नाईन इलेव्हन - Twin To-Worse: भाग १
लहानपणापासूनच आयुष्यात अनेक दुःखदायक प्रसंगांना सामोरे गेलेल्या सोफीया डंकवर्थच्या आयुष्यात सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या तिच्या पुस्तकाला १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मानाचा समजला जाणारा 'नॅशनल बुक अवॉर्ड' जाहीर झाल्या दिवसानंतर उण्यापुऱ्या दहा महिन्यांनी आज आणखीन एक अभिमानास्पद आणि आनंददायी असा दिवस आला होता.
१९९३ साली अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर झालेल्या पहिल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत २६ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रकाशित झालेले, तिच्या स्वानुभवांवर आधारित असलेले 'Nine Eleven - Twin To-Worse' हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याला जगभरातील वाचकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाल्याने पुढच्या अवघ्या दोन महिन्यांत त्याची तिसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती.
अल्पावधीतच वाचकप्रिय ठरलेल्या ह्या 'बेस्ट सेलर' पुस्तकाने मनोरंजन क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले नसते तरच नवल होते!मे २०२२ च्या पहिल्या आठवड्यात 'नेटफॉक्स' ह्या 'ओव्हर-द-टॉप' स्ट्रीमिंग सेवा पुरवण्यात आघाडीवर असलेल्या कंपनीसाठी वेब सिरीजची निर्मिती करणाऱ्या 'टर्नर ब्रदर्स' ह्या विख्यात निर्मितिगृहाचा प्रतिनिधी जॉन मॅक्लेन ह्याने सोफीयाची भेट घेऊन तिच्या पुस्तकावर वेब सिरीज निर्माण करण्याची त्यांच्या कंपनीची इच्छा असल्याचे तिला सांगुन त्याविषयीचा व्यावहारिक प्रस्ताव तिच्यासमोर मांडला होता.
वास्तविक हा प्रस्ताव सोफियाला ऐकताक्षणीच आवडला होता. लहानपणापासूनच स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सवय अंगवळणी पडली असल्याने तो स्वीकारण्यासाठी तिला कोणाशी चर्चा करण्याची वा कोणाची परवानगी घेण्याची आवश्यकताही नव्हती परंतु फिल्म अडॅप्टेशन राईट्स, आर्थिक गणिते, अटी-शर्ती आणि अन्य कायदेशीर-तांत्रिक मुद्द्यांवर तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यासाठी होकार देण्यापुर्वी एक आठवड्याची मुदत तिने मागून घेतली होती.
विहित मुदतीत सोफियाने संबंधित विषयांतील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून त्यावर आधारित असलेला आपला लिखित प्रस्ताव दुसऱ्या भेटीत जॉन मॅक्लेनच्या हाती सुपूर्द केल्यानंतर तिसऱ्या दिवशी कंपनीला तिचा प्रस्ताव बिनशर्त मंजूर असून त्या अनुषंगाने करारपत्र तयार करण्याचे काम सुरु असल्याचे जॉनने तिला फोन करून कळवले होते. अल्पावधीत ह्या सर्व घडामोडी घडल्याने सोफियाला हे सर्व स्वप्नवत वाटत होते पण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करारपत्रावर दोन्ही पक्षकारांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आणि तिच्या हाती मानधनाचा धनादेश मिळाला तेव्हा हे स्वप्न नसून वास्तव आहे ह्यावर तिचा विश्वास बसला होता.
पुढील तीन महिन्यांत पटकथालेखन आणि कास्टिंगचे काम पूर्ण झाल्यावर गेल्या सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात होऊन सुमारे अकरा महिन्यांत ते पूर्णही झाले होते. पोस्ट प्रोडक्शन सोपस्कार पार पडल्यावर दणक्यात केल्या गेलेल्या प्रदर्शनपूर्व प्रमोशन मुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली, तिच्या पुस्तकावर आधारित असलेली त्याच नावाची बहुप्रतीक्षित "Nine Eleven - Twin To-Worse" हि वेब सिरीज आज संध्याकाळी 'नेटफॉक्स' वर प्रदर्शित होणार होती आणि त्या निमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्याला प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहण्यासाठी दुपार पासूनच तिची लगबग सुरु होती.
*** दिनांक : १५ सप्टेंबर २०२३ वेळ : संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटे स्थळ : मँडरिन ओरिएंटल हॉटेल सेंट्रल पार्क, मिड टाऊन, न्यू यॉर्क.संध्याकाळी बरोब्बर सहा वाजून तीस मिनिटांनी सोफीयाने आपला दोन वर्षाच्या मुलगा जॉर्ज आणि आपली वृद्ध आजी मार्था ह्यांच्या समवेत मँडरिन हॉटेलच्या बॉलरूम मध्ये प्रवेश केल्या बरोबर ऑडिओ जॉकीने अचूक टायमिंग साधून 'सिक्स डे वॉर' हे गाणे लावले.
At the starting of the week At summit talks you'll hear them speak It's only Monday Negotiations breaking downSee those leaders start to frown
It's sword and gun day
Tomorrow never comes until it's too late You could be sitting taking lunch The news will hit you like a punch It's only Tuesday You never thought we'd go to war After all the things we saw It's April Fools' day Tomorrow never comes until it's too late We'll all go running underground And we'll be listening for the sound It's only Wednesday In your shelter dimly lit Take some wool and learn to knit Cause it's a long day Tomorrow never comes until it's too late You'll hear a whistling overhead Are you alive or are you dead? It's only Thursday You feel a shaking of the ground A million candles burn around Is it your birthday? Tomorrow never comes until it's too late Though that shelter is your home
The living space you have outgrown It's only Friday As you come out to the light Can your eyes behold the sight It must be doomsday Tomorrow never comes until it's too late Ain't it funny how men think They made the bomb, they are extinct It's only Saturday
आपल्या सर्वाधिक आवडत्या गाण्याच्या पार्शवभूमीवर बॉलरूम मध्ये प्रवेशकर्ती झालेल्या सोफीयाचे सूत्रसंचालकाने आपल्या प्रमुख पाहुणीचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्याचे सांगत तिचे स्वागत करण्यासाठी केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत उपस्थितांनी उस्फूर्तपणे आपल्या खुर्चीतून उठून उभे रहात टाळ्यांचा गजर करून जोरदार स्वागत केले. साश्रूनयनांनी मिळालेल्या ह्या सन्मानाचा स्वीकार करत सोफिया, जॉर्ज आणि मार्था आयोजकांनी त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या मंचासमोरील टेबलवर स्थानापन्न झाले होते.
बसल्या जागेवर डोळे मिटून ती शांतपणे ऐकत असलेल्या त्या गाण्याची शेवटची ओळ जीचे तीन वेळा आवर्तन होते, ती ओळ सुरु होण्या आधीच सोफियाने ऑडिओ जॉकीला गाणे तिथे पॉज करण्याची खूण केली.
पुढे जवळपास तासभर प्रथितयश पॉप गायकांनी कॉकटेल्स आणि स्टार्टर्सचा आस्वाद घेत बसलेल्या उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यानंतर 'नेटफॉक्स' चे मुख्य विपणन अधिकारी राल्फ डाल्टन ह्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात लेखिका सोफिया डंकवर्थ ह्यांची पार्शवभूमी आणि ह्या वेब सिरीजच्या निर्मिती प्रक्रिये विषयी माहिती देत घड्याळाकडे लक्ष ठेवत सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सोफियाला मंचावर आमंत्रित करून वेब सिरीज अधिकृतरीत्या प्रदर्शित करण्याची विनंती केली. बरोब्बर आठ वाजता सोफियाने पोडियमवर ठेवलेल्या टचस्क्रीन वरील एक कळ दाबली आणि सूत्रसंचालकाने Nine Eleven - Twin To-Worse हि वेब सिरीज आता नेटफॉक्सच्या जगभरातील प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची घोषणा करून सोफियाला दोन शब्द बोलण्याची विनंती केली.
माईक हातात घेतल्यावर सुरुवातीला अशा प्रसंगी जे औपचारिक बोलावे लागते ते बोलणे अक्षरशः चार-सहा वाक्यात आवरतं घेत सोफियाने आपले मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली. आपल्या छोटेखानी भाषणाच्या शेवटी तिने तिच्या आगमनाच्या वेळी लावण्यात आलेल्या गाण्यासाठी आयोजकांचे मनापासून आभार मानले आणि त्या गाण्याचे तिच्या आयुष्यात असलेले स्थान विषद केले.
"सिक्स डे वॉर हे खूप जुनं गाणं आहे, माझ्या जन्माच्याही कितीतरी वर्षे आधीचं, पण ते माझ्या आई-वडिलांचे अत्यंत आवडते गाणे होते. मी ते अगदी लहान असल्यापासून ऐकत आले आहे. इतरांसाठी हे फक्त एक गाणे असेल पण माझ्यासाठी ते त्यापेक्षा खूप जास्त काही आहे. युद्ध, मग त्याचे स्वरूप कुठलेही असो पण ते अगदी कमी वेळात लोकांच आयुष्य बदलून टाकतं! २६ फेब्रुवारी १९९३ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माझे वडील मृत्युमुखी पडले, ११ सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यात माझी आई मृत्युमुखी पडली आणि २६ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या काबुल विमानतळावरील आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात माझा नवरा मृत्युमुखी पडला. ह्या गाण्याचे शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐका, ते तुम्हाला अंतर्मुख करतील. लहानपणापासून म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षांपासून मी ह्या गाण्यातले शब्द नुसते ऐकले नाहीयेत तर ते जगले आहे, अद्याप जगत आहे. ज्यांनी माझे पुस्तक वाचले आहे त्यांना मी काय म्हणत आहे ते चटकन लक्षात येईल आणि ज्यांनी ते वाचलं नाहीये त्यांच्या हि वेब सिरीज पाहिल्यावर ते लक्षात येईल. आजही मी हे गाणे रोज, दिवसातून अनेकवेळा ऐकत असले तरी गेल्या कित्येक वर्षांपासून मी ह्या गाण्याची शेवटची ओळ कधी ऐकत नव्हते कारण 'उद्या' कधी येईल ह्या गोष्टीवरून माझा विश्वासच उडाला होता. पण आधी माझ्या पुस्तकासाठी मिळालेले वाचकांचे प्रेम आणि आज त्या पुस्तकावर निर्माण झालेल्या ह्या वेब सिरीजच्या प्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने मी इथे आले आणि आपण सर्वांनी मला जो आदर, सन्मान आणि प्रेम दिलंत ते पाहिल्यावर मला ती शेवटची ओळ व्यर्थ नसल्याची मनोमन जाणीव झाली आहे आणि हि जाणीव करून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांची आजन्म ऋणी राहीन."
इतके बोलून झाल्यावर कंठ दाटून आल्याने पुढे एक शब्दही सोफियाला बोलणे अशक्य झाल्याने तिने माईक सूत्रसंचालकाच्या हाती सोपवला आणि ती मंचावरून खाली उतरली.
सोफियाच्या भाषणानंतर कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले न्यू यॉर्क शहराचे मेयर, पोलीस अधीक्षक वगैरे मान्यवर मंडळी आणि वेब सिरीज मध्ये काम केलेले कलाकार व टीमच्या अन्य सदस्यांना स्मृतिचिन्हे देणे आणि त्यानंतर 'Nine Eleven - Twin To-Worse' चा पहिला एपिसोड बघता बघता डिनर असे दोन कार्यक्रम अजून बाकी होते पण भावनाविवश झालेल्या सोफियाचे मन आता तिथे रमणे शक्य नसल्याने तिने तिथून निघण्याचा निर्णय घेतला आणि आयोजकांना तसा निरोप पाठवला.
तिच्या मनःस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आयोजकांनी तिला पुन्हा रंगमंचावर न बोलावता बसल्या जागेवरच स्मृतिचिन्ह देऊन तिचा योग्य तो सन्मान राखला. सूत्रसंचालकाने आपल्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी आपल्या सर्वांचा निरोप घेत असल्याची उद्घोषणा केली. उद्या ह्या वेब सिरीजचे 'बिंज वॉचिंग' करण्याचा निश्चय करून झोपलेल्या जॉर्जला कडेवर घेऊन सोफीया आणि मार्था बॉलरूम मधून बाहेर जाण्यासाठी निघाल्यावर पुन्हा एकदा उपस्थितांनी उभे राहून सोफियाला निरोप देण्यासाठी टाळ्यांचा गजर केला आणि ऑडिओ जॉकीने मगाशी पॉज केलेल्या गाण्याची शेवटची ओळ सुरु केली...
I think tomorrow's come, I think it's too lateI think tomorrow's come, I think it's too late
I think tomorrow's come, I think it's too late
क्रमश:
आधीचा भाग : नाईन इलेव्हन - Twin To-Worse: प्रस्तावना- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments