मिपा शतशब्दकथा स्पर्धा - २०२२
मे महिना सुरु झाला आहे, ग्रीष्मातला सूर्य आग ओकतोय, बाहेर पाहिलं तर फक्त रखरखीत वातावरण, टळटळीत ऊन, असह्य उकाडा, जीवाची काहिली होतेय. अशा वातावरणात एक थंड हवेची झुळूक यावी, पावसाचा शिडकावा होऊन आसमंत मातीच्या सुगंधाने दरवळू लागावा, असं वाटत राहतं. अशीच उन्हाळ्यातून थोडी सुटका करून घेण्यासाठी मिपा आयोजित करत आहे - मिपा शतशब्दकथा स्पर्धा - २०२२
शतशब्दकथा हा विशेष लेखनप्रकार आहे.
केवळ सरळधोपट कथा सांगणे हा या लेखनप्रकाराचा मूलभूत उद्देश नसतो.
• बरोब्बर १०० शब्दांमध्ये कथा सांगणे आणि
• शेवटच्या शब्दात / वाक्यात वाचकाला अनपेक्षित धक्का बसेल असा कथेचा शेवट करणे,
ही या कथाप्रकाराची दोन कळीची लक्षणे आहेत.
स्पर्धेसाठी विषयाचे कोणतेही बंधन नाहीये, पण लेखनासाठी काही नियम आणि अटी आहेत -
१) धागा प्रकाशित झाल्यानंतर स्पर्धा लगेचच सुरू होईल आणि २५ मे २०२२ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल.
२) स्पर्धकांनी आपली कथा साहित्य संपादक या आयडीला व्यनिने पाठवायची आहे.
साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा.
कोणत्याही साहित्य संपादकाला वैयक्तिक व्यनि किंवा मिसळपावच्या अथवा सासंच्या ईमेल आयडीवर किंवा अन्य कोणत्याही दुसऱ्या मार्गाने कथा पाठवू नये.
३) प्रत्येक सदस्य जास्तीत जास्त २ (अक्षरी दोन फक्त) शशक पाठवू शकतात. मतदान दोन्ही कथांना होईल, मात्र जर दोन्ही कथांची मते विजयी क्रमांकाच्या यादीत आली, तर दोन्हींपैकी ज्या कथेला जास्त मते मिळालेली असतील, ती एकच कथा विजेती धरली जाईल.
४) ०३ मे २०२२ ते २५ मे २०२२ या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कथा स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ लेखकाचे नाव जाहीर होणार नाही. ('कथा बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात' हा आक्षेप घेतला जाऊ नये, म्हणून हे करण्यात आले आहे.). स्पर्धा संपल्यावर सर्व लेखकांची आणि त्यांच्या कथांची ओळख जाहीर करण्यात येईल.
५) मूळ लेखकाने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कथेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाउंटवर आपली ओळख कथालेखक म्हणून जाहीर केल्याचे निदर्शनास आल्यास ती कथा रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल.
६) साहित्य संपादक कथा प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या शतशब्दकथेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधन वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल.
७) लेखकाने कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Wordमध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.
८) तसेच, कथेत कोणतीही चित्रे, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कथा प्रकाशित केली जाईल.
९) जातिधर्माला दुखावणारे वा अश्लील लेखन आल्यास कथा स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर लेखक नियमबाह्य कथा स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात.
१०) कथेला आपण देऊ इच्छित असणारे नाव व्यनिच्या विषयामध्ये लिहिलेले असावे.
११) कुठेही पूर्वप्रकाशित कथा स्वीकारली जाणार नाही.
१२) कथा आधारित असल्यास, कथेच्या शेवटी तसा स्पष्ट उल्लेख करावा. हे शब्द १००मध्ये मोजले जाणार नाहीत.
कथा प्रकाशित झाल्यावर लगेच मतदान सुरू होईल आणि दि. ३० मे २०२२ रोजी २३.५९ भाप्रवेपर्यंत करता येईल.
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.
निकाल दिनांक १ जून २०२२ रोजी घोषित केला जाईल.
लेखन करण्याविषयी / व्यनिविषयी / स्पर्धेविषयी कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास प्रतिसादांमध्ये विचारू शकता.
एक मार्गदर्शिका -
कथा मराठीमध्ये असावी. एखादे हिंदी-इंग्लिश वाक्य कथेची गरज म्हणून चालेल, पण कथा मराठीत हवी. प्रमाण मराठी, झाडीबोली, वऱ्हाडी, खान्देशी, माणदेशी, सातारी, पुणेरी, आगरी, मालवणी... कोणतीही पण मराठीत हवी..
लेखकाने लेख प्रसिध्द करायच्या आधी चहूबाजूंनी विचार करुनच लिहिला पाहिजे, तसे करण्यात तो कमी पडला तर नाउमेद न होता पुढच्या वेळी अधिक काळजी घेउन त्याने लेखन केले पाहिजे. आपले प्रत्येक लेखन हे वाचकांनी डोक्यावरच घेतले पाहिजे हा आग्रह नसावा. किंबहुना लेखन हे स्वांतसुखाय असेल तर त्याचा आनंद लेखकाला अधिक घेता येतोपुर्णतः सहमत शिवाय फक्त स्पर्धा जिंकणे हे एकमेव उद्दिष्ट असू नये. आलेल्या प्रतिक्रियांवर विचार करुन भविष्यात लेखनात आणखी सुधारणा करता येतील.