इंदूर - छप्पन दुकान आणि सराफ्याची खाद्य भ्रमंती
अगदी नुकतेच इंदूर भटकंती झाली. मांडू, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर सर्व काही पाहिले. पण खास आकर्षण होते ते छप्पन दुकान आणि रात्रीच्या सराफ्याचे. छप्पन दुकान हा छप्पन गाळ्यांचा समुच्चय. छप्पन दुकान दिवसभर सुरु असते. शेवटचे १/२ कपड्यांचे गाळे वगळता इतर सर्व खादाडीचीच दुकाने आहेत. इथले सर्वाधिक खास म्हणजे विजय चाट हाऊस, जॉनी हॉट डॉग आणि बाबू नारियल क्रश.
वेगवेगळ्या स्टॉल्सवरुन खादाडीचे पदार्थ घेऊन निवांतपणे खाता यावेत म्हणून इकडे जागोजागी सीट आउट्स आहेत.
विजय चाट हाऊसचे सर्वच पदार्थ एकदम जबरदस्त. खोबरा पॅटिस इथला युएसपी. एकदम मऊसूत पॅटिसमध्ये खोबर्याचे सारण आणि आंबटगोड चटणी. एकदम सुख.
खोबरा पॅटिस
इथला साबुदाणावडा सुद्धा अशक्य भारी आहे. दही, फराळी चिवडा आणि चटणीसोबत तो देतात. आपल्याकडच्या साबुदाण्या वड्यापेक्षा सर्व्ह करण्याची वेगळी पद्धत पण चव जबरदस्त.
असेच सलग एका रांगेत छप्पन गाळे आहेत.
इथला फेमस बाबू नायियल क्रश. शहाळ्याचे पाणी आणि त्यातलीच मलई एकत्र करुन मिक्सरवर फिरवून ग्लासमध्ये देतात. एकदम मस्त.
दुपारचं खाणं असं छप्पनमधील विविध प्रकार खात खातच केलं. साबुदाणा वडा, खिचडी, भुट्टे का किस, गराडू ढोकळा, खोबरा पॅटिस, बास्केट चाट, पनीर टिक्का, मसाला सोडा, नारियक क्रश अर्थात सर्व डिश शेअर करतच खाव्या लागतात कारण सर्वच हवेहवेसे वाटते.
बाकी छप्पन तर फक्त ट्रेलर आहे. खरी मजा तर सराफ्यालाच येते. दिवसा सराफ बाजारात सगळी दुकाने आहेत ते सराफांची, मात्र जशीजशी ते रात्री साडेआठ नवाला बंद होऊ लागतात तसातसा सराफा विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सने फुलायला लागतो. रात्री दहाच्या आसपास जवळपास संपूर्ण सराफा हा पूर्णपणे सुरु होतो ते पार उत्तररात्री दोन तीन वाजेपर्यंत. रविवारच्या दिवशी मात्र दागिन्यांची दुकाने बंद असल्याने संध्याकाळी सहापासूनच सराफा फुलायला लागतो. आणि गेलो तो रविवारच होता आणि राती साडेनऊला पोचलो असल्याने सर्व स्टॉल्स उघडले होते आणि प्रचंड गर्दी होती. येथे एक मात्र सांगणे आवश्यक. सराफा हा जुन्या इंदूरात ऐन बाजारात असल्याने येथे स्वतःची गाडी घेऊन येऊ नये. इंदूरातल्या कुठल्याही कोपर्यातून येथे येण्यासाठी व रात्री कितीही उशिरा जाण्यासाठी येथे रिक्षा उपलब्ध असतात. आम्ही देखील कार जिंजरवर ठेवूनच रिक्षाने सराफ्यात आलो. सराफ्यातल्या दुकानदारांप्रमाणेच येथले रिक्षावालेही अगदी हसतमुख आहेत.
रिक्षाने आम्हाला होळकर राजवाड्यापाशी सोडलं. राजवाडा असा झगमगत होता.
राजवाड्याच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने थोडे पुढे जाताच सराफ्याच्या गल्लीची सुरुवात होते.
