हेंडगूळ
*हेंडगूळ*
पावसाळ्यातली गोष्ट. गाडी मित्राकडे होती, ती आणायला पायीच चाललो होतो. उड्डाणपूलाच्या बाजूने सर्विस रोडवर पूर्ण चिखल झालेला. एकच माणूस जाईल, इतकीच पायवाट शिल्लक, बाकी सगळा चिखल. जवळपास अर्ध अंतर गेल्यावर एके ठिकाणी पाच सहा कुत्र्यांचा घोळका एका कुत्री साठी जोरजोरात भांडत होता. ते बघून पलीकडून येणारे दोघं तिघं आणि इकडून जाणारे आम्ही दोघं तिघं, जागेवर थांबलो. चुकून जरी भांडत आमच्या अंगावर आले, तरी आम्हाला पळायला जागासुद्धा शिल्लक नव्हती. मिनीटभराने ती कुत्री तिथून हलली आणि तिच्या मागे सगळा घोळका. मनातल्या मनात शिव्या घातल्या "भाद्रपदाला अजून दोन महिने अवकाश असताना मधेच काय?". सावधपणे पुढची चिखलाची पायवाट तुडवताना हा किस्सा आठवला.
किस्सा आहे, मी मुक्तांगण मधे असतानाचा. वार्डमधे आमच्या सोबत एक काका होते, "जोशी काका". नावाप्रमाणेच त्यांचं व्यक्तिमत्त्व. मध्यम उंची, ५'४/५'५ वगैरे, गुटगुटीत देह, गुलाबी झाक असलेला गोरापान रंग आणि डोक्यावर फक्त कडेकडेने पांढऱ्याशुभ्र केसांच्या पुंजक्याची पट्टी, मधे तुळतुळीत गुलाबी गोरं टक्कल. बोलणं सुद्धा टिपिकल पुणेरी संथ टोनमधे. पण .... फार अतरंगी माणूस. कन्याकुमारी च्या विवेकानंद केंद्रामध्ये योगासने शिकवायचे. कोणास ठाऊक कसे, व्यसनात अडकले आणि मुक्तांगणला येऊन पोचले. तिथे आमची ओळख झाली.
काकांचा माझ्यावर विशेष लोभ असण्याचं एक कारण होतं. मुक्तांगणमध्ये सगळे पेशंट एकाच वॉर्ड मधे रहायचे. प्रसिद्ध व्यसनमुक्ती केंद्र असल्यामुळे बरीच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पाहुणे मंडळी भेट द्यायला यायची. आणि अशी पाहुणे मंडळी आली की, आमचे वॉर्ड निरीक्षक "बंधू", नाव वेगळं होतं पण सगळे बंधूच म्हणायचे, पाहुण्यांना घेऊन वॉर्ड दाखवायला यायचे. आणि काही खास पेशंट लोकांची ओळख करून द्यायचे, त्यात आमच्या दोघांचा नंबर असायचा. नेहमीप्रमाणे पुस्तकी भाषेत माहिती देऊन झाली की बंधू सगळ्यांना बोलवायचे. "या, या सगळे जण या, पाहुण्यांची ओळख करून घेऊ". असं म्हणलं की सगळे एका जागी गोळा व्हायचे. पुढे काय होणार, सगळ्यांना पाठ असायचं. अशावेळी जोशी काका हटकून माझ्या बाजूला येऊन थांबायचे. पुणेरी संथ टोनमधे पुटपुटायचे, "झाऽली सुरूवात, ....... च्याऽयला. आऽता समोऽर बोऽलावून इज्जत काऽढणार, च्याऽयला". सगळे गोळा झाले की बंधू चालू व्हायचे "आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करणारी लोकं येतात." मग माझ्या नावाचा पुकारा व्हायचा. मी पुढे जाऊन नमस्कार चमत्कार करून माझ्या व्यसनाची माहिती द्यायचो आणि परत आपल्या जागेवर. आणखी एक दोघं झाले की पुढचा विषय. "आमच्या कडे वेगवेगळ्या स्तरातील लोकं येतात" इती. बंधू. आणि काकांचं नाव घेतलं जायचं. "या, जोशीकाका या". लगेच काका त्यांचे गुलाबी ओठ, पार या कानापासून त्या कानापर्यंत पसरवून स्मित हास्य करायचे आणि माझ्या मागून जात जात कानात पुणेरी संथ टोनमधे पुटपुटायचे "आऽयची ** बंध्याच्या".
असे हे काका एक दिवस, चहाच्या वेळी, खिडकीजवळ उभे राहून सावकाश चहा पित, गंभीरपणे बाहेर बघत उभे होते. मी ग्लासभरून गरमागरम चहा घेऊन वॉर्ड मधे शिरत होतो. मला दारात बघून काका पुणेरी संथ टोनमधे एकदम ओरडले,"अऽरे मानस ... मानस, इऽकडे येऽ इकडे ये इकडे ये." मी चहा सांभाळत घाईघाईने काकांजवळ पोहोचलो. त्यांनी त्यांचा गोरापान गुटगुटीत हात बाहेर काढून बोटाने इशारा केला आणि पुणेरी संथ टोनमधे म्हणाले,"तेऽ बऽघ, हेंऽडगुळ लागलंय." बाहेर गवतावर एक कुत्रा आणि एक कुत्री जगप्रसिद्ध रोमँटिक पोज मधे धापा टाकत उभे होते. मी जागेवर फुटायच्या बेतात होतो. उभ्या उभ्या चहा सांभाळत खदाखदा हसायला सुरुवात केली. काका पण सावकाश हसत पुणेरी संथ टोनमधे म्हणाले,"ह्या ह्या ह्या ...... बऽघून घे. याऽ जेऽलमधे हेऽच बऽघायला मिळणार ..... ह्या ह्या ह्या." माझा खदखदाट बघून आणखी तीन चार जण गोळा झाले. काका त्यांना पण दाखवत पुणेरी संथ टोनमधे म्हणाले "बऽघून घ्याऽ रेऽ, इथे हेऽच बघायला मिळणार."
- व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलेली व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्त होऊन परतते हि अंधश्रद्धा आहे, ज्यांना त्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवावा माझा त्यावर विश्वास नाही!
- अडगळ वाटू लागलेल्या आई-बापांना ठेवण्याची जागा = वृद्धाश्रम. आणि सांभाळणे अशक्य झालेल्या कुटुंबातल्या/समाजातल्या व्यसनाधीन व्यक्तीला ठेवण्याची जागा = व्यसनमुक्ती केंद्र, अशी ती तुलना आहे.
व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलेली व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्त होऊन परतते असे कोणाला वाटत असेल तर ती अंधश्रद्धा आहे, कारण व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडायचे कि नाही हे सर्वस्वी रुग्णाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते, त्या व्यक्तीला तिथे पाठवणाऱ्या कुटुंबियांच्या, सल्ला देणाऱ्या डॉक्टर-मानसोपचारतज्ज्ञांच्या, मित्रमंडळी किंवा अन्य कोणा हितचिंतकांच्या ईच्छा आणि भावनांना त्या प्रक्रियेत काही स्थान नसते. व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णामध्ये तशी इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न नक्कीच केले जातात पण बहुसंख्य रुग्णांच्या बाबतीत त्याचा परिणाम अल्पकाळासाठी टिकतो आणि बाहेर पडल्यावर काही दिवस, महिने लोटले कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण झालेली दिसते. त्यामुळे तिथल्या उपचारांनी किंवा समुपदेशनामुळे व्यसनमुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अगदीच शून्यवत नसले तरी ते नगण्य असते. आपण व्यसनाधीन झालोय ह्याची जाणीव होऊन त्यातून बाहेर पडण्याच्या ईच्छेने स्वतःहून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होऊन यशस्वीरीत्या व्यसनमुक्त होणाऱ्या व्यक्ती अगदी विरळा. त्याउलट बळजबरीने (अक्षरशः केंद्राची चार माणसे येऊन रुग्णाला बळजबरीने गाडीत टाकून नेणे वगैरे) किंवा फसवून तिथे दाखल केले जाणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त असते. अशी बळजबरीने किंवा फसवून दाखल होणारी बहुतांश मंडळी असहकाराचे धोरण स्वीकारतात, अन्य रुग्णांशी आणि स्टाफशी क्षुल्लक कारणांवरून भांडणे, मारामाऱ्या करतात, बाहेर पडल्यावर ह्या बळजबरी, फसवणुकीसाठी घरच्यांना धडा शिकवणार, अद्दल घडवणार अशी जाहीर वाच्यता करतात. तर शासकीय सेवेत असलेल्या काही व्यसनाधीन लोकांची आणखीनच वेगळी तऱ्हा, त्यांना आपली नोकरी टिकवण्यासाठी नाईलाजाने म्हणा कि अनिच्छेने, पण तिथे दाखल होणे भाग असते, अशा लोकांना तिथल्या उपचारांत, समुपदेशनात आणि व्यसनमुक्त होण्यात काहीहि रस नसतो, केवळ विहित कालावधी पूर्ण करून व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवणे एवढाच त्यांचा उद्देश असतो. राहिला दुसरा मुद्दा... वृद्धाश्रमांची गरज आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर जसे 'हो' आहे तसेच व्यसनमुक्ती केंद्रांची गरज आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तरही 'हो' असेच आहे. वृद्धाश्रमांत अनेक वृद्धांना अनिच्छेने राहावे लागत असले तरी तिथे स्वेच्छेने राहणारी मंडळीही आहेत. त्याच प्रमाणे ज्या व्यसनाधीन लोकांना सांभाळणे कुटुंबियांना अशक्यप्राय होऊन बसते त्यांना ठेवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे असणे जरुरी आहे. सुधारणेपलीकडे गेलेली अशी व्यसनाधीन लोकं व्यसनपूर्ती न झाल्यास त्यांच्या कुटुंबियांसाठीच नव्हे तर शेजाऱ्या-पाजाऱ्यांसाठीही प्रचंड त्रासदायक ठरतात. कल्पना करा तुम्ही सकाळी कामावर जायला निघाला आहात, तळमजल्यावर कोणीतरी लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवल्याने वैतागून तुम्ही पायऱ्या उतरून खाली आलात पण शेवटच्या पायरीवर तुमच्या बिल्डिंग मधली एक व्यसनाधीन व्यक्ती हातात सूरी घेऊन संपूर्ण नग्नावस्थेत जिना अडवून बसली आहे आणि "आज बिल्डिंगमधलया कोणीही कामावर जायचे नाही" असे तुम्हाला बजावते आहे, अशावेळी तुम्ही काय कराल? किंवा, पहाटे तुमच्या सोसायटीत येत असलेल्या दुधवाल्याचा तुमच्या इमारतीत राहणाऱ्या कोणा व्यसनाधीनाने जिन्यात गळा दाबून धरला आहे, श्वास कोंडल्याने त्या बिचाऱ्याच्या तोंडातून आवाजही बाहेर पडत नाहीये, केवळ त्या दुधवाल्याच्या नशिबाने कोणीतरी दोन जण जिना चढून येताना हा प्रकार बघून त्या व्यसनाधीन व्यक्तीच्या तावडीतून त्याची सुटका करतात, ह्या प्रसंगाने भयभीत झालेला दूधवाला तुमच्या बिल्डिंगमध्ये पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेऊन तुम्हाला दुसरा दूधवाला शोधा म्हणून सांगतो. अशी व्यक्ती जर तुमच्या इमारतीत राहात असेल तर तुम्हाला कितपत सुरक्षित वाटेल? ह्या कल्पना नसून प्रत्यक्षात घडलेल्या घटना आहेत! बाकी घरात चोऱ्यामाऱ्या करणे, गावभर ज्यांच्याकडे उधार उसनवारी करून ठेवलेली असते ती लोकं वसुलीसाठी घरी येणे, घरच्यांना शिवीगाळ, मारहाण असल्या गोष्टींची यादी तर न संपणारी. त्यामुळे ह्या व्यक्तींच्या सुधारण्याची शक्यता शून्य असली तरी निदान त्यांचा सांभाळ करून त्यांच्या त्रासापासून घरच्यांना आणि इतरांना सुटका मिळवून देण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून तरी व्यसनमुक्ती केंद्रे असणे अत्यावश्यक ठरते. तसेच व्यसनमुक्ती केंद्रात स्वेच्छेने जाऊन व्यसनमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी असले तरी त्यांच्यासाठीही हा पर्याय उपलब्ध असावा. टिपः वर व्यक्त केलेली मते ही माझी 'वैयक्तिक मते' असुन ती सगळ्यांना पटलीच पाहिजेत असा माझा अजिबात दुराग्रह नाही 😀 अरे हो, ह्या उपप्रतिसादाच्या आधी ह्या धाग्यावर मी तिन उपप्रतिसाद दिले आहेत, पण मुळ धागाविषयावर प्रतिक्रीया द्यायची राहुनच गेली की... असो, अरिंजय भाऊ, लेख आवडला 👍 'हेंडगूळ' हा शब्द मलाही पहिल्यांदाच समजला!