मदतकार्यातले पर्यटन - गांधारपाले लेणी.
पुर, वादळ, भूकंप अशा नैसर्गीक आपत्तीच्या प्रसंगी आपण सगळेच मानवधर्माला जागुन यथाशक्ती मदतकार्यात सहभागी होतो त्याप्रमाणे काल दिनांक २६ जुलै २०२१ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड शहर आणि परिसरातील वाड्या, वस्त्यांमधील पुरग्रस्त रहिवाशांना अन्नवाटप करण्यासाठी मित्रांबरोबर जाणे झाले.
प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी होऊन ८०० खऱ्याखुऱ्या गरजूंच्या हातात ताजा, गरम गरम मसुर पुलाव मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य व दिसलेला आनंद पाहुन लाभलेले समाधान आणि हे काम करत असताना मधे मिळालेल्या दिड एक तासाच्या फावल्या वेळात अगदी अनपेक्षीतपणे नितांत सुंदर अशा सह्याद्रीच्या कुशीत, गांधारपाले गावाजवळ ई.स. दुसऱ्या शतकात खोदलेला प्रचीन बौद्ध लेणीसमुह पहायला मिळाल्याने कालचा दिवस आमच्यासाठी विशेष ठरला.
अशी आस्मानी संकटे कोसळल्यावर राज्यातुनच नव्हे तर देश-विदेशातुनही मदतीचा ओघ सुरू होतो. वितरणातील त्रुटींमुळे काही जणांना नको तितकी मदत मिळते तर अनेक गरजू मदतीपासुन वंचीत रहातात.
अनेकदा येणाऱ्या मदतीचे प्रमाण खुप जास्त असल्याने त्यातल्या अन्नपदार्थ आणि नाशिवंत वस्तुंचे वाटप व्यवस्थीत होऊ न शकल्याने त्या वाया तरी जातात किंवा स्थानीक लोकप्रतीनीधी व त्यांच्या चेले-चपाट्यांकडुन ती सामुग्री फक्त त्यांच्या समाजातील लोकांत, खात्रीच्या मतदारांत वाटणे तसेच परस्पर विकुन टाकणे असे गैरप्रकार होत असल्याचे पुर्वानुभव गाठीशी असल्याने अशा प्रकारच्या मदतकार्यात आमच्या खास वर्तुळातील मित्रमंडळींचा प्रत्यक्ष सहभाग असेल तरच आम्ही त्यात आप आपला वाटा उचलतो अन्यथा अलिप्त राहणे पसंत करतो.
परवा संध्याकाळी ग्रुपमध्ये महाडला जाउन मदतकार्य करण्याची कल्पना मांडली गेली तेव्हा सकाळी निघुन उशीर झाला तरी रात्री घरी परत येणे शक्य असल्याने मी धरून चारजण प्रत्यक्ष तिथे जाण्यासाठी तयार झालो आणि बाकीच्यांनीही साहित्य किंवा आर्थिक स्वरूपात आपला वाटा उचलला.
२६ तारखेला सकाळी मसुर पुलाव बनवण्या साठी लागणाऱ्या भाज्या आणि मसाल्यांची खरेदी उरकुन आचारी ठरलेल्या ठिकाणी पोचल्यावर अकरा वाजता आम्ही चार मित्र आणि दोन आचारी व त्यांच्या मदतीसाठी तीन कामगार असे एकुण नऊजण एक पजेरो आणि दुसरी जिनिओ पिकअप अशा दोन गाड्यांमधुन निघालो.
वाटेत वडखळला एका हॅाटेल व्यावसायीक मित्राकडुन मोठाली पातेली/टोप व ईतर भांडीकुंडी आणि गॅस सिलेंडर पिकअप मध्ये चढवून पुढे
अतिवृष्टीमुळे दुर्दशा झालेल्या मुंबई-गोवा हायवेवरच्या खड्ड्यांमधुन मार्गक्रमण करत दुपारी तीन वाजता एकदाचे महाडजवळ पोचलो.
महाडपासुन जवळपास तीन कि.मी. अलीकडे एका मित्राचा मेहुणा रहात असलेल्या ‘स्काय प्लाझा’ नावाच्या ईमारतीच्या पार्कींग मधल्या सर्व गाड्या बाहेर काढुन ती जागा साफसुफ करून आम्हाला जेवण बनवण्यासाठी त्या सोसायटी मधल्या रहिवाशांनी उपलब्ध करून दिली होती.
आचारी आणि त्यांचे मदतनीस स्वयंपाकाच्या तयारीला लागल्यावर आमच्याकडे बऱ्यापैकी थोडा मोकळा वेळ होता. तिथून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर प्राचीन ‘गांधारपाले’ लेणी असल्याचे कळल्यावर तो वेळ सत्कारणी लावण्यासाठी आम्ही चौघांनी लेण्यांकडे आमचा मोर्चा वळवला.
ह्या लेणीसमुहाजवळ त्यांच्याविषयी अधिकृत माहीती देणारे कुठलेही फलक पुरातत्व खात्यातर्फे लावलेले नाहीयेत. विकीपिडीया वरील माहीती नुसार ही लेणी ई.स. १३० च्या आसपास बौद्ध धर्मीय कंभोज वंशिय राजा विष्णु पुलित यांच्या कारकिर्दित निर्माण केली गेली.
जाणकार मिपाकरांनी वरील माहितीत अधिक भर घालावी अशी नम्र विनंती.
लेणी पाहुन साडेपाचच्या सुमारास परतलो तेव्हा पुलावचा पहिला घाणा काढण्यासाठी भलेमोठे पातेले पेटलेल्या शेगडीवर चढवले होते.
तासाभरात तयार झालेल्या पहिल्या घाण्यातील पुलावचे पॅकींग करून एक टीम दोन माहितगार स्थानीक तरूणांना सोबत घेऊन चार किमी अंतरावरच्या मदतीपासुन वंचीत राहीलेल्या गावात जाऊन गरमागरम ताजा पुलाव आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून आली.
अशाप्रकारे तीन घाण्यांमध्ये तयार केलेल्या मसुर पुलावच्या आठशे पिशव्या गरजु लोकांपर्यत पोहोचवून आमच्या मदतीसाठी सर्वतोपरी झटलेल्या सोसायटीतील सर्व रहिवाशांना कृतज्ञतेपोटी पुलाव खायला घालुन निघल्यावर घरी पोचायला रात्रीचे दोन वाजले.
(अशा पद्धतीने घाऊक प्रमाणात स्वादिष्ट मसुर पुलाव तयार करतानाचा व्हीडीओ मी चित्रीत केला आहे, पुढेमागे तो व्हिडीओ शेअर करीन.)
प्रचेतस
👌
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा