Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

खगोलविश्वातील अढळ तारा: नारळीकर सर!

म
मार्गी
Wed, 05/21/2025 - 10:56
💬 10 प्रतिसाद
नमस्कार. डॉ. जयंत नारळीकर गेले! अनेकांना ज्यांच्यामुळे खगोलशास्त्र कळालं ते नारळीकर सर! विदेशात उच्च पदावर असूनही प्रवाहाविरुद्ध भारतामध्ये विज्ञान प्रसारासाठी आलेले नारळीकर सर! संशोधक, शिक्षक आणि विज्ञान प्रसारक! त्यांना दोनदा भेटण्याचा मला योग आला होता. त्यांची पत्रंही आली होती. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. तो दिवस स्पष्ट आठवतो. २२ जानेवारी १९९५! परभणीतल्या अ. भा. साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस. माझ्या एका मोठ्या मित्राने मला "प्रेषित" ही नारळीकर सरांची कादंबरी घ्यायला सांगितलं. तेव्हा माझं वय दहा होतं. ही विज्ञान कादंबरी वाचताना अंगावर शहारे येत गेले! त्याच रात्री पूर्ण झाली आणि एक नवीन जग कळालं. परकीय जीवसृष्टीचा शोध, आधुनिक वैज्ञानिक प्रगती, राक्षसी तार्‍यावरील परिस्थिती, विज्ञानातल्या इतर गमती आणि अतिशय गूढ कथानक! पुढच्या वर्षांमध्ये ह्या कादंबरीची ३५ तरी पारायणं केली. ती वाचल्यावर सरांना पत्रही लिहीलं आणि विशेष म्हणजे त्यांचं उत्तरही आलं! प्रेषितनंतर "व्हायरस" कादंबरीवर प्रतिक्रिया दिली तेव्हाही त्यांचं दुसर्‍यांदा पत्र आलं होतं! नंतर "यक्षांची देणगी", "अंतराळातील स्फोट", "अंतराळातील भस्मासूर", "वामन परत न आला", "टाईम मशीनची किमया", "अभयारण्य" अशा त्यांच्या विज्ञान कादंबर्‍या व कथासंग्रहही खूप आवडले. "आकाशाशी जडले नाते" हे विज्ञान पुस्तक मात्र समजायला जड गेलं. त्यांच्या कादंबर्‍यांमधून व कथांमधून विज्ञान मात्र खूप आवडत गेलं आणि गोडी लागत गेली! त्यातूनच १९९७ मध्ये आठवीत असताना मी वर्षभर "आकाश" नावाचं खगोलावरचं पाक्षिक सुरू केलं होतं. ते आयुकाच्या ग्रंथालयात गेलं होतं.  हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल. मार्च १९९९ मध्ये नारळीकर सर नांदेडला आले होते. तेव्हा त्यांचं व्याख्यान ऐकलं. त्यांना जवळून बघता आलं. माझा मामा नंदन फाटक आणि मामाचे मित्र डॉ. राम मोहन राव सर ह्यांच्यासोबत नारळीकर सरांना भेटताही आलं. राव सरांच्या मोठ्या दुर्बिणीतून गुरू ग्रह मला सेट करून दाखवता आला होता! नंतरही एकदा त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं. नारळीकर सरांच्या संशोधनाच्या संकल्पना व तांत्रिक बाबी तेव्हा समजणं शक्यच नव्हतं आणि आताही‌ ते समजणं कठीणच आहे. पण एक वैज्ञानिक आणि माणूस मात्र हळु हळु कळत गेला. मग ते २४ ऑक्टोबर १९९५ च्या सूर्यग्रहणाच्या वेळेस त्यांनी दूरदर्शनवर केलेलं मार्गदर्शन असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी सांगितलेल्या विज्ञानातल्या गमती व किस्से असतील. त्यांच्या तशा कॅसेटसही होत्या. माझ्यासारख्या कित्येकांना खगोलशास्त्राची आवड त्यांच्यामुळेच लागली हे नक्की. खगोलशास्त्र व विश्वरचनाशास्त्र (कॉस्मोलॉजी) हे त्यांचे मुख्य विषय. म्हणूनच ते भारतीय खगोलविश्वाचे जणू अढळ तारे बनले. खगोलशास्त्र व विज्ञान प्रसाराचा चेहरा बनले. विज्ञानावरची पुस्तकं व कथांसोबत त्यांच्या "चार महानगरातले माझे विश्व" ह्या आत्मचरित्रामधूनही विज्ञार्थ्यांना खूप मेजवानी मिळत गेली. त्यांच्या कथांमध्ये व पुस्तकांमध्ये कूट प्रश्न व गणिती संदर्भांची रेलचेल असायची. उदा., १५३ संख्येमध्ये एक विशिष्ट गुणधर्म आहे व तोच गुणधर्म ३७०, ३७१ आणि ४०७ मध्ये आहे. किंवा १ + २ + ३ ..... + १०० ह्या अंकांची बेरीज करण्याची सोपी पद्धत शोधणे! किंवा एका मोठ्या सतरंजीवर एका चादरीवर ठेवलेला चेंडू चादरीला स्पर्श न करता उचलणे! ६० अंश उत्तर ह्या ठिकाणी विमान पश्चिमेच्या दिशेला उडत असेल व त्याची गती पृथ्वीच्या ६० अंशावरील परिवलन गतीहून जास्त असेल तर सूर्यास्त झाल्यानंतरही‌ सूर्य पश्चिमेला उगवल्याचा अनुभव येऊ शकतो! त्यांच्या लहानपणीची आठवण- ते विद्यार्थी असताना घरामध्ये फळ्यावर रोज गणितातले कूट प्रश्न- कोडी लिहीलेली असायची! ह्या सगळ्यांमधून नारळीकर सर विज्ञानाचे व बुद्धीला धार लावण्याचे बाळकडू द्यायचे. त्यांच्या लेखनामध्ये ही मेजवानी मिळते. कालांतराने टीआयएफआर (Tata Institute of Fundamental Research), आयुका (Inter University Centre for Astronomy and Astrophysics), GMRT (Giant Meter Wave Radio Telescope) व इतर संस्था- प्रकल्पांमध्ये त्यांचं योगदान किती मोठं होतं हे कळत गेलं. फ्रेड हॉयलसारख्या जगातल्या सर्वोत्तम वैज्ञानिकांसोबत संशोधन करण्याचा राजमार्ग त्यांच्यापुढे होता. असंख्य शैक्षणिक पुरस्कार, स्कॉलरशिप्स व फेलोशिप्स त्यांना मिळाल्या होत्या. पण तरीही, त्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना १९७२ मध्ये म्हणजे वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी भारतामध्ये येऊन टीआयएफआरमध्ये काम सुरू केलं. प्रवाहाविरुद्ध येणं सोपं नव्हतं. त्यांना खूप अडचणी आल्या. भारतात येऊन राहणं- संसार सुरू करणं कष्टाचं गेलं. इथे प्रत्येक ठिकाणी "लाल फीत" संस्कृती होती, नोकरशाही होती. पण तरीही ते शांतपणे कार्यरत राहिले. टीआयएफआरमध्ये १६ वर्षं काम करून तिथे सुस्थितीत असताना १९८८ मध्ये परत एकदा आयुकाच्या रूपात पुण्यातली नवीन सुरूवात त्यांनी केली! आकाशाच्या उंचीची प्रतिभा आणि तेज असूनही जमिनीवर उभे राहिले. त्यांच्या सहकार्‍यांच्या, मंगलाजींच्या व इतरांच्या आठवणींमधून त्यांच्यातल्या विनम्र माणसाचं दर्शन घडतं. त्यांचा साधेपणा, शिस्त आणि आपल्या कामावर असलेलं कमालीचं प्रेम कळतं. त्यांचं शिक्षण मुख्यत: उत्तरेत हिंदी माध्यमात आणि नंतर विदेशात झालं होतं. त्यामुळे त्यांची मराठी ही इतकी पक्की नव्हती असं त्यांना वाटायचं. पण तरीही जिद्दीने मराठीमध्ये ते विज्ञान लेखन करत राहिले आणि त्यांच्या लेखनामुळेही लेखकांच्या पुढच्या फळीला प्रेरणा मिळाली. त्यांची पहिली विज्ञान कथा साहित्यिकांना कशी वाटेल ह्याची शाश्वती नसल्यामुळे त्यांनी टोपण नाव वापरून लिहीली होती. पण त्यानंतर भरभरून लेखन केलं. विज्ञान लेखक म्हणूनसुद्धा ते मोठे ठरतात. आधुनिक विज्ञानातले सगळे विषय त्यांच्या लेखनात येतात- वैज्ञानिक दृष्टीकोण, तंत्रज्ञान, तंत्रज्ञानातील धोके, माणसाला विज्ञानाबरोबर आवश्यक असलेली समज, समाजातल्या सर्व घटकांना विज्ञानाचा लाभ होण्याची गरज, पर्यावरण असे अनेक पैलू. सर बिग बँगचे विरोधक व स्टेडी स्टेट थिअरीचे समर्थक होते. म्हणजे विश्वाचा जन्म महास्फोटातून नाही झाला तर विश्व आधीपासूनच होतं व नेहमी तसं राहतं असं ते मानायचे. शिवाय ऊर्जा निर्माणही करता येत नाही व नष्टही करता येत नाही तर केवळ रुपांतरित करता येते. त्यामुळे त्यांच्या जन्मानंतर पृथ्वीच्या सूर्याभोवती जवळ जवळ ८७ प्रदक्षिणा झाल्यावर, गुरूच्या साधारण सव्वा सात प्रदक्षिणा झाल्यावर व शनिच्या साधारण तीन प्रदक्षिणा झाल्यानंतर ते शरीर रूपाने जरी सोडून गेले असले तरी प्रेरणा रूपाने व मार्गदर्शक रूपाने "स्टेडी स्टेट" प्रकारे आपल्यासोबत असतीलच. संशोधन करणारा असला तरी शास्त्रज्ञ समाजाभिमुख राहावा, समाजासोबत जोडलेला असावा हे त्यांनी दाखवून दिलं. विज्ञानाला सोपं करून सांगणं सगळ्यांनाच जमेल असं नाही, पण त्याचा प्रयत्न नक्की करावा, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणातून पुढे ठेवलं. स्वत:ची कामं स्वत: करण्याची त्यांची शिस्त आणि अगदी उतार वयामध्येही पाषाण- पंचवटीमधलं त्यांचं फिरणं! सरांकडून इतकं काही मिळाल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गावर एक पाऊल जात असल्याचं समाधान नक्कीच वाटतं. फार पूर्वी दूरदर्शनवर मशाल पुढे देतानाचं दृश्य दाखवायचे. त्यामध्ये कपिल देव होता आणि सगळ्यांत शेवटी एक गोंडस मुलगी असायची. सरांनी दिलेली ही विज्ञान प्रसाराची मशाल पुढे नेण्याची जवाबदारी आता आपण सर्वांची आहे! (वाचल्याबद्दल धन्यवाद. लेख जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावा. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. लेख लिहीण्याचा दिनांक: 21 मे 2025)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2867 views

💬 प्रतिसाद (10)
य
युयुत्सु Wed, 05/21/2025 - 14:21 नवीन
सदर पुस्तकात स्टेडी स्टेट थिअरीची पिछेहाट कशी झाली (स्टीफन हॉकींगने टाचणी कशी लावली) याचा आणि इतर रंजक इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 05/21/2025 - 14:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 05/21/2025 - 14:49 नवीन
स्टीफन हॉकींगचा मूळ पेपर मी वाचला आहे. पण तो सापडत नाहीये. स्टीफन हॉकींगने हवा काढून घेतल्यामुळे या थिअरीचं हसं झालं, असं जाणकार म्हणतात. मला असं कळलं की खुद्द आयुकामध्ये पण या विषयावर कुणी काम करत नाही. Image removed. Helge Kragh, "Cosmology and Controversy: The Historical Development of Two Theories of the Universe", Princeton University Press, 1997, page 385
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 05/21/2025 - 15:21 नवीन
सुंदर आठवणी. त्यांनी पाठ्वलेल्या पत्राचा फोटो टाकू शकाल का? तुमचे खगोल विषयक लेख, आवड यामागची प्रेरणा नारळीकर सरच आहेत तर. डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Wed, 05/21/2025 - 16:34 नवीन
https://rajeshmorankar.blogspot.com/2025/05/blog-post.html
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/21/2025 - 17:47 नवीन
हा लेख विशेष आवडला. ----------- हॉकिन्स यांनी स्टेडी स्टेट सिद्धांताला विरोध केला आणि गणिताने पटवलं की हा सिद्धान्त चुकीचा आहे. परंतू हॉकिन्स यांचेही बरेच आडाखे चुकीचे निघाले आणि ते त्यांनी मागे घेतले होते. बिग बँग सिद्धा चुकीचा असून शकतो. त्या वेळी कोण होतं पाहायला? खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे?
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 05/21/2025 - 22:35 नवीन
कंजूस यांच्या बरोबर सहमत. खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे? डाॅ नारळीकर हे उत्तुंग व्यक्तीमत्व नेहमीच प्रेरणादायक असणार आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 05/22/2025 - 03:23 नवीन
खुप छान लेख आहे.दुरदर्शनवर सर यायचे,ते आठवतंय.
  • Log in or register to post comments
म
मार्गी गुरुवार, 05/22/2025 - 13:09 नवीन
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! @ युयुत्सु जी, अच्छा! हो. बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. किंबहुना विज्ञान आपल्याला आपण किती सूक्ष्म आहोत, किती क्षुद्र आहोत हेच सांगतं! त्यामुळे बिग बँग किंवा स्टेडी स्टेट ह्या फक्त थिअरीजच आहेत. सत्य फार लांब आहे. @ सौंदाळा जी, हो ना, इथे देणार होतो पण सापडतच नाही आहेत! :( @ बाजीगर जी, छानच!
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 05/22/2025 - 14:14 नवीन
<बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. > मुद्दा असा आहे की स्टेडी स्टेट थिअरी नाकारली गेली आहे आणि याचा इतिहास वर दिलेल्या संदर्भात आहे. स्टीफन हॉकींग rejected it because he found it inconsistent and self contradictory.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा