साहित्य, ललिता आणि पुरचुंडीभर राख !
साहित्य असाच एका रविवारी फेसबुकवर चाळवाचाळव करत असताना त्याला त्या ३.५ बीएचके फ्लॅटची जाहिरात दिसली. एका बंगल्याच्या पुनर्विकासानंतर सहकारनगर सारख्या सभ्य आणि सुसंस्कृत भागात असलेला फ्लॅट "निदान बघून तरी येऊ" असे म्हणून तो, ललिता आणि लेखना तो फ्लॅट बघायला गेले.
चकाचक इमारत,
२ कार पार्किंग्स.. आणि तेही अगदी लांब लचक कार सहज आत बाहेर येऊ जाऊ शकेल अशा..
प्रशस्त हॉल ... सॉरी सॉरी - लिविंग रूम... मोठाल्या बेडरूमस ....
वॉशिंग मशीन आणि डिश वॉशर सहज बसेल आणि तरीही जागा उरेल असे स्वयंपाकघर ... सॉरी सॉरी - मॉड्युलर किचन ...
प्रत्येक बेडरूमला मध्यम बाल्कनी ..
लिविंग ला मोठ्ठी गॅलरी ... उन्हाळ्यात पापड कुरडया वाळवत घालायला मस्त ... सॉरी सॉरी ... संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर काचेच्या गोल टेबलाभोवती चेयर्स टाकून बियर चे घोट मारत बसायला मस्त !
समोरच तळजाईचा पावसाळ्यात हिरवी चादर नेसलेला डोंगर ...
त्यातली एक बेडरूम लेखनाने मनात ठरवून टाकली ... आणि साहित्य ला म्हणाली "बाबा ही बेडरूम माझी ... बाकी तुम्ही तुमच्या निवडा ". साहित्य ललिता आणि तो बिल्डरचा माणूस हसू लागले.
तिघांच्या स्वप्नातला फ्लॅट ...
जागा दाखवणाऱ्या बिल्डरच्या माणसाला साहित्य आणि ललिता "किंमत किती" ते सारखे विचारात होते ... पण तो पठ्ठा काही किंमत सांगायला तयार नव्हता ... "साहेब आधी तुम्ही फ्लॅट बघुन घ्या हो पैशाचे काय नंतर खाली ऑफिसात बोलू".
तो स्वप्नातील फ्लॅट पाहून ते तिघे बिल्डरच्या ऑफिसात आले. मस्त कॉफी त्या माणसाने आणून दिली. [फ्लॅट बुक करेंपर्यंत अशीच कॉफी त्यांना मिळत राहते आणि एकदा फ्लॅटची अमाऊंट भरली की .... .... असो ]. त्या बिल्डरच्या माणसाने कॉफी झाल्यावर मग विषयाला हात घातला. आणि किंमत सांगितली. सहकारनगर सारख्या भागात असा फ्लॅट कितीला असेल याची दोघांना कल्पना होतीच. त्यामुळे फारसा धक्का त्यांना बसला नाही. आणि ते तर फक्त गंमत म्हणून फ्लॅट बघायला आलेले होते, घेणार थोडीच होते ?
बोलणी पूर्ण झाल्यावर ते तिघे घरी निघाले. घराकडे परतताना त्यांच्या हातात त्या स्कीमचे रंगेबिरंगी ब्रॉचर होते आणि मनात तो फ्लॅट. साहित्य आणि ललिता आता बऱ्यापैकी व्यवसायात स्टेबल होते. गेल्या १५ वर्षात केलेल्या गुंतवणुकीचा परतावा आता इन्ड मनी app मध्ये दिसत होता. लेखना चे मोठे खर्च अजून ३-४ वर्षे पुढे होते.
घरी आल्यावर साहित्यने विषय काढला. app मधून पोर्ट फोलिओ रिपोर्ट डाउनलोड केला. फार नाही तरी दीड एक कोट रुपये कमी पडत होते. दोघांच्या आई बाबांकडून २० -३० लाख रुपये मिळाले असते, दागिने विकून २५एक लाख आले असते आणि बाकीचे कर्ज काढता आले असते.
साहित्य सगळी गणिते ललिताला समजावून सांगत होता, ती ऐकत होती. तो फ्लॅट घेणे तसं जमण्यासारखे होते. मात्र आजवर जमवलेली सगळी पुंजी एकदम अशी खर्चायची का नाही हे काही ठरत नव्हते.