आतमध्ये प्रवेश करताच की एकदम स्वर्गच, दोन्ही बाजूंना विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स
इथले प्रमुख आकर्षण म्हणजे जोशी दही बडा हाऊस. प्लेटमधला दहीवडा हवेत उंच उडवून परत प्लेट्मध्ये झेलणारे आणि एकाच चिमटीतून सैंधव, काळी मिरी, चाट मसाला आणि जीरावम दहिवड्यावर खुबीने पेरणारे जोशीबुवा इथली खासियत. आम्ही गेलो तेव्हा जोशी नेमके तिथे नव्हते, सराफा मनसोक्त खादाडून परत येतांना त्यांचे दर्शन झाले. , त्यांचा मुलगा तेव्हा दुकानावर होता.
अफलातून चवीचा दहीबडा
थोडं पुढं गेल्यावर कुल्फीच्या दोन स्टॉल्सवर सोन्याचे प्रचंड दागिने घालून हसतमुखाने स्वागत करणारे दोन भाऊ आपल्या दिसतात. येथे आपल्याला सोन्याचा वर्ख लावलेली कुल्फी देखील ३०० रुपयात मिळते. इतर कुल्फ्या अगदी २०/३० रुपयांपासून मिळतात.
गराडू हे येथले अजून एक आकर्षण. एक प्रकारचे कंदमूळ आहे. आधी ते वाफवून घेतात आणि तेलात तळून त्यावर लिंबू आणि एक प्रकारचा विशिष्ट मसाला पेरुन एकदम गरमागरम खायला देतात. छप्पनमधल्या गराडूपेक्षा इथला गराडू शतपटीने भारी.
सराफ्यात खाद्यपदार्थांची प्रचंड विविधता आहे. अगदी चायनीज पासून मोमोज पर्यंत, पावभाजी पासून पिझ्झ्यापर्यंत विविध स्टॉल्स आहेत. इतके सर्वच खाणे शक्य नाही पण नुसते पाहण्यास तरी काय हरकत आहे. आणि तुम्ही येथे खात नसलात तरी दुकानदार खडूसपणाने बघत नाहीत, उलट खाऊ नका पण आमचे फोटो बिंधास्त काढा म्हणत असतात.
हा मोमोजचा स्टॉल
चाट
दहिवडा
डेझर्ट्स
ही १२ चवींची पाणीपुरी एकदम भन्नाट. त्यातही हिंग लसूण, हाजमा हजम आणि पायनापल स्वाद तर एकदम भारी. १२ चवींची पाणीपुरी खाताना मात्र शेयर करुन खाऊ नये कारण वेगवेगळे स्वाद मिस होऊ शकतात आणि त्यातही सराफ्यातले प्रमुख पदार्थ खाल्यावरच पाणीपुरीस हात घालावा कारण ह्या बारा पुर्या गप्पकन पोटात बसतात.
गराडूप्रमाणेच भुट्टे का किस येथले अजून एक आकर्षण. मक्याचे दाणे किसून आणि वाफवून मसाला टाकून देतात.
अग्रवालची मिठाई म्हणजे एकदम भारी. राजभोग, गुलाबजाम, कलाकंद, रसमलई, रबडी, मालपुवा, काय नाही ते विचारा.
रबडी तर अशी घट्ट, सायीचा प्रचंड दाट थर असलेली.
येथली जिलेबी पण लै भारी. जवळपास ७०० ग्रॅम असलेली एकच भलीमोठी जिलबी मागणीनुसार तळून देतात. सोबत असतात ते मालपुवे.
आता इतकं खाल्ल्यावर नवीनचं कोकोनट क्रश हवंच, छप्पनमधल्या बाबूपे़क्षाही नवीनचा नारियल क्रश जगात भारी. येथे एक अॅडिशन म्हणजे नारियल क्रशमध्ये नवीन वरतून पुन्हा शहाळ्याची कोवळी मलई टाकतो, त्याने तर अजूनच भारी चव येते.
सगळं खाऊन पचवायला इथे पानांचे देखील विविध प्रकार आहे. साध्या पानापासून चॉकलेट पानापर्यंत, बनारस पासून कलकत्त्यापर्यंत, स्मोक पानापासून फायर पानापर्यंत.
शेवटी काय, खायची कितीही इच्छा असली तरी पोट तर भरतं पण मन मात्र भरत नाही. सराफ्याला किमान दोन रात्री तरी हव्यात. शिवाय सगळे पदार्थ शेयर करुनच खावेत त्यामुळे येथली चव तर कळतेच आणि वैविध्यही अनुभवास येते.
खरंच पृथ्वीवरील स्वर्ग आहे हा सराफा म्हणजे आणि तेथील खाद्य म्हणजे स्वर्गसुखाची परमावधी.
💬 प्रतिसाद
(68)
ह
हणमंतअण्णा शंक…
Mon, 01/19/2026 - 08:44
नवीन
इंदूर कमालीचे स्वच्छ शहर आहे आणि भारतात अशी स्वच्छता असू शकते यावर सुरुवातीला विश्वास बसत नाही. तरीही एवढे सर्व लोक सांगताहेत म्हणजे कुछ तो होगा तिथे.
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 01/19/2026 - 09:34
नवीन
रस्त्यात केर कचरा, प्लॅस्टिक, बाटल्या यांचे ढीग पडलेले असणे या बाबतीत इंदूर अवश्य स्वच्छ आहे. व्यवस्था उत्तम आहे. पण हॉटेलच्या आत आणि समोर मात्र अत्यंत कळकट आहे सर्वत्र. डोळे मिटून खायचे.
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 01/19/2026 - 10:22
नवीन
खरकटे, सांडपाणी, रस्त्यावरचे उष्ट्याचे ओघळ इत्यादि गोष्टी बहुधा कचरा किंवा अस्वच्छ या सदरात मोडत नसावेत. ते तर बायो डिग्रेडेबल, कंपोस्ट.
:-)
पण घन कचरा व्यवस्थापन, विशेषतः प्लास्टिक कचरा .. याबाबत इंदूरची प्रगती निर्विवाद आहे आणि कौतुकास्पद. वेळोवेळी कचरा उचलणे, रिसायकल, जागोजागी कचऱ्याच्या कुंड्या उपलब्ध. सर्व चोख आहे. कुठेही ढीग साठलेले सापडत नाहीत. हे सराफा सोडून बाकीच्या आधुनिक इंदूर शहरात अधिक लागू.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 01/19/2026 - 10:58
नवीन
सराफा रात्री दोनच्या पुढे बंद झाला की हे सगळे उष्टे खरकटे उचलले जाऊन ओघळ साफ केल्या जाऊन दागिन्यांची दुकाने उघडायला तयार होतात.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 01/19/2026 - 09:55
नवीन
इंदुर सरवटे बस स्टँड किंवा उज्जैनमधलेही स्टँड हे कचरा डेपो आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस ऊर्फ एसटी केव्हाच बंद केली आणि तो धंदा { योग्य} व्यक्तिंना आंदण दिला. परंतू कर्नाटकात पन्नास टक्के खाजगी बसेस धंदा करतात तरीही एसटी डेपो मॉलच्या तोडीस तोड आहेत.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Mon, 01/19/2026 - 14:05
नवीन
सहमत. २००१ च्या सुमारा बंगळुरात होतो तेव्हा तेथील एस.टी सेवा अगदीच मोडकळीस आलेली होती. बस स्टँड वगैरे अगदी गलिच्छ प्रकारात मोडत असत. तेव्हा हटकुन महाराष्ट्रातील एस.टी सेवेशी तुलना होत असे. पण पुढे दहा वर्षांनंतर पूर्ण कायापालट झाला.आज महाराष्ट्र बस सेवा जवळपास नसल्यात जमा आहे. मध्यप्रदेशात देखील हीच बोंब आहे. एस.टी सेवा पूर्णपणे नाहीशी झालेली आहे.
- Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक…
Mon, 01/19/2026 - 08:41
नवीन
ठिकाणे नोंद करून ठेवली आहेत आणि सर्व सूचना देखील.
कधीतरी चान्स येईल तेव्हा गोंधळ व्हायला नको.
मध्यप्रदेश एकूणच खूप इंट्रेस्टिंग प्रकरण आहे..
इंदूरात मराठी किती बोलतात याची उत्सुकता होती.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 01/19/2026 - 09:12
नवीन
हे सर्व पदार्थ राजस्थानी लोक अधिक चांगले बनवतात यावर मी ठाम आहे.
माहेश्वरात राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या चौकावरच्या हॉटेलात थंडीमध्ये पौष्टिक ( खुराक) लाडू सात प्रकारचे मिळतात. मोठ्या थाळ्यांत मांडलेले असतात ते खूपच चांगले असतात. शिवाय ते तिथेच लगेच खाल्ले पाहिजेत असं नाही. तुपातच केलेले असल्याने सात दिवस सहज टिकतात.
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 01/19/2026 - 14:44
नवीन
मांडू येथे दाल बाफले आणि दाल पनिए थाळी खाल्ली. ते मोठाले दगड फोडून थकवा आला. दातही बास म्हणाले. या पदार्थावर कायमची फुली. आतून कच्चा राहील याची हमखास हमी अशा आकाराचा अजस्त्र कणकेचा किंवा पिठाचा गोळा भाजला किंवा तुपात तळला तरी त्याचे ते दगडपण आणि आतून पिठाळ गच्च टेक्स्चर किती बदलणार.
डाळ रोटी बरी त्यापेक्षा. उगीच नसते दावे नसतात.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 01/19/2026 - 15:54
नवीन
तुम्ही भलतीकडेच खाता, तुम्हाला दादाजी सुचवले होते पण तुम्ही रस्त्याच्या कडेला खाल्लेत :)
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 01/19/2026 - 16:00
नवीन
दादाजी बंद होते आणि हे रस्त्याच्या कडेला नव्हते. प्रॉपर सर्वात जास्त गर्दी बघून गेल्तो. गर्दी = लोकप्रिय.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/19/2026 - 16:21
नवीन
दादाजीच्या जागेवर आता देशी दारू अड्डा आला आहे, दादाजी थोडे पुढे शिफ्ट झाले.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 01/19/2026 - 16:34
नवीन
दाल बाफले नका खाऊ.
राजस्थानात बऱ्याच ठिकाणी दालबाटी चुरमा मिळतो तो खा. फक्त हीच प्लेट मागवल्यास सहा दालबाटी देतात, त्यापेक्षा जेवण थाळी घ्यावी त्यात दोन दालबाटी येतात .अतिरेक होत नाही.
- Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक…
Mon, 01/19/2026 - 22:49
नवीन
गविजी,
अगदी माझ्या मनातले बोललात.
मी पहिल्यांदा हा दाल बाटी प्रकार खाल्ला तेव्हा वाटलं कुणाच्या टाळक्यातून इतका बेचव बेसिकमधे लोचा असलेला टाईमपास निघाला असेल?
एकवेळ थंड झालेल्या चकुल्या गिळवतील पण हा प्रकार माझ्या गळ्याच्या खाली उतरणे अशक्य. आणि मी उगीच म्हंटलं हा हॉटेलचाच दोष असावा म्हणून मित्रांनी जी स्थळे सुचवली त्या त्या ठिकाणी तोच अनुभव आला.
आमचे एक गुजराती काका म्हणत असत त्या स्टाईलने : चोटली मारुन टाकली.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 01/20/2026 - 05:49
नवीन
दालबाटी / बाफले हे गरिबांची थंडीतलं खाणं होतं. ( बिहारमध्ये लिट्टि चोखा. बाटी अधिक वांगे बटाटा रस्सा).
- Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक…
Mon, 01/19/2026 - 22:57
नवीन
या चविष्ट धाग्याला गालबोट लावू वाटत नाही पण या चिंचोळ्या ठिकाणी इतकी गर्दी पाहून धडकी भरत नाही का? (जीभ चावतो)
(कित्येक दुकानांचे सिलींडर वगैरे पेटलेले असणार आहेत या चिंचोळ्या गल्लीत तेही गॅस इत्यादी बाबतीत, कमीतकमी सेफ्टी आणि जास्तीत जास्त 'चलता है' 'जुगाड' अशा पवित्र्यातली ही दुकाने असतात)
समजा भगदड झाली तर वाचण्याची शक्यता किती?
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 01/20/2026 - 04:17
नवीन
अवश्य भरली. अनेकदा. काही वेळा आणि काही जागी ती गर्दी अक्षरशः तुडवतुडवीच्या एक पायरी मागे इतकी होती.
हो. पेटत्या शेगड्यांची आग, तापलेले तवे आणि उकळणारे तेल यांना चिकटण्याचे योग अनेकदा येत होते. एकूण हे प्रकरण निवांतपणा आवडणाऱ्या लोकांना झेपणारे नाही. पदार्थ मिळवणे, तो हातात पकडणे आणि त्या आईसक्रीमच्या लाकडी सपाट चमच्याने खाणे (हा चमचा इथे सर्वव्यापी आणि सर्वात गैरसोयीचा) - या सर्व क्रिया चारी बाजूंनी धक्के खात आणि कशीबशी एक चौरस फूट क्षेत्र पकडून तोल सांभाळत गपागप खाऊन टाकणे आणि पुढे सरकत राहणे...
खाण्याची नजाकत निवांत खाण्यात असते. भुकेला कुत्रा, इतर कुत्र्यांच्या टोळीच्या स्पर्धेत, मिळालेले अन्न जसा जागच्या जागीच पटकन वचावचा खाऊन टाकतो तसे हे खाणे मला तरी भासले. पार्सल आणले तर त्यात काही अर्थ नाही. बहुतांश पदार्थ तिथल्या तिथे खाल्ले तरच बरे लागतील असे.
असो.
- Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक…
Tue, 01/20/2026 - 18:34
नवीन
इंदूर भारतातील सर्वात स्वच्छ महानगर आहे तरीही नुकतीच दूषित पाणी पिऊन तिथे अनेक गरीब ज्यात लहान मुलं पण होती ती दगावली. कुठेतरी हे जुगाड असे मुळावर उठतात.
मला भारतीय दुकानदार गाड्यांवले केटरिंग वाले सिंलिंडर ज्या पद्धतीने हाताळतात ते पाहून खूप भीती वाटते. अनेकदा त्या पाइप आपले शेवटचे आचके देत असतात, त्यांची सिलिंडर वर बसवायची मुंडकी कशीही ट्वीक केलेली असतात वा वापरलीच जात नाहीत, एकाच सिलिंडरला अनेक शेगड्या जोडल्या असतात.
कुठेही कसले ऑडिट नाही की सूचनांचे पालन नाही. चलता है.
माझ्या लहानपाणी मांढर देवीच्या जत्रेत स्फोट होऊन अनेक जण गेले चेंगराचेंगरी झाली (साउथ कोरिया सारख्या ठिकाणी अत्यंत प्रगत शिस्तबद्ध देशात देखील एके ठिकाणी अगदी अशक्य अशी चेंगरा चेंगरी झाली ) त्यानंतर सरकारने जत्रांचे वर्गीकरण करून एक नियमावली जाहीर केली.
त्या वर्गीकरणाचा फायदा घेऊन देवस्थानांनी आणि राजकारण्यांनी पैसे लाटण्याच्या प्रकाराशिवाय काही विशेष केले नाही, जत्रा तशाच निष्काळजी पद्धतीने चालू असतात.
अशा ठिकाणी तेलकट पदार्थांना चटावलेल्या लोकांनी एक दोन घासांसाठी आपला जीव धोक्यात घालण्याला काहीही अर्थ नाही. विशेषत: लहान मुलं घेऊन जी मंडळी इथे हौसेने जात आहेत त्यांनी निदान त्यांचा तरी विचार करावा.
हा टीकिंग बॉम्बच आहे. महाकाल करो असे ना घडो.
पण मी काही वीडियो पाहिले आणि मी तरी रात्री इकडे अजिबात जाऊ शकत नाही.
दिवसा कदाचीत एकदोन ठिकाणी जाऊन खाऊन घेईन.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2