Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पांढरं फरवालं स्वेटर

ब
बिपीन सुरेश सांगळे
Wed, 01/12/2022 - 19:32
💬 3 प्रतिसाद
पांढरं फरवालं स्वेटर --------------------------- खूप थंडी होती . खूपच . नकोशी , बोचरी , गारठवणारी , हाडं फोडणारी थंडी ! रात्रीचे दहाच वाजले होते . एवढ्या लवकर रस्त्यावरची गर्दी थंडीने जुलमाने हाकलून लावली होती . रस्त्यावर तुरळक गाड्या अन माणसं . नदीकाठच्या रस्त्यावर काही झोपड्या . त्यांना झोपड्या तरी कसं म्हणायचं ? नावापुरताच आडोसा . त्यात माणसं ... माणसंच की ती - परिस्थितीने फटकारलेली . तान्ह्या पोरापासून वाकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत . मोकळा , मोठा रस्ता . त्यात शेजाराला नदी. पाण्याने आणि गार वाऱ्याने थंडी तिथे अगदीच जोमात आलेली . रस्त्यावरचे दिवेही काही बंद काही चालू . त्यांचा प्रकाशही त्यांच्यापर्यंत नीटसा पोचत नव्हता . तो तरी काय अपवाद म्हणा , त्यांचं आयुष्य... त्यात राणीही होती . आठ - नऊ वर्षांची . तिच्या अंगावर एक बिनबाह्यांचा फ्रॉक काय तो होता . खालून वरून वारं आत पोचवणारा . तिला खूप थंडी वाजत होती अन जीव नकोसा होत होता . पण करणार काय ? सांगणार कोणाला ? आजीने शेकोटी पेटवलेली होती . पण तिची आच कमी अन धूरच जास्त होता ... डोळ्यांत पाणी आणणारा . आयुष्यासारखा ... तिच्या शेजारी वंदी बसलेली होती . तिच्यापेक्षा थोडी मोठी . तेवढ्यात एक गाडी येऊन थांबली . ते पाहताच वंदी पुढे पळाली . त्या माणसाने एक मोठी पिशवी तिच्या हातात दिली . त्यामध्ये उबदार कपडे होते . तऱ्हेतऱ्हेचे . कानटोपी , स्वेटर्स , जॅकेट्स अन काही काही . वंदीनं पिशवी उचकायची सुरुवात केली . राणीलाही त्या गंमतीत उत्सुकता वाटत होती ; पण तिला कुडकुडत असताना , पायांना मारलेली हातांची घट्ट मिठी सोडून जायचाही कंटाळा आला होता . तो माणूस गेला . वंदीला एक स्वेटर सापडलं . पांढरंशुभ्र, फरवालं स्वेटर . तिनं ते घातलं अन ती आनंदाने नाचायला लागली. अंधाराच्या पार्श्वभूमीवर, त्या स्वेटरमध्ये ती नाचणाऱ्या पांढऱ्या सशासारखी भासत होती . नाचण्यामुळे अन स्वेटरमुळे तिला थंडी वाजत नव्हती आता . राणी तिच्याकडे मजेने पाहत होती . अन असूयेने ! कारण लोक असं काही काही देतच असत . मग ते सगळ्यांना वाटून मिळतच असे . तिलाही ते स्वेटर आवडलं होतं . पण - आता हे स्वेटर वंदीनं आधी घेतल्यामुळे तिला मिळणार नव्हतं... वंदी नाचत नाचत इकडे तिकडे पळू लागली . ती रस्त्यावर गेली . एक बुलेटवाला जोरात येत होता . त्याला अंधारात ती दिसली नाही पटकन . ते पांढरं स्वेटर त्याच्या लक्षात यायच्या आत त्याने तिला उडवलं . तो पळून गेला. वंदी मात्र रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली . ते पांढरंशुभ्र फरवालं स्वेटर ,लालभडक रक्तात माखलं . शेकोटी विझली . एकच गलका उठला . विझलेल्या शेकोटीने की ते दृश्य पाहून , कोणास ठाऊक ; पण राणी आणखी थरथरा कापू लागली .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1969 views

💬 प्रतिसाद (3)
च
चौथा कोनाडा गुरुवार, 01/13/2022 - 08:49 नवीन
छान कथा ! शेवट वाचताना अंगावर काटा आला ! शॉर्टफिल्म काढण्यासारखे स्क्रिप्ट !

+१

  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 01/13/2022 - 09:23 नवीन
कडाक्याच्या थंडीत वंदीला फरचा स्वेटर मिळाला हे वाचताना फार छान वाटत होते तोपर्यंत तो आनंद हिरावला गेला... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे गुरुवार, 01/13/2022 - 16:40 नवीन
| चौथा कोनाडा पैजारबुवा आभार
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 25 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 37 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 41 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा