Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अधिकार

आ
आकाश खोत
Wed, 03/27/2024 - 10:30
💬 5 प्रतिसाद
गेल्या आठवड्यात माझ्या बायकोच्या आजी देवाघरी गेल्या. बातमी कळताच आम्ही सर्व तातडीने पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला निघालो. गाडीमध्ये मी माझी बायको आणि माझे सासु सासरे होते. पूर्ण प्रवासात सतत आम्ही संभाजीनगरला आजींच्या राहत्या घरी गोळा झालेल्या नातेवाईकांशी संपर्कात होतो. एरवी पुण्याहून निघालो, नगरला पोहोचलो, नगर क्रॉस झालं, जवळ पोहोचलो एवढे अपडेट पुरेसे असतात. अशा प्रसंगी मात्र कोणालाच स्वस्थ बसवत नसतं, सतत बोलत संपर्कात रहावं वाटतं. जवळची एक व्यक्ती गेलेली असताना इतर जवळच्या व्यक्तींच्या सहवासात रहावं वाटतं. आणि यावेळेस सतत चर्चा करण्यासाठी आणखी एक विषय होता. दिवंगत आजींना मुलगा नव्हता. त्यांना आणि दादांना (आजोबांना सगळे दादा म्हणतात) सहा मुली. त्यातल्या एक मावशी आजाराने अशातच देवाघरी गेलेल्या. सख्खा भाऊ नाही. मग अंतिम संस्कार कोणी करायचे असा प्रश्न होता. यावर आजी आणि दादांनीच काही वर्षांपूर्वी आमच्या मुलींनीच आमचे सर्व सोपस्कार पार पाडले तर बरं अशी इच्छा व्यक्त केली होती असं समजलं. आणि या बहिणींची सुद्धा तशीच इच्छा होती. सहसा घरातून एकदा पार्थिवाला निरोप दिला की पुरुष मंडळी वैकुंठात जाऊन अग्निसंस्कार करून येतात आणि स्त्रिया घरीच राहतात. माझ्यासमोर आजवर आलेल्या प्रसंगात हेच पाहिलं होतं. आणि वैकुंठात जे वातावरण असतं ते पाहता मला त्यात आजवर फार काही वावगं वाटलं नाही. आत्ता अगदी काही तासांपूर्वीपर्यंत आपल्यात वावरणाऱ्या जवळच्या व्यक्तीच्या पार्थिवाला अग्नी देताना पुरुषसुद्धा भावूक होतात. आपण हे काय करतोय असा प्रश्न पडतो. त्यात स्त्रिया तुलनेने जास्त भावनाप्रधान असतात, त्यांना घरी असतानाच दुःख आवरायला बऱ्यापैकी जड जातं. पण आजवर मी पाहिलेल्या बहुतेक प्रसंगात सगळे विधी करायला मुलगा होताच. प्रश्न होता ही मुलींनीच सर्व संस्कार करण्याची थोडी रूढ मोडणारी इच्छा पूर्ण करायला कोणी गुरुजी सहाय्य करतील का? घरातलंच कोणी विरोध करेल का? सुदैवाने घरातल्या कोणी मोडता घातला नाही परंतु अशी तयारी दाखवणारे गुरुजी शोधायला मात्र अवघड गेलं. अनेक ठिकाणी फोन झाले. मुलींना अधिकारच नाही हे शेरे ऐकवून नकार मिळाले. प्रयत्न करून त्यातलेच एक तयार झाले पण तरीही त्यांनी विधी सांगताना तुसडेपणा, खरं तर हा ह्यांचा अधिकार नाही पण आता काय करणार, करा.. असली शेरेबाजी केलीच. या बहिणींनी मात्र या सर्वातून खंबीर राहून एकमेकींना धीर देत तो प्रसंग निभावून नेला. फार कौतुक वाटलं त्यांचं. आणि थोडं इतर नातेवाईकांचे सुद्धा ज्यांनी हे पार पडायला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ दिली. या अधिकारावर चर्चा होत असताना मला गाडीत जाताना आईंचं एक वाक्य सतत आठवत होतं.. मुलींचं असच का होतं? जबाबदाऱ्या सगळ्या घ्यायच्या, सेवा सगळी मुलींनी करायची, कामं करायची आणि अधिकार मानसन्मान मात्र पुरुषांना. सुख असो दुःख असो कुठलाही प्रसंग आला तरी तेच. आपल्याच आई वडिलांचं करायला अधिकार का नाही? आज त्याच आजींचे दशक्रिया विधी पैठणला पार पडले. तेही याच बहिणींनी केले. इथे भेटलेल्या गुरुजींचा मात्र सुखद अनुभव आला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही कसलीही शंका मनात न ठेवता सगळं करा. मुलींना मुलांना आहे तसाच पूर्ण अधिकार आहे. उलट मुली दोन कुळांचा उद्धार करतात त्यांना जास्त अधिकार आहे. असेच गुरुजी सगळीकडे का नसतात? असा चांगला विचार सगळ्यांनीच दाखवला तर का मुली नकोशा होतील? वंशाला दिवा म्हणुन, वय झालं की आधार द्यायला म्हणुन, शेवटी खांदा द्यायला आणि अग्नि द्यायला म्हणुन अशा नाना कारणांनी लोक मुलगा मुलगा करत बसतात. मुली हे सर्व करू शकतात. आजी दादांना मुलीच असल्यामुळे अनेकदा अपमान झेलावे लागले असं मी ऐकलं. त्याउपर त्यांनी अशी इच्छा दाखवली आणि मुलींनी ती पूर्ण केली. आणि आज त्यांना तो पाठिंबा मिळाला. आधीच्या काळी अनेक मुलगा नसलेल्या कुटुंबात मुलींना असं बोलताही आलं नसेल. त्यांच्या आई वडिलांचे विधी करायला कोणी चुलत भाऊ, पुतण्या, नातू, जावई असे कोणी पुढे झाले असतील. बरं संबंध जवळचे आणि आपुलकीचे असले तरी ठीक पण चांगले संबंध नसतानासुद्धा केवळ अधिकाराच्या मुद्द्यावर कोणीही सोम्या गोम्या त्यांच्या आई वडिलांचं करायला पुढे केला जात असेल तर त्यांना किती वाईट वाटत असेल? आणि कोणी दिला हा अधिकार? मी गेल्यावर माझ्या देहाचं काय व्हावं हे ठरवायचा पहिला अधिकार माझा, मी तो व्यक्त न करता गेलो तर माझ्या कुटुंबाचा अधिकार हवा. कोणी तिसऱ्याने का अधिकार सांगावा? आधीच्या काळी धर्मपरंपरा म्हणून, पुरुषप्रधान व्यवस्था म्हणून जे होत असेल ते असेल. पण आपण सती प्रथा सोडली, विधवा केशवपन सोडलं, जुना पेहराव सोडला, असे अनेक बदल केले. तसे आता असेही बदल स्वीकारायला हवेतच. मी वाचलेल्या एका सुभाषितात असं म्हटलं होतं की आपल्या मतिला पटेल तोच धर्म. एखादी गोष्ट ब्रह्मदेव सांगतोय पण बुद्धीला पटत नसेल तरी ती करू नका, आणि जी गोष्ट आपल्या सद्बुद्धीला पटेल ती ब्रह्मदेवसुद्धा चुकीची ठरवू शकत नाही. आपल्या लोकांनी बदल बंद केले तेव्हाच आपल्या सनातन धर्माचं साचलेलं डबकं होऊन त्यात घाण माचली होती. आपण पुन्हा बदल स्वीकारायला लागलो तेव्हापासूनच आपण समाज म्हणुन पुन्हा प्रगतीपथावर आहोत. कधी काळी याच पैठणमध्ये कर्मठांनी, परंपरा मोडली म्हणून संत ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना देहत्याग हेच प्रायश्चित असं सांगितलं होतं. आणि त्यांनी ते करूनही त्यांच्या मुलांना छळलं होतं. आज त्याच ठिकाणी गुरुजींनी मुलींना पूर्ण अधिकार आहे हे सांगताना ऐकलं तेव्हा फार बरं वाटलं. एका इंग्रजी सिरीजमध्ये एक छान वाक्य ऐकलं होतं, Power resides where men believe it resides. आपण पूजेला एक सुपारी उचलतो आणि मग तिला गणपती मानून पुढचे विधी करतो, दगडाला शेंदूर फासतो मग त्याला देव मानतो, अंतिम संस्कारात एक दगड उचलून तोच सांभाळून त्याला अश्मा म्हणून पूजेत घेतो. हा मान देणारे आपणच, अधिकार देणारे आपणच, अधिकार गाजवणारे आपणच आणि सदुपयोग करू शकणारे सुद्धा आपणच. चांगले विचार आणि काम करण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि तो सर्वांनी सतत बजावावा. ता. क. देवाघरी गेलेल्या व्यक्तीचं समाधान असमाधान व्यक्त करण्याचा अधिकार आपण कावळ्यांना दिलेला आहे. आमच्या आजीच्या पिंडाला तत्काळ कावळे शिवून त्यांनी आपलं पूर्ण समाधान व्यक्त करण्याचा अधिकार बजावला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2189 views

💬 प्रतिसाद (5)
भ
भागो Wed, 03/27/2024 - 11:05 नवीन
डोळे उघडवणारा लेख. तुम्हाला धैर्य दाखवणारे गुरुजी भेटले. हे तुमचे सुदैव. धर्म गतिमान असावा. तरच तो टिकेल. धर्म आपल्यासाठी असावा. माझ्या ओळखीतल्या एकांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आपला पूर्ण देह हॉस्पिटलला दान केला होता. त्यामुळे अंतिम संस्कार वगैरे काहीही करण्यात आले नाही. अश्या महान व्यक्ति विरळाच.
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Wed, 03/27/2024 - 12:22 नवीन
संबंधित विषयावर याआधी झालेली चर्चा पापा की परी पुढे चालू द्या. आम्ही पॉपकॉर्न घेऊन बसलो आहोत. Image removed. https://www.magiquestpf.com/wp-content/uploads/popcorn-coke.png
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 03/27/2024 - 14:35 नवीन
अंमळ सरका तिकडं थोडं. आणि पुडा आमच्या बाजुला धरा...
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Wed, 03/27/2024 - 15:26 नवीन
अहो या की, पॉपकॉर्न फुल्ल पुडा घेऊन आलोय. हवं तर त्यावर घालायला कांदा लिंबू आहेच. बरं ते जाऊ द्या, बाकी आपले इमानदार भौ काय म्हणतात सध्या? हवापालट दीर्घकाळ चालणार बहुतेक.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण गुरुवार, 03/28/2024 - 02:58 नवीन
अगदि मजेत आहेत. त्यांचे शरीर जरी जेलमधे असले तरी आत्मा आपल्या आसपास आहे. आपण डोळे मिटून अनुभूती घेऊ शकतो असे त्यांच्या सुविद्य पत्नीने कालच जाहीर केले आहे. आता त्याच मुख्क्यमंत्री होणार आहेत म्हणजे हे महीला सक्षमीकरणच म्हणायचे की. जो ह्या लेखाचा गाभा आहे त्यामुळे हा प्रतिसाद अवांतर नाही हे जाणकारांच्या लक्षात आलेच असेल. इतरांना आता कळेल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा