Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

असा मी असामी.

भ
भागो
Fri, 02/16/2024 - 12:01
माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीत हल्लीच एका नव्या लेखकाची भर पडली आहे. भेदक आणि चमकदार लिखाण. त्यांनी लिहिलेलं एक ललित वाचून मला धक्का बसला. ह्या लेखकाला मी केव्हा भेटलो? अगदी डिट्टो मला समोर ठेवून ते ललित लिहिले गेले असणार. मला ओळखणाऱ्या मोजक्या लोकांचा मी मनोमन आढावा घेतला. तर त्यात ह्या नावाचा कोणीही नव्हता. पण नंतर विचार केला कि हल्ली काय लोक टोपणनाव नाव घेऊन लिहितात. मला ओळखणाऱ्या मोजक्या लोकांचा काय भरवसा? पण त्यात लेखक असा कोणीही नव्हता. सगळे आपापल्या व्यापात गुंतलेले. लिहायला वेळ कुठून काढणार? बिचारा गुप्ते मुलांच्या शाळेच्या अॅडमिशनच्या विवंचनेत गुंतलेला. राजा राजमाचीकरचे इंग्लिश प्रेम जगजाहीर होते. तो कशाला मराठीत लिहून आपली पातळी खालावेल. राहता राहिला करंदीकर. रिकामटेकडा जीव. त्याची भंकस ऐकवायला त्याला मीच सापडायचो नेमका. जेव्हा विडिओकान ("कान" च. कारण "कॉन" म्हणणे बरोबर नाही.) वगैरे कंपन्यांचा उदय झाला नव्हता तेव्हाची गोष्ट आहे. करंदीकर मला म्हणतो कसा, "हायला आज कपडे धुवायला लागले." "का? बाईने दांडी मारली काय?" "नाही हो, आमचे वाशिंग मशिन बंद पडलय." "वाशिंग मशिन? अमेरिकेतून आणले काय?" "लग्नात सासऱ्यांनी भेट म्हणून दिलं आहे. तुम्हाला नाही दिलं? भागो, तुम्ही फार भिडस्त आहात बुवा. आणि मागणार असाल तर डिशवाशरपण घ्या मागून. पोळ्या बनवायचं, केर काढायचंपण मशीन असत. हाय काय नाय काय." करंदीकरने मला मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला. "पण त्याची देखभाल इथं इंडियात कोण करणार?" मी माझी आपली शंका बोलून दाखवली."कोण म्हणजे? हे काय विचारणं झालं. आपणच करायची." "पण मी मेकानिक थोडाच आहे?" "अहो," त्याने खाजगी आवाज काढून मला सांगितले, "शिकून घ्यायचे. केल्याने होत आहे रे..." आता करंदीकराने हा किस्सा सगळ्या ऑफिसात इंक्लुडिंग स्त्रीवर्गात पसरवला असणार यात काडीमात्रही शंका नाही. ते काहीही असो. पण मी काही सासऱ्यांकडे असली मागणी केली नाही , करणार नाही. ते माझ्या स्वभावात नाही. तत्वात बसत नाही. तो महान लेखक पुढे काय लिहितो बघा. "बालपणी डोळ्यात चमक होती. ती जपून ठेवायला पाहिजे होती." माझ्या केसमध्ये काय झाले? माझ्याही डोळ्यात लहानपणी ती चमक होती. ते पाहून आईबाबाना काळजी वाटू लागली. आता ह्याचं काय होणार? कसं होणार? इथपासून ते ह्याच्याशी कोण लग्न करणार? इथपर्यंत. मग धरलं मला आणि गेले घेऊन चष्म्याच्या डॉक्टरकडे. "डॉक्टर, जरा ह्याला तपासा बर. काही दिवसांपासून ह्याच्या डोळ्यात निराळीच चमक दिसायला लागली आहे." "अरेरे, खूप रेअर कंडीशन आहे ही. शेवटची केस पन्नास वर्षापूर्वी चायनाच्या हुआंग हुंग मध्ये सापडली होती. ह्यामध्ये काय होता कि डोल्यामदी एक ऑप्टिक नर्व्ह असणार. तीला बिमारी झाली असणार, काय? वेळेवर उप्चार नाय केले तर मग मोठेपाणी ह्याला कालाचष्मा दिवसापण आणि रात्रीपण घालावा लागणार. तो आपला कोण फेमस पोलितिशिअन आहे?... गेला बिचारा. त्याला व्हती. पण घाबारायाचा कारण नाही. आपण ह्याला बरोबर करणार. पोरा चल आतमंदी. तुझी ऑप्टोमेट्री करून टाकू." झालं. अशाप्रकारे कोवळ्या वयात मला चष्मा लागला. डोळ्यातली चमक चष्म्याच्या आरशित उतरली. चष्म्याच्या काचा चमकायला लागल्या. एकूण काय तर सध्या मी जो आहे, जसा आहे त्याचे श्रेय माझ्या आईबाबांना आहे. आता हा एक किस्सा वाचा म्हणजे तुम्हाला माझ्या व्यक्तिमत्त्वाची थोडी कल्पना येईल. त्याचं काय झालं कि ऑफिसमधल्या सर्वांनी ठरवलं कि पार्टी तो बनतीही है! कशासाठी? कशासाठी असं नाही. सगळ्यांनी ठरवलं म्हणून. पण स्थळ? आहे एक स्थळ. विनापाश विनापत्य अश्या एकमेवाद्वितीय मिस्टर भागोचा फ्लॅट. अरे पण त्याला विचारायला नको? त्याची परवानगी घ्यायला नको? कशाला. तो काय आपल्याला नाही थोडाच म्हणणार आहे? मग ठरलं तर. शनिवारी रात्री भागोच्या फ्लॅटवर पार्टी! रात्री नऊ वाजता सगळे जमले. कुणी बाटल्या आणल्या. कुणी भेळ, फरसाण आणले. मन्या स्टार्टर घेऊन आला. मीठ लाऊन कांद्याचे पाSSSSतळ काप तयार झाले. उतारा जवळ असावा म्हणून लिंबं चिरून ठेवली होती. पार्टी सुरु झाली. हळूहळू रंगात आली. लोकं मोकळी झाली. अद्वातिद्वा रिमार्क टाकू लागली. जनरल मॅनेजर पासून इष्टमित्रमैत्रिणीलेकीसुनापोरीबाळांसह सर्वांचा उद्धार करण्यात आला. मन्या कशाला तरी म्हणून उठला आणि तोल जाऊन खाली पडला. "चढलीरे चढली मन्याला." सगळे ह्या ह्या करून हसायला लागले. मन्या कसाबसा उठला आणि जागेवर बसला. "माझा फिजिकल बॅलंस गेला असेल पण मेंटल बॅलंस पक्का आहे." अस बोलून त्याने पेपर ओढला. खिशातून पेन काढून त्याने लिहिले. २+२=५. "पक्या, वाच लेका. बरोबर आहे ना? दोन अधिक दोन बरोबर पाच." सगळ्यांनी विचार करून होकार भरला. म्हणाले, "तथास्तु." अश्या गप्पा गोष्टी होता होता मध्य रात्र उलटून गेली. मग कुणाला तरी माझी आठवण झाली शेवटी. "हायला, भागो कुठाय?" "आत्ता तर इथे होता. गेला कुठे?" इति करंदीकर. "अरे असा कसा दिसला तुला? तो पार्टीला आलाच नाही. म्हणी इथे होता." "आपण बोलावलाच नाही तर तो यील कसा. चुकलच आपलं." "पण भागो म्हणजे ए वन झंटलमन माणूस. कुणाच्या ना अध्यात ना मध्यात. चुपचाप ऐकून घेणारा. त्याला आपण नाही बोलावलं? असं कसं विसरलो आपण?" आत्ताही मी चुपचाप ऐकून घेतच होतो की. "मी तर त्याला नायट्रोजन वायू म्हणतो. कलरलेस, टेस्टलेस, ओडरलेस. निव्वळ गुळाचा गणपती." छान. येऊ द्या अजून. ठीक आहे. अजून काही? "उद्या आपण त्याची क्षमा मागायला पाहिजे." "मंजूर!" बसल्या जागीच सगळे एकेक करून ढेर झाले. मन्याला जरा जास्त झाली असणार कारण त्याने तिथेच ओ केली. बादलीभर पाणी टाकून मॉप घेऊन मी ती साफ केली आणि झोपलो. सकाळी सगळे उठले. मी सगळ्यांसाठी चहा केला. "भागो तू हे बरोबर केलं नाहीस. पार्टीला आला नाहीस." एकूण मंडळींचा फिजिकल बॅलंस परत आला होता, पण मेंटल बॅलंस? "अरे होतो ना. मस एन्जॉय करत होतो तुमच्या संगतीनं." "अबे ओ फेकू. होतास म्हणतोस म आम्हाला दिसला कसा नाहीस?" तोच तर माझा प्रॉब्लेम आहे!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 830 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा