तात्या ......... !
तात्या वारला !
चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस - वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही. तो वारला हे भिडेखातर लिहितोय - तात्या मेला अस लिहिलं पाहिजे.
काही वर्षापूर्वी भारतात होतो तेव्हा तात्याच्या अनेक भेटी व्हायच्या. सोशल मीडियातून मला भरगच्च मित्र मिळाले. पुढे वेगवेगळ्या कारणांनी सगळेच दुरावले - त्यातला तात्या प्रमुख ! फेसबुक आणि ऑर्कुट लोकप्रिय व्हायच्या आधी - मिसळ पाव हा नव्या मराठी लेखकांचा अड्डा होता. तात्या त्यातला मुख्य माणूस. तो फोरास रोडच्या वेश्यावस्ती पासून सुधीर फडकेंच्या गाण्यापर्यंत कशावरही लिहायचा. मी अति पुरोगामी लिखाण सुरु केले की ढुंगण वर करून झोपलेल्या नागड्या बाळाचा फोटो टाकायचा - वर म्हणायचा हे आस्तिक नास्तिक विज्ञान वगैरे - वाद विवाद संपेपर्यंत तात्या ढुंगण वर करून झोपला आहे.
तात्या शिवसैनिक होता . आमची मैत्री झाली ते आम्ही दोघंही शिवसेना असल्याने. तात्या शिवसैनिक होता हे कौतुक नाही, मी पण होतो, मुंबई ठाण्यातली निम्मी मराठी माणसं शिवसैनिकच असतात. संघ भाजप विरुद्ध मनापासून दंड ठोकणारा तो शिवसैनिक होता. तात्याची शिवसैनिक गिरी समजण्यासाठी मुंबईचा कनिष्ठ मध्यम वर्गीय गरीब मराठी माणूस समजून घेतला पाहिजे. मुबईतला भाजपा गुजराथी मारवाडी श्रीमंतांचा पक्ष आहे. डाळीच्या भावाची चिंता असलेला मराठी माणूस मुंबई भाजपात नाही. मागे डाळीचे भाव वाढले तेव्हा कचकून शिव्या खाल्ल्या मोदीने तात्याच्या. पुढे तो स्वतःला काँग्रेसवाला म्हणायचा कधी बहुजनसमाजमावादी चित्पावन म्हणायचा !
तात्या अभ्यंकर चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण . तात्याच्या जातीचा उल्लेख करण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. लेखाच्या शेवटी ते देणार आहे. आटपाट नगरात एक गरीब ब्राम्हण राहत होता अशा गोष्टी आपण लहानपणापासून वाचल्या आहेत. 1990 नंतर जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेत आटपाट नगराच्या कथा गेल्या. मुंबई पुण्यातले गरीब ब्राम्हण सुद्धा गेले. शिकले इंग्लिश बोलले ते बाहेर गेले. काळाच्या मागे राहिलेले , न शिकलेले अडाणी मूंबईतून बाहेर फेकले गेले. मुंबई अडाणी अंबानींची झाली. थोडक्यात उद्याच्या अन्नाची चिंता असलेला ब्राम्हण शिल्लक राहिला नाही. तात्या राहिला.
त्याच वडिलोपार्जित लहान घर ठाण्यात होतं त्यात राहिला . हिशोबनीस म्हणून फोरास रोडच्या बार मध्ये कामं केली . दोन पेग नी घसा ओला करत कोणत्याही बार मध्ये बाबूजींचं , माडगूळकरांचं - गीत रामायण गात राहिला . तात्याच्या आवाजात भारदस्त पणा होता . प्रेम वासना गाणं दारू वेश्यावस्ती या सगळ्यावर लिहिताना आणि बोलताना त्याच्या व्यक्तिमत्वातला भारदस्त पणा दिसत असे . तात्या वेश्या वस्तीत फिरायचा . पण त्याचं पुरुष म्हणून स्खलन झालं नाही आणि प्रेमाची किंमत त्याच्या लेखी कमी झाली नाही . उलट वाढली.
एक काळ असा होता की , बरेचसे गरीब ब्राम्हण ट्रॅफिक लायसन्स आणि एलआयसी चे एजन्ट असायचे . तात्या ते होताच . शिवाय तो शेअर मार्केट चा पण एजन्ट होता . इंट्रा डे शेअर मार्केट हा जुगार आहे . पैसे छापायचे मशीन कोणी विकत नसतो . बौद्धिक आणि शारीरिक कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत हे अर्थशास्त्र कळण्याची बौद्धिक कुवत त्याच्यात निश्चित नव्हती . निष्पाप आणि निर्मळ नसला तरी तो जाणून हलकट निश्चित नव्हता . तो त्या शेअर मार्केट च्या दुष्टचक्रात गेला . मग लोकांकडून पैसे उधार घेणं आलं . दुप्पट करतो आलं . त्याच्या नावाने पेपरात नोटिसाही आल्या . पण तात्याने अनेकांचे पैसे बुडवले तसे अनेकांना दुप्पट करून सुद्धा दिले होते.
तात्याची पिसं काढता येतील - ते सोप्प आहे . त्याचं गरीब ब्राम्हण असणं मात्र समजून घेणं अनेकांना अवघड आहे . तात्या अविवाहित होता . त्याचा जबरा प्रेमभंग सामाजिक कारणामुळे झाला असावा . तितकं मोकळं आणि खरं तो नेहमी बोलेल याची खात्री नाही . तो दुःखी नव्हता पण त्याच्या अडाणचोट रांगड्या वृत्तीत एक एक घाबरलेला आणि हरलेला माणूस होता.
माझी तात्याशी पहिली भेट 2013 साली झाली असावी . त्याच्या आधी फक्त इंटरनेट वर ओळख होती . मला त्याचं लिखाण भारी वाटलं होत . कोणी दुढाचार्य चष्मांवाला, शर्ट इन केलेला अभ्यंकर मला अपेक्षित होता . जे पाहिलं - तो सरळच पेशन्ट होता शर्टाच्या गुंड्या खालीवर लावल्या होत्या . तोंडात गुटखा तंबाकू खाऊन पांढरे घट्टे पडले होते . वजन जास्त . ब्लड प्रेशर मुळे हाताला किंचित कंप होता.
पहिल्याच भेटीत त्याने माझ्याकडे पैसे मागितले . शेअर मार्केट मध्ये लावून डबल करतो बोलला . त्याची बुडणाऱ्या पैशाबद्दलची कीर्ती आधीच ऐकली होती . गरिबी सुद्धा माहीत होती . पैसे बुडणार हे निश्चित होतं . पण त्याची नड पण समजत होती . जितके मागितले तितके दिले . पण एक अट घातली दुप्पट कर पण परत देऊ नको. त्यानंतर तात्याने मला कधी पैसे मागितले नाहीत.
त्याची बार मधली गाणी ऐकली . भीमसेन जोशी आणि बाबूजींचे किस्से ऐकले . तात्या थोरामोठयाच्या संगतीत राहिला . पण मोठा झाला नाही लहान मुलासारखाच राहिला . तात्याची एक आई आहे . तात्या मेला तो त्या आईच्या साक्षीने . आई खूप म्हातारी आहे . तात्याने तिची वर्षानु वर्ष सेवा केली आहे . तात्या तिचं सगळं नित्यनेमाने प्रेमाने करायचा . लहान मुलासारखाच आई आई बोलायचा .
तात्याने लग्न केले नाही , स्त्री प्रेमासाठी तो आसुसला होता. विषय काढला लग्नाचा तर म्हणायचा लग्न करून सुद्धा तुम्ही तसेच भोंगळे रहाणार लेको ! तात्या मेला तेव्हा त्याची आई जिवंत होती. आई आजारी आहे - तिला नीट चालता सुद्धा येत नाही. तात्याला हार्ट अट्याक येऊन तो जमिनीवर कोसळला. त्यावेळी आईने माझा श्रावणबाळ म्हणून हंबरडा फोडला. एक गरीब ब्राम्हण मेला. त्याच्या आईचं बघायला कोणी नाही.
- डॉ अभिराम दिक्षित एन.
----------------------------------------------------------------------------------
मिपा मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर आपल्यातून जाऊन ५ वर्षे झाली.
दि. १५ मे २०१९ ही ती तारिख.
फेसबुक चाळता चाळता मिपाकर अतृप्त आत्मा यांच्या वॉल वर हा लेख दिसला.... अन काळजात चर्र झालं, मी तात्या अभ्यंकर यांना कधी भेटलो नाही तरी !
मिपा सुरू झाल्या पासुन तात्याचं लेखन वाचत होतो.. अन आपसु़क या व्यक्तिमत्वाचा फॅन झालो. भेटायची इच्छा झाली पण योग नाही आले. तात्यांचं लेखन जेव्हा फॉर्म मध्ये होतं तेव्हां मिपाकर नव्हतोच फक्त एक्स्टर्नल वाचक .. पण मनातून पक्का मिपाकर झालो होतो. पुढे २०१४ ला मिपा सदस्यत्व घेऊन कमेंटायला अन लिहायला लागलो,
अतृप्त आत्मा यांनी अभिराम अभिराम यांचा लेख शेअर करताना " मी दरवर्षी हा लेख वाचतो आणि शेवटच्या चार ओळींना भरपूर रडतो ! एक तात्या आपल्यात अजूनही आहे .याची नम्र जाणीव होते ." अश्या भावना व्यक्त केल्यात.
तात्या अभ्यंकर यांच्या व्यक्तिमत्वाचा आरपार वेध घेणारा हा लेख मला इथं शेअर करावासा वाटला.
तात्या अभ्यंकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली _/\_
मदनबाण.....