थालीपीठ-एक मराठमोळा पदार्थ
ब्रिस्क वाॅक करताना कानात कुंडले घालून मराठी गाणी ऐकणे बरेच दिवसापासूनचा नियम.दररोज प्रमाणे सकाळचे फिरणे संपले व सोसायटीतील मुलांच्या बागेत बाकावर सकाळचं कोवळं उन खाण्यासाठी येऊन बसलो. हिरवटसर पिवळ्या गवतावर सध्या सुरू असलेली पानगळ एक वेगळेच चित्र रेखाटत होती.शांत वातावरण, कोवळे उन आणी मंद वारा यांच्या संगनमताने उबदार थंडी सुखावत होती.
सध्या परीक्षेचा हंगाम असल्याने बागेत मुलांचा गलका नव्हता पण पाखरांचा चिवचिवाट मात्र आनंदात भर टाकत होता.झोपाळा,घसरगुंडी सर्व काही शिक्षा दिल्यासारखे गपचूप उभे होते. तेवढ्यात समोरून दोन साळुंक्या दोन मैत्रीणीं सारख्या रमत गमत जमीनीवर आपलं भक्ष टिपत चालल्या होत्या. त्यांच लक्ष माझ्याकडे नव्हतं पण मी मात्र त्यांच्या कडे लक्ष देऊन बघत होतो. त्यांनी मला बघीतले व भुर्रकन उडून रिकाम्या झोपाळ्यावर जाऊन बसल्या.जड लोखंडी झोपाळा उगाचच हलल्या सारखा वाटला.
सकाळचा व्यायाम झाल्यामुळे चुस्त शरीर व प्रसन्न मन निसर्गाच्या सान्निध्यात आणखीन आनंदी झाले. नगरसेवक कृपा बेंचवर बसून व्हाट्स अपवर आलेले मेसेजेस बघायला सुरुवात केली.एक मिपा सदस्यानी खालील टेक्स्ट,स्टेटस म्हणून टाकले होते.
"मराठी माणसाला 'थालीपीठ' म्हणजे काय हे एखाद्या दुसऱ्या माणसाला समजावून सांगायची वेळ आली की तो दुसरा हा दुसराच बनून राहतो. कारण आपल्याला जेव्हा थालीपीठाची आठवण येते, त्यावेळेला ती नुसत्या एका चवदार पदार्थाची नसते.ज्या स्वयंपाकघरात आपण पाटावर बसून ते थालीपीठ खाल्लेलं असतं ते स्वयंपाक घर, थालीपिठा बरोबर त्याच्यावर आईने हलकेच ठेवलेला ताज्या लोण्याचा गोळा, थालीपीठ थापताना आईच्या हातातल्या बांगड्यांचा किणकिणाट, घरभर सुटलेला तो खमंग वास, रंग, रस, गंध,स्पर्श या आठवणींचे असंख्य भोवरे त्या एका शब्दाबरोबर गुंजन करायला लागतात. आणि आपल्याप्रमाणे, ह्या शब्दाच्या उच्चाराने आणखी कुणाला हाच अनुभव येतो हे समजल्यावर तो परका माणूस आपला माणूस होऊन जातो. शेवटी माणूस म्हणजे त्याच्या स्मृतिकोशात साठत गेलेल्या असंख्य संदर्भाचं चालतं बोलतं गाठोडं आहे.
- पु. ल. देशपांडे"
स्टेस्टस वाचल्यानंतर, आठवणींचे असंख्य भोवरे त्या एका शब्दाबरोबर गुंजन करायला लागले व पु. ल.नीं वर लिहील्या प्रमाणे स्मृतिकोशात साठवलेल्या गाठोड्यातल्या असंख्य संदर्भाच्या गाठी सुटून इतस्ततः पसरू लागल्या.
पानशेत फुटी नंतर आमच्या वडलांची बदली एका खेडेगावात झाली. तसे तालुक्याचे गाव पण आकारानुसार खेडेगावच. एका मोठ्या वाड्यात रहायला जागा घेतली.पुर्ण वाड्यात आम्हांला धरून दोनच भाडेकरू,मालक दुर निरा नरसिंगपूर येथे. भाडे पाच सात रूपये ते सुद्धा वर्षा दोन वर्षातून एकदा घ्यायला यायचे. संपूर्ण वाडा आमच्याच बापाचा आसल्या प्रमाणे आम्ही वागायचो. आंगणात मोठं उबंराचे झाड,परसदारी मोठी जास्वंद, शेवगा आणी शेज्यार्याचां पेरूच्या झाडाच्या झुकलेल्या फांद्या. पुढे वडीलांनी भाजीपाला लावला. उकिरडा हा प्रत्येक घराचा त्या वेळेस अविभाज्य घटक,वडिलांनी त्याचे खताच्या खड्डय़ात रूपांतर केले. तेच खत भाजीपाला पिकवताना टाकायचे.
त्यावेळेस आमच्याकडे गाय होती. भरपुर दुधदुभते.दुधावरच्या सायीवर मात्र आईचा खडा पहारा असायचा (दुध गाळून पिणाऱ्या महानुभावांची किव येते,हे परमेश्वरा ते कुठे चुकताहेत त्यांनाच कळत नाही). आठवड्यात एकदा ताक व लोणी बनायचे. ज्या दिवशी लोणी बनायचे त्या दिवशी आई भाजणीचे खमंग थालीपीठ जरूर करायची.
भाजणी बनवणे एक मोठीच प्रक्रिया होती. आठरा प्रकारची धान्ये, कडधान्य,जीरे,धणे एकत्र करून भाजणी हा खमंग प्रकार गीरणीत किवां घरीच दळायचा. भाजणी बनवणे सुरू झाल्या पासूनच आम्ही मुले धुतलेली बाजरी,डाळ इ. खायचो.आईने पकडले तर पाठीत धपाटा पडायचा. थालीपीठाचे अनेक प्रकार,धपाटा सुद्धा एक प्रकारचे कणकेचे गोड थालीपीठ. गुळाच्या पाण्यात गव्हाचे पिठ व थोडा सोडा टाकून आई बनवायची. आताच्या प्लम केक पेक्षा भारी. भाजणीचे थालीपीठ हा सर्वांचा राजा. यानेअमराठी माणसालाही वेड लावले आहे.
एरवी गिरणीत जायला टाळाटाळ करणारी मुलं,भाजणीचे पिठ दळून आणायला पायावर नेहमी तय्यार असायची. मेल्यानों, कच्ची भाजणी खाऊ नका आशी तंबी जरूर मिळायची . भाजणी खरोखरच खुप खमंग असायची.धणे,जिरे, बाजरी, ज्वारी, हरबारा डाळ इ. यांचे विषेश प्रमाण एकत्र दळल्यानंतर काय मस्त वास यायचा. गरम गरम चिमूटभर पिठ तोंडात टाकायचा मोह कुणालाही आवरत नसे.
त्यावेळेस घराघरात चुल, शेगडीवरच जेवण बनायचे. स्वयंपाक घरात सर्व मुले गोल करून गरम थालीपीठ केव्हा मिळेल याची वाट बघत बसायचो.
आमची आई भाजणीचे पिठ गरम पाण्यात मळून त्याचा छोटा गोळा पाढंर्या शुभ्र कापडाच्या चौकोनावर गोल थापायचा. त्याला मध्यभागी पाच छिद्र पाडायची त्यात साजूक तुप टाकायची. चुलीवरच्या गरम तव्यावर भाजून घ्यायचे.घरचे साजूक तुप त्या छिद्रातून तव्यावर थालीपीठच्या खाली पसरायचे. खालील भाग मस्त खरपूस तळून निघायचा. मऊ आणी कुरकुरीत असे भाजलेले थालीपीठ आमच्या थाळ्यात बरोबर घरचेच लोणी, लोणचे,ताक दही असायचे. कांदेनवमीला कांद्याचे,भाजणीचे थालीपीठ मुख्य पदार्थ जरूर असायचा.
स्वयंपाक घर,माजघर,ओसरी, अंगण,पडवी, गोठा परसदार असा घराचा पसारा आसायचा.आता याची जागा किचन, हाल,बेडरूम, बाथरूम यांनी घेतली आहे. ताट,पाट,वाटी काळाच्या ओघात लुप्त झालेत व त्यांची जागा डायनिंग टेबल, खुर्ची,काटे चमचे प्लेट्स यांनी घेतली आहे. थालीपीठाच्या जागी पिझ्झा व लोण्याच्या गोळ्या ठिकाणी बटर चिज दिसून येत आहे. मुलांचा गोंधळ संपलाय.एक,दोन खंडूळी( मुले) डायनिंग टेबलवर नाहीतर सोफ्यावर समोर टिव्हीवर किंवा मोबाईल बरोबर एकटेच जेवताना कसले तोबरे भरून रवंथ करताना दिसतात.
आता, काप गेली आणी भोकं राहीली आहेत.
थालीपीठ हा अस्सल मराठमोळा पदार्थ. रंगरूप ओबडधोबड. नुसतं बघून प्रेमात पडावं असा तर नव्हेच.पण एकदा जिभेवर चव रेंगाळली की बस्स....
माझी लाडाची मैना गावाकडं रायली
माझ्या जीभेची होतीया कायली
थालीपीठ हा पदार्थ खूप जुना असणार. माणूस शेती करू लागला आणि त्याला धान्य भाजता आणि दळता येऊ लागलं अगदी तेव्हाचं.ते बनवण्याच्या प्रक्रियेत जो सोप्पेपणा आहे ना, त्यावरूनच ते स्पष्ट होतं.दुर्गाबाई भागवतांनी त्यांच्या ‘खमंग’ मध्ये थालीपिठाला पहिलं स्थान दिलंय.
थालीपीठ नुसतं चवीनं श्रीमंत नाही, तर ते पौष्टिकही आहे. त्यातल्या धान्यांमधून, कार्बोहायड्रेट मिळतात. हल्ली डाएटची काळजी करणाऱ्यांमध्ये ज्वारी-बाजरी ही भरड धान्ये भलतीच डीमांडमध्ये आहेत, त्यांची थालीपिठात उपस्थिती असते. सोबत प्रथिनांनी समृद्ध असलेली कडधान्ये आहेतच. शिवाय भाजून घेतल्याने पचायला हलके.
सहज सुचलं,
गेले ते स्वयंपाक घर
आले ते किचन
काळ्याशार डायनिंग टेबलवर
सजतयं तंदूरी चिकन
पाटावरचा थाट गेला,
गेला आमटीचा भुरका
टेबलावर सजलायं काटा अन चमचा
खुर्चीवर बसून ग्लोबल
चर्चा करतयं
घरात काय चाललंय
याची कोण पर्वा करतयं
थालीपीठ ,वडापाव हार्वर्डला गेलं
पिझ्झा आणी बर्गर बनून आलं
पैशाच्या मागे पळ पळ पळतयं
नाती गोती मागं सुटली
हे कुणाला कळतयं
काळाचा महिमा
जग पुढं चाललयं
सारं जरी कळत आसलं
तरी कुठं वळतयं
थालीपीठ आणी लोण्यासाठी
आजही मन माझं झुरतयं.
मराठमोळ्या थालीपीठा बरोबर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
थालीपीठ आणी लोण्यासाठी आजही मन माझं झुरतयं. मराठमोळ्या थालीपीठा बरोबर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा._/\_