साहित्यने त्याच्या फायनांशियल प्लॅनर गोडबोलेला लगेच फोन केला, आणि असा फ्लॅट घ्यायचा विचार सुरु आहे असे सांगीतले. गोडबोलेने सगळा डेटा मागवून घेतला आणि उद्या कळवतो असे सांगितले.
त्या रात्री ..
साहित्य त्या फ्लॅट मध्ये छोटा बार कुठे बसेल याचा विचार करत होता.... आपल्या मित्रांना जेव्हा आपण हा फ्लॅट दाखवू तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आलेले भाव कसे असतील याचा तो विचार करत होता ... विशेषतः त्याच्यावर जेलस असणाऱ्या मित्रांना तो खास बोलावणारच होता त्या फ्लॅट वर [विशेषतः त्या कौस्तुभ पोंक्षे ला].
ललिता तिचे किचन मॉड्युलर किचन कसे असेल याची स्वप्ने रंगवत होती. तिची दिवाळीतील भिशी पार्टी सॉरी सॉरी ... किटी पार्टी कशी करायची याची स्वप्ने रंगवत होती. तिने तिच्या एका इंटेरियर करणाऱ्या मैत्रिणीला साडेतीन bhk साथीचे इंटेरियर ला किती खर्च येईल हेही विचारून घेतले होते.
लेखना मनातल्या मनात तिची बेडरूम सजवत होती. .. या भिंतीवर त्या BTS कोरियन बँड च्या अमक्याचा फोटो ,... त्या भिंतीवर तमक्याचा फोटो ...
दुसऱ्या दिवशी त्या गोडबोलेंचा फोन आला. त्याने साहित्यला पुढचे लेखनाचे खर्च, त्या फ्लॅटचा होणारा देखभाल खर्च, प्रॉपर्टी टॅक्स ही सगळी गणिते सांगितली. सर्वस्व विकून तुम्हाला फ्लॅट घेता येईल, नाही असे नाही, पण तुम्ही हे करू नये असे स्पष्ट सांगोतले. [ही पोंक्षे , गोडबोले मंडळी दुसऱ्याच्या मनाला काय वाटेल याचा विचार न करता इतकी रोकठोक कशी बोलू शकतात याचे त्याला नेहमी आश्चर्य वाटे.. ] . गोडबोले यांचे मत ऐकून साहित्य खट्टू झाला.
संध्याकाळी त्याने ललिताला आणि लेखनाला गोडबोले यांचे मत सांगीतले. साहजिकच दोघेही खट्टू झाले. साहित्य मात्र तो फ्लॅट आता घ्यायचाच या इरेस पडला होता. ललिता काहीच बोलत नव्हती. तिने आपण यावर उद्या बोलू असे सांगून तो विषय थांबवला. रात्री चुपचाप तिने तिच्या बाबांशी आणि साहित्यच्या बाबांशी फोन करून त्यांचे मत विचारले. दोघानींनी इतकी मोठी उडी नको असेच मत व्यक्त केले. पण तुमच्या दोघांचा हट्टच असेल तर आम्ही शक्यतेवढी मदत करूच असेही कळवले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच साहित्यने परत फ्लॅटचा विषय काढला. ललिताने आपण तो फ्लॅट घ्यायला नको असे मत सांगितले. मग त्यावर त्यांच्यात थोडी कडकड झाली. निर्णय काही झाला नाही. दोघंही तणतणत आपल्या कामाला निघून गेले.
दुपारी साहित्यला त्या बिल्डरच्या माणसाचा फोन आला की साहेब काय ठरलं तुमचे ? साहित्यने त्याला "आठ दिवसात कळवतो" म्हणून सांगितले. दरम्यान त्याने त्याच्या होम लोन देणाऱ्या मित्राला फोन करून काय डॉक्युमेंट्स लागतील ती विचारली आणि त्याच्या सॉफ्ट कॉपीज पाठवून पण दिल्या.
दरम्यान या फ्लॅट वरून दोघांत धुसपूस सुरूच होती. ललिता ठाम पणे हे करायला नको असे सांगत होती. लेखना आपण त्या फ्लॅट मध्ये कधी राहायला जायचे विचारू लागली.
शुक्रवार उजाडला. दुपारी ललिताचा फोन वाजला. वेदश्रीचा फोन होता. ललिता आणि वेदश्री खूप जुन्या मैत्रिणी. वेदश्री सध्या दुबईत जाऊन येऊन करत असे. म्हणजे बराच वेळ दुबई आणि कधीतरी एखाद आठवड्यासाठी पुण्यात.
"हाय डिअर" वगैरे नंतर वेदश्रीने फोन करण्याचे कारण सांगोतले. तिच्या एक दूरच्या काकू सिंहगड रस्त्यावर असलेल्या एका वृद्धाश्रमात होत्या. म्हणजे त्यांना तिथे बरेच महिने ठेवले होते. त्यांचे बहुदा जवळचे कोणीही नसावे. वेदश्रीच त्यांचे वृद्धाश्रमाचे पैसे पाठवणं, त्यांची औषधे पोहोचवणे , त्यांना काही खाऊ देणे असे करत होती, का ते माहित नाही.
या काकूंची औषधे संपली होती. आणि एकंदर तब्येत पण खालावली होती. तर वेदश्रीने ललिताला त्यांना प्लिज औषधे नेऊन देशील का असे विचारण्यासाठी फोन केला होता.
ललिताने विचार केला, उद्या शनिवारच आहे. तेव्हा ती आणि साहित्य त्या आश्रमात जाऊन त्यांना औषधे देऊ शकतात आणि तसेच पुढे खडकवासल्यापर्यंत जाऊन थोडे फ्रेश होऊन घरी येऊ शकतात. आणि सोमवार पासून सुरु असलेली धुसफूस पण तिला आता नको होती. साहित्याशी मोकळेपणाने बोलून रुसवा घालवू, असा विचार करून तिने वेदश्री ला होकार दिला. वेदश्रीने तिला त्या काकूंच्या औषधाची यादी पाठवली. आणि ललिता नको नको म्हणत असताना पेमेंट पण ऍडव्हान्स पाठवले. त्या काकूंना केळी आवडत असत, म्हणून जाताना जरा पिकलेली केळी डझनभर प्लिज ने असेही सांगितले.
संध्याकाळी ललिताने वेदश्री चा आलेला फोन आणि सांगितलेलं काम साहित्यच्या कानावर टाकले.
ही वेदश्री जरा साहित्यला आवडायचीच ... थोडं क्रश का काही असते ना ते .. तिचे काम म्हंटल्यावर तो लगेच तयार झाला. खडकवासल्याच्या चौपाटीवर पावसात कणीस खाताना ललिताला त्या फ्लॅट साठी आपण सहज कन्व्हिन्स करू शकू अशी एक संधीही त्याला दिसली. आणि वेळ पडली तर वेदश्री कडून ललिताला तो फ्लॅट घ्याबाबत पटवून देऊ अशी एक आयडिया सुचली.
त्याचा त्वरित आलेला होकार पाहून ललिता खुद्कन हसली. तो लगेच तयार होणार हे ललिताला माहित होते... कितीही असलं तरी ते वेदश्रीचे काम होते ... साहित्य नाही म्हणूच शकत नव्हता..
दुसऱ्या दिवशी दोघे कार ने न जाता ऍक्टिवावर निघाले. पाऊस आला तर भिजायला झालं तरी काय झाले ... दोघंही भिजलेले तेही एकाच स्कुटरवर... (हा अनुभव त्यांनी बरेच वर्षात घेतलाच नव्हता.)
वाटेत दांडेकर पुलापाशी त्यांनी डझन भर पिकलेली केळी घेतली. वेदश्रीने कोणत्या मेडिकल मधून औषधें घ्यायची हे सांगितले होतेच. ते मेडिकल त्या काकू जिथे होत्या त्या वृद्धाश्रमाच्या जवळच होते. बीटाडीन मोठी बाटली, १०० एक गाउस , भरपूर हॅन्डग्लोव्स, कॅन्डीड पावडर, डायपर अशी मोठी लिस्ट होती. एकंदरीत त्या औषधांवरून त्या काकूंना बेडसोर्स झाले असणार हे ललिताला मनात कळले. ते औषधांचे मोठे पार्सल ऍक्टिव्हाच्या पायाशी ठेवून ते आश्रमापाशी आले.
प्रत्येक वृद्धाश्रमाचा एक तीव्र वास असतो ... तिथल्या रुग्ण लोकांचे पॉटी , युरीन, डेटॉल, बेडसोर्स मध्ये झालेला पस, फिनेल, सॅनिटायझर्स या सगळ्यांचा मिळून एक सामुदायिक वास ... त्या वृद्धाश्रमाच्या इमारतीत शिरल्या शिरल्या तो वास दोघांच्या नाकात गेला ... लवकरात लवकर त्या काकूंना औषधे आणि केळी देऊन कधी इथून बाहेर पडतोय असे त्यांना झाले.
इथे काम करणारे दादा, मावशी, कर्मचारी याना या वासात रोज , काम करावे लागत असणार, इथे जे वृद्ध राहतात त्यांना २४ तास हा वास सहन करावा लागत असणार... दोघ्यांच्या मनात हेच विचार सुरु होते.
ते ऑफिस मध्ये बसून कोणी येईल म्हणून थांबले होते. त्या ऑफिसमध्येच बाजूला एक दादा एका आजींचे मशीनने केस कापत होता. बघता बघता त्या आजींचा लहान शेपटा होता तो अगदी बारीक केसात रूपांतरित झाला. मशीन बंद झाल्यावर तो केस कापणारा दादा आजींना म्हणाला "आजी चला वर, आणि नाही होणार उवा डोक्यात". आजींच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते, त्या निमूट पणे उठल्या आणि त्या दादाला धरून जिना चढून वर गेल्या.
बाजूला पडलेल्या त्यांच्या कापलेल्या शेपट्याकडे ललिताची नजर गेली. नकळत तिचा हात तिच्या केसांवरून फिरला. (मागल्या आठवड्यातच तिने ३००० रु खर्चून केसांचे स्ट्रेटननिंग केले होते.)
काही मिनिटात एक मामा [त्या व्यक्तीचे तिथले टोपण नाव] आले. ललिताने त्यांना आम्ही अमुक काकूंसाठी आलोय असे सांगतिले. त्यांची औषधे त्या मामांकडे दिली. मामानी त्या आजींना सिव्हियर बेड सोर्स झालेत असे सांगितले. "आम्ही रोज तीनदा ड्रेसिंग करतो. आजी उठत नाहीत म्हणून बेडसोर्स वाढतच आहेत. चला तुम्हाला दाखवतो. वेदश्री मॅडमला कालच कल्पना दिलीये" असे मामा म्हणाले. "आजीना अर्ध्यातासापूर्वीच दूध पोळी कुस्करून खाऊ घातलीय."
औपचारिकता म्हणून त्या काकूंना भेटणे भाग होते. सोबत आणलेली केळी घेऊन मामांच्या मागे ते दोघे गेले. दुसऱ्या मजल्यावर एका खोलीत ते तिघे शिरले. तो वास अधिक तीव्र झालेला होता. ललिताने "मला ते बेड सोर्स बघायचे नाहीयेत , मला ते सहन होणार नाही" सांगितले. मग मामानी त्या काकूंना जागे केले आणि ते दुसऱ्या कामाला निघून गेले.
त्या काकू म्हणजे आजीच होत्या. ७५ ते ८० वय असेल. त्यांना उठता येत नव्हते. कण्हत त्या म्हणाल्या "वेदश्री का ?"
ललिता उत्तरली " नाही आजी मी तिची मैत्रीण, ललिता". वेदश्री दुबईत आहे, म्हणून मी आले औषधें घेऊन."
काकूंनी विचारले " केळी आणलीत का ? मी वेदश्रीला सांगितले होते"
ललिताने सोबत आणलेले एक केळे थोडे सोलून एक घास काकूंच्या तोंडात दिला. तो तोडून काकू चावू लागल्या.
दरम्यान साहित्य आणि ललिता त्या खोलीतील इतर आजींकडे पाहू लागले. साधारण २०० स्के फूट चा हॉल होता आणि त्यात या आजींबरोबर ३-४ पेशंट होते.
एक आजी पोथी वाचत होत्या ..
एक जप करत होत्या ..
त्यापलीकडे दोन आज्या भांडत होत्या. एकीला उकडत होते म्हणून फॅन हवा होता, तर दुसरीला थंडी वाजत होती म्हणून फॅन नको होता. एक आजी उठून फॅन लावी , की लगेच दुसरी उठून तो बंद करी. तीन चार वेळा हा प्रकार झाल्यावर फॅन नको असलेल्या आजी मोठ्याने रडायला लागल्या ... "काय करू ? ही सटवी ऐकतच नाही ... मला थंडी वाजतेय ... डोक्याला फॅन नाही सहन होत.. डोक्यावरून पांघरून घेतले की श्वास कोंडतो... आहो मामा , ओ मामा हिला जरा सांगा ना ... " असं म्हणून त्या रडत होत्या ...
प्रत्येकाला एक खाट, त्या शेजारी एक स्टूल, त्यावर त्या पेशंटची औषधे ... इतकच त्या प्रत्येकाचे जग ... लगेचच साहित्य च्या डोळयासमोर तो सहकारनगरचा फ्लॅट तरळला ..
मनात विचार आले "आपण एक bhk , दोन bhk असं करत आज ४ bhk पर्यंत आलो ... पण या प्रवासात आपण कधीच सुखी का नव्हतो ? ज्याचा एक bhk आहे त्याला दोन हवाय ... ज्याचा दोन आहे त्याला तीन हवाय आणि ज्याच्या तीन आहे त्याला बंगला हवाय .... कोणीच सुखी नाही ..."
आणि या सगळ्या प्रवासाचा शेवट काय ? एक खाट , शेजारचे स्टूल आणि त्यावरील औषधें ??"
ललिताला जाणीव झाली ... आपण त्या काकूंना केळे भरवत होतो ... दुसरा घास द्यायाला तिने त्यांच्या कडे पहिले ...
पहिला घास काकूंच्या तोंडांतून बाहेर पडला होता... डोळे पांढरे झाले होते ... हात ताठ झाले होते.. ललिताच्या तोंडातून अस्फुट किंकाळी आली ...
साहित्यने मामाना आणले. इतक्या वर्षांच्या अनुभवावरून मामा काय ते समजले. "सुटल्या बिचाऱ्या " दोघांकडे बघून ते म्हणाले.
त्यांनी त्या आश्रमाच्या डॉक्टरना बोलावून घेतले ...
साहित्यने ललिताला खाली ऑफिसात आणले. ती सावरली होती. तिने वेदश्रीला फोन व्हॅट्सप करून दुःखद बातमी दिली. वेदश्रीने गुगल मीट वरून ललिताला फोन केला. वेदश्रीला हे अपेक्षित असावे .. तिला फार धक्का बसलेला दिसला नाही ... (कदाचित तिलाही आपण सुटलो असेच वाटले असेल का?)
आता खरा प्रॉब्लेम होता पुढचे कोण करणार त्याचा? काकूंचे दुसरे कोणीच नव्हते. वेदश्री म्हणाली मला यायला उद्या सकाळ तरी होईल .. तोवर काकूंना जवळच्या mortuary मध्ये ठेवायची व्यव्यस्था करशील का प्लिज ?
ललिता समोर काही पर्याय नव्हता .. ती हो म्हणाली .
डॉक्टर आले आणि त्यांनी डेथ सर्टिफिकेट लिहून दिले. पण mortuary ठेवू नका, लवकर आटपा म्हणाले. मग पुन्हा वेदश्री बरोबर फोनाफोनी झाली, आणि पुढचे सगळे साहित्य आणि ललिता यांनाच करावे लागणार होते हे ठरले. ऍम्ब्युलन्स आली. खालच्या चादरीसहित [मृत] काकूंना ऍम्ब्युलन्स मध्ये ठेवले. ललिता ऍम्ब्युलन्स मधून थेट वैकुंठ स्मशानात जाणार होती. साहित्य पाठोपाठ ऍक्टिवावर.
रुम मधून बाहेर पडण्याआधी साहित्यने त्या खाटेकडे एकदा पहिले .. आता ती रिकामी होती ..
काही वेळाने मामा तेथे येतील .. वरची गादी सॅनिटाईझ करतील ... कदाचित जाळूनही टाकतील... स्टूलावरची काकुंची औषधे आता डस्टबिन मध्ये जातील .. स्टूल पण रिकामे होईल ...
पुन्हा अशाच कोणत्यातरी आजी किंवा काकूंना शेवटची साथ देण्यासाठी ...
साहित्यच्या मनात ऍक्टिव्हा वरून वैकुंठाकडे जाताना विचार सुरु होते ....
"तुम्ही कितीही कमवा , कितीही मोठा फ्लॅट , बंगला घ्या .. शेवट हाच ... एक खाट आणि शेजारचे स्टूल... ... आणि त्यानंतर देह जळाल्यावर उरणारी पुरचुंडी भर राख "
कौस्तुभ पोंक्षे
८००७६०५०८२
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments