भारतात विमान उत्पादन का होत नाही?
दोन-तीन वर्षांपूर्वी मला माझ्या काकांच्या मित्राने सहज बोलताना प्रश्न विचारला की भारतात विमान उत्पादन का होत नाही. तेव्हा माझ्याकडे त्याचे उत्तर नव्हते.
आज दोन-तीन वर्षांनी काही मुद्दे मला एकेक करून मिळाले ते असे.
१) विसाव्या शतकाच्या सुरुवातीला राईट बंधूंचे पहिले उड्डाण झाले. १९४० साली वालचंद हिराचंद यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्सची स्थापना करून विमान उत्पादनास भारतात सुरुवात केली. मात्र लगेचच १९४२ मध्ये तत्कालीन शासनाने महायुद्धाचे कारण देऊन ती आपल्या ताब्यात घेतली. पुढे स्वातंत्र्योत्तर काळातही त्यावर भारत सरकारची मालकी राहिली. सध्या तिथे रशियाकडून परवाने घेऊन विमाने उत्पादित करायचे काम चालते आणि मुख्यत्वे करून भारतीय लष्कराला विमाने पुरवण्यावर त्यांचा भर आहे
२) स्वातंत्र्योत्तर काळात अवलंबलेल्या नियंत्रणवादी धोरणात (Industries Act १९५१) प्रत्येक गोष्टीकरता उद्योजकांना शासकीय परवानगीची गरज लागत असे. आणि ती परवानगी प्रत्येक अर्जाची स्वातंत्र्यपणे छाननी करून मिळे. अशा काळात जिथे शासन टाटांना हवाईवाहतूकीचा व्यवसाय चालवू देईना तिथे विमान उत्पादन करण्यास कुणी अर्ज केला असता तर तशी परवानगी मिळेल निव्वळ अशक्य.
३) जगातील काही विमान उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि त्यांची स्थापना वर्षे
बोईंग - १९१६, दासो - १९२९, एअरबस - १९७० मात्र एअरबस स्थापन करणाऱ्या युरोपातील कंपन्या आधी पासून अस्तित्वात होत्या.
मान उत्पादन करण्याचा याना किमान ५० वर्षांचा अनुभव आहे. आता कुणी भारतातील कंपनीने जरी नव्याने सुरुवात करायची म्हटले तरी या ५० वर्षांच्या अनुभवाशी स्पर्धा कशी होईल?
४) विमानाचे जेट इंजिन हा अतिशय महत्वाचा भाग विमान उत्पादन करणाऱ्या कंपन्या जनरल इलेक्ट्रिक, रोल्स रॉईस, सॅफ्रान, प्रॅट अँड व्हिटनी अशा अन्य कंपनीकडून खरेदी करतात. त्यामुळे त्याच्याशी संबंधित उद्योग आणि संशोधन अस्तित्वात असले पाहिजे.
५) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मित्सुबिशी कंपनी जपानी लष्करी विमाने उत्पादित करत असे. आणि अजूनही ते विमानांचे उत्पादन करतातच. १८६० नंतर मेजी पुनरुज्जीवन नावाच्या घटनेमुळे जपानने आधुनिकीकरणाची कास धरली आणि त्यामुळेच मित्सुबिशी सारख्या उद्योगांची तिथे सुरुवात झाली.
६) रशियानेही स्वतःची अशी लष्करी आणि प्रवासी वाहतुकीची विमाने उत्पादित केली आहेत. आपल्या लष्करात आज रशियातील विमाने मोठ्या संख्येने आहेत. रशियातही करशॉफ (किरचॉफ लॉ मधला), मेंडेलिव्ह (आवर्तसारणी तयार करणारा) इ सारखे संशोधक राजेशाहीच्या काळात अस्तित्वात होते.
म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच रशिया आणि जपान भारतापेक्षा कितीतरी आधुनिक अवस्थेत होते. भारताला मेजी पुनरुज्जीवनासारखे प्रयत्न करणे ब्रिटिशांच्या राज्यात शक्य होणार नव्हते. तरीही भारतीय सुधारकानी वेळोवेळी आधुनिक मूल्यांचा अंगीकार आपण करावा यासाठी प्रयत्न केलेच आहेत.
७) गेल्या दशकात चीननेही प्रवासी विमान बाजारात आणले आहे. त्यांचे मुख्य ग्राहक सध्या चीनमध्येच आहेत. चीननेही डंग शाओफंग यांच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या आर्थिक धोरणात मूलभूत बदल घडवून आणले आणि विमानच नाही तर अनेक क्षेत्रात सर्वांना चकित करून टाकणारी प्रगती साधली आहे.
चीननेही इंजिन परदेशी कंपनीचे लावलेले आहे. त्यांना ते मिळू नये याकारताही अमेरिकेत काही प्रयत्न झाले. GE China deal
८) ब्राझील मधील एम्बरेअर ही मुळात शासकीय कंपनी म्हणून १९६९ मध्ये सुरु झाली. आता तिचे खाजगीकरण झाल्याचे दिसते. पण तेही विविध प्रकारच्या विमानाची उत्पादन आणि विक्री करतात असे दिसते. त्यांचा रेव्हेन्यू हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या रेवेन्यूच्या पाचपट तरी आहे.
९) इराणवर असलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे तिथले विमाने फारच जुनी होऊ लागली आहेत. तसेच देशी उत्पादक नसल्याने त्यांची अडचण झाली आहे.
Iran Boeing deal
आपल्या देशावर कधी अशी येईल असे वाटत नाही.
१०) भारतीय बनावटीचे तेजस, ज्याचा निर्णय १९८३ मध्ये झाला आणि, आपण आत्ताच काही विमाने सेवेत घेतली आहेत. त्याचे इंजिन खरेतर देशी बनावटीचे असणार होते पण ते पूर्ण न झाल्याने सध्या जनरल इलेक्ट्रिकचे इंजिन वापरले आहे. Kaveri Engine
११) भारतातील उद्योजकांनी आता विमान उत्पादन करण्याची इच्छा दाखवली तरी अजून एक विमान उत्पादकास विमाने विकण्यास बाजारपेठ उपलब्ध आहे का तेही बघायला पाहिजे. महिंद्रा एअरोस्पेसच्या रूपात थोडी सुरुवात झालेली आहे.
आपल्याला याबद्दल काय वाटते?
व्हॅल्यू ऍडीशन
हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो, उदाहरणार्थ आपण एमब्रायर ह्या ब्राझीलीयन कंपनीचे मध्यम लहान आकाराचे विमान (जे मुळात प्रवासी आराखड्यात बांधले गेले होते ते) घेऊन त्यावर व्यवस्थित रिसर्च करून ग्लोबली स्पर्धात्मक असलेले एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सिस्टम्स (एवॅक्स) बसवले आहेत. असे प्रॅक्टिकल डिझाईन अधिक मार्केटिंग एलमेंट्स प्लस फायनान्स लक्षात घेऊनच निर्णय व्हावेत असे वाटते.