Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित "ड्युअल (Duel)"

प
प्रचेतस
Wed, 05/21/2025 - 08:46
💬 5 प्रतिसाद
खरं तर ड्युअल (Duel) हा चित्रपट खूप आधी देखील पाहिला होता, आवडलाही होता. परवा घरचे इंटरनेट मुसळधार पावसामुळे बंद पडले असल्यामुळे हार्ड डिस्क टीव्हीला जोडून पुन्हा एकदा पाहिला. स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित ड्युअल (१९७१) हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या जीवघेण्या संघर्षावर आधारित आहे, ज्यामध्ये भय, मानसिक तणाव आणि अस्तित्वाची झुंज यांच्यापासून निर्माण झालेल्या थराराने पुरेपुर भरलेला आहे. हा चित्रपट स्पिलबर्गचा केवळ दुसराच पूर्ण लांबीचा चित्रपट असून, त्याने त्याच्या कारकीर्दीची ठोस पायाभरणी ह्याद्वारे केली. मुलाचे पाय कसे पाळण्यात दिसतात तसेच स्पिलबर्गचे दिग्दर्शकीय कसब ह्या त्याच्या कारकिर्दीच्या केवळ दुसर्‍याच चित्रपटात पुरेपुर दिसते. मुळात हा चित्रपट टीव्ही फिल्म म्हणून बनवला गेला असल्याने अतिशय कमी बजेटमध्ये निर्माण करावा लागला, नंतर सिनेमा थिएटर मध्ये दाखवण्यासाठी नव्याने काही दृश्ये त्यात टाकली गेली. a ड्युअलमध्ये डेव्हिड मान, एक सामान्य सेल्समन, आपल्या कारने एक व्यावसायिक सफर करण्यासाठी लॉस एन्जलिस सोडून एका कंट्री रस्त्याने प्रवास करत असतो. वाटेत तो एका अजस्त्र इंधनवाहू ट्रकला ओव्हरटेक करतो. ही कृती त्या ट्रक ड्रायव्हरच्या अहंकाराला धक्का देते आणि पुढे सुरू होते एक जीवघेणी पाठलागाची मालिका जी हळूहळू मानच्या मानसिक अत्याचारांत रूपांतरित होते. रमत गमत, गाडीतला रेडियो ऐकत आपली लाल रंगाची प्लायमाउथ कार जिचा रेडीएटर खराब झालेला आहे, अशी काहीशी जुनाट असलेली असलेली कार आणि तो चालवणारा डेव्हिड मान, ज्याला वेगाचेही आकर्षण नाही. ६० च्या वर जायलाही त्याला भिती वाटते. कुणाच्याही अध्यातमध्यात न पडता निवांत आपल्या चालीने जावे असा त्याचा सर्वसाधारण स्वभाव. ट्रक चालकाचे व्यक्तिमत्व किंवा चेहरा कधीही दाखवले जात नाही, काही दृश्यांत फक्त त्याचा एक हात पास करुन जा असे सांगताना दाखवले आहे. तर एका दृश्यात फक्त त्याचे चामड्याचे बूट घातलेले पाय एकमेकांवर आपटवताना दाखवले आहेत. दिसतो तो अजस्त्र ट्रकच, जो जुनाट आहे, गंजलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूस दिसणारी मानची लाल रंगाची प्लायमाऊथ कार. ह्या चित्रपटात संवाद, पार्श्वसंगीत अतिशय कमी प्रमाणात आहेत. आवाज आहे तो ट्रकच्या अजस्त्र गडगडाटाचा आणि मानच्या कारचा थ्रोटल पिळण्याचा. पहिल्यांदा जेव्हा मान ट्रकला ओव्हरटेक करतो, त्यावेळीच चित्रपटाची मूळ संकल्पना स्पष्ट होते, "साधी कृती अनपेक्षित परिणाम घडवू शकते". ट्रकची सूडभावना हाच चित्रपटाचा गाभा ठरते. ह्यात ट्रक ड्रायव्हर कुठेही दिसत नसल्याने केवळ प्रचंड ट्रकच हा व्हिलन म्हणून आपल्यासमोर उभा राहतो व मानच्या जीवघेण्या संघर्षात आपणही दंग होऊन जातो. ट्रक पुन्हा मानला ओव्हरटेक करतो आणि मुद्दामून त्याला पुढे जाऊ न देता त्याची वाट अडवून हळू हळू त्याच्या पुढे जात राहतो. ट्रकमधून निघत असलेल्या धुरामुळे ठसका लागत असलेला मान वैतागून त्याला मागे टाकण्याचा प्रयत्न करतो पण त्याला तशी संधी ट्रक देतच नाही, मग एका मुख्य रस्त्यावरुन कच्च्या रस्त्यातून त्याला कट मारत मान त्याची कार ट्रकच्या पुढ्यात आणतो मग सुरु होतो ट्रकचा जीवघेणा पाठलाग. मानच्या कारचा अजस्त्र ट्रकसमोर टिकाव कसा लागणार, ट्रक त्याला पाठीमागून ढुशा देऊ लागतो. ७ मैलांचा हा जीवघेणा पाठलाग सुरुच राहतो, मग यातलीच काही दृश्ये स्पिलबर्गमधील दिग्दर्शक दाखवतात. हायवेरील कॅफेत आश्रय घेतलेला मान, आणि तिथेच थांबलेला ट्रकच, मानची तिथल्या गिर्‍हाईंकांवरील संशयी भिरभिरती नजर आणि हळूहळू वाढत जाणारा पॅरेनोईड स्वभाव. एका बंद पडलेल्या स्कूलबसला कारने धक्का देऊन पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असलेला मान आणि त्याचा पाठलाग न सोडलेला अचानक समोरच्या बोगद्याचा तोंडाशी उभा येऊन ठाकलेला ट्रक आणि त्याचे गोल आकारातील चालू केलेले दिवे. हायवेवरच्या एका लहानशा अ‍ॅनिमल फार्मवर थांबून पोलिसांना फोन करणारा मान आणि चिडलेला ट्रकने थेट धडक देऊन तो फोन बूथच उद्वस्त करणे. हायवेरच पुढे मानची वाट बघत थांबलेला ट्रक आणि मानची तिथून जाणार्‍या एका कारमधील वृद्ध जोडप्याकडून मदतीची अपेक्षा करणे आणि हे पाहून ट्रकने रिव्हर्स येऊन त्यांना धडकवण्याचा प्रयत्न करणे. आडबाजूला विश्रांती घेत थांबलेल्या मानला लागलेली डुलकी आणि बाजूलाच असलेल्या रेल्वेलाईनवरुन जाणार्‍या ट्रकच्या आवाजाशी साधर्म्य असलेल्या रेल्वेचा गडगडाटी आवाज. चढावावर मानचे जीवांच्या आकांताने अगदी वेगात गाडी पळवणे. मानच्या त्या ट्रकबरोबर होत असलेल्या जीवघेण्या संघर्षाचा शेवट कसा होतो हे प्रत्यक्ष चित्रपटातच बघणे गरजेचे आहे. a स्पिलबर्गने ह्यात मानच्या दृष्टीच्या अंगाने सगळे शॉट्स घेतले आहेत, क्लोज अप दृष्ये आणि वाळवंटातील रखरखाट, खुरटी झुडपे, लहानमोठ्या टेकड्या ह्या पार्श्वभूमीवर अजस्त्र जुनाट ट्रक आणि त्याच्यासमोर मानची अगदी लहान कार विलक्षण प्रभाव पाडून जातात. अजून एक खास दिग्दर्शकीय कसब म्हणजे ट्रकवर लावलेल्या विविध राज्यांच्या नंबर प्लेटस. जे तो ट्रक ड्रायव्हर एक सिरियल किलर असल्याचे दर्शवतो आणि एका राज्यातून दुसर्‍या राज्यात असेच गुन्हे करत असलेला फिरत असल्याचे प्रतिक आहे. शिवाय वेळोवेळी त्या ट्रकचा रंग आणि ट्रकची बॉडी खराब, जुनाट होत गेल्याचे दाखवले आहे. स्पिलबर्गचे जॉज, ईटी, ज्युरासिक पार्क, म्युनिक, इंडीयाना जोन्स, शिंडलर्स लिस्ट आणि अजून कित्येक चित्रपट बहुतेकांनी पाहिलेले असतात पण त्याच्या कारकिर्दीचा सुरुवातीचा हा चित्रपट त्यातल्या कित्येकांना ठाउकही नाही. थराराची आवड असणार्‍यांनी स्पिलबर्गने हा अत्यंत कमी सामुग्रीत बनवलेला हा चित्रपट अवश्य बघावा. हा चित्रपट युट्युबवर उपलब्ध असून येथे पाहता येईल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2156 views

💬 प्रतिसाद (5)
क
कपिलमुनी Wed, 05/21/2025 - 10:09 नवीन
ह चित्रपट पूर्वी टीव्हीवर कधीतरी पाहिला होता. खिळवून ठेवतो . या थीम च्या बर्‍याच कॉपीज नंतर निघाल्या . हा सर्वात बेस्ट .. ओजी आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/21/2025 - 11:01 नवीन
चित्रपटाची ओळख आणि वर्णन भारी. चित्रपट पाहिला आणि आवडला. पुढील लेखनास शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 05/21/2025 - 13:19 नवीन
खुपच कमाल वर्णन केले आहे.सिनेमा नक्की पाहणार.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 05/21/2025 - 13:26 नवीन
नक्की बघणार
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 05/24/2025 - 18:30 नवीन
नक्की बघणार
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 54 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा