Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

परिचित, तरीही अपरिचित ‘दख्खन’

प
पराग१२२६३
Fri, 09/16/2022 - 20:24
💬 10 प्रतिसाद
दख्खन दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी. अगदी आपल्या प्रवासाच्या दिवसापुरतंच प्रवाशाच्या तोंडात नाव येणारी अशी ही गाडी. दख्खनच्या राणीच्या नावाशी साधर्म्य असणारी दख्खन अर्थात डेक्कन एक्सप्रेस. या परिस्थितीमुळंच ही गाडीही आता 60 वर्षांची झालेली आहे, तरी तिच्या वाढदिवसाचा, 6 दशकांच्या वाटचालीचा साधा उल्लेख कुठंही, साधी आठवण कोणाला झालेली नाही. सुरुवातीची बरीच वर्ष दख्खन एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (तेव्हाचं व्हिक्टोरिया टर्मिनस) सकाळी 6.35 ला निघत राहिली. त्यावेळी पुण्याला पोहचायला तिला 4 तास 40 मिनिटांचा अवधी लागत होता. परतीच्या प्रवासात ती पुण्याहून दुपारी सव्वातीनला निघून संध्याकाळी पावणेआठला मुंबईत पोहचत असे. पुढं 21 व्या शतकात दख्खन एक्सप्रेसचा वेग वाढवण्यात आला. परिणामी आता आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारण 4 तास घेत आहे. आज दख्खन एक्सप्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रोज सकाळी 7 वाजता निघते आणि सकाळी 11.05 ला पुण्यात पोहचते. या प्रवासादरम्यान ती दादर, ठाणे, कल्याण, नेरळ (हा थांबा फक्त डाऊन प्रवासात), लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजीनगरला थांबे घेते. अप दिशेच्या प्रवासात ती पुण्याहून दुपारी सव्वातीनला निघते आणि शिवाजीनगर, खडकी, तळेगाव, लोणावळा, कल्याण, ठाणे आणि दादरला थांबे घेत संध्याकाळी 7.05 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहचते. 2019 पर्यंत दख्खन एक्सप्रेस जाता-येता कर्जत आणि खंडाळ्याचे थांबेही घेत होती. 2020 मध्ये आलेल्या COVID-19 च्या साथीनंतर ही गाडी विशेष गाडी म्हणून सोडली जाऊ लागली होती. डाऊन दख्खनच्या प्रवासाच्या कालावधीत काही फरक पडलेला नाही आहे. त्याला कारणही आहे. कर्जतचा व्यावसायिक थांबा रद्द झाला करण्यात आला असला तरी तिथला तांत्रिक थांबा चालूच ठेवावा लागला आहे. कर्जतला या गाडीला मागे बँकर इंजिनं जोडावी लागत असल्यामुळं हा थांबा दख्खन घेतच राहणार आहे. बँकर जोडण्यासाठी किमान 6 मिनिटांचा वेळ कर्जतमध्ये लागत आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये दख्खन एक्सप्रेसनं स्वत:मध्ये वेळापत्रकाबरोबरच अन्य अनेक बदल पाहिले आहेत. 1989 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी 4 अंकी क्रमांकांची पद्धत लागू करण्यात आली. त्यामुळं दख्खन एक्सप्रेसचा क्रमांकही आधीच्या तीन अंकांऐवजी 1007 डाऊन आणि 1008 अप असा झाला. पुढे 2010 मध्ये भारतीय रेल्वेवरील प्रवासी रेल्वेगाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे नवीन क्रमांक पद्धती लागू करण्यात आली. तेव्हापासून रेल्वेगाड्यांसाठी 5 अंकी क्रमांक दिले जाऊ लागले आहेत. त्यावेळी दख्खन एक्सप्रेसच्या क्रमांकात 11007 डाऊन आणि 11008 अप असा बदल झाला. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर 1928 पासून 1500 व्होल्टस् डीसी विद्युत कर्षणप्रणाली (traction system) अस्तित्वात होती. त्यामुळे या मार्गावर डीसी विद्युत इंजिनंच रेल्वेगाड्यांना जोडली जात होती. पण डीसी कर्षण प्रणालीमुळं रेल्वेगाड्यांच्या वेगवाढीवर मर्यादा येत होत्या. बदलत्या काळाच्या गरजांनुरुप मुंबई-पुणे दरम्यानचा रेल्वेप्रवास अधिक वेगवान होण्यासाठी जे प्रयत्न रेल्वेकडून केले जात होते, त्यापैकीच एक प्रयत्न म्हणजे जुन्या डीसीचं एसीमध्ये रुपांतर करणं. तसं केल्यामुळं अत्याधुनिक, अधिक शक्तिशाली कार्यअश्वांसह (इंजिनं) या मार्गावर रेल्वेगाड्या चालवता येणं शक्य होणार होतं. त्यामुळं भारतीय रेल्वेवर इतरत्र अस्तित्वात असलेली 25 केव्ही एसी कर्षणप्रणाली या मार्गावरही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि डीसी ते एसी हे परावर्तन 2015 मध्ये पूर्ण करण्यात आलं. बदलत्या काळानुसार दख्खन एक्सप्रेसला गती देणाऱ्या कार्यअश्वांमध्येही बदल होत गेले. साधारण 2000 पर्यंत या गाडीला WCM श्रेणीतील इंजिन जोडलं जात होतं. त्याचवेळी घाटात WCG-2 श्रेणीतील बँकर इंजिनं जोडली जात होती. त्यानंतर WCM इंजिनं भारतीय रेल्वेवरून काढून टाकल्यावर त्यांची जागा WCAM-3 या AC आणि DC अशा दोन्ही कर्षणप्रणालींवर चालणाऱ्या इंजिनांनी घेतली. घाटात मात्र WCG-2 ही बँकर इजिनंच कायम राहिली. डीसी-एसी परावर्तन पूर्ण झाल्यावर घाटात WCG-2 बँकर इंजिनांची जागा अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम WAG-7 इंजिनांनी घेतली. LHB डबे जोडले जाऊ लागल्यावर काही काळ अत्याधुनिक WAP-7 या कार्यअश्वाकडं दख्खनच्या सारथ्याची जबाबदारी आली होती. पण आता पुन्हा WCAM-2 इंजिन या गाडीला जोडलं जात आहे. पण त्यामुळं पर्यावरणानुकूल HOG (Head-on-Generation) तंत्रज्ञानावर ही गाडी चालवणं आता बंद झालं आहे. भोजनयानाच्याजागी एक अनारक्षित डबा वाढवला गेला होता. 2020 पर्यंत दख्खन एक्सप्रेस 17 ICF डब्यांची होती. त्या डब्यांची रंगसंगतीही पुणे-मुंबई मार्गावरच्या अन्य इंटरसिटी गाड्यांप्रमाणंच निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. ऑक्टोबर 2019 मध्ये त्या रंगसंगतीत बदल करून उत्कृष्ट डबे या गाडीला जोडले जाऊ लागले, पण 2021 पासून अत्याधुनिक LHB डब्यांसह ही गाडी धावू लागली आहे. त्याचवेळी खंडाळ्याच्या घाटामधली दृश्य प्रवाशांना उत्तमरित्या अनुभवता यावीत या हेतूनं या गाडीला एक Vista Dome डबाही जोडला जाऊ लागला आहे. आता या गाडीचा रेक मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसबरोबर शेअर केला जात आहे. आज दख्खन एक्सप्रेसला 1 जनरेटर, गार्ड आणि ब्रेक सामान यान, 1 गार्ड, अनारक्षित आणि ब्रेक सामान यान, 3 वातानुकुलित खुर्ची यान, 1 व्हिस्टा डोम, 5 द्वितीय श्रेणीचे खुर्ची यान आणि 6 अनारक्षित डबे जोडले जात आहेत. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/09/blog-post_16.html

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3173 views

💬 प्रतिसाद (10)
म
मुक्त विहारि Sat, 09/17/2022 - 06:10 नवीन
कोणे एके काळी, माझा एक मित्र, चितळ्यांची मिठाई आणि बाकरवडी, ह्या गाडीतून आणायचा आणि नंतर घरोघरी ठाणे, डोंबिवली आणि परीसरात विकायचा.... 1990च्या सुमारास .. त्याची ही आवडती गाडी ... आता चितळ्यांची मिठाई आणि बाकरवडी, कुठेही मिळते...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 09/17/2022 - 06:16 नवीन
पण आता पुन्हा WCAM-2 इंजिन या गाडीला जोडलं जात आहे. पण त्यामुळं पर्यावरणानुकूल HOG (Head-on-Generation) तंत्रज्ञानावर ही गाडी चालवणं आता बंद झालं आहे. आताच ३० ऑगस्ट २२ रोजी मी मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेसने व्हिस्टाडोमने गेलो तेंव्हा तिला WAP -७ हेच इंजिन होते. आणि तसेही माझ्या दवाखान्याच्या समोरूनच संध्याकाळी सव्वा सहा साडे सहाच्या मध्ये हि गाडी मुलुंड हुन जाते तेंव्हा सुद्धा कधी WCAM -२ हे इंजिन लावलेलं पाहिलं नाही.
  • Log in or register to post comments
प
पराग१२२६३ Sun, 09/18/2022 - 07:05 नवीन
सुबोधजी, WAP-7 हे काही दिवस या गाडीला जोडलं जात आहे अधूनमधून. पण WCAM-2/3 हे जास्त दिवस जोडलं जात आहे. मी १ सप्टेंबरला दख्खनच्या राणीनं पुण्याला येत असतानाही शेजारून गेलेल्या दख्खन एक्सप्रेसला WAP-7 होतं. आता बऱ्याच लोहमार्गांचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे, त्यामुळं इंजिनांच्या उपलब्धतेनुसार हे बदलत असतं.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 09/17/2022 - 06:20 नवीन
हि गाडी जाताना आणि विशेषतः येताना ठाण्याला थांबत असल्याने पुण्याहून येण्यासाठी मला फार सोयीची होती. पुण्यात एम बी बी एस नंतर एम डी करत असताना शनिवार अर्धा दिवस काम करून सव्वातीनला या गाडी बसले कि संध्याकाळी ७ पर्यंत मुलुंड ला घरी पोचत असे. सोमवारी पहाटे इंद्रायणी एक्स्प्रेस पकडून नऊ पर्यंत पुण्याला पोचणे हा माझा कार्यक्रम कित्येक वेळेस झालेला आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 09/17/2022 - 06:45 नवीन
बाकी बसध्ये असतात तशा सीट्सवाले डबे रेल्वेने आणखी आणू नयेत. समोरासमोर तीन तीन सीट्सवाले जुनेच चांगले होते. आता तर काही सीट्समधले अंतरही ( leg room) वाढवलेले सापडले. दूरच्या गाड्यांना दोन्ही टोकांना जे सामान्य ( unreserved ,seating) डबे असतात त्यात काही टू टिअर असायचे. ते फारच आरामदायी असत. या पुण्याच्या गाड्या घाटात ठाकूरवाडी,जामरूंग,मंकीहिल इथे थांबत आणि लहान मुले,माकडे आणि आदीवासी सर्वांचीच सोय व्हायची. हल्ली हे स्टॉप्सही बेभरवशाचे झाले आणि घाटातील माकडेही कमी झाली आणि मुलांची आवडही बदलली. उन्हाळ्यातल्या करवंदे,जांभळे,कैऱ्यांची आवड जाऊन चाकलेटं आली. माकडांचे चाळे पाहण्यापेक्षा लहानथोर सबवेसर्फर आणि गोट्या पाडणे मोबाईल गेमसमध्ये,कार्टुनात गुंतली. कर्जत स्टेशनचे दिवाडकर फेम लगदा बटाटेवडे( जीआइ ट्याग घेणारेत म्हणे) कधी घेतो असे आता होत नाही आणि कर्जत स्टॉपही गायब झाला. असली चहा स्टेशनला लागून दुकानात आणि खमंग बटाटेवडे (दगडे यांचा)मात्र कर्जत बाजारात मिळतात. ते फलाटावर विकायला येत नाहीत. चिंचवड स्टेशनवरचा सिंधी माणूस फार छान चहा देतो.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sat, 09/17/2022 - 07:44 नवीन
चांगली माहिती. 👌
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 09/17/2022 - 17:30 नवीन
गुजरात, राजस्थान कडे जाण्यासाठी पुण्यावरून जाणाऱ्या गाड्या नसल्यामुळे ही तीन वीस ची गाडी आमच्याकरता लाईफ लाईन होती.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 09/18/2022 - 04:02 नवीन
छान माहिती. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 09/18/2022 - 04:30 नवीन
शीर्षक अगदी समर्पक आहे. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
प
पराग१२२६३ Sun, 09/18/2022 - 06:58 नवीन
धन्यवाद Bhakti, वामन देशमुख, ॲबसेंट माइंडेड
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा