Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

संगीत देवबाभळी : एक हृदयस्पर्शी नाटक

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/19/2025 - 05:53
💬 18 प्रतिसाद

काल संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात 'संगीत देवबाभळी' नाटकाचा प्रयोग होता. नाट्यगृह संपूर्ण भरलेलं. अनेकांना वेळेवर तिकीट मिळेल या अपेक्षेनेआलेल्या अनेक रसिकांचा हिरमोड झालेला दिसला. गर्दी तुडुंब. २०१८ पासून यानाटकाचे प्रयोग होत आहेत. जवळ जवळ सहाशेच्या आसपासचा हा प्रयोग होता. एकाच दिवशी दोन प्रयोग आमच्या शहरात होते.

sangeet-devbabhali-marathi-natak-coverv2-1536x864
संगीत देवबाभळी

दोन स्त्रियांची ही कथा आणि दोनच पात्रांचं हे सांगीतिक नाटक. यातल्या दोन्ही स्त्रिया विशेष आहेत. एक संत तुकारामाची पत्नी आवली आणि दुसरी विठ्ठलाची पत्नी रखुमाई. या दोन स्त्रियांच्या मनातला परस्पर संवाद म्हणजे हे नाटक. आपापल्या आयुष्यात मनामनाचं ओझं घेऊन वावरणा-या ही केवळ त्या दोन स्त्रियांची कथा नाही. समस्त् स्त्रियांचीच ही कथा वाटायला लागते. एक साक्षात विठ्ठलाची पत्नी आणि दुसरी एक कजाग म्हणून नावारूपास असलेली पण तितकीच प्रेमळ संत तुकारामाची पत्नी आवली.

नाटक सुरू होतं ते ‘अंधाराला दिशा नाही' या गायनाने आणि मग, भंडारद-याच्या डोंगरात नव-याला शोधायला निघालेल्या आवलीच्या प्रवासाने. आपल्या नवऱ्याला शोधत रानोमाळ फिरणाऱ्या आवलीच्या पायात देवबाभळीचा काटा रुततो, तो काढण्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाला अशा या कथेच्या कल्पनेचा विलास सुरु होतो. आवलीच्या पायात काटा रुततो आणि तिची शुद्ध हरपून जाते. आवली जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा तीस्वत:च्या घरात असते. रखुमाई उर्फ लखुबाय तिच्या घरात स्वयंपाक करत असते. आवलीच्या स्वचा शोध सुरु होतो. आपल्या घरात ही कोण आहे. मी इथे कशी आली. संवाद होता होता, दोघीही भांडण करता करता बहिणीप्रमाणे कधी प्रेम व्यक्त करायला लागतात ते आपल्या लक्षातही येत नाही. दोघीही आपल्या मनातली सल व्यक्त करायला लागतात.

आपल्याला हे दोघेही पुरुष कसे दुर्लक्ष करतात असे वाटून दोघीही त्रागा करतात. विठ्ठलाने एका सामान्य स्त्री असलेल्या आवलीच्या पायात रुतलेला काटा काढण्यासाठी यावं ? या गोष्टीची मनावर झालेली जखम आवलीच्या पायात रुतलेल्या काट्यापेक्षा मोठी रखुमाईला वाटायला लागते. पोटूशी असलेल्या आवलीच्या घरात रुखुमाई तिची सेवा करते. आवलीच्या पायाची जखम त्रास असल्यामुळे संपूर्ण नाटकभर आवली तिरपा पाय करत लंगडत चालते. भक्तांच्या प्रेमात पडलेला 'विठ्ठल' आणि विठ्ठलाच्या नादात पडलेला 'तुकाराम' या दोघांचाही शोध 'आवली' आणि 'रखुमाई' घेतात. नाटक हळूहळू मनाची पकड घेत पुढे सरकत जाते.

