प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं..
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
१४ फेब्रुवारी, म्हणजे संतश्रेष्ठ व्हॅलेंटाईन यांच्या नावाचा प्रेमाच्या गावी जाण्याचा दिवस. आपल्या सखीला किंवा सख्याहरीला आपले प्रेम जाहीरपणे सांगण्याची संधी देणारा दिवस आणि अर्थात काही सडक सख्याहरींना आपली जागा दाखवून द्यायचा दिवस. व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजे अगदी आगळावेगळा दिवस. नेहमीच्या दिवसासारखा हा नाही उजाडत. सूर्यही जरा लाजत, दबकत उगवतो, उषेचा रक्तिमा अधिक गडद भासतो आणि हवाही पॅरिसच्या हवेसारखी धुंद नशीली बनून जाते. त्यातून आज वसंत पंचमी, म्हणजे भारतीय कामदेवाचा उत्सव आणि अभारतीय लव्ह डे असे एकत्र आले आहेत. म्हणतात ना आधीच हा, त्यातून हा! सध्या भारतीयत्वाची चलती आहे. पूर्वी अभारतीयत्वाची होती. परंतु प्रेमाचा हा झरा, आहे मूळचाची खरा. प्रेमभावना इकडे तिकडे चोहीकडे आहेच आहे आणि सारखीच आहे.
आजही कित्येक प्रेमवीर आणि विरांगनांनी आदली रात्र तळमळत काढली असेल. सिंहाच्या काळजाचे असतील त्यांनी स्वरचित प्रेमकवितेची रिस्क घेतली असेल. बाकी ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे कुसुमाग्रज, नलेश पाटील, पाडगाव अथवा बोर कर, गुलजार, गालिब मौजूद आहेतच. घेतलेली भेटवस्तू, ती गुलाबी रिबीन, लाल, लाल टपोर गुलाब, कचकड्याची हृदयं, कार्ड्स, केक्स, (ते अव्वाच्यासव्वा महाग) गिफ्ट, आपले कपडे, आपला लुक; प्रेमयाचनेचे ठरलेले संकेत आणि अव्हेर झाला तर? ही चिंता. आणि तीव्र शारीरिक ओढीसह, प्रचंड भावनिक गुंतवणूक असलेले हे नातं पुढे आयुष्यभराच्या लाभावीण प्रीतीचा लाभांश देणारे ठरेल ना? ही लॉन्गटर्म चिंता.
खरंच काय असतो हा प्रेम नावाचा केमिकल लोच्या? काळीज धडधडतं, कानशीलं तापतात, सर्वांग मोहरून जातं, हुरहूर लागते, जग अर्थशून्य भासतं, कोण्या जनूचा मजनू बनून जातो. आशिक कधी जग उध्वस्त करू पहातात तर कधी कधी स्वत:लाच ध्वस्त करून घेतात. पण हे सगळं होतं कसं?
इम्यूनो-न्यूरो-एंडोक्राईन सिस्टिम अशा भयसूचक नावाची काही कार्यप्रणाली आपल्या सर्वांत असते. आपली प्रतिकार शक्ती, मेंदू, नसा आणि अंत:स्त्रावी ग्रंथी यांचे प्रगाढ नाते असते. हे नातेसंबंध म्हणजेज ही कार्यप्रणाली. आपले प्रेमपात्र दिसताच बरंsss वाटणं ते नकार येताच नैराश्याने अंथरूण धरणे, हे सगळं सगळं ह्या सदरात घालता येईल. ह्या साऱ्याच्या मर्मस्थानी असतात, हायपोथॅलॅमस आणि पिटयूटरी ग्रंथी. ही मंडळी साऱ्या अंत:स्त्रावी (एंडोक्राईन) ग्रंथींचा कारभार नियंत्रित करीत असतात. म्हणजेच साऱ्या शरीरसृष्टीचे हे नियंते. ह्या नियंत्यांकडे डोपामीन, ऑक्सीटोसीन, टेस्टोस्टेरोन अशी अनेक आयुधे आणि अंकुश.
ह्यातील डोपामीन हा सुख रस. डोळ्याला डोळा भिडला, एकांताचा वास घडला की हा मेंदूभर पसरतो. अंगी अगदी वसंत फुललेला. मग आनंदाचे डोही आनंद तरंग. प्रेमात पडलेली माणसं तारतम्य आणि ताळतंत्र गमावून बसतात ते ह्या डोपामीनमुळे. म्हणजे हा स्त्रवत असला की मनाला शांत, आनंदी, प्रसन्न वाटतं, शरीरही त्या आनंदात सहजच सामील झालेलं असतं आणि हा अनुभव वारंवार मिळवा अशी आस लागते. पण ह्याच डोपामीनचा हाच परिणाम माणसाला व्यसनाधीन बनवू शकतो. व्यसन कसलेही असू शकतं. प्रेमिकाचे, दारू-जुगाराचं किंवा लेखन-व्यासंगाचं. सर्वत्र डोपामीन कार्यरत असतो.
ह्याचाच एक मित्र. त्याचं नाव ऑक्सीटोसीन. हा ममता रस. एकमेकांच्या कुशीत अगदी खुषीत, निश्चिंतपणे विसावताना जो विश्वास, जी जवळीक, जे भावनिक तादात्म्य जाणवतं ना; ते ह्या ऑक्सीटोसीनमुळे.
‘जन्मोजन्मी मी तुला…’,
‘दुनिया गेली तेल लावत…’,
‘तुला चंद्रावर नेऊन…’
अशा शब्दांनी सुरू होणारी वाक्यं आणि त्यामागचा दुर्दम्य, आणि बहुतेकदा फाजील, आत्मविश्वास ही ऑक्सीटोसीनची देन आहे. हाती हात धरताना, घट्ट मिठीत मुरताना ह्याची मदत होते, तसेच सामाजिक ओळखीपाळखी आणि नाती सांभाळण्यातही ह्याचा हात असतो.
असाच एक व्हासोप्रेसिन नावाचा गडी आहे. हाही पिट्यूटरी ग्रंथीतून झरत असतो. वारंवार ब्रेकअप होणाऱ्या, आणि हे धक्के वारंवार पचवून हृदयाला पोचे आलेल्या प्रेमवीरांनी पुढील मजकूर अगदी काळजीपूर्वक वाचावा. व्हासोप्रेसिनला म्हणतात एकगमनी रेणू. थोडक्यात एक पत्नीव्रती किंवा एक पतीव्रती राहण्यासाठी हा सहाय्यभूत ठरतो. हा जितका अधिक तितके नाते घट्ट. बाहेर भानगडी करू नयेत, जोडीदार/दारीण एकनिष्ठ राहावा/वी म्हणून गंडेदोरे करण्यापेक्षा, व्हासोप्रेसिनची मात्रा निश्चित लागू पडणारी आहे. व्हासोप्रेसिन उपलब्ध आहे! त्याचे इंजेक्शन प्रसंगोपात वापरले जाते. पण नवऱ्याला गोळी घालावी म्हणजे त्याचे ‘बाहेरचे’ खयाल बंद होतील अशी निष्ठावर्धक वटी अजून बाजारात आलेली नाही.
पहिल्या भेटीतच काही वेगळंच वाटायला लागलं की समजावं हायपोथॅलॅमसही आता चांगलंच तापलं आहे. आता डोपामीनचा पूर येतो माणूस प्रेमात गटांगळ्या खाऊ लागतो, सारं जग विसरायला होतं, फक्त आणि फक्त प्रेमपात्राचं स्मरण होत रहातं. मनात फक्त तेवढाच विचार.. ती/तो आत्ता काय करत असेल? पण शरीरात मात्र ऑक्सीटोसीन आणि व्हासोप्रेसिन पुढच्या तयारीला लागलेले असतात. या नाजुक नात्याला काही संदर्भ द्यायला, अधिक सखोल करायला, काही भविष्य द्यायला सरसावलेले असतात. जसं नातं रुजत जातं, जसं ते फुलत जातं; मनं मिळून मिळून जातात, तारा जुळून येत जातात; तसं ही भारदस्त इम्यूनोन्यूरोएंडोक्राईन सिस्टिम आपली साथसंगत करत राहते. दाद, जवाब देत रहाते, लाजवाब! म्हणत रहाते. होर्मोन्सच्या लाटा येतात, जातात; आस, आसक्ती, सक्ती, मर्यादा, मालकीभावही येत जात रहातात. शरीर, शरीरसुखाची मागणी करतं. ही असते टेस्टोस्टेरोनची करामत. हा एक नर-रस. म्हणजे दाढी मिशांशी आणि पुंबीज निर्मितीशी ह्याचं नातं. मात्र नराला आणि नारीलाही कामेच्छा निर्माण होते ती ह्याच्यामुळे.
कोणताही नातं म्हटलं की त्यात ताण तणाव आलेच. ब्रेकअपही आले आणि पॅचअपही. मग विरह आला. अस्वस्थता आली. तगमग आली. पाण्याविना मासोळीसम तळमळणे आले. आता स्ट्रेस-हॉरमोन, कोर्टीसॉल, उसळी मारतो. एखाद्या दारुड्याला दारू मिळाली नाही की माणूस अतिशय अस्वस्थ होतो. तशीच, अगदी उपचार लागावेत अशी टोकाची अस्वस्थता अनुभवास येते. पण बरेचदा सारे स्थिरस्थावर होते. नव्याने संतुलन साधले जाते. कोणत्यातरी नव्या बिंदुपाशी पुन्हा सारे होर्मोन्स तोलून रहातात. ह्या ‘न्यू नॉर्मल’प्रमाणे आयुष्य पुढे जात राहते.
व्हॅलेंटाईन डे ला जे घाऊक प्रमाणात ओसंडून वहातं ते ‘प्रेम’ आहे का ‘आकर्षण’ हे प्रत्येकाने तपासून घ्यायला हवे. आकर्षण अगदी तीव्र, तात्काळ आणि आवेगी असतं. आपला जोडीदार तिथे आदर्शाचा पुतळा होऊन जातो. त्याच्या/तीच्या दोषांकडे दुर्लक्ष किंवा प्रसंगी त्यांचं समर्थन वा उदात्तीकरणही केलं जातं. अनेक प्रेमविवाह फसतात कारण ते मुळी प्रेमविवाहच नसतात. ते असतात ‘आकर्षण विवाह’. निव्वळ डोपामीनवर आधारलेले. प्रेम अधिक खोल, अधिक गंभीर असतं. परस्परांना समजावून घेणं, सहवासातून, सह-अनुभूतीतून जाणून घेऊन मग दीर्घकालीन साथीचे वचन देणे घेणे, हे अभिप्रेत असतं. त्यात समाज आणि संस्कृती, अनेक फासे फेकत असतात. स्त्री आणि पुरुषाकडून विशिष्ट अपेक्षा बाळगून असतात. त्यांचे दबाव निर्माण होतात. त्यांना सामोरे जावेच लागते. संवाद कौशल्ये, उत्तम भावनिक बुद्ध्यांक, दुसऱ्याचा दृष्टीकोनातून आसपास पहाणं असेल; समान मूल्य, समान आवडी, समान ध्येय असेल तर असल्या दाबावातूनही प्रेमाला उत्तम अधिष्ठान लाभते.
ज्यांना हे साधलेले नाही ते मात्र व्हॅलेंटाईन डे ला नेटफ्लीक्स बघणे किंवा स्वतःवरच प्रेम करणे एवढंच करू शकतात. खोलीत एकटेच काय बसतात, आईस्क्रीमचा अख्खा फॅमिली पॅक काय संपवतात आणि सोशल मिडियावर डे ची उणीदुणी काढणाऱ्या पोस्ट टाकत रहातात.
प्रेम; एक सुखद भावना, एक दिव्य अनुभूती पण ती चक्क इम्यूनोन्यूरोएंडोक्राईन सिस्टिमच्या भाषेत मांडता येते. पण ह्यात वावगं काय? पचनसंस्थेचं, श्वसनसंस्थेचं कार्य आपण अशाच भाषेत, अगदी शाळेत शिकतो. पण एकूणच भावना, विचार, कलांचा प्रदेश आपल्याला अस्पर्श, अतीत परामानवी वाटत असतो. पण असं काही नाही. आधुनिक तंत्र-विज्ञानाने आता ह्याही क्षेत्रात अनेक नावे शोध लावले आहेत. प्रेमाचा थर्मामीटर, वशीकरण गुटिका आणि ब्रेकअपसाठी गुणकारी पॅचअप मलम लवकरच मिळू लागेल. तोवर ह्या गुलाबी दिवसाच्या गुलूगुलू शुभेच्छा.
प्रथम प्रसिद्धी
‘तुमचं आणि आमचं सेम केमिकल असतं’ या शीर्षकाने
लोकसत्ता, चतुरंग पुरवणी, १०.२.२०२४
💬 प्रतिसाद
(20)
अ
अहिरावण
Sat, 02/10/2024 - 07:59
नवीन
लैच गुळचट पाणी पाजलंत राव !! तरिच लोकसत्तात छापून आलं!
छ्या !! कुसुमाग्रजांची प्रेम कर भिल्लासारखं वाचावी लागणार उतारा म्हणून !!!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 02/10/2024 - 08:45
नवीन
वा खू सा...
- Log in or register to post comments
न
नठ्यारा
Sat, 02/10/2024 - 19:29
नवीन
अवांतर :
च्यायला त्या संत व्हॅलेंटाईनचा प्रेमाशी नेमका संबंध काय? या मनुष्यास युद्ध अप्रिय होतं. त्याकाळी युद्धात सक्तीची खोगीरभारती होत असे. मात्र विवाहितांना तिच्यातनं सूट मिळे. म्हणून त्याने लग्न लावायचा सपाटा लावला. त्यामुळे तत्कालीन रोमन सम्राट क्लॉडियस याने त्यास टपकावला. तो दिवस होता १४ फेब्रुवारीचा. म्हणून हा लग्नदिवस म्हणायला पाहिजे. प्रेमाशी संबंध काय लग्नाचा? उगीच आपलं काहीतरी.
१४ फेब्रुवारी या दिवसापासून दिनवर्धन व निशासंकोच लक्षणीयरीत्या होत जातो. त्यामुळे हा माझ्या मते हा युरोपातील संक्रांतीसारखा सण आहे.
-नाठाळ नठ्या
कथेचा संदर्भ : https://www.nicholaswylde.com/february-2018-newsletter/origin-valentines-day-st-valentine-traditions-begin/
- Log in or register to post comments
न
नठ्यारा
Sat, 02/10/2024 - 20:11
नवीन
अवांतर :
आजूनेक इंग्रजी लेख सापडला : https://theconversation.com/the-real-st-valentine-was-no-patron-of-love-90518
यानुसार व्हॅलेंटाईन ही केवळ दंतकथा आहे. अधिकृत नोंदींनुसार जे कोणी तीन सेंट व्हॅलेंटाईन होते, ते कोणीही प्रेमाशी वा लग्नाशी निगडीत नव्हते. प्रेम म्हंटलं की बायकांना अगदी भरून येतं. त्यांना नादी लावायला असले प्रेमाचे सण बरे पडतात.
एकंदरीत व्हॅलेंटाईन डे ही एक अंधश्रद्धा आहे. अनिस काय पवित्रा घेणार यावर, ते पाहणं रोचक ठरावं.
-ना.न.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 02/11/2024 - 03:21
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
Tue, 02/13/2024 - 05:48
नवीन
>>>अनिस काय पवित्रा घेणार यावर, ते पाहणं रोचक ठरावं.
ते भुक्कड पुरोगामी काय पवित्रा घेणार? हेच हिंदूंच्या संतासंदर्भात असते तर छात्या पिटत आले असते !!
- Log in or register to post comments
B
Bhakti
Sun, 02/11/2024 - 03:20
नवीन
हा हा, मस्तच लिहिलंय.
शास्त्रीयदृष्ट्या आपल्यासोबत काय झालं,हे आता कुठं समजतंय!
हा लेख टीन एजरने नक्की वाचायला हवा!
संत व्हॅलेंटाईन खरच अजूनही साजरा होतो ;))
मला वाटलं पिढी स्मार्ट झाली असेल.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sun, 02/11/2024 - 04:38
नवीन
लेख आवडला. बाकी
प्रेम म्हणजे रोग. ज्याचे औषध नाही. विरहात जगता येत नाही आणि मरता ही येत नाही. सफल झाले आणि लग्न झाले तर प्रेम हा देखावा होता, हे वर्षाच्या आत कळते फूल मुरझाने के बाद केवल कांटे चुभते हैं.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/11/2024 - 12:15
नवीन
लिहिते राहा. आवडलं.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 02/12/2024 - 13:13
नवीन
मस्त लेख ... अगदी समयोचित !
व्हेलेंटाईनचं निमित्त करुन लिहिलेला दळण कम आवडला.
❤️
थोड्ं हलकं लिहित लेख रंगवलाय हे बाकी छानच !
इम्यूनो-न्यूरो-एंडोक्राईन सिस्टिम, पिटयूटरी ग्रंथी, डोपामीन, ऑक्सीटोसीन, टेस्टोस्टेरोन, ऑक्सीटोसीन अशी केमिकल पदार्थांची पखरण (गारनिशिंग) करून टेस्टी भेळ आणखी चमचमीत, चटकदार बनवलीय !
बाकी हालवेंटाईन म्हंजे शुद्ध बाजारूपणा !
- Log in or register to post comments
B
Bhakti
गुरुवार, 08/15/2024 - 13:50
नवीन
शंतनु अभ्यंकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
आंतरजालावरील विज्ञान लेखक म्हणून एक आवडते लेखक होते.
https://www.facebook.com/share/p/R4QjdZUTewhFvJDD/?mibextid=oFDknk
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
गुरुवार, 08/15/2024 - 15:48
नवीन
डॉ. शंतनु अभ्यंकर यांचे लेखन आणि दृष्टिकोन पटत असे बर्याच वेळा. ते गंभीर आजाराने आजारी होते असं वाचलं होतं. थेट श्रध्दांजली दिलीत, काय झालं?
- Log in or register to post comments
B
Bhakti
गुरुवार, 08/15/2024 - 16:26
नवीन
कॅन्सरमुळे डॉ. शंतनु अभ्यंकर यांचे आज दु:खद निधन झाले आहे.
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Fri, 08/16/2024 - 11:20
नवीन
डॉ. शंतनु अभ्यंकर यांना श्रध्दांजली. एक विज्ञानवादी, पुरोगामी लेखक, विचारवंत आपल्यातून निघून गेला.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 08/15/2024 - 16:28
नवीन
डॉ. शंतनु अभ्यंकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली . प्रसन्न व्यक्तिमत्त्व हरवले.
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/15/2024 - 17:49
नवीन
[15/08, 7:37 pm] Prakash Ghatpande Mipa: https://shantanuabhyankar.blogspot.com/2022/10/blog-post_98.html
निशब्द, स्वतः कडे कुंपणावर बसून त्रयस्थ पणे भाष्य करणे येरा गबाळ्याचे काम नव्हे.
भावपूर्ण श्रद्धांजली.
सुरेश भटांनी फार सुंदर लिहीले आहे.
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी वीझलो तेव्हां सारे आकाश उजळले होते
कधी ज्ञान वरदान ठरण्याच्या ऐवजी शाप ठरते याचे एक उदाहरण.
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Fri, 08/16/2024 - 11:22
नवीन
>> कधी ज्ञान वरदान ठरण्याच्या ऐवजी शाप ठरते याचे एक उदाहरण.
समजले नाही, आपण असे का म्हणत आहात.
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Fri, 08/16/2024 - 13:56
नवीन
कधी कधी अज्ञानात आनंद असे म्हणतात..
स्वतःलाच स्वताचे मरण कळणे व दररोज जगण्या मधे ते भोगणे अकल्पनीय वाटते. डाॅक्टर शंतनू याना कळाले होते व ते त्याला थांबवू शकत नव्हते. त्यांच्या डाॅक्टर पत्नीस हे भोगणे किती अवघड गेले असेल व पुढेही भोगावे लागणार आहे याची कल्पनाच करवत नाही.
सामान्य रोगी किवां त्याचे नातेवाईक यांना वैद्यकीय ज्ञान नसल्याने काय होत आहे व पुढे काय होणार आहे या बाबत फारशी कल्पना नसते. रोग्याची स्थिती व त्यातून उद्भवलेला मृत्यू यावर समय हे औषध आहे. पण डाॅक्टर पती पत्नी मुलगा,मुलगी यांना ज्ञान असल्याने समय हे औषध सुद्धा गुणकारी नसते.
माझ्याच एक वरिष्ठ सहकार्याची त्याच्या पत्नीच्या दुर्धर अजारात सेवा करताना होणारी फरपट व डोळ्यासमोर झालैल्या मृत्यू मुळे झालेली मानसिक अवस्था बघीतली आहे. अनेक अशी उदाहरणे देऊ शकतो.
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Mon, 08/19/2024 - 12:42
नवीन
आपण म्हणता ते खरेच आहे. त्यांना सगळ्या अवस्थांची व पुढे काय होऊ शकेल याची कल्पना येत गेली असेल व त्यामुळे नक्कीच क्लेश वाढले असण्याची शक्यता आहे.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 08/16/2024 - 17:55
नवीन
श्रद्धांजली. फार छान लिखाण असे त्यांचे.
- Log in or register to post comments