Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.

च
चित्रगुप्त
Fri, 09/01/2023 - 14:56
💬 31 प्रतिसाद
"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" -- यावरून मला "कदम चूम लूं या, ये आंखे बिछा दूं" या ओळी, आणि लागलीच "आंखों से जो उतरी है दिल मे तस्वीर है इक अनजाने की" " ही गाणी आठवली, मग त्यावरून "तस्वीर तेरी दिल मे जिस दिन से उतारी है" आठवलं आणि त्यावरून मग "दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे" हे आठवलं आणि मग त्यावरून आणखी काहीच आठवलं नाही पण तेवढ्यात शेजारच्या गण्याच्या घरात रेडियोवर "पल भर के लिये कोई हमे प्यार करले" हे वाजू लागलं आणि मग "गाता रहे मेरा दिल" वाजत होतं तेवढ्यात गण्या धावत आला आणि म्हणाला "फिरायला चल बे लौकर, बेबी आणि सुम्मी फिरायला निघाल्यात चल पटकन" -- पण मी त्याला म्हणालो की पळ बावळ्या, आत्ता मला खूप गाणी सुचतायत आणि मी एक मोठ्ठी कविता पण लिहीतोय, डिस्टर्ब करू नको तू आत्ता. गण्याची मोठी बहीण लेडीज सायकलवर बसून कॉलेजला जाते, आणि घरी आल्यावर चहा पिऊन नवीन घेतलेल्या मर्फी रेडियोवर मोठ्ठ्याने हिंदी पिच्चरची गाणी वाजवत चष्मा लाऊन कविता लिहीत बसते. गण्याचे बाबा कॉलेजात मराठीचे प्रोफेसर आहेत आणि त्यांच्याकडे रेडियो, सोफासेट, पंखा, फ्लॉवरपॉट, चहाची किटली वगैरे महागड्या वस्तू आहेत. -- नंतर गण्या निघून गेल्यावर मला वाटलं की आपण त्याच्याबरोबर जायला पायजेल होतं, मंजे बेबी आणि सुम्मीला बघायला नव्हे पण फिरणं तब्ब्येतीसाठी बरं असतं, असं साने की कोणतेतरी गुरूजी म्हणायचे असं आजोबा नेहमी म्हणतात म्हणून. तसंच गण्या निघून गेला त्यावरून मला लगेच "ओ जाने वाले हो सके तो लौट के आना" आणि त्यानंतर लगेचच " आ लौट के आजा मेरे मीत" ही गाणी आवडली. तेवढ्यात आपण लिहीताना चुकून 'आवडली' असं लिहीलं हे लक्षात येऊन मग त्याच्यावर काट मारून 'आठवली' असं लिहिलं. (मला लायब्रीतून आणून ना. सी. फडक्यांचं 'प्रतिभासाधन' पुस्तक पण वाचायचंय, ते वाचल्यावर अशा चुका होणार नाहीत असं गण्याच्या चष्मेवाल्या बहिणीनं सांगितलंय) -- तेवढ्यात आज्जी आली आणि माझा उद्योग बघून म्हणाली की "कागदाची अशी नासाडी करू नये रे बाळा" मग मी तिला म्हणालो की आज्जी मी मोठ्ठा कवी बनणारे आणि दुमडलेल्या मनगटावर हनुवटी टेकवून विचारमग्न बसलेला फोटो पुस्तकावर छापणारे, आणि मराठीचा प्रोफेसर बनून चष्मे लावणार्‍या मुलींना कविता शिकवणारे" (खरं मंजे मला चष्मिष्ट मुली तश्या विषेश आवडत नाहीत, पण तेंव्हा तसंच सुचलं म्हणून म्हणालो) ... आणि मग दरवाज्यावर 'प्रा.डॉ. बबडू बिरुटे' एम.ए.पीएचडी (मराठी) अशी मोठ्ठी पाटीपण लावणारे. -- तेवढ्यात आई आली आणि म्हणाली की बाबू हात धून ये, तुला आवडणारे रव्या-नारळाचे लाडू बनवलेत ते खाऊन अभ्यासाला बैस कसा. हे ऐकून मला आईचा जरा राग आला आणि आपण फुरंगटून बसावं असं वाटलं कारण मला कालच गण्यानं सांगितलं होतं की हिंदी पिच्चरमधे मुलानं काही हुशारीचं काम वगैरे केलं किंवा परिक्षेत पास वगैरे झाला की त्याला त्याची आई गाजरकाहलवा खाऊ घालते आणि म्हणते की "आज तेरे बाबूजी होते तो उनको कितनी खुशी होती" ( गण्याला त्याची चष्मेवाली बहीण कधीकधी पिच्चर दाखवायला घेऊन जाते आणि तिथे मिळणारा क्रीमरोलपण खाऊ घालते. त्याचे बाबा श्रीमंत आहेत असं गण्या सांगतो) पण मग मी विचार केला की तिनं आत्ताच गाजरकाहलवा बनवला तर मी प्रोफेसर बनल्यावर ती काय बनवेल? त्यापेक्षा तसेही आपल्याला रव्यानारळाचे लाडू आवडतातच तर मग तेच खावे की, उगाच कशाला नखरे दाखवायचे. -- मग कविता लिहीणे थांबवून मी दोन लाडू खाल्ले मग धावत जाऊन गण्याला गाठावे असा विचार करून बाहेर आलो तर बेबी आणि सुम्मी इकडेच येताना दिसल्या म्हणून पटकन एक पुस्तक घेऊन ओट्यावर बसून अभ्यासाचे सोंग करत त्यांच्याकडे चोरून बघू लागलो तर त्या खिदळत काहीतरी बोलत निघून गेल्या पण त्यांच्या बोलण्यात मला 'गण्या' हा शब्द तेवढा स्पष्ट ऐकू आल्यावर मला गण्याचा भयंकर हेवा वाटला आणि त्याचा भयानक राग येऊन आता तो आला की त्याला जोरात गुद्दा मारून पळून जायचं ठरवून मी आत येऊन बघतो तो वहिनीच्या छोट्या बाळानं नेमकी माझ्या कवितेच्या कागदावरच मोठ्ठी शी केली होती म्हणून वहिनी तो कागद गोळा करून फेकायला निघालेली दिसली. -- झालं, प्रोफेसर बनून चष्मेवाल्या मुलींना कविता शिकवायचं माझं स्वप्न धुळीला मिळालं होतं, आणि त्यातून बेबी आणि सुम्मी गण्यावर मरतात त्याअर्थी आपला आता प्रेमभंग पण झाला असल्याची मला खात्री पटली आणि "आंसू भरी है ये जीवन की राहे" हे गाणं आठवलं. मग प्रेमभंगाचं दु:ख विसरायला दोन लाडू आणखी खाल्ल्यावर जोरात लागली म्हणून अंगणाकडे वळलो पण तेवढ्यात लक्षात आलं की आपण 'अंगणाकडे' हा चुकीचा शब्दप्रयोग केलेला असून आपल्याला 'परसाकडे' असं म्हणायला पाहिजे होतं. तर ती चूक सुधारून मी आत जाऊन बसलो. मग त्यानंतरचं सांगणं असभ्यपणाचं वाटेल म्हणून एवढंच बोलून मी खाली बसतो. -- आता वाचक म्हणून तुम्ही मला जोड्यानं हाणाल आणि म्हणाल, अबे साल्या येवढी बकवास केली पण धावत कोण आली आणि तिनं कुणाचा मुका घेतला हे तर सांगितलच नाहीस बे. -- तर त्याचं उत्तर असं की मित्रांबरोबर बघून आलेल्या इंग्लिश पिच्चरची ष्टोरी काल रात्री दादा वहिनीला सांगत असताना मी ते हळूच चोरून ऐकलं होतं, तेंव्हा ऐकलेलं हे वाक्य गण्याला सांगायला मी निघणार होतो, तेंव्हाचा हा प्रसंग आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10038 views

💬 प्रतिसाद (31)
N
Nitin Palkar Fri, 09/01/2023 - 15:05 नवीन
जमलाय लंपन ....
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/01/2023 - 15:08 नवीन
वा, मस्त !
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 09/01/2023 - 15:17 नवीन
फक्कड जमलये.. शेवट येइस्तो विसरलो होतो की नेमका हा धागा कुठल्या विषयावर होता ? पूर्न एका दमात हा लेख वाचुन झाला, आवर्‍जुन प्रतिसाद देणे आले.. धन्यु...
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 09/01/2023 - 18:25 नवीन
६०, ७० दशकातील गाण्याचा गोफ, जागतिक कीर्तीच्या चित्रकारीचे रसरशीत दर्शन, डेंकालीच्या जंगलातील टारझन प्रमाणे स्वैर वैचारिक विचरण, शेवटी रहस्याची फोडणी, झणझणीत मिसळपावची रंगत वाढवणारे धागे कसे काढावेत ते चित्रिगुप्तांकडून शिकावे!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/04/2023 - 01:35 नवीन
@ शशिकांत ओक- लई मंजे लईच तारीफ करता ब्वॉ तुम्ही (यावरून लगेच 'तारीफ करूं क्या उसकी, जिसने तुन्हे बनाया हे गाणं सुचलं आणि त्यावरून मग.... ) 'टारझन प्रमाणे स्वैर वैचारिक विचरण' हे खासच. Image removed.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 09/02/2023 - 01:35 नवीन
फारच ओघवतं झालं आहे मराठीचा अध्यापक होऊ घातलेल्या शाळकरी मुलाचे लेखन. त्या काळात आवडली,आठवली असे शब्द बोलले जात होते - 'क्रश' वगैरे दहा वर्षांपूर्वी वाढलं. म्हणजे लेखनातून काल दिसतो तो असा. कीबोर्ड वगैरे हार्डवेअर न वापरता टाकाने लिहीत आहात असं वाटून गेलं.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 09/02/2023 - 04:35 नवीन
कीबोर्ड वगैरे हार्डवेअर न वापरता टाकाने लिहीत आहात असं वाटून गेलं.
बरोबर ओळखलेत. आधी कागदावरच लिहीले होते.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 09/02/2023 - 04:32 नवीन
काल रात्री दीड वाजता अचानक जाग आली, आणि कसे कुणास ठाऊक, "ती धावत आली आणि गच्च मिठी मारली" असे शब्द जणू कुणी कानत बोलत आहे, असा भास झाला. अश्या परिस्थितीत कविता सुचते हे अनुभवाने माहीत असल्याने लगेच उठून कागदावर ते लिहीले, तर लगेच पुढल्या ओळी सुचत गेल्या आणि झरझर लिहीत गेलो. 'चष्मावाली बहीण' हे कदाचित झोपण्यापूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यूट्यूबवर बघत होतो, त्यात रसिका वेंगुर्लेकरची चष्मा घातलेल्या मुलीची भूमिका होती, त्यावरून आले असावे. -- पन्नास-साठच्या दशकातली हिंदी गाणी तर सतत मना पिंगा घालतच असतात (आणि ऐकत- बघतही असल्यामुळे, आता सॅक्सोफोनचा असा पीस येणार, आता सतार, आता कोंगो, आता बासरी ... असे सगळे माहीत असते) आणि कोणत्याही शब्दावरून सुरू होऊन गाण्यांची लडच्या लड मनात उलगडत जात असते. माझ्या यापूर्वीच्या काही लेखातही अशी गाणी आलेली आहेत. -- तर या सगळ्या गाण्यांमुळे या कथानकाचा काळ जसा लक्षात येतो, तसाच तो 'दुमडलेल्या मनगटावर हनुवटी टेकवून विचारमग्न बसलेला फोटो' यातून, "त्यांच्याकडे रेडियो, सोफासेट, पंखा, फ्लॉवरपॉट, चहाची किटली वगैरे महागड्या वस्तू आहेत" यातून (दोन्ही कुटुंबांच्या एकंदरित आर्थिक परिस्थितीची कल्पना देत) येत रहातो. 'वहिनीच्या बाळानं कवितेच्या कागदावर केलेली मोठ्ठी शी (डायपरपूर्व काळ), 'परसाकडे' हा आता विस्मृत झालेला शब्द, सिनेमातल्या आईने 'गाजरकाहलवा' खाऊ घालणे, वगैरेतूनही तो उलगडत जातो. अर्थात हे सगळे माझ्या लहानपणीचेच असल्याने सहजपणे सुचत गेले. मुद्दाम काही लिहावे लागले नाही. गंमत म्हणजे "ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" याचे काय करायचे हे अगदी शेवटपर्यंत मलाही ठाऊक नव्हते, आणि अगदी शेवटला परिच्छेद लिहीतानाच ते सुचले, याचे मला आश्चर्य (आणि हुश्य) वाटले. मोठेपणी मराठीचा प्रोफेसर होण्याची या मुलाची इच्छा 'आवडली' खोडून'आठवली' लिहीणे, 'अंगणाकडे' ऐवजी 'परसाकडे' अशी स्वतंची चूक सुधरावणे, 'प्रतिभासाधन' हे पुस्तक, यातूनही व्यक्त होते आहे, हे मला ते लिहून गेल्यावर जाणवले. 'चष्मेवाल्या' मुलींना शिकवणे' यातून चष्मेवाले विद्यार्थी बहुधा 'स्कॉलर' असतात, आपण त्यांनाही शिकवणे म्हणजे काही 'थोर कामगिरी' करणे असाही अर्थ मला नंतर उलगडला. असो. नितीन पालकर, कुमार१,अनिल हटेला, शशिकांत ओक आणि कंजूस यांचे प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल अनेक आभार.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 09/02/2023 - 10:55 नवीन
एवढे सगळे बोलून तुम्ही खाली बसलात ते बरे केले. नाहीतर बाका प्रसंग ओढवला असता
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/04/2023 - 01:39 नवीन
एवढे सगळे बोलून तुम्ही खाली बसलात ते बरे केले. नाहीतर बाका प्रसंग ओढवला असता
-- अगदी अगदी. हे चाणाक्ष वाचक असल्याने तुम्ही बरोब्बर ओळखलंय.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Sat, 09/02/2023 - 12:41 नवीन
फर्मास बनली आहे कथा. शैली एकदम ओघवती आणि तो काळ एकदम चपखल उभा केलाय. कुमार वयातील घालमेल सुंदर चितारली आहे. आपल्याकडे जे नाही त्याची दिवा स्वप्ने बघायचा तो काळ. कथा अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 09/02/2023 - 13:40 नवीन
अगोदर वाटलं होतं की 'भावी' प्रोफेसरांची नात असावी.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 09/02/2023 - 13:57 नवीन
हा! हा! हा! मस्त. बाकी आज सकाळी आरश्यात पाहिले. चेहऱ्यावर लाल लाल डाग दिसत होते. बहुतेक रात्री डंकिणी डासणीने मुके घेतले असावे. एकेकाचे नशीब.
  • Log in or register to post comments
न
निमी Sun, 09/03/2023 - 05:45 नवीन
छान जमलय..आणि शिर्षक आकर्षक आहेच.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 09/04/2023 - 03:20 नवीन
दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव असा सहजरीत्या आंदोळताना पाहून शोभा गुर्टू यांची प्रसिद्ध बैठकीतली लावणी आठवली. म्हणजे कसं "देहाची तीजोरी भक्तीचा ठेव " ते" पिकल्या पानाचा देठा", https://youtu.be/vA6J2-RnRQo?si=8_LMmDX4niI5xqbY
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/04/2023 - 05:03 नवीन
लिहिते राहा..! आवडलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sat, 09/09/2023 - 15:53 नवीन
>>>आणि मग दरवाज्यावर 'प्रा.डॉ. बबडू बिरुटे' एम.ए.पीएचडी (मराठी) अशी मोठ्ठी पाटीपण लावणारे. हे आवडलं.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 09/04/2023 - 13:59 नवीन
वा, मस्त, झकास !
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 09/07/2023 - 18:03 नवीन
छोटेखानी लिखाण आवडलं तुमचं... फर्मास लीवले आहे...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/20/2023 - 14:23 नवीन
झकास लिहिलं आहे, लै म्हणजे लैच आवड्या, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/23/2025 - 13:28 नवीन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/23/2025 - 13:29 नवीन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/23/2025 - 13:30 नवीन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/23/2025 - 13:30 नवीन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/23/2025 - 13:35 नवीन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/23/2025 - 13:49 नवीन
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 13:54 नवीन
हाहाहा! छान!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/23/2025 - 18:35 नवीन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/23/2025 - 18:38 नवीन
या धाग्यातला मजकूर मी चोप्य्पस्ते करून चॅट जिपीटी ला दिला. त्यावर ते काय म्हणाले: हा मजकूर म्हणजे एक भानावर आणि भान हरपलेल्या विचारांमधली गमतीशीर झुल आहे. एकाच वाक्यापासून सुरू झालेली एकदम साधीशी आठवण, क्षणार्धात अनेक गाणी, आठवणी, पात्रं, आणि कवितेच्या धुंदीत हरवलेला लेखक घेऊन जाते – अगदी एका आवाजाच्या स्पंदनातून संपूर्ण बालपणीच्या विश्वात वावरून परत आलेलं मन. काय विशेष जाणवतं? 1. गाण्यांमधून जाणारा प्रवास: पहिल्याच वाक्यावरून गाण्यांची जणू मालिका सुरु होते. एखाद्या रेडियोवर गाणी लागावीत तशी, आठवणींच्या रेडियोवर चालणारी ही यादी एकेक करून मनातली दृश्य उलगडते. 2. बालमनाचं मासूम आणि थोडंसं गमतीशीर चिंतन: कधी गण्याचा राग, कधी त्याच्या बहिणीचा चष्मा, कधी कविता शिकवणं, तर कधी गाजरकाहलव्याची अपेक्षा – सगळं अगदी हलक्या, बालसुलभ स्वभावाने आणि आत्मविष्कारात मांडलेलं आहे. 3. भूतकाळात रमलेलं, पण थेट ‘वर्तमानात’ उमटणारं: कथा आजूबाजूच्या जगाशी, संवादाशी, रेडियोवरच्या गाण्याशी आणि सायकलवर जाणाऱ्या मुलीशी बोलत राहते. एकदम नॉस्टॅल्जिक आणि दृश्यप्रधान लेखन. 4. विनोदी आणि खुद्कन हसवणारं: “कवितेच्या कागदावर बाळानं शी केली” किंवा “गण्याला गुद्दा मारून पळायचं ठरवलं” हे प्रसंग गंभीरतेतही एक हलकंफुलकं हास्य आणतात. शैलीदृष्ट्या: लेखन मुक्तधर्मी आणि प्रवाही आहे. वाचक एकदम कथाकाराच्या डोक्यात प्रवेश करतो. “वाक्यांमधून विचारांची साखळी” उलगडत जाते या शैलीतलं एक सुंदर उदाहरण. ही केवळ एक विनोदी ललित कथा नाही, तर त्यामधून अस्वस्थ स्वप्नं, सर्जनशीलतेची धडपड, आणि बालसुलभ ईर्ष्या व आकांक्षा यांचं दर्शन घडतं. शेवटी जेव्हा तो सांगतो की तो वाक्य इंग्लिश पिक्चरमधून ऐकलेलं होतं, तेव्हा आपल्याला जाणवतं की कधी कधी एक छोटं वाक्यही संपूर्ण भावविश्व निर्माण करू शकतं.ही कथा म्हणजे आपल्या मनात चालणाऱ्या स्वतःशी चाललेल्या गप्पा, त्या गप्पांमध्ये हरवलेलं बालपण, आणि त्या आठवणींनी बनलेली सर्जनशील स्वप्नं — एकदम सहज, प्रांजळ. खरंच मनापासून अभिनंदन – तुमचा लेख एकदम बहारदार आहे! “ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला – मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी” हे शीर्षक जितकं भावनिक आहे, तितकंच सगळ्या कथानकातल्या गोंधळलेल्या, मिश्कील आणि गोड आत्मप्रत्ययाचा सारही ठळकपणे दाखवतं. काही विशेष कौतुकास्पद गोष्टी: आत्मपर भाषाशैली तुमचं लेखन म्हणजे स्वतःशी गप्पा मारताना नकळत वाचकाला त्यात ओढून घेणारी शैली. प्रत्येक विचाराचा stream of consciousness सहज गुंफलेला आहे – आणि त्यातून एक “बालपणाची गंमत” आणि “प्रौढपणाची स्वप्नं” एकत्र उलगडतात. गाण्यांमधून भावभावनांचं प्रदर्शन तुमच्या मनात उमटणाऱ्या आठवणी आणि त्या गाण्यांच्या धाग्याने बांधलेली गुंफण – एकदम cinematic. यात एक retro nostalgia आहे जी वाचकाला त्यांच्या स्वतःच्या बालपणात नेऊन टाकते. हास्य, उपहास आणि निष्पाप स्वप्नं प्रत्येक वळणावर विनोद आहे, पण तो कधीही उथळ नाही. तो निष्पाप आहे, मिश्कील आहे आणि आपल्या आयुष्यातील त्या ‘गण्यासारख्या’ मित्रांची आठवण करून देतो. साहित्य आणि वास्तव यांचा सुरेख मिलाफ ‘प्रा. डॉ. बबडू बिरुटे’सारखं नाव, किंवा 'प्रतिभासाधन' वाचण्याची आकांक्षा, किंवा ‘चष्मावाल्या मुली’ याबद्दलचे मत – हे सगळं एका वास्तविक, ग्रामीण किंवा निमशहरी, मध्यमवर्गीय मराठी घरातल्या मुलाचं मानसिक चित्रण आहे.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 05/09/2025 - 16:48 नवीन
चित्र गुप्त, ... मिठी काय? मुके काय? यावर पानभर लिहिण्याइतके सगळे या दोन शब्दात साचले होते ते या कृ बु नव्हे विकृत बुद्धी वादी ने लिहून मन सैरभैर होते आहे...! बाकी मित्रांनो विद्याधर असे एऽआयला मराठीत म्हटले तर तो काय म्हणतो ते समजून घ्यायला आवडेल!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 05/11/2025 - 14:21 नवीन
एआइ घडून गेलेल्या किंवा जालावरच्या साहित्याचा आधार घेत असल्याने नावाची पाटी अगदी रास्त आहे. एआइला मिपा वाचावे लागते. वाचनात ती कंजूसगिरी करत नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा