भाग २ व ३
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग १ : डाग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग २
'हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? मी आजवर कधी कोणाचंच काही वाईट केलं नाही. रात्री बेरात्री उठून सालं हे असलं काहीतरी करावं लागेल असं कधीच वाटलं न्हवतं. गेले किती दिवस, किती आठवडे झालेत साधी झोप म्हणून भेटलेली नाही. दिवसभर काम करण्यात डोकं खपवायचं आणि रात्रीचं हे.... श्या. कोणाला सांगावं तरी कसं आणि मदत तरी कोणाकडून मागू मी? आणि... आणि काय सांगणार मी? याचं उत्तर कोणीतरी देऊ शकेल का? खऱ्याची दुनिया नाही, कोणाला सांगायला गेलो तर एकाचं दोन होईल आणि सगळीकडे पसरेल हे आणि मग पोलीस.... पोलीस? नाही.... नको. उत्तरा!माझी पिलू. त्या माझ्या छकुली चं काय होणार? त्या बाळाला अजून जग पहायचंय. तिच्या वाट्याला का ह्या वेदना. नाही.... मी तिच्या वाट्याला काही येऊ देणार नाही. उत्तरा, बाळा तुझा बाबा असताना तुझ्या वाट्याला काही वाईट येऊ देणार नाही.' असं म्हणत असतानाच त्याने दगडाने एक शेवटचा घाव केला आणि चेहरा अजिबात ओळखता येणार नाही याची खात्री केली. त्या प्रेतावरचे सगळे कपडे काढले. प्रेताच्या पँटच्या खिशातले ओळख पटवणारे ड्राइविंग लायसन्स आणि पॅन कार्ड तसंच ऑफिस आईडेंटिटी कार्ड काढले आणि स्वतः च्या खिशात ठेवले. पाकीट आणि कपडे लगेच कार मध्ये ठेवले. प्रेत पूर्ण निर्वस्त्र केलेलच होतं ते तसंच दरीत ढकललं आणि नकळत उजव्या हाताची दोन्ही बोटं शर्टला पुसली. येताना नेहेमीच्या ठिकाणी ते कपडे आणि पाकिटं पेटवले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग ३
पहाटे पहाटे केंव्हा कबीर घरी आला ते माया ला ही समजलं नाही. थकलेल्या अवस्थेत कसाबसा कपडे बदलून तो बेडवर येऊन पडला. शेजारी माया गाढ झोपेत होती. तिच्या गालावरून मायेने हाथ फिरवून कबिरने डोळे बंद केले. त्याच्या बंद डोळ्यातून एक थेंब उशीवर पडला.
सकाळी माया रोजचं आवरत होती. तिचा प्रेमळ नवरा कबीर, रात्रीचा कुठे जातो, काय करतो, इतका कसल्या तणावात आहे या विवंचनेत असताना च तिच्या हाती त्याचा सफेद शर्ट लागतो ज्यावर लाल रंगाचे डाग असतात. एका पतिव्रते प्रमाणे पतीवर संशय न घेता योग्य वेळेची वाट पाहावी असं ती मनोमन ठरवते. तिचा कबिरवरचा विश्वास तिला सांगत असतो की ती योग्य वेळ आली की कबीर स्वतः तिला सर्वकाही स्पष्ट करेल.
कबिरचा अलार्म दुसऱ्यांदा खणाणतो. नाईलाजाने कबीर डोळे उघडतो. बेडवर बसलेला कबीर साईड टेबल वरच्या फोटो फ्रेम कडे बघत बसतो. त्या फोटो फ्रेम मध्ये त्याचं जग आहे, माया आणि उत्तरा.
खिडकीतून वाऱ्याची झुळूक येते तसा तो तंद्रीतून बाहेर येतो. प्रशस्त मास्टर बेडरूम च्या त्या ड्रेसिंग टेबल समोर उभा राहून आरश्यात स्वतः ला बघत थांबतो. त्याचे डोळे त्याला आत गेल्यासारखे भासतात. डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स बनू लागलेत असं त्याला जाणवतं. जागरणामुळे हे सगळं होत आहे ते ही त्याला माहित असतं पण हे जागरण त्याचं केंव्हा संपणार, हे त्याचं त्यालाच माहीत नाही.
"इतकं न्याहाळू नकोस, नजर लागेल माझ्या नवरोबाला." माया थोड्या लाडिक मूड मध्ये त्याला छेडते. तिच्या हातात धुण्याच्या कपड्यांमध्ये कबिरला कालचं शर्ट दिसतं आणि नेमकी डागाची बाजू वर असल्याने ते ही दिसतात. माया मात्र काही न झाल्यासारखे वागते आणि रूम मधले बाकीचे कपडे एकत्र करत खिडकी पाशी येते.
खिडकीतून बाहेर काहीतरी नीट बघताना ती कबिरला विचारते "कबीर, पोलिसांची गाडी का रे येत असेल आपल्या कम्पाउंडच्या आत?"
क्रमशः
💬 प्रतिसाद
(1)
र
राजेंद्र मेहेंदळे
Mon, 01/22/2024 - 12:17
नवीन
कथावस्तू चांगली आहे, पण दिर्घ कथा नाही आणि ३ शशक सुद्धा नाही असे काहीसे. जरा एडिटींग करता आले तर पहा.
- Log in or register to post comments