Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मुक्त चिंतन

अ
अन्या बुद्धे
Fri, 09/16/2022 - 17:56
💬 18 प्रतिसाद
मुक्त चिंतन काळा कभिन्न कातळ. कणखर, खडबडीत, बऱ्यापैकी तापलेला. मधेच वाळकं गवत. खडकातल्या बारक्या कडा, भेगा यात बोटं खुपसून, पावलांच्या कडा आधारासाठी वापरत आपण रॉकला भिडतो. हळूहळू उंची गाठली जात असते. आणि अचानक सावकाश नकळत आपल्या नजरेचा पसारा आकुंचित होतो. अर्धा इंच रुंदीच्या क्रॅक स्पष्ट दिसू लागतात. बोटं दाबलेल्या खडकाच्या आतली धडधड आपल्या छातीतल्या धडधडीशी जोडली जाते आणि क्षणात तो भरवशाचा नाही म्हणून दुसऱ्या कंगोऱ्याकडे हात सरकतो. पावलाच्या बोटापासून ताणलेल्या हातापर्यंत एक हवा-नको-हवासा ताण येतो. आपली पुढली हालचाल 2 फूट अधिक उंची की खाली कोसळत जाणं यातला फरक सांगणार असतात. बिले पोटाला जाणवतो. पण त्यातला धोका, अपयश, हेही दूर नजरेच्या टप्प्यापलीकडे गेलेलं असतं. किती झालं, किती बाकी हे अर्थहीन झालेलं असतं. फक्त आपण आणि 7x4 चा कातळकडा.. लांब पल्ल्याचा पोहण्याचा सराव.. वाऱ्याचा पाण्याचा गारवा, उन्हाची तिरीप, लाटा हे सगळं सवयीचं होत जातं पहिल्या 100 मीटरमधेच. शरीराला पाण्याची जाणीव थांबते. ब्रेस्ट-स्ट्रोक लयीत सुरू राहतो. पाण्याखाली बुडबुड्यानी पाणी सोडत क्षणकाल हाताच्या दाबाने डोकं पाण्यावर येतं. आपसूक श्वास घेऊन परत पाण्यात. श्वास सोडणे, हात फिरवत खाली दाबणे, श्वास घेत परत खाली, पाय तोवर जवळ आलेले असतातच, ते दूर लोटणे, श्वास सोडत परत पाण्यावर.. हे सगळं आपसूक यंत्रवत होत राहतं. रिकाम्या डोक्यात कानात श्वासाचा आवाज घुमत राहतो... घरात आपण एकटेच असतो. भुकेची हलकी जाणीव व्हायला लागते. रात्रीचं जेवण वरण भातावर करायचा शॉर्टकट. हॉलमधे शफल मोडवर मोठ्या आवाजात गाणी सुरू असतात. ऐकत काम सुरू राहतं. शिट्ट्या बंद करून वाफ जायची वाट बघत आपण बेडरुममधे पंख्याखाली पसरतो. आणि एवढ्यात हॉल मधून लता साद घालते, हरेक बात पे कहते हो तुम के तू क्या है?! यमन मनाचा ताबा घेत जातो. शरीर सैलावत जातं. डोकं यमनच्या लडिवाळ हुरहुरत्या वळणांच सौंदर्य निरखण्यात रंगून जातं. जो आंख ही से न टपका तो फिर लहू क्या है? क्या बात! नकळत दाद जाते. नंतर बाचिजा ए अतफाल सुरू होतं आणि डोकं काही क्षण बावचळून जातं. ना राग समजत ना ते अवघड शब्द. पण तरी स्वर्गारुड वाढतच जातं. डोळे बंद. खोली वितळून नाहीशी होते. साऱ्या जगात फक्त लताचे जीवघेणे कारुण्यमयी सूर शिल्लक राहतात. बाकी काही काही उरत नाही... गच्च गर्दीची लोकल. कसाबसा 2 बेंच मधल्या जागेच्या टोकाजवळ येऊन पोचतो. सॅक ठेवायला जागाच नाही. कमीतकमी हालचाल करत सॅकमधून पुस्तक काढतो. 25 मिनिट चेपल्या गर्दीत उभा राहून पाय दुखू लागले असतात. गुडघ्यात सॅक, डाव्या हाती पुस्तक, उजवा हात वर कडीला, वर पिवळा दिवा, घामाची चिकचिक, अशात गोष्ट सुरू होते. चित्रदर्शी भाषेची जादू होते आणि लवकरच हे सगळं गायब झालेलं असतं. नायकाच्या सावलीसारखा त्याच्या सोबत मी महंताच्या मागोमाग चालत मठाकडे निघतो. त्या अंधारात अचानक दिसणारे विजेचे दिवे, रेशमी वस्त्र, सुग्रास अन्न, जमिनीखाली तीन मजले पार करत छोट्या कातळाच्या खोलीत शिरतो... अशीच जादू अनेकदा घडते. सायकलवर बहुतेकदा, कविता/लेख घडताना, स्वच्छ कोऱ्या कागदावर रेषा मारायची हिम्मत करत हळूहळू त्यावर चित्र उमटत जाताना.. डोकं, पोट वगैरे दुखतंय म्हंजे तब्येत नीट नाही. जखम असेल तरच वेदना असतात. सगळ ठीक असेल तर हे अवयव आहेत याची जाणीव देखील नसते. ते निवांत आपलं काम करत राहतात. आपल्या मनात डोक्यात कायम विचारांची भावनांची दंगल सुरू असते, सवयीचे असले तरी सततचे ताण असतात. विचार भावना एकमेकांना धक्के देत पुढे घुसून लक्ष वेधून घेत राहतात. त्यांना आराम हवाच. झोपलो तरी स्वप्न सुरूच राहतात. ते 100% शांत रिकामे करता येणे खूपच अवघड. योगीलोक करतात म्हणे. आपल्यासारखे लोक काय करणार? आपल्या प्रत्येकाकडे अशी मन बुद्धी पूर्ण बंद जरी नाही तरी मिनिमम सुरू राहील अशी सोय असते. त्याला छंद म्हणतात. ज्यात आपण स्वतःला विसरून जातो. माझ्या मी असण्याची जाणीव अगदीच पुसट नाममात्र होत जाते. आपल्यासारख्या सामान्यांसाठी ही सोय उपलब्ध आहे ही किती छान गोष्ट आहे! हेच पहा ना.. हा लेख लिहिता लिहिता सीएसटी ते डोंबिवली प्रवास झाला देखील.. लेख आणि मी.. बाकी काहीही न समजता! - अनुप

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4251 views

💬 प्रतिसाद (18)
क
कर्नलतपस्वी Fri, 09/16/2022 - 18:27 नवीन
आहो काय भरारी,कातळातून पात्रात आणि पाताळातून सरपट पळणाऱ्या लोहपथगामीनीवर. छान मुक्तक.आवडलं
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 09/16/2022 - 18:28 नवीन
पात्रात ऐवजी पाताळात वाचणे.
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे Sat, 09/17/2022 - 14:16 नवीन
धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
च
चष्मेबद्दूर Sat, 09/17/2022 - 15:58 नवीन
पटलं.
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे Sun, 09/18/2022 - 09:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sat, 09/17/2022 - 16:21 नवीन
आवडलं!
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे Sun, 09/18/2022 - 09:19 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 09/18/2022 - 14:09 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 09/18/2022 - 21:42 नवीन
खूप दिवसांनी, काही तरी वेगळे वाचले ... अनियंत्रित पण सैरभर नसलेले मन, असेच मोकळे सोडावे... दर शनिवारी संध्याकाळी, मी हेच करतो ....
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे Mon, 09/19/2022 - 08:52 नवीन
व्वा! माझिया जातीचा...
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 09/19/2022 - 11:06 नवीन
ईंजिनीयरिंगला असताना एका मित्राला स्मिथि, कार्पेंटरी अशी सहसा रटाळ वाटणारी प्रॅक्टीकल्स फार आवडायची. कारण हातांना काम करायला सोडुन देउन डोक्याला विचारांचा खुराक देता यायचा. अर्थात तो त्यात एक्सपर्ट होता म्हणुन, कारण तेच जॉब करताना आमच्या नाकी नउ यायचे :) या लेखाच्या निमित्ताने त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे Tue, 09/20/2022 - 07:09 नवीन
क्या बात! भाग्यवंत लोक
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 09/19/2022 - 11:29 नवीन
सहीच मुक्तक..
  • Log in or register to post comments
स
सनईचौघडा Mon, 09/19/2022 - 12:00 नवीन
आवडलं लेखन
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 09/20/2022 - 14:01 नवीन
मुक्त चिंतन आवडलं. अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे Wed, 09/21/2022 - 13:08 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Wed, 09/21/2022 - 14:07 नवीन
छान मुक्त चिंतन, आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे गुरुवार, 09/22/2022 - 12:42 नवीन
धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा