Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पुण्यात मेट्रो धावू लागली!

प
पराग१२२६३
Sat, 03/19/2022 - 17:04
💬 2 प्रतिसाद
गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे. मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते. शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे. सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत. भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत. • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव • आवश्यक स्रोतांची कमतरता • देशातील कायदेशीर व्यवस्था • मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता • कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे • शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली. • शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला. • शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला. • इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली. • दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले. • दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले. • एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली. दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत. सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे • कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे. सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प • नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे. मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प • ठाणे, विशाखापट्टणम लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल. https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2043 views

💬 प्रतिसाद (2)
क
कंजूस Sun, 03/20/2022 - 01:12 नवीन
एरपोर्ट ते शहरातील आतील भाग जोडल्यास खूप उपयोगाची सेवा ठरेल. मुंबई इं एरपोर्ट ते मेट्रो स्टेशन पाचशे मिटरस असेल. पण तेवढे अंतर सामान घेऊन कुणी चालत जाणार नाही.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 03/21/2022 - 15:36 नवीन
सर्वांगाने आढावा घेणारा उत्तम लेख! पहिल्या आठवड्यात प्रवासची उत्सुकता होती, आता शमली आहे. त्यामुळे मेट्रोचा प्रवास करण्याचा योग आलेला नाही. पुण्याच्या कारभाऱ्यांनी उद्योग नाही केले तर मेट्रो नक्कीच अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 21 hours ago
  • सुंदर !!
    3 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा