वासंतिक
सुरांबरोबरच कुंचल्यातून उतरलेली माझी कविता...
व्हिडिओ पण नक्की पाहा आणि अभिप्राय जरूर कळवा.
हिंडोल छेड भ्रमरा, सुमनांत आज,
स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥धृ॥
ती शाल्मली बहरली, फुलला पलाश,
आरक्त कुंकुम गमे, तबकात खास।
ये औक्षणास अवनी, चढवून साज
स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥१॥
मोहोर सोनपिवळा, परसात जाई,
शिंपीत केशर सडा, मधुमास येई।
पानांफुलांत भरला, नखरेल बाज,
स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥२॥
तांबूस लाघव नवे, प्रसवेल कुक्षी,
मंजूळ शीळ घुमवी, कुहु आम्रवृक्षी
बेभान जीव प्रणयी, विसरून लाज,
स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥३॥
या स्वागतास अवघे जग सिद्ध झाले,
रस, रंग, गंध, रवही दिमतीस आले।
सृष्टी अजून जपते नृपती रिवाज,
स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥४॥
वृत्त - वसंततिलका
(गागाल गाल ललगा ललगा लगागा)
💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी
Sun, 04/03/2022 - 02:36
नवीन
आवडली
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/03/2022 - 08:44
नवीन
सुंदर. निसर्ग कविता आवडली. व्हिडियो ही छान झालाय.
लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sun, 07/23/2023 - 01:11
नवीन
छान कविता. व्हिडियो कुठे आहे ? इथे काही दुवा दिलेला दिसत नाहिये.
- Log in or register to post comments