Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

फाईल बंद

र
रम्या
Sat, 04/26/2025 - 13:39
💬 10 प्रतिसाद
गोव्याचा अथांग समुद्र, निळेशार पाणी आणि पांढरी शुभ्र वाळू. आजुबाजुला नारळी फोपळीच्या बागा, समुद्रावरून येणारा ताजा वारा. अशा छान वातावरणात पोलिस सब-इन्स्पेक्टर पाटील बायकोच्या कमरेत हात घालून, गालाला गाल चिकटवून, प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात पाहत सेल्फी काढत होते. बायको सुद्धा फारच रंगात आली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच नवरा असा तिच्या हातात आला होता. दोघांचेही कुठे म्हणजे कुठेच लक्ष नव्हते. ते दिवस, तो सहवास संपूच नये असे वाटत होते. फक्त तू आणि मी, मी आणि तू. माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी. दुसरा कोणताच विचार मनात नव्हता आणि तो असण्याचे कारणही नव्हते. फौजदार फार तयारीने आले होते. कसं सगळं छान आणि प्रयत्नपूर्वक जमवून आणलं होतं. सगळ्या महत्वाच्या फाईल चलाखीने बंद केल्या होत्या. योग्य ठिकाणी आवश्यक ती सोय आधीच करून ठेवली होती. सगळ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी तयार केले होते. हाताखालच्या सगळ्या शिपायांना सक्त ताकीद दिली होती, जे होईल ते सगळं निभावून न्यावे. काहीही होवो फोन म्हणून करायचा नाही. कुणी ती हिम्मत केलीच तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. च्यायला या पोलिस खात्यातल्या नोकरीने आयुष्याचा अक्षरशः वनवास केला होता. काय नाही केलं आपण पोलिस इन्स्पेक्टर होण्यासाठी! मान मोडून अभ्यास केला. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला. रोज पंधरा किलोमीटर पळून आणि खुराक घेऊन तब्येत बनवली. शेवटी जिद्दीने इन्स्पेक्टर झालोच! वाटलं होतं चोरांना पकडू, दरोडेखोरांचा माग काढून त्याच्या मुसक्या आवळू, मुली-बायांची छेड काढणाऱ्या मवाल्याच्या मुस्कटात हाणू. पण फसगत झाली आणि पोस्टिंग झाली मुंबईच्या जुहू पोलिस स्टेशनात. श्रीमंतांची, सिनेमातल्या नायक नायिकांची वसाहत. त्यांच्या रोजच्या रोज पार्ट्या आणि रोजचा रोज बंदोबस्त. फक्त त्या सिनेमातल्या नायक नायिकांची बडदास्त ठेवायची. आज काय तर तो हिरो कुठल्या तरी लफड्यात अडकला आणि कोर्टात चालला, द्या त्याला संरक्षण. उद्या काय तर त्याच्या बापाला धमकीचा निनावी फोन आला म्हणून पुरवा चार पोलिस शिपाई. कधी हिरोइनच्या बहिणीचं तिसरं लग्न तर कधी तिच्या बापाचं चौथे लग्न! एवढा मोठा मी इन्स्पेक्टर पण आता या धनदांडग्यांच्या गाडीच्या मागनं सरकारी जीप मधून फिरतोय. रोज रात्री तीन वाजता घरी यायचं आणि सकाळी परत पोलिस स्टेशन गाठायचं. ऑफिसात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोटावर नाचायचं आणि रात्री चिडलेल्या बायकोची किरकिर सोसायची! अक्षरशः वीट आला होता अशा या आयुष्याचा! नको ती वर्दी आणि नको ती नोकरी असं झालं होतं! अखेर इन्स्पेक्टर साहेब जिद्दीला पेटले. काहीतरी करून मोठ्ठी रजा मंजूर करून घेतली आणि सरळ गोवा गाठला. आणि आज गोव्याच्या समुद्राकाठी, बायकोचा हात हातात घेऊन वाळूत पाठीवर पडून आकाशाकडे बघत बसले होते. कशाला येतेय पोलिस स्टेशनची आठवण? आणि अशा निवांत खाजगी वेळी हेड कॉन्स्टेबल तांदळेंचा फोन वाजला! "साहेब, तांदळे बोलतोय.." "तांदळ्या तुझ्या आयला...." साहेबांच्या शिव्यांची शृंखला तोडीत तांदळे म्हणाले, "कमिशनर साहेबांचा निरोप आहे." त्याबरोबर बायकोचा हात झटकीत, नारळाच्या झाडांची चित्रे असलेली हाफ चड्डी परिधान केलेले उघडबंब इन्स्पेक्टर ताड करून उभे राहिले. "ओं कमिशनर? काय, काय म्हणाले?" "कोणीतरी हरवल्याची केस आहे, असाल तसे ताबडतोब या म्हणाले" इन्स्पेक्टर साहेबांचा चेहरा पडला. बायको नवऱ्याच्या आणि कमिशनरच्या नावाने बोटं मोडत आवराआवर करू लागली. तासाभरात बॅगा भरल्या आणि परतीचा प्रवास सुरु झाला पूर्ण प्रवासात इन्स्पेक्टर साहेब निराश होते आणि बायको नवरा आणि त्याच्या नोकरीच्या नावाने तोंड वाजवित होती. इन्स्पेक्टर साहेब थेट पोलिस स्टेशनात गेले आणि खाली मान घालून उभ्या असणाऱ्या तांदळेंच्या तोंडाकडे बघत खेकसले, "मूर्खा, आता नुसता उभा राहू नकोस. पटापट बोल." "एक जाडी बया इंग्लिश मध्ये येस फेस करत आली होती." "बरं मग?" "म्हणाली पोरगं हरवलंय." "मग घ्यायची तक्रार लिहून आणि तपास सुरू आहे म्हणायचं. काय आजच नोकरीला लागला का रे तांदळ्या?" "तसंच केलं साहेब. लै बोलायला लागली तेव्हा आपल्या लेडी कॉन्स्टेबल हिरवे बाईंनी चार शिव्या सुद्धा दिल्या तिला आणि हाकलून लावलं. थोड्या वेळाने कमिशनर साहेबांचा फोन आला. लै वरडले माझ्यावर. म्हणाले साहेबांना सांगून तपास आत्ताच्या आत्ता सुरू करा." पाटलांना कळेना डायरेक्ट कमिशनर कसा काय बुवा पडला यात? रोज कोणीतरी हरवतच असतं आणि कोणीतरी सापडतच असतं. त्यात विशेष ते काय? "बरं काय नाव?" "हेड कॉन्स्टेबल भगवंत तांदळे, मूळ गाव डुंगुरवाडी, तालुका जत, जिल्हा सोलापूर" "मूर्खा त्या तक्रारदार बाईचं नाव विचारतोय मी." "हां हां, मोनिका शहा" "आणि पोराचं नाव?" "कल्लू" "आडाण ठोकळया, त्या मोनिका शहाच्या पोराचं नाव विचारतोय मी." "त्या पोराचंच नाव कल्लू." "कल्लू?" पाटील विचारात पडले. मोनिका शहा नावाच्या, इंग्लिशमध्ये येस फेस करणाऱ्या बाईच्या पोराचं नाव "कल्लू" वगैरे नसतं. काहीतरी घोळ आहे. साहेब काहीच बोलेनात म्हटल्यावर तांदळेंनी स्वतःच खुलासा केला, "कल्लू म्हणजे भटकं काळं कुत्रं आहे साहेब. रस्त्यांवरनं बोंबलत हिंडतंय." हे ऐकल्याबरोबर पाटील स्तब्ध