शेपूच सँडविच
सांप्रत काळ हा अत्यंत फालतुगिरीचा आहे. फेबु आणि तत्सम प्रकारांमुळे ह्या फालतुगिरीला अत्यंत चांगले दिवस आले आहेत. उदाहरणार्थ कुठल्याही गावाच्या गल्लीबोळात जाऊन तिथं मिळणाऱ्या कुठल्याही पदार्थाचे व्हिडिओ बनवणे. सुरुवातीला उत्सुकता होती नंतर त्यातही साचलेपण आलं आणि आता पुढचा टप्पा..म्हणजेच कैच्या कै पदार्थ बनवणारे लोकं आणि ते खाणारे महाभाग आणि कळस म्हणजे त्यांचे व्हिडिओ बनवणारी जनता. काही खाद्य पदार्थ विक्रेते ह्या व्हिडिओ बनविणाऱ्या लोकांची लई बिना पाण्याने करतात..तरी पण हे थांबत नाहीत. असाच एक व्हिडिओ पाहण्याचा दुःखद योग आला, जो ह्या पोस्टची प्रेरणा देऊन गेला..
तर आज आपण आलो आहोत पुण्यापासून फक्त 120 किमीवर अंतरावर असलेल्या मौजे येडेभोसरी इथलं प्रसिद्ध चुलीवरील शेपू सँडविच खाण्यासाठी. सातारा हायवेवर 70 किमी आत आल्यावर देशी दारूच्या गुत्त्याजवळ हा गाडा आहे. (इथं एक अत्यंत कळकट म्हातारा पोट खाजवत बसलेला आहे).
"नमस्ते काका तुमचं प्रसिद्ध शेपू सँडविच आमच्या प्रेक्षकांसाठी बनवणार का?"
त्यावर म्हातारा एक तुच्छता दर्शक कटाक्ष टाकून पुन्हा पोट खाजवायला लागतो.
"किती वर्षांपासून आपण हे सँडविच बनवता?"
आता त्याच्या जीवावर आल्यामुळे तो "80 रुपये" इतकंच बोलून शेपूची भाजी काढून चिरायला घेतो.
"80 वर्षांपासून म्हणजे ह्यांच्या आजोबापासून हे सँडविच बनवत आहेत ही त्यांची तिसरी पिढी". ह्याच्या अकलेच्या नावाने बोंब आहे. म्हाताऱ्याने ह्याला कधीच फाट्यावर मारले आहे. आता तो काय करतोय हे कळायला मार्ग नाही.
"आपण पाहतो आहोत की ह्या सँडविचसाठी एक विशिष्ट ब्रेड इथे वापरण्यात येत आहे. काय वैशिष्ट्य आहे ब्रेडचं?" उत्तरादाखल म्हातारा थोड्या अंतरावर असलेल्या एका दुकानाकडे हात दाखवतो आणि १ अशी खूण करतो.
"सँडविच ब्रेड आजोबांनी सांगितल्याप्रमाणे समोर दिसणाऱ्या दुकानातून मिळवला जातो". समोरच्या दुकानातून एक पोरगा विडीच बंडल घेऊन येतो आणि म्हाताऱ्याला देतो. म्हाताऱ्याची शेपूची भाजी चिरून झाली आहे. आता तो ब्रेडला कुठलीतरी चटणी लावतो आहे. " ही चटणी आपली speciality आहे. ही घरीच बनवता का आपण?" म्हातारा उत्तरादाखल परत दुकानाकडे बघतो आणि तो मघाचा पोरगा काडीपेटी घेऊन येतो.
"आपण पाहत आहोत की, 80 वर्षांपासून प्रसिद्ध अशी चटणी बनवली जाते. ही त्यांची secret recipe आहे".
म्हातारा ब्रेडमध्ये कापलेला शेपू कोंबतो आणि तिथल्याच एका वर्तमान पत्राच्या तुकड्यावर टाकून देतो.
"आपलं प्रसिद्ध असं शेपू सँडविच तयार आहे, आजी बाहेर गेल्यामुळे चुलीवरच सँडविच आज मिळू शकणार नाही. पण हे सँडविच सुद्धा चवीला भन्नाट आहे. आपण पाहू शकता की शेपूचा हिरवा रंग आणि ब्रेडचा तांबूस रंग ह्यांच्या मिश्रणातून हे सुंदर असं सँडविच ह्यांनी बनवलं आहे."
"८० रुपये" म्हातारा इतकंच बोलून पुन्हा गप्प बसतो.
म्हाताऱ्याला पैसे देऊन तोंड फाटेस्तोवर स्तुती करून स्वतःची आणि चॅनलची जाहिरात करून एकदाचा व्हिडिओ संपतो. तिकडे म्हाताऱ्याने शांतपणे विडी पेटवलेली असते आणि शांतपणे झुरके मारत असतो..व्हिडिओ संपतो!
उत्तरादाखल म्हातारा थोड्या अंतरावर असलेल्या एका दुकानाकडे हात दाखवतो आणि १ अशी खूण करतो.समोरच्या दुकानातून एक पोरगा विडीच बंडल घेऊन येतोम्हातारा उत्तरादाखल परत दुकानाकडे बघतो आणि तो मघाचा पोरगा काडीपेटी घेऊन येतो.हा विनोद लै म्हणजे लैच आवडला..... :))))