चहा!
चहा, जिव्हाळ्याचा विषय. चहा तयार करणं बऱ्याच अंशी एक कला आहे. थोडंसं गणित व शास्त्रही आहे म्हणा त्यात. चवीत सातत्य राखायचे असेल, तर त्यातील प्रत्येक घटकाची भूमिका, प्रमाण, आणि वेळ समजावून घेणं गरजेचं. एखादी सुंदर संगीत रचना जर करायची असेल, तर आधी तुम्हाला संगीत वाद्यांशी, प्रत्येक सुराशी समरस व्हावं लागतं, अगदी तसंच.
चहापूड (पूड=पावडर) मधील अर्क शोषण्याचं काम पाण्याचं. चहापूड टाकण्याआधीच पाणी उकळतं असणं गरजेचं. आणि चहापूड उकळत्या पाण्यात टाकल्यावर, फक्त काही मिनिटेच थांबावं, नाहीतर कडवटपणा उतरण्याची शक्यता असते. चहाला पाण्याच्या चवीपासून दूर ठेवायचं असेल, तर साधारण एक कप चहासाठी एक चतुर्थांश, एवढंच पाणी पुरेसं. निदान आसाम चहात तरी इतर काहीही न मिसळता, फक्त पाण्यात उकळून, मोठ्या आवडीने पिणारे किंवा तसं भासवणारे लोक, चवीच्या बाबतीत निश्चितच निरस म्हटले पाहिजेत.
दूध निरसं, ताजं, असावं. तेही फक्त एकदा उकळवल्यावर आणि फक्त काही मिनिटातच चहासाठी वापरलं गेलं, तरच चहातील वेगवेगळया घटकांचं प्रमाण संतुलित राहतं. गुळाचा चहा ऐकायला कितीही गोड वाटला, तरी चवीच्या बाबतीत, त्याला साखरेची सर येऊ शकत नाही. कदाचित गुळाची शुध्दता आणि त्यामुळे येणारी वेगळी चव, हेही एक कारण असावं त्यामागे. चहातील सर्व घटकांचं प्रमाण, संतुलन, प्रयोग-निरीक्षण-निष्कर्ष अशा शास्त्रीय पद्धतीने अगदी अचूक शोधता येतं, खरं तर ते प्रत्येकाने शोधायचं असतं.
हल्ली चहा मसाल्याचं पीक आलं आहे. त्यात रंग सोडून नेमके कोणते घटक असतात ते कुणालाच ठाऊक नसतं किंवा कोणी त्याची चिकित्सा करण्याची तसदीही घेत नाही. चहामध्ये अगदी किंचित प्रमाणात, आलं किंवा फार तर विलायची, एवढंच सामावू शकतं. गवती चहा, नावात चहा असूनही, चहासाठी कधीच वापरू नये, असं माझं, प्रयोगाअंती ठाम झालेलं, प्रांजळ मत आहे. थोडक्यात काय, तर चहाच्या मूळ स्वादाला झाकोळून टाकणारे कोणतेही घटक किंवा त्यांचं अप्रमाण, निदान खऱ्या चहाप्रेमींना तरी स्वीकारार्ह होऊ शकत नाही.
भारतात साधारण सात ते आठ प्रमुख जातींची चहा लागवड केली जाते. त्यात आसाम चहाचा सर्वात मोठा वाटा आहे. आसाम चहा लोकप्रिय असण्याचं एक कारण, त्याचा स्वाद (flavor), थोडासा माल्टी, म्हणजे बियरच्या स्वादासारखाच आहे, असं वाचनात आलं आहे. आता मद्यप्रेमी लोक चहाचा कितपत आदर करतील याची शंकाच आहे, त्यामुळे तूर्तास, कोणीतरी म्हणतं म्हणून, चहा आणि बियरच्या स्वादात थोडंसं का असेना पण साम्य आहे, यावर फक्त चहा घेणाऱ्यांनी, समाधान मानायला हरकत नसावी.
लेखात चर्चिलेलं चहाप्रेम इतकं उतू जायला, काहीजण वेडेपणा (obsession) म्हणतीलही, पण अस्सल चहाप्रेमी याला, शुद्धतावादी (purist) हीच संज्ञा वापरतील!
----
💬 प्रतिसाद
(16)
भ
भागो
Sun, 06/30/2024 - 16:20
नवीन
छान लेख. आवडला.
------------- मी एक चहॉंबाज.
मै दुनिया भुला दूंगा तेरी "चहात" मे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 06/30/2024 - 16:27
नवीन
वाह!
(मीपण एक चहाबाज...... होतो.
आताशा पिववत नाही.)
- Log in or register to post comments
ग
गवि
Sun, 06/30/2024 - 16:36
नवीन
हो. पूर्वी पीत होतो.
(सखाराम गटणेची कबुली आठवली).
- Log in or register to post comments
भ
भागो
Sun, 06/30/2024 - 18:24
नवीन
हो. पूर्वी पीत होतो. >>> मी विचारतो, काय पीत होता?
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Sun, 06/30/2024 - 17:44
नवीन
खडी चमच,गुळाचा,बिनसाखरेचा......
सकाळी,दुपारी,मध्यरात्री...
घरात,तंबू मधे,गाडीत ....
कुठेही कधीही चहाला नाही न म्हणणारा चहाबाज.
पण साधे पान ,साधा चहा याची सर कशालाच नाही.
लेख पुढे फुलवायचा होता. तरीपण आवडला.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 06/30/2024 - 18:19
नवीन
गवती चहा मला तर खूप आवडतो. एकदम मस्त लागतो.
- Log in or register to post comments
श
श्रीगणेशा
Sun, 06/30/2024 - 19:23
नवीन
हो, लेख अपुरा वाटतो आहे, हे खरं. जेवढं उत्स्फूर्त सुचलं, त्यात फक्त अर्धा कप भरला :-)
----
अवांतर:
मिपावर लेखातील चुका दुरुस्त करण्यासाठी काही पर्याय आहे का?
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 07/01/2024 - 14:00
नवीन
मस्त कडक चहालेख ! आवडला !
तंतोतंत सहमत !
क्या बात .. शेम हियर !
मी पण चहाबाज !
काहीही न घातलेला (आलं, वेलदोडा, ग'चहा, दालचिनी वै वै) पातळ दुधाचा कडक चहा (आणि याच्या आसपासचा) म्हणजे माझं अमॄत !
कधी ही ना नाही
आता कमी करायला लागणार आहे !
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 07/01/2024 - 14:58
नवीन
आमचे एक बाबा म्हणतात....
सवाष्णीने कुंकावाला आणि चहाबाजाने चहाला नाही म्हणू नये...
- Log in or register to post comments
य
यश राज
Mon, 07/01/2024 - 15:46
नवीन
मी पण चहाबाज,
चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच !
छान लिहिलयं
- Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड
Mon, 07/01/2024 - 17:09
नवीन
चहा सोडलाय. बिनसाखरेची कडवट कॉफी पितो. आता मस्त सवय झालीय.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 07/03/2024 - 19:05
नवीन
मनोरंजक प्रतिसाद....
- Log in or register to post comments
र
रामचंद्र
Wed, 07/03/2024 - 19:26
नवीन
यात खास पूर्व पुण्याची खासियत असलेल्या आणि आता अस्तंगत होत चाललेल्या एकमेवाद्वितीय चवीच्या इराणी चहाचा उल्लेख नाही... नाझ, महानाझ, वोहुमन आणि इतर अनेक अगदी सिटी पोस्ट चौकातलं ए-वन.
- Log in or register to post comments
श
श्रीगणेशा
Fri, 07/05/2024 - 11:06
नवीन
गावाचं नाव आठवत नाही, पण खूप वर्षांपूर्वी, जेजुरीहून मोरगावला जाताना एका छोट्या त्रिफुलीवर (तीन रस्ते एकत्र येणारं ठिकाण), एका छोट्याशा टपरीवर घेतलेल्या चहाची चव अजूनही लक्षात राहिली आहे.
----
तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे गावाच्या सुरुवातीलाच, रस्त्यालगत असणाऱ्या विशाल हॉटेल मधील चहाही लक्षात राहण्यासारखा. सोबतीला वेल्ह्यातील निसर्गरम्य पावसाळी वातावरण असेल, तर "चहा"शर्करा योगच म्हणावा लागेल!
----
- Log in or register to post comments
र
रामचंद्र
Fri, 07/05/2024 - 15:21
नवीन
हे विषयांतर होतंय पण चाळीसेक वर्षांपूर्वी वेल्ह्यात एसटी स्टँडजवळ पोस्ट ऑफिसकडून गडाच्या वाटेकडं जाताना सुरुवातीलाच डाव्या बाजूला एका शेतातल्या विहिरीचं पाणी पिल्याचं आठवतंय. इतकं गोड आणि छान होतं की इतक्या वर्षांनी अजून लक्षात राहिलं आहे.
बाकी पावसाळ्यात ट्रेक करून झाल्यावर परतीच्या वाटेवर मस्त चहा मिळाला तर स्वर्गसुखच!
- Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे
Tue, 07/09/2024 - 04:06
नवीन
जुनंच वाक्य पुन्हा
चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो .
- Log in or register to post comments