लखुबाई आणि आवली या दोघामध्ये रंगमंचावर संवाद सरू असतात. संवाद, गायन, संगीत, अभंगाचा आनंद घेणं ही यानाटकातली एक गोड पर्वणीच आहे. सर्वसामान्य स्त्रीया ज्या भावना व्यक्त करत असतात त्याच आवली आणि प्रत्यक्ष रखुमाई यांच्या आहेत. सर्वसामान्य महिला यांच्या मुखातून अधून-मधून एक प्रसिद्ध वाक्य येत असते. 'माझ्यामुळे चाललंय हे सगळं' दुसरीकोणी असती तर आतापर्यंत सोडून गेली असती' अशी तक्रार रखुमाई सुद्धा करते. रखुमाईच्या तोंडी हे वाक्य जेव्हा येते तेव्हा नाट्यग्रुहात प्रेक्षकांच्या गाली हलकी खसखस पिकते आणि टाळ्यांचा कडकडाटही होतो. सामान्य स्त्रीचं जे दु;ख आहे, त्या दु⁚खाचं चित्रण इथे यायला लागतं. दिवसरात्र 'पांडुरंग पांडुरंग' करणारा नवरा आणि संसारात त्यामुळेच ही दशा आलेली आहे, तसा असूनही त्याची काळजी करणारी सामान्य स्त्री आवली. तिच्या दुःखाला, मनातल्या भावनेला, वाचा फोडते. स्त्रीच्या दुःखाला पारावर नसतो. स्त्रीच्या मनाचा विचार दोघेही करीत नाही अशी एक सल दोघींच्या मनात उमटते. साहित्यातील स्त्रीवादाची जाणीव येथे होते ( हे राम )

कृष्णाने द्वारकेत आल्यानंतर राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रुक्मिणी रुसून दिंडीरवनात आली. कृष्णावर रुसून दिंडीरवनात आलेली रुक्मिणी म्हणजेच रखुमाई उर्फ लखूबाई जी आवलीच्या घरात येते. विठ्ठलावर रागावून वेगळी आणि एकटी असलेली लखूबाईचं दुःख आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या नामस्मरणात आणि अभंग लेखनात घर दार विसरून दिवस रात्र विठ्ठल नामात रंगलेल्या तुकारामांमुळे घरात एकटीच असलेली आवली दोघींची व्यथा एकच. आपल्या नवऱ्याला दुसरीने नावं ठेवली की दोघीही एकमेकांवर खवळून उठतात. आवलीची सेवा करताना, सतत तिच्या मुखातूनआपल्या नवऱ्याला मिळणाऱ्या शिव्या ऐकण्याची दुहेरी कसरत लखुबाईला करावी लागते त्यावेळीचे हावभाव अप्रतिम आहेत.

एकदा तर, लखूबाई आवलीला विचारते, ‘’सुखवस्तू माहेर असताना या अठरविश्र्व दारिद्र्य असलेल्याघरात, तू का पडून राहिलीस ? का नाही सोडून गेलीस हे घर ? त्यावरचं आवली लखुबाईला म्हणते, ‘’रागावून निघून जायला मी रखुमाई थोडीच आहे. आणि मी निघून गेल्यावर यांची काळजी कोण घेणार ? निघून गेल्यावर पुन्हा परतावं असं वाटलं आणि आपलं घरच हरवून गेलेलं असलं, तर काय करायचं बाई ? अतिशय मार्मिकआणि आजच्या काळातही लागू व्हावा असा प्रश्न आणि असे उत्तर. तर, युगायुगाचा अबोला आहे, असं रखुमाई बोलते तेव्हा आवली तिला म्हणते. ‘’असं रुसल्यावरसोडून जायचं असतं व्हय बये ? घरावर रुसून निघून गेले, आनी परत यायची इच्छा झाली तेव्हा घर जागेवर नसलं तर.? मानूस इसरून जाईल इतका अबोला बरा न्हाई आई ”

तुकारामाची आवली ही कडकड करणारी, विठ्ठलाला लटक्या रागाने शिव्या देणारी आणी तितकीच प्रेमळ. तुकोबांनी रखुमाईला‘आई’ म्हटल्याने रिलॅक्स झालेली आवली. आणि काटा काढायचं निमित्त करून विठ्ठलाकडे संशयाने पाहणारी रखुमाई. स्त्री सुलभ भावनांच्या छटा या नाटकातही अतिशय सुंदर आल्या आहेत. पांडुरंग भक्तांवर इतका आणि का असा कसा प्रेम करतो ते बघायला आलेली लखुमाय. आयुष्यातली सगळी ओझी टाकून मनसोक्त पावसात भिजले पाहिजे. 'तू पहिल्यांदा पावसात केव्हा भिजली होती' असे आवलीला विचारणारी रखुमाई. आणि आता पुन्हा एकदा पावसात भिजूया हा प्रसंग सुंदर उभा केला आहे. प्रेक्षकांच्या टाळ्यांनी डोळ्यांची कड ओलावून नाट्यगृह भिजून जाते.

लेखक दिग्दर्शक, प्राजक्त देशमुख आहेत. प्रसाद कांबळी निर्मीत 'संगीत देवबाभळी' यात आवलीची भूमिका शुभांगी सदावर्ते यांनी तर, रखुमाई उर्फ लखुमाय मानसी जोशी यांनी केली आहे. अप्रतिम अभिनय, प्रकाश, नेपथ्य, गायन, संगीत यांचं एक उत्तम नाटक बघायला मिळतं. तुकाराम प्रत्यक्ष रंगमंचावर न येता केवळ 'पांडुरंग पांडुरंग' या ध्वनीने येणारा तुकाराम, इंद्रायणीचा काठ, स्वयंपाकघर, नेटकं अप्रतिम नेपथ्य आणि तितकीच उत्तम प्रकाशयोजना.

नाटक संपल्यानंतर संपूर्ण नाटकभर आम्ही दोघींनी सर्वच गायन केलं आहे, हे सांगितल्यावर पुन्हा टाळ्यांचा कडडाट होतो. आवली रखुमाईला ओळखते का ? आणि रखुमाईला विठ्ठल इतकी भक्तांची का काळजी करतो त्याची उत्तर मिळतात का ? त्यासाठी नाटक बघितले पाहिजे. एकाच दिवशी दोन प्रयोग. नाटकही करायचं. नाटक संपल्यानंतर दोन्हीही कलाकार प्रेक्षकांना भेटतात, संवाद करतात. सर्वांना तितक्याच उत्साहाने बोलतात. आम्हीही भेटून घेतलं, फोटोही काढला. दोघींच्या कामाचं कौतुक केलं. अशी कौतुकं कितीदा तरी त्यांनी ऐकली असतील पण त्यांचं आवर्जून भेटणं, बोलणं रसिक म्हणून आनंद देऊन जातो ‘’ ये गा ये गा विठ्ठला ये गा येई गा विठ्ठला | प्राण हा फुटला आळविता || ये गा येई गा विठ्ठला’’ पडदा.


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5129 views

💬 प्रतिसाद (18)
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 06/19/2025 - 06:53 नवीन
उल्लेखित रंगमंदिर बनवण्यात माझे वर्गमित्र, लंगोटीयार म्हंजे खरोखरच लगोंटीतला मित्राची आठवण झाली. चित्तरंजन चांदेकर, वास्तुशास्त्रज्ञ. याचा सहभाग होता.समर्थ नगर मधे व्यवसाय होता. बाकी अशाच प्रकारच्या कथानकावर मकरंद अनासपुरे यांचा एक चित्रपट आहे. नाटक सुदंर आहे यात शंकाच नाही. बादवे प्रसाद कांबळी मच्छिंद्र कांबळी यांचे सुपुत्र,भद्रकाली मुळे मच्छिंद्र कांबळी यांच्याशी काही काळ संपर्क आला होता.थेट कोकणी अगदी फणसा सारखाच कलाकार माणूस. लेख आवडला. नाटक बघीतले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/19/2025 - 16:34 नवीन
तुमचं हे लेखन वाचताना असं वाटलं की, आपण एखाद्या प्रयोगाला प्रत्यक्ष बसलोय, आणि समोर आवली आणि रखुमाई यांचा हृदयात झिरपणारा संवाद, गान आणि अभंगाचे सुर ऐकत आहोत. सांगीतिक नाटकाचे रसग्रहण एवढ्या नेणिवेने, सहानुभूतीने आणि सौंदर्यदृष्टीने करणं ही सहजसाध्य गोष्ट नाही. नाटकाचा केवळ सारांश न देता, तुम्ही त्यामागचा भाव, अध्यात्म, स्त्रीचे समाजातील स्थान, भक्ती आणि भक्ताच्या घरातील स्त्रीचे वास्तव यांचा उहापोह करत नाटकाच्या सर्जनशीलतेला आणि सामाजिक समर्पकतेला तुम्ही उजाळा दिला आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 07/07/2025 - 22:15 नवीन
प्रचेतस यांच्या प्रतिसादाशी सहमत. खूपच सुंदर लिहीले आहे. नाटक कधी बघायला मिळेल (का) - कुणास ठाऊक.
  • Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर Fri, 06/20/2025 - 02:37 नवीन
सुंदर परीक्षण!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 06/20/2025 - 06:27 नवीन
आपण लिहिलेले एखादे पुस्तक परीक्षणही वाचायला आवडेल. कृपया मनावर घ्यावे. मिपावरील काही जडजंबाल व टायपोग्रस्त परीक्षणे व त्यावर दिलेले "चांगलं लिहलंय" असे प्रोत्साहनपर प्रतिसाद वाचून परीक्षणांच्या वाटेला जायचे बंद केले होते.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 06/20/2025 - 08:23 नवीन
उत्तम रसग्रहण.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 06/20/2025 - 10:18 नवीन
लिहिते रहा वाचतोय पुलेशु ~मारवा
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 06/20/2025 - 10:41 नवीन
तुकारामाची आवली ही कडकड करणारी, विठ्ठलाला लटक्या रागाने शिव्या देणारी आणी तितकीच प्रेमळ. तुकोबांनी रखुमाईला‘आई’ म्हटल्याने रिलॅक्स झालेली आवली. आणि काटा काढायचं निमित्त करून विठ्ठलाकडे संशयाने पाहणारी रखुमाई. स्त्री सुलभ भावनांच्या छटा या नाटकातही अतिशय सुंदर आल्या आहेत आपल्या नवऱ्यावर संशय असणे ही भावना स्त्रीसुलभ आहे ? नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी स्त्री खरे म्हणजे नवऱ्याविषयी अजिबात insecurity न वाटणारी स्त्री अशा स्त्रियांचे वर्तन स्त्रीसुलभ नसते का ? तुम्ही लेखात स्त्रीवादाची जाणीव वगैरे म्हटले म्हणून विचारतोय आजकाल polyamory किंवा Ethically non-monogamous (ENM) पर्यंत स्त्री पुरुष संबंधांनीं प्रवास केलेला आहे. आणि आज तुम्हाला प्रा डॉ दिलीप बिरुटे. ना स्त्रियांनी नवऱ्याचा संशय वगैरे घेणे स्त्रीसुलभ वाटते का ?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 06/20/2025 - 11:55 नवीन
एकदम बरोबर !
नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी स्त्री खरे म्हणजे नवऱ्याविषयी अजिबात insecurity न वाटणारी स्त्री अशा स्त्रियांचे वर्तन स्त्रीसुलभ नसते का ?
पण एक निरीक्षण ज्या स्त्रीला आपल्या पार्टनरकडून प्रेम मिळत नाही तीच संशय घेते. उलटपक्षी प्रत्येक प्रामाणिक असो वा नसो पुरूष 'आपल्या स्त्री ' बाबत जरा संशयी(possesive)दिसतो...संशय हे पुरूषी अहंकाराची बाजू असते अनेकदा.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 06/20/2025 - 12:47 नवीन
स्त्रीसुलभ म्हणजे स्त्री च्या बाबतीत "अहो हे तर अगदी स्त्रियांच्या बाबतीत साहजिकच असतं ना " अशा अर्थाने taken for granted आहे. स्त्री सुलभ ची उदाहरणे स्त्री चे लाजणे ( सर्वात वरचा क्रमांक ) स्री ने वारंवार भावूक होऊन अश्रू गाळणे स्त्री ने सदा सर्वदा सौंदर्यकेंद्रित सौंदर्यचिंतीत असणे (कारण तीच एकमात्र ॲसेट हा एक norm) वगैरे वगैरे गंमत म्हणजे उच्चशिक्षित मंडळी सुद्धा......ते खर म्हणजे आपल्या सर्वांच्या मानसिकतेत इतक्या खोलवर रुजलेलं आहे की .... असो
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 07/07/2025 - 22:25 नवीन
आणखी एक 'स्त्रीसुलभ' गोष्ट म्हणजे, नवरा घराबाहेरच्या जगात कितीही, विद्वान, हुषार, पराक्रमी वगैरे वगैरे मानला जात असला तरी तो अगदीच 'हे' आहे ('हे' म्हणजे काय, ते वाचकांवर सोपवतो) असे (त्याला-) वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करणे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/20/2025 - 13:21 नवीन
'संशय' या शब्दाला आपण स्त्री 'सुलभ' भावना समजले आहात असे वाटते. नाटकातील ज्या विविध भावभावनांच्या छटा आहेत त्यासाठी ते लिहिले आहे. समस्त स्त्रियाच संशयीच असतात असे त्यातून अधोरेखीत झाले असेल तर तो माझा लेखन दोष समजावा. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. -दिलीप बिरूते
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/20/2025 - 13:26 नवीन
मिपाकर आणि वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभारी आहे. आपल्या लेखन प्रोत्साहानामुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो. तहेदिलसे शुक्रिया...! -दिलीप बिरूटे
  • Log in or register to post comments
न
नपा Sun, 06/22/2025 - 07:14 नवीन
नाटकाच्या परीक्षणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद अप्रतिम ओळख करून दिलीत. संधी मिळाल्यास हे नाटक नक्की पाहीन.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 06/30/2025 - 09:52 नवीन
वा मास्तर व्व्वा. चांगल्या विषयावर चांगलं लिहिलाय की तुम्ही. आवडले. अ‍ॅक्चुअली माझ्या आयुष्यात स्टेजवरची नाटके बघायचा योग दुर्मिळच. आईबाबासोबत बार्शीला सिल्व्हर जुबली ला एकदा 'तो मी नव्हेच'. आणि बायकोसोबत एकदा बालगंधर्व ला 'वाडा चिरेबंदी' इतकीच संपत्ती. पण कोण जाणे दोन म्हिन्यापूर्वी चिंचवडात रामकृष्ण मोरे ला दुपारचा प्रयोग होता. लेकराला सांभाळणार्‍या ताईकडे लेकराला तीन तास सोपवुन बायकोला हपिसातून उचलले आणि देवबाभळीचा प्रयोग पाहिलाच. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. कशाबद्दल बोलावे आणि लिहावे. सगळेच अगदी नजर लागण्याजोगे. . पुन्हा जमेल तसे, जमेल तेंव्हा देवबाभळी बघायचेच हा संकल्प करुन आलोय. बघू आता योग येतोय का.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 06/30/2025 - 10:41 नवीन
हे नाटक कधीपासून बकेटलिस्टमध्ये आहे. आता तर पाहायची अजूनच ईच्छा झाली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/05/2025 - 05:01 नवीन
नपा, श्वेता२४, आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार. अभ्याचाही प्रतिसाद पाहून डोळे पाणावले. येत जा हो अभ्याशेठ. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 07/07/2025 - 15:56 नवीन
डॉ दिलीप बिरुटे सरांना धन्यवाद. भरतवाक्य: युगांतरानेही मानवी मनाचे नाट्य असेच! इतक्या वर्षांनी या संगीत नाटकाची आठवण करून दिल्याबद्दल. ज्यांच्याबद्दल तक्रार आहे, ते गायब आहेत खरे, पण दोघींच्या व्यथा मात्र सारख्याच - "नवरे आमच्या मुठीत नाहीत!" असो. कितीही युगे लोटली, मानवी मन कितीही हळवे झाले तरी, हे जीवननाट्य असेच चालत राहणार...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा