Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

जहाजांचा मेळावा

प
पराग१२२६३
Sat, 02/19/2022 - 06:34
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत. आपल्या नाविक इतिहासाची आणि परंपरांची माहिती करून देतानाच नौदलाच्या शक्तीची झलक दाखवणारा ‘राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण’ (Presidential Fleet Review) हा समारंभ. तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असतो. स्वतंत्र भारताच्या इतिहासात 1953 पासून आतापर्यंत 11 वेळा असे ताफा निरीक्षण पार पडलेले आहे. त्यापैकी 2001 आणि 2016 मध्ये आयोजित करण्यात आलेले ताफा निरीक्षण ‘आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण’ होते. भारताचे प्रत्येक राष्ट्रपती आपल्या कार्यकाळात एकदा आपल्या नाविकशक्तीचा संपूर्ण आढावा घेत असतात. भारतीय सैन्यदलांचे सर्वोच्च सेनापती असलेले राष्ट्रपती त्यांच्यासाठी नेमलेल्या खास युद्धनौकेवर (Presidential Yacht) स्वार होऊन समुद्रात ओळीने उभ्या असलेल्या युद्धनौका, पाणबुड्या आणि अन्य जहाजांबरोबरच नौदलाच्या हवाईशक्तीचे अवलोकन करतात. त्या युद्धनौकेवर राष्ट्रपतींबरोबरच पंतप्रधान, संरक्षण मंत्री, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि संबंधित घटकराज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्रीही उपस्थित असतात. या समारंभात स्थिर, चलित आणि हवाई या तीन प्रकारांनी नाविकशक्तीचे प्रदर्शन घडविले जाते. राष्ट्रपतींची खास युद्धनौका समुद्रात नांगर टाकून उभ्या असलेल्या युद्धनौकांसमोरून जात असताना त्यांच्यावरील नौसैनिक डेकवर उभे राहून, आपल्या कॅप हातात धरून राष्ट्रपतींचा त्रिवार जयजयकार करतात. राष्ट्रप्रमुखाने आपल्या नौदलाच्या ताफ्याचे निरीक्षण करणे ही बरीच जुनी नाविक परंपरा आहे. अटलांटिक महासागरात वसलेल्या ब्रिटनसाठी समुद्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. हा व्यापारी प्रवृत्तीचा देश असल्यामुळे सागरावरील प्रभुत्व त्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरते. सतराव्या शतकात ब्रिटनच्या राजाकडून ‘रॉयल नेव्ही’ची तयारी पाहण्यासाठी त्याच्या ताफ्याचे निरीक्षण करण्याची पद्धत तेथे रुढ झाली. युद्धाला जाण्यापूर्वी किंवा राजा/राणीच्या राज्यारोहणाच्यावेळी देशाच्या सर्वोच्च प्रमुखाकडून ‘रॉयल नेव्ही’च्या ताफ्याचे निरीक्षण केले जाऊ लागले आणि आधुनिक काळातील ताफा निरीक्षणाची ती प्रथा जगभरात गेली. भारतीय नौदल स्वातंत्र्योत्तर काळात सातत्याने विकसित होत राहिले आहे. 1990 च्या दशकापर्यंत भारतीय नौदल प्रामुख्याने आपल्या सागरी सीमांचेच संरक्षण करत होते. शेजारी देशांची विनंती किंवा ‘संयुक्त राष्ट्र संघटने’चा (United Nations Organisation) ठराव याच्या आधारेच ते आपल्या सीमांच्या पलीकडे जाऊन कार्य करत असे. 1990च्या दशकात शीतयुद्धाचा आणि द्वीधृवीय जागतिक व्यवस्थेचा अंत झाला. त्याचवेळी जागतिकीकरणानेही वेग घेतला. भारतानेही आता मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले होते. परिणामी जगातील विविध भागांमध्ये भारताची राष्ट्रहिते विस्तारू लागली. परिणामी त्यांच्या संरक्षणासाठी भारतीय नौदल पश्चिमेला सुएझ कालव्याच्या पलीकडे आणि पूर्वेला दक्षिण चीन सागरापर्यंत कार्यरत राहू लागले आहे. ‘नाविक राजनया’च्या (Naval Diplomacy) माध्यमातून भारतीय नौदल भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विस्तारीकरणाला हातभार लावत आहे. संकटग्रस्त प्रदेशांमध्ये मानवी मदत आणि बचावकार्य भारतीय नौदल राबवत आहे. आज हिंदी महासागरातील सर्वात प्रबळ नौदल असलेले भारतीय नौदल या क्षेत्रातील ‘मुख्य सुरक्षा पुरवठादार’ (Net Security Provider) म्हणून भूमिका बजावत आहे. भारत आणि त्याच्या आजूबाजूचा सागर यांच्यातील नात्याशी संबंधित या सर्व बाबींची झलक ‘राष्ट्रपतींच्या ताफा निरीक्षणा’मधून पाहायला मिळत असते. त्यामुळे हा समारंभ भारतीय नौदलाची, भारताच्या सागरी इतिहासाची, सागरी परंपरांची माहिती करून घेण्याचे एक साधन ठरत असते. या सोहळ्यात नौदलाशी संबंधित अन्य कार्यक्रमांचा - जसे, बँडपथकाचे सादरीकरण, सागरी परिसंवाद, प्रदर्शने, सागरी युद्धाची प्रात्यक्षिके यांचाही समावेश असतो. हे संपूर्ण आयोजन राष्ट्रीय प्रतिमेशी निगडीत असल्याने त्याचे नियोजनही अतिशय शिस्तबद्ध आणि दिमाखदार असते. अशा सोहळ्याला एक दर्शक म्हणून प्रत्यक्ष उपस्थिती लावण्याची माझी अनेक वर्षांपासून इच्छा आहे. 2016 मध्ये विशाखापट्ट्णममध्येच पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण’ सोहळ्याला भेट देण्याचे ठरवले होते, पण शेवटच्या क्षणी जाणं रद्द करावं लागलं होतं. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_19.html

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1224 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 23 hours ago
  • सुंदर !!
    3 days 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा