२) भारतीय विचार – मोक्ष आणि ज्ञान
(२) भारतीय विचार – मोक्ष आणि ज्ञान – (१) (६४८)
भारतीय दर्शनांचा मूळ प्रश्न ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती व शाश्वत सुख निर्मिती’ म्हणजे मोक्ष हा आहे. हा मोक्ष मनुष्याला जिवंतपणी कसा मिळू शकतो, त्यासाठी मनुष्याने स्वत:त योग्यता कशी निर्माण करावी याबद्दलची सगळी चर्चा म्हणजे भारतीय विचार! ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती व शाश्वत सुख निर्मिती’ म्हणजे मोक्ष आणि त्याची जाणीव मनात स्थिर होणे यालाच ज्ञान म्हणतात. अद्वैतमतानुसार या चराचर सृष्टीच्या मुळाशी असेलेलं चैतन्य म्हणजेच मी आहे याची अनुभूती निर्माण होऊन मन पूर्णत्वात स्थिर होते. या पूर्णत्वाच्या मनस्थितीमुळे मनुष्य व्यवहारी जगाकडे अधिक सजगतेने वावरतो, अधिक वस्तुनिष्ठपणे व्यवहार करतो आणि शारीरिक अथवा मानसिक दु:खांची परिस्थिती आली तरी धीराने जीवन कंठतो. उत्तरोत्तर अशा मनुष्याची बुद्धी आणि मन पूर्णत्वात अधिक अधिक दृढ होत जाते आणि यालाच मोक्ष म्हणतात. हा मोक्ष म्हणजेच ज्ञान.
वेदांत या चर्चेचा अंतिम चरण आहे आणि आपण ज्याला बुद्धिवाद म्हणतो, ज्यावर आपला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोण आधारित आहे त्या बुद्धिवादावर वेदांत पूर्णपणे कसा खरा उतरतो हे पाहू. वैज्ञानिक प्रयोग करून निर्माण होणाऱ्या ज्ञानाला मान्यता मिळायसाठी ‘प्रमाण’ (प्रुफ) निर्माण असावे लागते. असे प्रमाण मिळवण्यासाठी लागणाऱ्या कसोट्या म्हणजे -
१) जे कोणी प्रयोग करू इच्छितात त्यांना प्रयोगाचे प्रमेय, सिद्धता आणि साध्य स्पष्टपणे माहीत असणे, व
२) प्रयोगाच्या सिद्धता पद्धतीनुसार कोणीही प्रयोग केला तरी त्याचा निकाल एकसारखाच येणे.
भारतीय दर्शन शास्त्रांमध्ये प्रमाणांचा अतिशय बारकाईने विचार केला आहे. किंबहुना, भारतीय दर्शने जर केवळ faith किंवा belief असतील तर, प्रमाण निर्मितीची गरजच उरत नाही. पण भारतीय दर्शनांमध्ये वेदांताचा दावा – मोक्ष right now, right here (जीवनमुक्ती) – हा आहे त्यामुळे मानवी बुद्धीत प्रमाण निर्मिती करणे हा वेदांताचा प्रमुख विषय आहे. वैज्ञानिक प्रयोगातून निर्माण होणारे प्रमाण आणि वेदांतिक प्रमाण यांत महत्त्वाचा फरक एकच – वेदांतात प्रमाणाचा विषय, प्रमाण निर्माण करणारा आणि साध्य ही तिन्ही एकच आहेत – ते म्हणजे वेदांताचा अभ्यास करून प्रमाण निर्माण करू पाहणारा मनुष्य हा स्वत:च स्वत:चा सच्चिदानंद आत्मा समजून घेतो. त्यामुळे हा प्रवास वैयक्तिक म्हणूनच सुरू होतो परंतु अद्वैताची जाणीव निर्माण झाल्यावर प्रमेय, सिद्धता आणि साध्य ही एकाच आहेत ही लक्षात येते. वैयक्तिक अनुभूती असल्यामुळे बऱ्याचदा वैयक्तिक अनुभव यासदराखाली पारलौकिक (occult) अनुभव यात घुसडले जातात आणि वेदांताला अवैज्ञानिक व गूढ (mystic) प्रकार म्हणून हेटाळले जाते. अर्थात यांत नुकसान जे परंपरेपासून तुटलेले सर्व सामान्य लोक असतात, त्यांचेच होते. भारतीय दर्शने सहा प्रकारची प्रमाणे मान्य करतात – प्रत्यक्ष (पाच ज्ञानेंद्रियांनी निर्माण होणारे ज्ञान), अनुमान (Inference), उपमान (Comparison), अर्थापत्ती (Postulation), अनुपलब्धी (Non-apprehension) आणि शब्द (Verbal testimony). यातील शब्द प्रमाण सोडले तर बाकीची प्रमाणे मानवी बुद्धी नेहमी स्वतंत्रपणे निर्माण करू शकते. यातूनच चार्वाक, जैन, बौद्ध, न्याय, वैषेशिक, सांख्य, योग (पतंजली) आणि मीमांसा या दर्शनांचा विकास झाला. ही सर्व दर्शने द्वैत-मत म्हणजे ‘एकच ब्रह्म-ईश्वर विश्वाच्या मुळाशी आहे’ ही नाकारणारी आहेत. अद्वैत हे एकमेव दर्शन असे आहे ज्यात सर्वव्यापी अशा निर्गुण ब्रह्माची आणि सगुण ईश्वराची मांडणी केली आहे. उपनिषदांत पुन:पुन्हा ज्याचे विवरण केले आहे त्यालाच अद्वैत दर्शन म्हणतात. शब्द प्रमाण ज्याला revelations म्हणजेच वेदांतिक ज्ञान म्हणतात ते उपनिषद लिहिणाऱ्या ऋषींना स्फुरले. खालील तक्ता ज्ञान मिळवण्याच्या म्हणजे प्रमाण कसे निर्माण होते याचे विवेचन करतो.
- चार्वाक - फक्त ‘प्रत्यक्ष’ प्रमाण
- बुद्ध आणि जैन - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही)
- वैशेषिक आणि सांख्य-योग - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही)
- न्याय - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही), उपमा (आंशिक), अर्थापत्ती (आंशिक), अनुपलब्धी(आंशिक)
- मीमांसा - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही), उपमा, अर्थापत्ती,
- अद्वैत - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमा, अर्थापत्ती, अनुपलब्धी
🗣 चर्चा
(5)
T
Trump
गुरुवार, 12/29/2022 - 18:57
नवीन
धन्यवाद. तुमचे धागे वाचतो आहे. अतिशय उत्तम आशय आहे.
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Fri, 12/30/2022 - 08:40
नवीन
+१
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/30/2022 - 10:08
नवीन
वाचतेय.....
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Fri, 12/30/2022 - 14:16
नवीन
दर्शन शास्त्रात गती नाही... छान लिहीले आहे पण कळत नाही त्यामुळे कुठलीच प्रतिक्रीया देत नाही. दगडावर सतत पाणी पडल्यावर काहीतरी खुणा उमटतात त्याच प्रमाणे एवढे वर्ष या जगात घालवल्यावर काहीतरी मनास भावलेले विचार आपल्या समोर मांडत आहे. चुक बरोबर माहीत नाही.
प्रारब्धानुसार अन्नासाठी दाहीदीशा अशाच परीस्थीतीत या विषया कडे कधीच लक्ष गेले नाही. आमचे आजोबा दत्त संप्रदायातील अधिकारी,अनुग्रहीत, मोठ्ठा शिष्य परीवार पण काही शिकावे,समजुन घ्यावे अशी उपरती कधीच झाली नाही.
उत्तर भारतात राहिल्यामुळे तुलसीदास, सूरदास,कबीर कानावर पडले. तसेच संत साहित्य थोडेफार वाचनात आले. त्यांनी मांडलेले विचार काहीसे समजले आवडले.
जसे,
पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर l
तुलसी चिंता क्यूं करे भज ले श्रीरघुबीर ll
किंवा
वहाँ न दोजख(नर्क), बहिस्त मुकामा(स्वर्ग)।
यहाँही राम, यहॉँही रहमाना।।
जर सर्व काही पूर्वनिर्धारित आहे व जे काही आहे ते इथेच आहे तर मी चिंता कशाला करू.
योगेश्वराने अर्जुनाला पर्यायाने समस्त मानवांना सांगीतले आहे की,
रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवांत मी पांडवांत मी
अणुरेणूत भरलो
मीच घडवितो मीच मोडितो
उमज आता परमार्था
कर्तव्याने घडतो माणूस
जाणून पुरुषार्था
कर्मफलाते अर्पून मजला
सोड अहंता वृथा
सर्व धर्म परि त्यजून येई
शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज
सिद्ध करी धर्माथा
कर्तव्याने घडतो माणूस
जाणून पुरुषार्था
उमज आता परमार्था
कर्तव्याच्या पुण्यपथांवर मोहांच्या फुलबागा,कधी मोहाला बळी पडलो कधी वाचलो.
असो,कर्म जसे समजले/ते त्या प्रमाणे करत गेलो/करतो व इदं न मम म्हणत पुढे चालतो.
हा विचार पटला त्यामुळे दर्शन शास्त्रा, कर्मकांड ,मोक्ष वगैरेच्या भानगडीत पडत नाही.
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Fri, 12/30/2022 - 20:20
नवीन
छान आणि महितीप्रद लेख.
भारतीयांचे असे कालातीत ज्ञान शालेय जीवनात का देत नाहीत हा मोठा प्रश्नच आहे.
न्यूयॉर्कच्या वेदान्त सोसायटीचे स्वामी सर्वप्रियानंद (Swami Sarvapriyanand) ह्यांची सोप्या आणि ओघवत्या इंग्रजी भाषेतील वेदान्त तत्वज्ञानावरील विवेचनात्मक प्रवचने (discourses) यू-ट्यूब वर उपलब्ध आहेत. स्वामीजी अतिशय चांगल्यारीतीने अद्वैत तत्वज्ञान समजावून सांगतात. जिज्ञासूंनी जरूर ऐकावीत.
- Log in or register to post comments