होऊन तांदळेंच्या तोंडाकडे पाहत राहिले. आता साहेबांच्या रागाचा स्फोट होणार आणि आपल्या आई बापाचा परत उद्धार होणार हे त्या चतुर हवालदाराच्या ध्यानात आलं. त्याने भराभर खुलासा केला. आपण हे प्रकरण दाखलच करून न घेण्यासाठी खूप प्रयत्न केला. एरव्ही हे सहज शक्य झालं असतं पण ती मोनिका हडळ निघाली कमिशनरच्या बायकोची मैत्रीण आणि कमिशनरची बायको सुद्धा निघाली श्वानप्रेमी! एरव्ही काहीतरी करून तोंडदेखला पंचनामा आणि शोध सुरू केला असता पण कुत्रं शोधायची प्रोसीजर कुणालाच ठाऊक नसल्याने नाईलाजच झाला आणि तुम्हाला फोन करून बोलवून घ्यावे लागले. इन्स्पेक्टर पाटलांचे खांदे पडले, कंठ दाटून आला. अशा क्षणी तांदळेंच्या खांद्यावर मान टाकून भावना मोकळ्या कराव्या वाटलं पण त्यांनी स्वतःला आवरले. तरीही न राहवून ते रडवेल्या चेहऱ्याने म्हणालेच, "यात माझी काय चूक तूच सांग?" "ते पण खरंच साहेब. नशिबाचे भोग. नाईलाजच झाला त्याला इलाज काय?" खरंच आता काहीच इलाज राहिला नाही. काळ यावा तसा कल्लू आला आणि आपल्या गळ्यात पट्टा घालून गोव्याहून आपल्याला फरपटत घेऊन आला! आता त्या कल्लूला शोधणं क्रमप्राप्त होतं. पण भटकं कुत्रंच ते, शोधायला सुरवात करायची तरी कुठून? आपले खबरी आहेत पण त्यांना कुत्र्याची खबर ठेवावी असे कधीच वाटले नव्हते. खंडणीसाठी पळवले असे म्हणावे तर आपल्या विभागातील गुंड तसे बरे आहेत. कुत्रे पळवावे एवढे नालायक तर निश्चित नाहीत. काय करावे काही सुचत नव्हते. पण कुठून तरी सुरवात करायलाच हवी होती. मोनिका बाई ज्या ठिकाणी रोज कल्लू आणि त्याच्या इतर सग्या सोयऱ्याना बिस्किटे खाऊ घालते त्या ठिकाणी एकदा जाऊन पहावे. "इधर ही आता था मेरा कल्लू बेटा, मेरे हाथों से बिस्किट खाता था", असं म्हणून मोनिका बाई पर्स मधील टिश्यू पेपरने डोळे आणि नाक पुसत हुंदके देत निघून गेली. हे पाहून तांदळे हळूच पाटील साहेबांना म्हणाले, "हे तर येडं दिसतंय साहेब. हिचं करा काहीतरी नाहीतर मेलो आपण." "तिचं काय करतोस आता? तो कमिशनर मानगुटीवर बसलाय. तो हरामखोर कल्लू कुठून धरून आणायचा ते बघ आधी. ह्या कल्लूची फाईल बंद झाली नाही तर तो कमिशनर जीव घेईल माझा." तांदळें आत्मविश्वासाने म्हणाले, "साहेब, कुत्रंच ते, एक हाडूक टाकून इथंच झाडामागे गोणपाट घेऊन 'कल्लू यु यू' असं ओरडत बसू. कसं पळत येतंय बघा! ते बेणं आलं की भरु गोणपाटात आणि त्या बाईच्या मढयावर टाकू, की फाईल बंद तिच्या मारी." पाटलांना तरी दुसरा उपाय कुठं माहिती होता? त्यांच्या ट्रेनिंग मध्ये 'हरवलेले भटके कुत्रे कसे शोधावे' असा विषय अजिबात नव्हता. त्यामुळे हवालदार म्हणतात तसेच करावे हे बरे. "असं म्हणतोस? बरं मग तसंच करू. जा गोणपाट आणि हाडूक घेऊन ये लवकर, चल पळ". हवालदाराने जवळच्या खाटकाकडून इन्स्पेक्टरचे नाव सांगून एक हाड आणले. झाडामागे बैठक बसवण्याआधीच कल्लू ऐवजी इतर पाच सहा कुत्री गोळा झाली आणि आपापसात हिसका हिसकी करत हाड पळवून निघून गेली. हवालदाराने पुन्हा नवीन हाड आणले. पुन्हा तोच प्रकार, फक्त हाड पळवणारे कुत्रे निराळे! खाटकाकडे पाच सहा फेऱ्या झाल्यावर खाटकाला सुद्धा संशय आला. रोज फुकटात मटण नेणारे हे पोलिस आज एका मागोमाग एक हाडं का बरं घेऊन जात असावेत? साहेबांचं नाव सांगून हा हवालदार काहीतरी चावटपणा करतोय. त्याने सरळ दुकानाचं शटर बंद केलं आणि घरी निघून गेला. नंतर बिस्किटे टाकून झाली. पिवळी, सोनेरी, राखाडी अश्या सगळ्या रंगाची कुत्री आली आणि बिस्किटे खाऊन गेली. पण कल्लू मात्र आला नाही. हवालदार तांदळे पुन्हा पाटलांच्या कानाला लागून दबक्या स्वरात म्हणाला, "साहेब, एक काम करू, यातलंच ते राखाडी कुत्रं धरू, त्याला काळा रंग फासू आणि कुत्रं सापडलं म्हणून नोंद करू. मग फाईल आपोआपच बंद. कसं?" "हां हां तसंच करू, धर धर त्या बेण्याला." हवालदार जसा जागेवरून उठला तसं ते राखाडी कुत्रं बिस्किटे तोंडांत धरून बाजूच्या झुडपात पळून गेलं. त्यामागोमाग तांदळे झुडपात शिरले. आतूनच ओरडून सांगू लागले, "डावीकडून आलं बघा, धरा धरा, ते बघा गेलं पलीकडे, थोडं आत शिरा, मग शेपूट धरा." हवालदारच आदेश सोडू लागला आणि त्याबरहुकूम इन्स्पेक्टर साहेब झुडपातुन इकडे तिकडे पळू लागले. शेवटी कुत्रं धरून गाडीत घालून पोलिस स्टेशनात आणलं गेलं. येताना गाडीत कुत्र्याने भारी गोंधळ केला, उतरे पर्यंत भुंकण्याचा धडका लावला. गाडीतील तो आवाज ऐकून रस्त्यावरची सारी कुत्री भुंकत भुंकत पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करू लागली. शेवटी ही वरात पोलिस स्टेशनात पोहोचली. कुत्र्याने सगळ्यांनाच ओरबाडले, सगळ्यांचे युनिफॉर्म फाडले. लेडी कॉन्स्टेबलची तर साडीच फेडली . त्यामुळे तिने या प्रकारातून काढता पाय घेतला. शेवटी चार हवालदारांनी कुत्र्याचे चार पाय पकडले. इन्स्पेक्टर पाटलांनी त्याला स्वतः काजळी, राख वगैरे फासले. झटापटीत सगळ्यांवरच राख आणि काजळी उडाली. सगळेच कल्लू प्रमाणे काळेभोर दिसू लागले. पण काम झाले आणि नकली कल्लूला गळ्यात दोरी बांधून खांबाला बांधून ठेवण्यात आले. झाल्या प्रकारानं हादरलेले ते कुत्रे आणि केल्या प्रकारानं दमलेले सारे पोलिस कर्मचारी धापा टाकत आपापल्या जागेवर बसून राहिले. भराभर पंचनामा झाला. कल्लू सापडल्याची नोंद दफ्तरात झाली. आता फाईल बंद होणार म्हणून सर्वांनाच हायसे वाटू लागले. मोनिका बाईला निरोप गेला. बाईने कल्लूला पाहून हंबरडा फोडला, "मेरा बेटा कल्लू..." असं म्हणत त्याला मिठीत घेण्यासाठी हात पसरले. पण त्या कुत्र्याने घात केला! बाई जसजशी पुढे येईल तसे मागे मागे सरकत बाईवरच भुंकू लागले. पाटलांची धडधड वाढू लागली. बाईला संशय आला आणि ती ओरडलीच, "यू स्टुपिड्स, धिस इज नॉट माय कल्लू!" पाटलांची धडधड अचानक थांबली आणि हृदय बंद पडल्यासारखे ते मटकन खुर्चीवर बसले. पोलिसांचा डाव बाईच्या ध्यानात आला आणि ती थेट इन्स्पेक्टर साहेबांवरच ओरडू लागली. इकडून बाई खेकसते आहे आणि तिकडून ते कुत्रं भुंकत आहे अश्या विचित्र वातावरणात काही क्षण गेले. शेवटी शिव्यांची लाखोली वाहत मोनिकाबाई पोलिस स्टेशनाबाहेर गेली आणि ती संधी साधून कुत्रेही पसार झाले! अचानक सगळे गपगार झाले. डोकंच चालायचं बंद झालं. बाईला फसवता येईल पण ते हरामखोर कुत्रं फसणार नाही हे आपल्या ध्यानात कसं नाही आलं? कुणीच कोणाशी बोलेना झाले, सगळे कष्ट वाया गेले होते, युनिफॉर्म फाटले आणि बाईच्या शिव्या खायला लागल्या त्या निराळ्याच. इन्स्पेक्टर पाटील डोके धरून बसून राहिले. काही मिनिटे शांततेत गेली आणि तांदळे पाटलांच्या कानाला लागून दबक्या आवाजात म्हणाले, "एक आयड्या सांगु, त्या भवानीच्या नवऱ्यालाच पोत्यात भरून......" "नको", तांदळे हवालदाराला हाताचा पंजा दाखवत पाटलांनी थांबवले, "काय करायचे ते मी बघतो. तुम्ही सगळ्यांनी शांत बसा, मला जरा विचार करू द्या." पाटलांनी शांत डोक्याने विचार केला. हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. त्या मोनिकाबाईला सोडा पण इथे गाठ कमिशनरच्या बायकोशी आहे. थुंकं लावून लाडू बांधायचा उपाय इथे चालणार नाही. कल्लू सापडला नाही तर कमिशनरची बायको कमिशनरचं जगणं हराम करेल आणि कमिशनरचा राग आपल्यावर निघेल. फाईल बंद करायची असेल तर कुठल्याही परिस्थितीत कल्लूला शोधून काढणे हाच उपाय आहे. आपल्यासाठी कल्लू कुत्रा म्हणजे कल्लू दरोडेखोर आहे असंच समजू आणि दरोडेखोरांचा माग आपण जसा काढला असता तशीच सुरवात करू. काहीतरी ठरवल्यासारखे इन्स्पेक्टर पाटील खुर्चीवरून उठले. गाडी थेट कुत्रा जिथे शेवटी दिसला होता तिथे गेली. आसपासच्या दुकानात चौकश्या करून सगळ्या दुकानाचे, सोसायट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. बऱ्याच इमारतीबाहेर कॅमेरे होते पण ते असल्याची माहिती इमारतीमध्ये कुणालाच नव्हती. काहींचे पासवर्ड फक्त सेक्रेटरीकडे होते आणि तो ते विसरला होता. मग तंत्रज्ञाला बोलावून पासवर्ड मिळवण्यात आले. शे-दिडशे कॅमेऱ्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग हाताशी घेऊन मागे पुढे करत कल्लू कोणत्या रस्त्याने कुठे गेला याचा माग काढला गेला. सुरवातीला कल्लू मोठ्या रस्त्याने गेला होता. तोपर्यंत सगळे सोपे होते परंतु नंतर पुढे तो छोट्या गल्लीतून पसार झाला. पुढे तर एका मोठ्या गटारात उतरून नाहीसा झाला. मग महालिकेच्या एका अभियंत्याला हाताशी धरून शहरातल्या त्या भागाच्या गटारांचा नकाशा मिळवण्यात आला. दुर्दैवाने त्या गटाराला इतर पाच गटारे येऊन मिळत होती. ही पाच गटारे जिथे उघडत होती तेथील आसपासच्या दुकानाचे कॅमेरा रेकॉर्डिंग मिळवून त्यात शोध घेतल्यावर कल्लू कुठून तरी बाहेर येताना दिसला. तिथे बाहेर आल्यावर इतर कुत्री त्याच्या मागे लागली. तिथे कुत्र्यांची धुळीत लोळून भरपूर भांडाभांड झाली आणि त्या भांडाभांडीत सर्व कुत्र्यांची सरमिसळ झाली. सगळीच कुत्री एकसारखी राखाडी दिसू लागली. शेवटी एका व्यक्तीने दगड मारून मारून त्यांची भांडणं सोडवली. भांडणं सुटल्यावर सगळी कुत्री चारही दिशांना पळाली आणि त्या त्या दिशेच्या भुयारी गटारात पुन्हा अदृश्य झाली! या इथपर्यंतच्या तपासामध्ये संध्याकाळ होऊन गेली होती. गटाराच्या नकाशासाठी महापालिकेच्या इंजिनियरला पुन्हा गाठण्यात आले. ऑफिस संपल्यावर सुद्धा हे पोलिस गटारात शिरण्यासाठी आपल्याला का वेठीस धरत आहेत हे त्या इंजिनीयरला कळेना. चिडचिड करत सगळ्या नकाशांची फाईल पोलिसांच्या हाती देऊन इंजिनीयर ट्रेन पकडून आपल्य घरी निघून गेला. पाटील कॅमेरा रेकॉर्डिंग बघून कल्लू कुत्रे ज्या गटारात गेले ते गटार नकाशाच्या फाईल मध्ये शोधून त्या गटाराचे दुसरे टोक शोधत होते आणि पुन्हा त्या ठिकाणाचे कॅमेरा रेकॉर्डिंग बघून कल्लू सापडतोय का पाहत होते. गटारातून बाहेर पडणारी सगळीच कुत्री एकसारखीच काळी कुळकुळीत होऊन बाहेर पडत होती. त्यामुळे त्यातला कल्लू नक्की कोणता हे काही ध्यानात येत नव्हते. तपासात अनेक दिवस गेले आणि शेवटी आपली माणसं चारही दिशांना पाठवून कल्लू सारखी दिसणारी आठ दहा कुत्री पोलिस स्टेशनला आणण्यात आली. एकमेकांना पाहून समस्त कुत्र्यांना पोलिस स्टेशन मध्येच भांडण्याची हुक्की आली आणि त्यांनी भुंकून भुंकून अख्खे पोलिस स्टेशन डोक्यावर घेतले. त्यांना आवरता आवरता पोलिसांच्या नाकी नऊ आले. पुन्हा फसगत नको म्हणून सगळ्या कुत्र्यांना अंघोळ घालण्यात आली. कल्लू नसणाऱ्या कुत्र्यांना पोलिस स्टेशनबाहेर हाकलून काढण्यात आले. शेवटी कल्लूची ओळख पक्की करण्यात आली! अनेक दिवसांच्या पायपिटीने तांदळे हवालदारांसकट सगळ्या हवालदारांची पोटे आत गेली. इन्स्पेक्टर पाटलांचे डोळे आत गेले, बरगड्या दिसू लागल्या. पण त्या काळ कल्लूचा शोध पूर्ण झाला होता. आता ती मोनिका चेटकीण येईल आणि या हरामखोर कल्लूला घेऊन जाईल की आपली वणवण संपली एकदाची. फाईल बंद! पुन्हा मोनिका बाईला बोलावणं धाडण्यात आलं. कल्लूला पाहून मोनिकाबाईने "मेरा बेटा कल्लू"असे म्हणत भोकाड पसरले. तिच्या पर्स मधल्या बिस्किटाच्या वासाने कल्लू तिच्याकडे पळत गेला आणि शेपटी हलवत उभा राहिला. "देखा कितना प्यार करता है मुझसे मेरा बेटा." बेट्याने तिच्याकडच्या अख्ख्या बिस्कीट पुड्यावर ताव मारला आणि पुन्हा त्याला जिथे बांधून ठेवला होता तिथे जाऊन बसला. मोनिकाबाईने सगळ्यांचे आभार मानले. कल्लूच्या फाईलमध्ये सही केली. जाता जाता इन्स्पेक्टर पाटलांना म्हणाली, "थँक्यु हां इन्स्पेक्टर, आताच गोव्याला चालले आहे. आज माझा बेटा कल्लू सापडला नसता तर गोवा अजिबात एन्जॉय करू शकले नसते". एवढे बोलून मोनिका बाई पोलिस स्टेशनाबाहेर गेली, आपल्या आलिशान गाडीत बसली आणि गोव्याला निघून गेली. कल्लू शांतपणे राजासारखा कोपऱ्यात बसून राहिला होता. कल्लूची फाईल टेबलावर उघडी पडून होती. ती बंद करीत तांदळे म्हणाले, "बंद झाली बाबा एकदाची फाईल." "थांब इतक्यात बंद करू नकोस", इन्स्पेक्टर पाटील ओरडले. सगळे जण आश्चर्यचकित होऊन पाटील साहेबांकडे पाहत राहिले. इन्स्पेक्टर पाटील, शांतपणे जागेवरून उठले, पायातले बूट काढून हातात घेतले आणि बक्ककरुन कल्लूच्या ढुंगणावर फेकून मारले. बेसावध कल्लू कुई कुई करत पोलिस स्टेशन बाहेर पळून गेला. पाटील शांतपणे खुर्चीवर बसत म्हणाले, "आता कर ती फाईल बंद".

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3353 views

💬 प्रतिसाद (10)
N
nutanm Sat, 04/26/2025 - 23:39 नवीन
छान मसत विनोदी कथा /हकिकत/प्रसनग.
  • Log in or register to post comments
N
nutanm Sun, 04/27/2025 - 01:08 नवीन
खूप हसायला मिळाले . स्रिमनत बायकाची थेरे व कोणाचया खादयावर कुणाचे ओझे.
  • Log in or register to post comments
र
रम्या गुरुवार, 05/01/2025 - 13:19 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 05/02/2025 - 07:23 नवीन
हॅहॅहॅ ! खुसखुशीत कथन! द मा मिरासदारांची आठवण आली. तारक मेहता का उल्टा चष्मा ची ही आठवण आली. अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments
र
रम्या Mon, 05/05/2025 - 19:15 नवीन
धन्यवाद, जसे सुचत जाईल तसे लिहित आहे.
  • Log in or register to post comments
य
यश राज Fri, 05/02/2025 - 09:36 नवीन
मजेशीर कथा
  • Log in or register to post comments
र
रम्या Mon, 05/05/2025 - 19:16 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 05/06/2025 - 10:56 नवीन
मस्तच मज्जा आली वाचताना. मुलीला आजच ही गोष्ट सांगतो
  • Log in or register to post comments
र
रम्या गुरुवार, 05/08/2025 - 09:07 नवीन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 05/08/2025 - 12:32 नवीन
>> काळ यावा तसा कल्लू आला आणि आपल्या गळ्यात पट्टा घालून गोव्याहून आपल्याला फरपटत घेऊन आला! हे भारीच! >> "हेड कॉन्स्टेबल भगवंत तांदळे, मूळ गाव डुंगुरवाडी, तालुका जत, जिल्हा सोलापूर" जत तालुका सोलापूर नसून सांगली जिल्ह्यात आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा