Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

"८३" च्या निमित्ताने - ८३ च्या आठवणी

फ
फारएन्ड
गुरुवार, 12/30/2021 - 22:16
💬 20 प्रतिसाद
"...इंग्लैंड मे चल रहे विश्वकप के अपने पहले मॅच मे भारत ने वेस्ट इंडिज को हरा दिया है..." १९८३ च्या जून मधल्या कोणत्यातरी दिवशी संध्याकाळच्या बातम्यांमधे ही बातमी रेडिओवर ऐकली. तोपर्यंत अशी एक काहीतरी टुर्नामेण्ट इंग्लंड मधे होत आहे, त्यातील सामने एका दिवसाचे असतात, त्यांची रेकॉर्ड कसोटी तर सोडाच, पण "फर्स्ट क्लास" मधेही धरली जात नाहीत, भारताने याआधीच्या टुर्नामेन्ट्स मधे फारसे काही केलेले नाही. फास्ट खेळणे वगैरे आपल्याला जमणारे नाही अशा विविध गोष्टी आमच्या गप्पांमधे ऐकल्या होत्या. त्यामुळे काहीतरी नवीन प्रकार आहे इतकेच माहीत होते. पण भारताने त्या पहिल्या सामन्यात विंडीजला हरवले याचे आश्चर्य वाटले होते इतके आठवते. त्यानंतरही या स्पर्धेबद्दल फारशी चर्चा कोठे झाल्याचे आठवत नाही. त्यावेळेस भारत नुकताच दोन महत्त्वाच्या मालिका खेळलेला होता. आधी पाकिस्तान मधे आणि नंतर वेस्ट इंडिज मधे. दोन्हीकडे पराभव झालेले होते, अपेक्षितपणे. तोपर्यंत फक्त अधूनमधून नाव ऐकलेला मोहिंदर अमरनाथ अचानक प्रकाशात आलेला होता - पाक मधे ३ व वेस्ट इंडिज मधे २ शतके मारून. पाक विरूद्ध हरल्यावर गावसकरचे कप्तानपद काढून घेउन कपिल कडे देण्यात आले होते, व गुंडाप्पा विश्वनाथलाही संघातून वगळण्यात आले. नंतरची वेस्ट इंडिज सिरीज आपण जरी हरलो तरी नवीन कप्तान व संघाच्या मानाने इतक्या बलाढ्य संघाविरूद्ध त्यांच्याच घरी कामगिरी ठीकठाक होती. हा वर्ल्ड कप या सिरीजनंतरचा. मधे दोन महिने होते. पण तेव्हा मुळात इतक्या सलग सिरीज नसत. मार्च-एप्रिल मधे आधीचा सीझन संपला, की मग जर इंग्लंड दौरा नसेल तर कधीकधी ५-६ महिने क्रिकेट नसे. ही स्पर्धा सुरू झाल्यावरही भारतात फारशी हवा नव्हती. एकतर वन डे क्रिकेट फारसे माहीत नव्हते. कसोटी सामन्यांच्या अधेमधे फुटकळ सामने असत. स्थानिक संघाविरूद्ध तीन दिवसांचा सामना, अध्यक्षीय संघाविरूद्ध सामना वगैरे प्रमाणेच. त्यातले विजय पराजय कोणी फारसे लक्षात ठेवत नसत, त्याला काही महत्त्वही नसे. त्यामुळे हा पहिला सामना जिंकल्यावरही फारशी काही हवा झाल्याचे लक्षात नाही. मग नंतर झिम्बाब्वेला हरवले. त्यानंतर मात्र एकदा विंडीज कडून आणि एकदा ऑस्ट्रेलियाकडून भारत हरला (याचीही इतकी चर्चा आठवत नाही. ही सगळी माहिती नंतर काढलेली). त्यानंतर आला तो टनब्रिज वेल्स चा झिम्बाब्वे विरूद्धचा सामना. त्यातील कपिलच्या नाबाद १७५ ची बातमी संध्याकाळी की दुसर्‍या दिवशी आली, आणि मग हळुहळू लोकांना इण्टरेस्ट वाढू लागला. टीव्ही/रेडिओ व पेपर्स मधे बातम्या येउ लागल्या. या १७५ बद्दल ती एकच बातमी तेव्हा आली होती. तोपर्यंत भारतात या कपमधल्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवतच नव्हते. तेव्हा सरकारचे "माहिती आणि नभोवाणी मंत्री" जाहीर करत कोणत्या स्पर्धेचे प्रक्षेपण दूरदर्शन वर होणार ते. त्यातही परीक्षांचा काळ वगैरे विचारात घेत. एकूणच इतर मंत्री माहीत नसले तरी या एका खात्याचे मंत्री आम्हाला नेहमीच माहीत असत :) विठ्ठलराव गाडगीळ व एच के एल भगत ही दोन नावे लक्षात आहेत. पण या सामन्याचे प्रक्षेपण मुळात उपलब्धच नाही हे नंतर समजले. १७/५ अशी अवस्था असताना कपिलने शेपटाला बरोबर घेउन स्कोअर २६२ पर्यंत नेला इतपत माहीत होते. पण यातील अनेक डीटेल्स नंतर माहीत झाले. एकतर १७५ हा स्कोअर तेव्हा highest individual score होता वन डे मधला. एक दोन वर्षांनंतर रिचर्ड्स ने तो मोडला, पण केवळ रिचर्ड्सच तो मोडू शकेल असे लोकांना वाटे इतका मोठा स्कोअर तो तेव्हा होता. अगदी ९०च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत १०-१२ शतके म्हणजे खूप असे आणि शतकांचे स्कोअरही फार मोठे नसत. वर्ल्ड कप मधल्या गेम्स ६० ओव्हर्सच्या होत्या हे धरले तरी तीन स्पर्धांमधे इतका मोठा स्कोअर कोणी केलेला नव्हता. बाकी मॅचेस मधे तर नाहीच. रिचर्ड्सचा १८९ चा इंग्लंड विरूद्धचा स्कोअर व ती इनिंग ही अनेक वेळा सर्वोच्च गणली जाते. पण माझ्या मते कपिलची ही इनिंग सुद्धा तितकीच भारी होती - काकणभर जास्तच. दोन्ही डाव हे पहिल्या विकेट्स पडल्यावर तळाच्या लोकांना बरोबर घेउन केलेले होते. एक इंग्लंड विरूद्ध असला तरी त्या दिवशी त्या मैदानावर झिम्बाब्वेच्या बोलर्सनीही जबरदस्त बोलिंग केली होती. त्यात वर्ल्ड कपचे प्रेशरही आलेच. यातील आणखी एक गंमत. त्या दिवशी त्या मैदानावर हे पिच मधल्या स्क्वेअरच्या एका बाजूला होते. त्यामुळे पिचच्या एका बाजूला बाउण्ड्री जवळ तर दुसरीकडे खूप लांब होती. पण कपिलने मारलेल्या ६ सिक्सेसपैकी बहुतांश या त्या लांब बाउण्ड्री असलेल्या बाजूला मारल्या होत्या, हे खुद्द झिम्बाब्वेचा कीपर डेव्ह हॉटननेच नंतर सांगितले. कपिलचा हा असला अचाटपणा त्याला फॉर्म मधे खेळताना पाहिलेल्यांना लक्षात असेल. जेव्हा १०० हा स्ट्राइक रेट फार महान समजला जात असे तेव्हा त्याच्या अनेक इनिंग्ज ३० बॉल मधे ५०, ३६ बॉल मधे ७२, ५६ बॉल्स मधे ८९ असल्या प्रकारच्या आहेत, त्या ही टॉप क्वालिटी बोलिंग विरूद्ध, आणि परदेशातील पिचेस वर. आणि नुसती धुलाईच नाही, तर त्याचे "रनिंग बिटविन" सुद्धा भारी होते. दुसरा फलंदाज तिकडे जेमतेम पोहोचेपर्यंत हा इकडे बॅट टेकवून पुन्हा ३-४ पावले निघाला आहे अजून एक रन काढायचा आहे का बघायला, हे कायम दिसणारे दृश्य होते. या विजयापासून भारताची घोडदौड सुरू झाली. मग ऑस्ट्रेलियाला हरवून आपण सेमी मधे पोहोचलो. आणि तेव्हा सेमी फायनल व फायनल दूरदर्शनवर लाइव्ह दाखवणार असे जाहीर झाले. आता तेव्हाचे कॅलेण्डर पाहिले तर २२ जून ची सेमी फायनल ही बुधवारी होती. या गेम्स साधारण दुपारी ३ वाजता सुरू होत भारतातल्याप्रमाणे. तेव्हा शाळा सुरू झालेल्या होत्या. म्हणजे ही शाळेतून घरी आल्यावर संध्याकाळी पुढे पाहिली असावी. भारताचा डाव पाहिल्याचे लक्षात आहे. चेस सुरू असताना मोहिंदर व यशपाल चांगले खेळत होते पण रन रेट अजून वाढायला हवा होता. आता संदीप पाटील यायला हवा असे लोक म्हणू लागले ते ही लक्षात आहे. मग तो आला आणि धुंवाधार खेळला. मॅन ऑफ द मॅच जरी त्याला मिळाले नसले तरी माझ्या दृष्टीने मॅच त्यानेच खेचली. संदीप पाटील याआधीही इंग्लंड मधे चांगला खेळला होता. एकदा एका टेस्ट मॅच मधे बॉब विलीसविरूद्ध त्याने एकाच ओव्हर मधे ६ फोर्स मारून ८० वरून १०४ वर जात शतक पूर्ण केले होते (त्या ओव्हर मधे एक नो बॉल होता). या सेमी फायनल मधेही त्याने बॉब विलीसला मारला होता. फायनलमधेही भारताला जिंकण्याचे चान्सेस नव्हतेच. त्यात १८३ वर सगळे ऑल आउट झाल्यावर तर नाहीच. पण भारत मॅच हरणार यात काही फारसे नावीन्य नव्हते. तरी आम्ही बघत बसलो. संधूचा एक बॉल एरव्ही आक्रमक खेळणार्‍या ग्रीनिज ने सोडला व तो ऑफ स्टंपची बेल घेउन गेला तेव्हा एकदम आता काय होते याबद्दल कुतूहल निर्माण झाले. पण तरी येणारा बॅट्समन रिचर्ड्स होता. ही मॅच बघताना साधारण या वेळेस आमच्याकडे व आसपास लाइट्स गेले. तेव्हा स्कोअर समजण्याचे इतर मार्ग सोपे नव्हते. कोणीतरी जेथे लाइट्स आहेत अशा भागापर्यंत गाडीने जाउन स्कोअर "आणला" तरच. रेडिओ वर धावते समालोचन होते का लक्षात नाही पण कोणाकडे बहुधा ट्रान्झिस्टरही नसावा आसपास. कारण पुन्हा लाइट्स येईपर्यंत स्कोअर माहीत नव्हता. मग लाइट्स आले तेव्हा अजून तीन विकेट्स उडालेल्या होत्या आणि मुख्य म्हणजे त्यात रिचर्ड्स होता हे समजले. नंतर लगेच लॉइडही परतला. आता मात्र एकदम इंटरेस्ट ने सगळे पाहू लागले. मग मधे थोडा वेळ दुजाँ व बहुधा होल्डिंगने स्कोअर बराच पुढे नेला. ओव्हर्स भरपूर होत्या त्यामुळे हे आता असेच चिकटपणे खेळून जिंकतात की काय अशी शंका आली. साधारण तेव्हाच मोहिंदर बोलिंगला आला. त्याची बोलिंग अ‍ॅक्शन अफाट होती. रन अपची सुरूवात जरा वेगाने करून मग बॉल टाकावा की नाही याचा फेरविचार करत असल्यासारखा तो स्लो होत असे क्रीजजवळ येताना. त्याने मध्यमगती गोलंदाजी करून ही जोडी फोडली. मग पुढचे लौकर गुंडाळून आपण मॅच जिंकली. मग ते चार्ल्स च्या हस्ते पारितोषिके देणे वगैरे लक्षात आहे. दुसर्‍या दिवशी 'केसरी' मधे "विंडीजचा धुव्वा, विश्वचषक भारताकडे" अशी पहिल्या पानावरची मोठी बातमी व कपिलचा हातात कप घेतलेला "फावड्या" फोटो - तो पेपर अनेक वर्षे जपून ठेवला होता. नंतर कोठे गेला माहीत नाही. या विजयानंतर जागतिक व भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलले. सुनील गावसकर ने १९७५ च्या वर्ल्ड कप मधे ६० ओव्हर्स खेळून फक्त ३६ रन्स केले होते ही बातमी या दरम्यान कधीतरी फुटली. तोपर्यंत त्याबद्दल ऐकल्याचे आठवत नव्हते. या सामन्यांना महत्त्व आले. या मॅचेस टीव्हीवर दिसू लागल्या, लोक पाच दिवस कसोटी सामनेही पाहात, हे तर एका दिवसात संपायचे. १९८५ सालच्या वर्ल्ड सिरीज कप मधला भारत-पाक अंतिम सामना बहुधा रविवारी होता. ऑस्ट्रेलियात डे-नाइट असल्याने भारतात तो सकाळी उशीरा सुरू झाला. तेव्हा रस्त्यांवर असलेली सामसूम लक्षात आहे. १९८४ मधे शारजालाही मॅचेस सुरू झाल्या. १९८४ मधेच भारतात नवी दिल्ली मधल्या नेहरू स्टेडियमवर भारत-पाक सामना डे-नाइट खेळला गेला. तेव्हा त्याचे अप्रूप वाटले होते. खेळाडूंच्या दिसणार्‍या चार सावल्या वगैरे. ती मॅच भारताने जिंकली होती. आता रेकॉर्ड पाहिले तर नंतर तो "बेनिफिट" सामना धरला गेला असे दिसते. याच सिरीज मधे मुंबईत झालेल्या आणखी एका बेनिफिट मॅच मधे संदीप पाटील व कपिल ने जबरी धुलाई केली होती ते ही लक्षात आहे. तरीही हे सामने एकाच सिरीज मधे कसोटी मॅचेसच्या अधेमधे होत. वेगळी वन डे सिरीज नसे. कपडेही पांढरेच असत. नियमही फार वेगळे नव्हते - पॉवर प्ले, नो बॉल्स चे नियम साधारण कसोटीसारखेच होते. २२०-२४० रन्स म्हणजे भरपूर होत. आणखीही विविधता होती. ऑस्ट्रेलियामधे पांढरा बॉल व रंगीत कपडे असत. इंग्लंड मधे ५५ ओव्हर्सच्या मॅचेस असत. भारत, इंग्लंड ई. ठिकाणी कॅमेरे एकाच बाजूला असत. त्यामुळे बोलर्सची अ‍ॅक्शन दोन्ही बाजूनी दिसत असे. आणि कपिल, इम्रान, मार्शल, होल्डिंग, हॅडली सारख्यांच्या अ‍ॅक्शन अगदी रन-अप पासून बघायला मजा येत असे. प्रत्येक ओव्हरनंतर जाहिरात नसल्याने ओव्हर झाली, की विकेट कीपर व स्लिप फिल्डर्स दुसर्‍या क्रीजकडे जात आहेत हे दिवसभर बघायला मिळे. साधारणपणे अर्धशतक वगैरे केलेल्याला मॅन ऑफ द मॅच मिळे. बोलर्सना त्यामानाने कमीच मिळत असे. याच काळात कसोटी सामने निर्जीव होउ लागले होते. त्यामानाने हे सगळे बरेच वेगवान वाटे. तरीही कसोटी सामन्यांचे महत्त्व होतेच. एक उदाहरण - तेंडुलकरची पहिली पाच-साडेपाच वर्षे व पहिले ७५-७६ सामने वन डे मधे एकही शतक नव्हते. पण त्याचे नाव कसोटीतील कामगिरीमुळे ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेले होते. अर्थात वन डे मधे निकालावर परिणाम करणारी अर्धशतके होतीच. पण शतक नव्हते. या वर्ल्ड कप विजयाचे आणखी पडसाद उमटले ते त्याच वर्षी वेस्ट इंडिज भारत दौर्‍यावर आले तेव्हा. त्यांनी ६ कसोटीत आपल्याला ०-३ असे व ५ वन डे मधे ०-५ असे हरवले. त्याबद्दल आणखी माहिती या लेखात आहे. आता नंतर भारताने पुन्हा २०११ मधे कप जिंकलेला आहे. पण तरीही हा १९८३ चा विजय भारी वाटतोच. माझा समाजशास्त्रीय अभ्यास वगैरे नाही पण गेल्या एक दोन दशकात एकूणच भारताची आंतरराष्ट्रीय पत वाढलेली आहे. आपले एकूणच लोक व खेळाडू जगात कोठेही आत्मविश्वासाने वावरतात. इव्हन प्रेक्षकांची तुलना केली तर ८०-९० मधे मैदानावर कोठेतरी पुंजक्यांमधे दिसणारे कोट वगैरे घालून आलेले भारतीय आणि आता जगातील कोणत्याही मैदानावर मोठ्या संख्येने दिसणारे, खूप "आवाज" करणारे आणि कसलाही कमीपणा न बाळगणारे भारतीय प्रेक्षक यातील फरक सहज जाणवतो. तेव्हा कपिल व कंपनी हे शिक्षकांनी दिलेल्या पारितोषिकाचा स्वीकार करत असल्यासारखे नम्र होते. आता आपले खेळाडू कोठेही कप वगैरे स्वीकारताना एकदम सहजपणे वावरतात. इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियालाही आपण हरवू शकतो याचा सेल्फ बिलीफ त्यांच्या खेळात, वागणुकीत दिसतो (तो मैदानावर खेळात नेहमी उतरतोच असे नाही ;) ) आयपीएल मुळे व भारत एकूणच क्रिकेटची मोठी बाजारपेठ झाल्याने इतरांनाही भारताची दखल घ्यावीच लागते. पूर्वी एरव्ही एकमेकांविरूद्ध खेळणारे रिचर्ड्स व बोथम सॉमरसेट मधे एकाच संघात असत तसे आता आयपीएलमुळे झाले आहे. बाकी पैसा, सोयी व हाय लेव्हल कोचिंग वगैरेही फरक आहेच. सध्या बर्‍याच शोज मधे १९८३ च्य खेळाडूंच्या मुलाखती पाहिल्या. अगदी तुटपुंजे मानधन, राहण्याच्या सोयीतील अडचणी वगैरेंचा सामना करून या लोकांनी विश्वचषक जिंकला हे पाहिले की 'टोटल रिस्पेक्ट' शिवाय दुसरे काही मनात येत नाही. आता सुपरस्टार कल्चर मुळे काही खेळाडू 'अनटचेबल' झालेत. सचिन कितीही भारी असला तरी त्याच्या करीयरच्या उत्तरार्धात त्याच्या खेळावर टीका ही फार क्वचित होत असे. कॉमेण्टेटर्स, ज्युनियर खेळाडू व इतर सपोर्ट स्टाफ यांना मुख्य खेळाडूंना दुखावणे परवडत नसावे असे चित्र अनेकदा दिसते. संजय मांजरेकर, हर्ष भोगले वगैरेंबद्दल ऐकले आहे. तेव्हा आता जर एखाद्याने विजयाचे पूर्ण श्रेय जर कोहली किंवा रोहित शर्माला दिले तर त्यात आश्चर्य वाटत नाही. या पार्श्वभूमीवर १९८३ च्या संघाच्या मुलाखतींमधे झाडून सगळे जे कपिलला निर्विवाद श्रेय देतात त्याचे महत्त्व जाणवते. २००८ मधे आयपील सुरू व्हायच्या आधी एक "आयसीएल" घोषित झाली होती - त्यात बीसीसीआयचा सहभाग नव्हता. किंबहुना विरोधच होता. तेव्हा कपिल त्यात असल्याने बरीच वर्षे त्याला संघाशी संबंधित कोणत्या पदावर घेतले गेले नव्हते. गावसकर, शास्त्री, द्रविड, कुंबळे, गांगुली वगैरे जसे बीसीसीआयच्या इनर सर्कलमधले वाटतात तसा तो अजूनही नाही. त्यामुळे कपिलची तारीफ करण्यात या खेळाडूंना कसलाही स्वार्थ नाही, किंवा न केल्यास काही नुकसान नाही. तरीही संघातील लोक त्याच्याबद्दल जे बोलतात त्यावरून त्याने एक कप्तान म्हणून एक अशक्यप्राय कामगिरी तेव्हा सर्वांकडून करून घेतली याची खात्री पटते. पुढे हा संघ बराच टिकला. कपिलचे कप्तानपद त्यानंतर वर्षातच गेले, आणि पुन्हा एका वर्षाने त्याच्याचकडे परत आले - आणि मग १९८७ च्या वर्ल्ड कप पर्यंत राहिले. उपकप्तान मोहिंदर भारताबाहेर जितका चांगला खेळला तितका भारतात खेळला नाही. पुढे ५-६ वर्षे संघात होता इतके लक्षात आहे. गावसकर या कपमधे विशेष चमकला नाही पण नंतर त्याने वन डे मधला खेळ आत्मसात केला. वेंगसरकर, शास्त्री, श्रीकांत हे पुढे अनेक वर्षे खेळले, तिघेही कप्तानही झाले (शास्त्री एक दोन सामने "बदली" कप्तान होता. वेस्ट इंडिज विरूद्ध एक विजयही त्याच्या नावावर आहे). संदीप पाटील पुढे एक दोन वर्षे चमकला पण अझर आल्यानंतर त्याला पुढे फार संधी मिळाली नाही. यशपालचे ही तसेच झाले असावे. किर्ती आझाद २-३ वर्षे होता. किरमाणी तर होताच. तो कसोटीत अनेकदा नाइट वॉचमन म्हणून येत असे (आणि त्याला ती संधी आपले लोक अनेकदा तत्परतेने देत), त्यामुळे कप्तान हे जसे पद असते तसे नाइट वॉचमन हे किरमाणीचे पद आहे असेच तेव्हा वाटे. बिन्नी व मदनलाल अनेक वर्षे संघात होते. भारतात फार चालत नसत पण परदेशात विकेट्स काढत. बलविंदर संधूबद्दल मात्र पुढे फार खेळला नाही. पुलंच्या 'दोन वस्ताद' मधल्या त्या वस्तादांप्रमाणेच त्याचे झाले असावे. फायनलमधे वेस्ट इंडिज च्या अभेद्य फलदांजीला पहिला सुरूंग त्याने लावला होता. आजही तो बहुधा ग्रिनीज ने बॉल सोडण्याकरता वर उचललेली बॅट व अचानक आत येउन ऑफ स्टम्प वरची बेल घेउन गेलेला बॉल - याची कहाणी सांगत असेल. ते लाइव्ह पाहिलेल्यांना ती सांगायचीही गरज नाही - कारण ती कोणीच विसरलेले नाही.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7026 views

💬 प्रतिसाद (20)
T
Trump गुरुवार, 12/30/2021 - 22:25 नवीन
मस्त, लिहाला आहे. नवज्योतसिंग सिद्दू, प्रभाकर, किरण मोरे हे खेलाडु राहिलेत.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/31/2021 - 03:55 नवीन
त्यावेळेला आमच्या घराजवळ एका कुटुंबाकडे टिव्ही होता. त्यांच्या घरी २०-२५ जणांनी मिळून अंतिम सामना पाहिला होता. रेडिओ कॉमेंटरी होती. कारण टिव्हीचा आवाज बंद करुन ट्रांझिस्टर वर कॉमेंटरी ऐकत सामना पाहिल्याचे आठवते आहे. जबरदस्त झाली होती ती मॅच, माल्मक मार्शल आणि ग्रिनीच बॉलिंग करायला लागले की छातीत धडकी भरायची, असल्या लोकांपुढे हेल्मेट न घालता खेळणारा गावस्कर आठवतो आहे. पण साधारण त्या काळी पीपीईचा फारसा वापर होत नसावा. पण सर्वात जास्त लक्षात राहिला तो कपिल ने घेतलेला विव्ह रिचर्डसचा कॅच, त्या वेळी सुध्दा त्याचा टिव्हीवर दोन तीन वेळा अ‍ॅक्षन रिप्ले दाखवला होता. त्या वेळी रेडिओ वर कोण कॉमेंटरी करत होते ते लक्षात नाही, पण हा कॅच घेतल्यावर सगळे कॉमेन्ट्रेटर्स पण चेकाळले होते. आता सुध्दा त्या सगळ्यांच्या मुलाखती पहायला मजा येते आहे. सिनेमा थेटर मधे आहे का ओटीट वर? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 12/31/2021 - 04:02 नवीन
सुनील वॉल्सन नावाच एक जण या संघात होता. त्याला एकही मॅच खेळायला मिळाली नाही. संपूर्ण टुर्नामेंट मधे तो एकदाही मैदानात आला नाही.मात्र अंतीम विजेत्या टीमचा तो भाग होता.( बारावा गडी म्हणून) म्हणून वर्ल्ड कप उचलतानाचा त्याचा फोटो वर्तमानपत्रात आला होता.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Fri, 12/31/2021 - 06:23 नवीन
८३ चा विजय कपिलचाच होता. अमरनाथ विकेट घेऊ शकतो हे वाटतं नव्हते
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/31/2021 - 07:22 नवीन
सेमी फायनल, वापीला बघीतली आणि फायनल डोंबिवली येथे रम्य आठवणी ...
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 12/31/2021 - 07:52 नवीन
एकदम झक्कास लेखन! मजा आली वाचताना. वाखूसा! सं - दी - प
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 12/31/2021 - 08:23 नवीन
छान लेख.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 12/31/2021 - 08:47 नवीन
83 ची गंमत म्हणजे ह्या कप नंतर काही महिन्यात जन्म झाल्याने माझे नाव कपिलदेव वरून प्रेरित होऊन ठेवले गेले.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 12/31/2021 - 08:49 नवीन
वाह! मस्तच लेख 👍
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 12/31/2021 - 10:28 नवीन
पिच्चर पाहून मजा आली. लगान थेटरात बघायचा राहून गेला होता, त्यामुळे ८३ चुकवायचा नव्हताच. ८८-८९ पासूनच्या अस्पष्ट आठवणी आहेत. आमच्या घरी १९८६ मध्ये रंगीत टीव्ही आल्याने मॅच बघायला आमच्या घरी गर्दी जमायची. तेव्हासुद्धा क्रिकेट या प्रकाराने लोकांना वेड लावले होते. एक नक्की.. कोणत्याही पिढीला शालेय वयात असताना जी टीम खेळते, ती सर्वोत्कृष्ट आणि क्लासिक वाटते आणि पुढील पिढीची टीम टुकार वाटते.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Fri, 12/31/2021 - 11:05 नवीन
छान लिहिलंय. मला तेव्हा व त्या आधीपासून च क्रिकेट चे समालोचन ऐकायची हौस. 83चे सामने पण रेडिओवर ऐकले. मला वाटते त्या आधी वेस्ट इंडिज मधे एक सामना आपण जिंकला होता .यशपाल शर्मा ने जोरदार फलंदाजी केली होती. (89) तेव्हा आमच्या भागात टीव्ही आला नव्हता. नंतर अंतिम सामन्या ची क्षणचित्राची विडीओ कॅसेट( ध्वनीचित्रफीत) अनेक विडीओ पार्लर मधे तिकीट लावून दाखवली जायची लोक गर्दी करून पाहायचे . नंतर वेस्ट इंडिज चा भारत दौरा झालाआ.त्यानी विश्व चषकातील पराभवाचा बदला घेतला. माल्कम मार्शल ने धुमाकुळ घातला होता विश्व चषकातील मालिकावीर मोहिंदर अमरनाथ चा स्कोअर सहा डावात 000200असा काहिसा होता..
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Fri, 12/31/2021 - 12:39 नवीन
८३ चित्रपट प्रदर्शित झाला की लगेच पाहिला. अप्रतिम आहे. कपिलदेवचे भारतीय क्रिकेटमधले योगदान अतुलनीय आहे. मला भावलेल्या काही गोष्टी: विजिगिषु वृत्ती - जिंकण्यासाठीच खेळणे, शिस्तबद्ध आणि शेवटच्या क्षणापर्यंत शिकस्तिचे प्रयत्न करणे भारतीय संघात कपिलनेच रूजवले. क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा दूर केला. थर्ड मॅन किंवा लाँग लेगला असलेला भारतीय क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून थेट यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू फेकतो आहे, आणि त्यामुळे एखादी अवांतर चोरटी धाव घेण्याची फलंदाजांची हिंमतच होत नाही हे सुखद दृष्य कपिल कर्णधार होण्याआधी भारतीयांसाठी अप्रूप वाटावे इतके दुर्मिळ होते. कपिलदेवच्या कालखंडातच 'रनिंग बीटवीन द विकेटस' मधे सुधारणा झाली. थोडक्यात सांगायचे तर सामना अनिर्णित ठेवण्यात समाधान मानण्याच्या आणि कसोटी क्रिकेटभोवती केंद्रित झालेल्या मानसिकतेतून बाहेर पडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटला सामोरे जात यशस्वी होण्यासाठीची भारतीय संघाची मानसिकता घडवण्यात कपिलचा सिंहाचा वाटा आहे. कपिलने स्वतः 'रोल मॉडेल' होत हे स्थित्यंतर घडवल्याने त्याला भारतीय क्रिकेटमधला महानायक म्हणावे तर अतिशयोक्ती ठरणार नाही. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि काही अपवादात्मक प्रसंगी यष्टीरक्षकाची देखील भूमिका निभावून नेलेला कपिल या सगळ्या भूमिका तितक्याच चोखपणे पाडू शकत होता. कुठल्याही भूमिकेत असताना सामना एकहाती फिरवण्याची ताकद राखून होता. असो. ८३ हा चित्रपट आवर्जुन पहावा असाच आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 12/31/2021 - 13:24 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 12/31/2021 - 16:21 नवीन
छान लेख.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sat, 01/01/2022 - 07:18 नवीन
फार छान लिहीलेत फारएण्ड.... एकदम आवडले. या मॅचच्या वेळी मी लहान (४ थी मध्ये) होतो. त्यावेळी कोल्हापुरला रेडीओवर ही मॅच ऐकत होतो. बरोबर शेजारचे ही बरेच जण होते व वडीलांचे मित्र होते. १८३ स्कोर झाल्यावर मी एकटा म्हणत होतो की आपण जिंकणार पण बाकी सर्वांनी आशा सोडली होती. (मला ही फार काही कळत नव्हते त्यावेळी.. मी असचं म्हणत होतो). नंतर मॅच जिंकल्यावर तर माझी मिनी मिरवणूक काढली लोकांनी. त्यांना वाटले की माझ्या बोलण्यात काहीतरी लक फॅक्टर आहे. नंतर काही दिवस आजूबाजूची लोकं घरी येऊन माझ्याकडून त्यांना अपेक्षित असे काहीबाही बोलवून घ्यायची. त्यानंतर काही दिवसांनी पश्चिम विभाग वि. वेस्ट इंडीज अशी तीन दिवसांची मॅच कोल्हापुरला झाली. माझ्या आयुष्यातली ही एकमेव क्रिकेट मॅच जी मी मैदानावर पाहिली. त्याच्या बर्‍याच आठवणी अजूनही आहेत. आख्खी वेस्ट इंडीज टीम व त्यांचा खेळ जवळून पाहिला होता. गॉर्डन ग्रिनिज व डेसमंड हेन्स हे अही-मही सारखे ओपनर, रिची रिचर्डसन, गोम्स, रॉबर्टस, लोगी आणि रिचर्डस वगैरे. रिचर्डसने फार काही खेळी केली नव्हती पण तो मैदानात आहे यानेच धडकी भरत होती. आपल्या खेळाडूंपैकी गुलाम परकार हा फार आवडला होता. तसेच राजू कुलकर्णी, रेंडाल डॅनियल, बलबिंदर संधू यांनीही छान खेळी केली होती. दुसर्‍यांदा बॅटींग करताना रिची रिचर्डसनने कॉमेडी सारखे काही प्रकार करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या मॅचची आणखी एक गंमत म्हणजे त्यावेळी आमच्या बाबांकडे मॅचचे पासेस होते. त्यामुळे बरेचसे नातेवाईक एकदम जवळचे झाले होते. अशीच कोणीतरी (त्यावेळी तरूण असणारी) आईची कोणती तरी बहीण आमच्याकडे मॅचच्या निमित्ताने आली होती. आज जवळ जवळ ३८ वर्षे झाली पण ही मावशी मला नंतर कुठेच समारंभात वगैरे भेटली नाही. कोल्हापुरच्या मॅच चा स्कोअर कार्ड.. https://www.espncricinfo.com/series/west-indies-tour-of-india-1983-84-61939/west-zone-vs-west-indians-547419/full-scorecard
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Sat, 01/01/2022 - 23:50 नवीन
धन्यवाद सर्वांना. प्रतिक्रियांशी संबंधित आणखी माहिती. ट्रम्प - सिद्धू, प्रभाकर व मोरे - तिन्ही खेळाडू नंतर आले संघात. १९८३ च्या वर्ल्ड कप मधे ते नव्हते. ज्ञानोबाचे पैजार - ओटीटी वर बहुधा हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स वर येइल. त्यांची नावे होती सुरूवातीला. सध्यातरी फक्त थिएटर मधे आहे. कपिलमुनी - एकदम भारी! चित्रपटातही एक मूल जन्मते व त्याचे नाव कपिल ठेवले जाते असे दाखवले आहे :) बाय द वे, पुण्यात त्याच काळात बांधल्या गेलेल्या एका बिल्डिंग चे नाव "प्रुडेन्शियल" आहे (या कपचे नाव तेव्हा प्रुडेन्शियल कप होते). नक्की कोठे ती बिल्डिंग आहे आता लक्षात नाही. कदाचित लॉ कॉलेज रोडच्या आसपास. नीलकंठ देशमुख - त्या सिरीजबद्दल मी लिहीलेल्या लेखाची लिन्क वरती लेखातच आहे. मोहिंदर बद्दल तुम्ही बरोबर लिहीले आहे. योगी९०० - जबरी अनुभव असेल त्या मॅचचा. लिन्क पाहिली. -
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Tue, 01/04/2022 - 07:49 नवीन
नेहमीप्रमाणे लेख आवडला... मी लहान असल्याने फार आठवणी नाहीत... पण आम्ही सगळे काकाच्या घरी सामना पाहिल्याचे (आमच्या घरी टी व्ही नसल्याने) अन शेवटच्या विकेट्स पडल्यावर टीव्ही समोर खूप नाचल्याचे आठवत आहे... कपिलचे प्रचंड गारुड होते तेव्हा आम्हा चिल्लर पिल्लर पोरांवर.. वत्रमानपत्रे अन षटकार मधे आलेले फोटो कापुन जपुन ठेवले होते अनेक वर्षे कपिलचे.... बाबांना मात्र कायम गावसकर दैवत होते... बाय द वे, पुण्यात त्याच काळात बांधल्या गेलेल्या एका बिल्डिंग चे नाव "प्रुडेन्शियल" आहे (या कपचे नाव तेव्हा प्रुडेन्शियल कप होते). नक्की कोठे ती बिल्डिंग आहे आता लक्षात नाही. कदाचित लॉ कॉलेज रोडच्या आसपास. >>>> पौड रोडला सर्वत्र सोसायटी समोर आहे ती ईमारत... प्रुडेंशियल ८३ असेच नाव आहे त्या ईमारतीचे.... आता पाडुन नवी झाली असेल तर माहित नाही....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/04/2022 - 10:31 नवीन
केवळ, मला क्रिकेट बघायला आवडते म्हणून सौ आली... आणि माझ्या पेक्षा तिनेच सिनेमा जास्त एंजाॅय केला मला तरी सिनेमा आवडला... जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 01/09/2022 - 13:59 नवीन
हा लेख आधी वाचला होता,आवडला होता.पण नक्की तेव्हा काय वातावरण होतं ते सिनेमा पाहून समजलं 83 रणवीरसाठी पाहायला गेले पण,तो सापडलाच नाही दिसला फक्त कपिल देव 😃 आणि मोहिंदर,यशपाल,गावस्कर,श्रीकांत सगळे शिलेदार!सगळ्यात भारी सीन म्हणजे रिअल कपिलने रील कपिलला चिअर करणे,मोहिंदर अमरनाथने लाला अमरनाथ होणे आणि छोटा सचिन...भारी सिनेमा!
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sun, 01/09/2022 - 14:59 नवीन
त्या वेळी घरी कृष्ण धवल टि व्ही होता. घरात सर्व भाऊ, वडील यांच्यासह हा सामना लाईव्ह बघितल्याचा थरार अद्याप आठवतोय. कपिलच्या रनिंग बिटविन विकेट बद्दलची एक आठवण... नक्की सामना कुठला होता ते आठवत नाही, सचिन आणि कपिल यांची सुमारे पन्नास एक धावांची भागीदारी झालेली होती, सचिनच्या एका कव्हर ड्राईववर दोन धावा धावून झाल्यानंतर तिसऱ्या धावेकरता कपिल नॉन striker हून वळून तीन चार पावले आला असताना, striker end वरुन सचिन धाप टाकत ओरडला, 'नही, नही देवजी...' नुकत्याच सुरू झालेल्या विकेट माइक मधून हे स्पष्ट ऐकू आलं होतं.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 21 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 23 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 25 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 28 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा