शंभर अदाणी हवे आहेत…
...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग !
महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा. त्यात ही प्रगतीचा केवळ एक दोन वर्षासाठी लागलेला मटका नाही तर प्रगतीचे परिणाम दूरगामी टिकतील असे महाकाय प्रकल्प उभे करणारा.
अन्य देशांचा जळफळाट का होणार नाही ? अमेरिकेतले सुमारे 1.8 ट्रिलियन डॉलर्सचे प्रकल्प कुशल मनुष्यबळ मिळत नाही म्हणून रखडत आहेत. धंदे धडाधड कोसळत आहेत. बहुचर्चित टेस्ला नोव्हे 21 पासून आजतागायत म्हंजे जाने 23 पर्यंत सुमारे 75 टक्क्यांनी कोसळला आहे. नोव्हें 21 ते मे 22 पर्यंत नेटफ्लिक्स 77 %, जुन 22 पर्यंत एका वर्षात पेपाल 78 % वगैरे ! फ्रांसच्या रस्त्यावर लोक आक्रोश करत आहेत कारण त्यांच्या निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले आहे, निवृत्ती वाढवली कारण पेन्शन द्यायला फ्रांसकडे पुरेसा निधी नाही. इंग्लंडमध्ये पुरेसा पगारच मिळत नाही म्हणून समस्त सरकारी नोकर रस्त्यावर उतरल्याची बातमी वाचली. शिवाय या सगळ्यांच्या डोक्यावर पुतीन मिरे वाटतो आहेच. सगळ्या युरोप अमेरिकेत महामारी नंतर महागाई निर्देशांकाने घाम फोडला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत अत्यंत धीराने एक एक पाऊल भक्कमपणे, आत्मविश्वासाने टाकतो आहे. चक्क ऐशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतो आहे.... जळफळाट का होणार नाही ?
अदाणीला बदनाम करणे हे षडयंत्र आहे. अदाणी चोर आहे असे म्हणणे हे आमच्या बँका किंवा सेबी आणि न्यायालये बिनडोक आहेत असे म्हणणे आहे ! बरं यालाच का पकडला असेल ? कारण अदाणीचे सगळे व्यवसाय हे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातले आहेत आणि बहुतेक भारतात आहेत - विमानतळे, बंदरे वगैरे ! ज्या देशातल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि विकास होतो, तो देश आज ना उद्या आर्थिकदृष्ट्या विकसित होतो. उदाहरणार्थ चीन. आमच्याकडे इतकी अशांतता असताना तुमच्याकडे इतकी भरभराट कशी होऊ शकते ???? हा जळफळाट आहे.
गुंतवणुकीसाठी जगभरच्या उद्योगांना आज भारतासारखे पोषक वातावरण कुठे ही नाही, हे कुणी ही किती ही काहीही आपटले तरी सत्य आहे. अदाणीला बदनाम करण्यामागे गुंतवणूकदारांना भ्रमित करण्याचा देखील हेतू आहे.
राहिला विषय देशी विरोधकांचा ! त्याला दोन कारणे आहेत : एक इथल्या जनतेला ज्यांना मोदींना विरोध करायचा आहे, त्यांना अदाणी व्हिलन वाटतो. अदाणी मोदींचा पिट्टू आहे असे एक नॅरेटिव्ह इकडे पब्लिकने बनवले आहे. यातल्या कुणालाही धंदे कळत नाहीत. एखादे सरकारी टेण्डर कसे मिळते हे खिजगणतीत देखील नसेल. अदाणीचे खिसे मोदी भरतात म्हंजे नेमके काय करतात आणि कसे भरू शकतात याचा शोध घ्यायच्या भानगडीत जनता पडत नाही. मोदीना जर अदाणीला त्यांच्या स्वार्थासाठी पाळायचे आहे तर असे आणखी काही उद्योजक भारतात त्यांनी का शोधले नसतील ? फक्त अदाणी किंवा अंबानीच का ? त्यांच्या नावाने इतकी बोंबाबोंब होऊन देखील मोदी सारखा हुशार माणूस केवळ यांनाच का पाळत असेल ? असे मोदीवर जीव ओवाळून टाकणारे बाकीचे कुणी या दीडशे कोटी जनता असणाऱ्या देशात मोदीना मिळत नसेल का ? .....मी सरकारच्या कंपन्यांबरोबर - पायाभूत सुविधांमधल्याच - गेली पंचवीस वर्षे धंदा करतो आहे. खाजगी उद्योगांमधल्या एखाद्या अधिकाऱ्याला एकवेळ पटवणे सोपे आहे ! सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत. सिग्नल तोडल्यावर पाच पन्नास रुपये देऊन सुटका करून घेणाऱ्या जनतेला शितावरून भात तसाच असेल असे वाटत असेल. पण वास्तव वेगळे आहे : स्पर्धक कंपनी धंदा गेल्यावर गप्प बसत नाही. एखाद्या आवडत्या कंपनीला संगनमताने ऑर्डर दिली आहे आणि आपल्यावर अन्याय झाला आहे अशी तक्रार कोर्टात करणाऱ्या कंपन्या आहेत का ?
दुसरे कारण : इथले उद्योजक आणि उद्योजकता खलास करण्याचा पायंडा इंग्रजांनी पाडला. इथले धंदे त्यांनी उद्धवस्त केले. स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने हे प्रयत्न थांबले नाहीत. स्वतंत्र झाल्यावर इथले उद्योग फुलवले असते तर चाळीस वर्षांनी देशाला सोने गहाण टाकण्याची नामुष्की पत्करावी लागली नसती. पैसे कमावणारे, धनिक चोरच असतात असा समज प्रयत्नपूर्वक तयार केला गेला आहे. उद्योग करणे हा ज्या समाजाचा सहज स्वभाव होता तिथे उद्योग करणे हे साहस आहे असा समज बनला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून एखाद्या कंपनीतल्या अधिकाऱ्या पर्यंत नोकरी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जितका मान सन्मान मिळतो तितका विशेषतः छोट्या आणि मध्यम उद्योजकांना मिळत नाही. ( नव्वद टक्क्याहून अधिक छोटे आणि मध्यम उद्योग इथे आहेत.) त्यामुळे उद्योजकांवर चिखलफेक इथे पाचवीला पुजली आहे. अदाणी हे केवळ एक प्रतिक आहे. मोदी विरोधकांनी या ही समजुतीचा पुरेपूर फायदा घेऊन अदाणीला मोदीचा माणूस बनवून टाकले. अदाणीला बदनाम करणे तो उद्योजक असल्यामुळं सोपे आहे, मोदी आपोआप बदनाम होतो !
"धंदा करणे हे साहस आहे अशी समजूत असलेल्या समाजात असे साहस करून यशस्वी होणाऱ्यांविषयी मत्सर असणे स्वाभाविक आहे" या माझ्या विधानाला पुराव्याची आवश्यकता नसावी.
या सगळ्या पार्श्वभूमीवर अदाणी होणे हे सोपे नाहीच. असे अनेक अदाणी आपल्याकडे का नाहीत ? पोर्ट बांधणे हे केवळ अदाणीलाच येते काय ? दाढीचे खुंट वाढवून खांद्याला झोळी लटकवून अदाणीच्या नावाने कंठशोष करणाऱ्या समस्त महारथीपैकी एकालाही पोर्ट बांधता येत नसेल काय ? नाही. अशा बोलघेवड्यांनाच काय पण आपल्या कल्पनेतल्या भलाभल्याना असे प्रकल्प हाती घेण्याची आणि ते पूर्ण करण्याची कुवत नसते. आकाराने भीषण असणारे हे प्रकल्प हाताळणारी उद्योजकता आपल्याकडे आधी इंग्रज आणि नंतर आपल्याच लोकांनी खच्चीकरण केलेल्या समाजात तयार झाली नाही - टाटा सुध्दा कमी पाडावेत ! मग काय ? अन्य देशातल्या क्वात्रोचीना इकडे निमंत्रण द्यायचे ? दीडशे कोटींच्या देशाने ??
अदाणी सारखे उद्योजक या देशात आता कुठे निर्माण होऊ घातले आहेत, या फेजचे महत्व आपण भारतीयांनी ओळखले पाहीजे.
चीनमध्ये माओनंतर आलेल्या डेंग झिओपांगने आर्थिक भरभराटीचे स्वप्न बघितले आणि स्टार्टर मारला. चीनच्या आर्थिक घोडदौडीची सुरुवात - माझ्या मते- एका महत्वाच्या निर्णयाने झाली. डेंगने ठरवले की चीन उद्या परवा कधीतरी श्रीमंत व्हायचा तेंव्हा होईल पण त्या आधी चीनमध्ये किमान शंभर अब्जपती तयार झाले पाहिजेत - जे जगातल्या श्रीमंतांच्या यादीत असतील. डेंगने ते केले. अलीबाबावाला जॅक मा सारखा एक होतकरू पण साधा शिक्षक देखील अजस्त्र मोठा झाला.... बाकी चीनच्या आर्थिक घोडदौडीविषयी इथे फारसे लिहीण्याचे कारण नाही.!
- आपल्याला किमान आणखी शंभर अदाणी हवे आहेत -. घरी बसल्या बसल्या लिंबाचे लोणचे खोचलेला बशीभर गोड शिरा खात खात हे मोदी आणि अदाणी देशाला लुटताहेत अशी बडबड करणाऱ्यांनी न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर शक्य असेल तर विश्वास ठेवावा. अदाणी नको असेल तर एखादा प्रकल्प उभा करण्याचा धंदा करावा किंवा जे धंदा करीत आहेत त्यांना आपल्या सर्व ताकदीनिशी मोठे करावे. देशातल्या आवश्यक तितक्या पायभूत सुविधा उभा करण्यासाठी किमान शंभर अदाणी हवे आहेत.
- सुधीर मुतालीक.
प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध.भ्रष्टाचार असेलच, पण या दरवाढीमागे अजूनही कारणे आहेत. अनेक दशके शेतकऱ्यांना विनाशुल्क किंवा अत्यल्प भावाने वीज देणे, शेतकऱ्यांनी देयकातील वीजशुल्क न भरणे, गावोगाव व गणेशोत्सवात आकडे टाकून वीज चोरणे यामुळे ५०,००० कोटी रूपयांहून अधिक थकबाकी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी नियमित वीजशुल्क देणाऱ्यांवर भाववाढ लादली आहे. वीजजोडणी तोडण्यासाठी गेलैल्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळवून लावले जाते. फक्त अदानीला दोष देऊन काय होणार?