आणीबाणीची चाहूल- भाग ५
यापूर्वीचे लेखन
आणीबाणीची चाहूल- भाग १
आणीबाणीची चाहूल- भाग २
आणीबाणीची चाहूल- भाग ३
आणीबाणीची चाहूल- भाग ४
यशपाल कपूर यांची साक्ष
आपण मागच्या भागात बघितले की १८ फेब्रुवारी १९७५ रोजी न्यायालयात यशपाल कपूर यांना साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले. ते या खटल्यातील एक अतिशय महत्वाचे सा़क्षीदार होते. पूर्ण खटल्याचा निकाल त्यांच्या एका साक्षीवर फिरू शकेल इतकी महत्वाची भूमिका त्यांनी या प्रकरणात निभावली होती. त्यामुळे दोन्ही वकीलांनी या साक्षीला तितकेच गांभीर्याने घेतले. १८ तारखेला त्यांची साक्ष सुरू झाली ती दुसर्या दिवशी म्हणजे १९ तारखेलाही चालू राहिली. दोन्ही दिवशी आठ तास साक्ष आणि उलटतपासणी चालू होती. त्यांच्या साक्षीतले महत्वाचे भाग न्यायालयात चालतात त्याप्रमाणे (प्रश्नोत्तरे या स्वरूपात) इथे देतो.
सुरवात इंदिरा गांधींचे वकील एस.सी.खरे यांनी केली. त्यानंतर शांतीभूषण यांनी उलटतपासणी घेतली.
खरे: चौथी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर तुम्ही रायबरेलीला कधी गेला होतात का?
कपूरः ७ जानेवारी १९७१ ला मी रेल्वेमंत्री गुलझारीलाल नंदांबरोबर रायबरेलीला गेलो होतो. त्या दिवशी स्वातंत्र्यलढ्यातील हुताम्यांना श्रध्दांजली वाहायचा कार्यक्रम होता. तिथे मी अगदी एखाद-दीड मिनिटच बोललो असेन. आणि माझ्या भाषणात मी केवळ हुतात्म्यांना वंदन केले. निवडणुकांविषयी कसलाही उल्लेख केला नव्हता.
खरे: तुम्ही सरकारी नोकरीचा राजीनामा नक्की कधी दिलात?
कपूरः मी १३ जानेवारीला इंदिराजींशी माझ्या राजीनाम्याविषयी बोललो. तेव्हा इंदिराजींनी मला सचिव परमेश्वरनाथ हक्सर यांना भेटायला सांगितले. हक्सर यांनी मला एकच प्रश्न विचारला- तुमच्या राजीनाम्याविषयी इंदिराजींना माहित आहे का? मी होकारार्थी उत्तर दिल्यानंतर हक्सर म्हणाले- सर्व काही ठीक आहे. तुम्हाला सरकारी नोकरीतून पदमुक्त करण्यात येत आहे.
खरे: तुम्ही राजीनामापत्र १३ जानेवारीला सादर केलेत पण त्यावर तारीख १४ का टाकलीत?
कपूरः कारण माझा राजीनामा १४ तारखेपासून मंजूर व्हावा असे मला वाटत होते.
खरे: इंदिरा गांधींनी रायबरेलीतून निवडणुक लढवायचा निर्णय कधी घेतला?
कपूरः १ फेब्रुवारीला इंदिराजी रायबरेलीला गेल्या होत्या. तिथे त्यांनी रायबरेली जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांबरोबर आणि प्रदेशाध्यक्ष कमलापती त्रिपाठींबरोबर चर्चा केल्या. त्या थोड्या वेळ माझ्याशी पण बोलल्या. त्यानंतर त्यांनी रायबरेलीतून निवडणुक लढवायचे ठरविले.
खरे: तुम्ही १ फेब्रुवारीपर्यंत इंदिरा गांधींच्या प्रचारासाठी काही काम केले होते का?
कपूरः नाही. इंदिराजींनी मला काही काम करायला सांगितले नाही आणि मी पण केले नाही.
खरे: तसे असेल तर इंदिरा गांधींनी आपल्या निवडणुक प्रचाराचा हिशेब सादर केला त्यात १ फेब्रुवारीपूर्वी केलेल्या खर्चाचा समावेश कसा?
कपूरः त्याचे झाले असे की रायबरेलीतून जो कोणी उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी उपयोगी पडेल म्हणून रायबरेली जिल्हा काँग्रेस समितीने मतदारयाद्यांच्या प्रती मागवल्या होत्या. तो खर्च जिल्हा काँग्रेस समितीने केला असल्याने त्यासाठी त्यांना पैसे दिले जाणे भाग होते. म्हणून त्या खर्चाचाही समावेश इंदिराजींनी हिशेब सादर केला त्यात केला आहे.
एस.सी खरे यांनी प्रश्न विचारल्यावर शांतीभूषण यांनी यशपाल कपूर यांची उलटतपासणी घेतली.
शांतीभूषण: तुम्ही पंतप्रधान कार्यालयात नोकरी कधीपासून करू लागलात?
कपूरः १९५१ पासून.मी १९६७ पर्यंत तिथे नोकरीला होतो. त्यानंतर मी राजीनामा दिला पण स्वतः इंदिरा गांधींनी स्वतः मला परत बोलावून घेतल्यामुळे तीनच महिन्यात मी विशेष कार्यकारी अधिकारी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) म्हणून तिथे रूजू झालो.
शांतीभूषणः १९६७ मध्ये पण तुम्ही इंदिरा गांधींच्या निवडणुक प्रचाराचे काम करायला म्हणून सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होतात का?
कपूरः नाही. १९६७ मध्ये इंदिराजींनी मला प्रचाराचे काम करायला सांगितले नव्हते. पण मी ते स्वतःच केले. याचे कारण मला सार्वजनिक जीवनात यायची इच्छा होती आणि इंदिराजींच्या प्रचारासाठी उल्लेखनीय काम केल्यास भविष्यात मला विधानसभा/लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल ही आशा मला होती.
शांतीभूषणः तुम्ही १५ जानेवारीला रायबरेलीत होतात. जर इंदिरा गांधी तिथून निवडणुक लढवणार हे १ फेब्रुवारीला नक्की झाले असेल तर तुम्ही १५ जानेवारीला तिथे काय करत होतात?
कपूरः मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलापती त्रिपाठींना भेटलो. त्यांनी मला उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचा दौरा करायला सांगितले. रायबरेली राज्याच्या पूर्व भागात येत असल्याने मी तिकडे गेलो.
शांतीभूषणः पण २२ जानेवारीच्या स्थानिक वर्तमानपत्रात एक फोटो आला होता की यशपाल कपूर इंदिरा गांंधींचा निवडणुक प्रचार सुरू करायला रायबरेलीत ७० गाड्यांच्या ताफ्यासह दाखल झाले.
कपूरः असे काही झाले नव्हते. बातमी देणार्या वार्ताहाराने स्वतःच्या कल्पना लढवल्या असतील.
शांतीभूषण यांनी नंतर इंदिरा गांधींच्या निवडणुक प्रचारासाठीच्या खर्चाविषयी प्रश्न विचारले. तेव्हा यशपाल कपूर यांनी सांगितले की या खर्चाचा हिशेब काँग्रेस कार्यकर्ते गयाप्रसाद शुक्ल बघत होते.
शांतीभूषण (एका जीपच्या चालकाला १५ जानेवारी ते १ मार्च या काळात दिलेल्या पैशाची पावती दाखवत): इंदिरा गांधी जर १ फेब्रुवारीला उमेदवार झाल्या असतील तर चालकाला १५ जानेवारीपासून पैसे का दिले होते?
कपूरः हो. गयाप्रसाद शुक्ल यांनी मला सांगितले की जो कोणी काँग्रेस उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी जीप नंतर भाड्याने घेतल्या जाणारच होत्या. त्यासाठी १५ जानेवारीलाच चालक नियुक्त करण्यात आले होते.
या उलटतपासणीदरम्यान यशपाल कपूर यांची एक साक्षीदार म्हणून विश्वासार्हता नाही हे दाखवून द्यायला शांतीभूषण यांनी काही इतर प्रश्नही विचारले. त्यात एक प्रश्न होता की ते दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात नोकरी करत असतानाही १९७१ मध्ये त्यांचे नाव रायबरेलीच्या मतदारयादीत कसे. दुसरा प्रश्न होता- दिल्लीत गोल्फ लिंक या उच्चभ्रू भागात त्यांच्या पत्नीने ४ लाखांचे घर कसे खरेदी केले? त्यासाठी पैशाचा स्त्रोत काय होता?
परमेश्वर नारायण हक्सर यांनी साक्षीत सांगितले होते की त्यांनी १४ जानेवारीला यशपाल कपूरांचा राजीनामा तोंडी संमत केला. यशपाल कपूर यांनीही साक्षीत तेच सांगितले. अर्थातच राजीनामा तोंडी संमत करायला काही अर्थ नाही हे वेगळे सांगायलाच नको. मागे लिहिल्याप्रमाणे सरकारी गॅझेटमध्ये २५ जानेवारीला १४ जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने कपूर यांचा राजीनामा संमत करण्यात आला. आता असा राजीनामा पूर्वलक्षी प्रभावाने संमत करणे वैध नाही हे शांतीभूषण यांना दाखवून देता आले असते तर या खटल्याचे भवितव्य तिथेच ठरणार होते. कारण यशपाल कपूर यांनी २५ जानेवारीपूर्वीच इंदिरा गांधींच्या प्रचाराचे काम सुरू केले होते हे पुरेसे स्पष्ट होत होते. त्यातूनही २५ जानेवारीपर्यंत यशपाल कपूरांचा राजीनामा संमत केला गेला आहे असे गॅझेट नोटिफिकेशन निघाले नव्हते. यातून आपण अडचणीत येऊ शकतो हे कदाचित लक्षात आल्याने मग पूर्वलक्षी प्रभावाने राजीनामा संमत झाला असे नोटिफिकेशन काढणे आणि राजीनामा तोंडी संमत करण्यात आला अशी साक्ष हक्सर आणि कपूर या दोघांनीही देणे हे बनाव नंतर पश्चातबुद्धी म्हणून करण्यात आले असे दिसते.
जर इंदिरा गांधींनी १ फेब्रुवारीला रायबरेलीतून निवडणुक लढवायचे ठरविले असेल तर कपूर ७ जानेवारी आणि १५ जानेवारीला दोनदा इतर सगळी ठिकाणे सोडून रायबरेलीमध्येच काय करत होते हा प्रश्न पडतोच. तसेच २२ जानेवारीला कपूर इंदिरांच्या प्रचारासाठी गाड्यांचा ताफा घेऊन दाखल झाले ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये आली होती या प्रश्नाचेही समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाही. एकूणच पहिल्यांदा हक्सर आणि मग यशपाल कपूर यांच्या साक्षीनंतर इंदिरा गांधींची बाजू दुबळी पडायला लागली. तेव्हा आपली बाजू वाचवायला म्हणून बचावपक्षाने शेवटी स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधींना साक्षीदार म्हणून पाचारण करायचे ठरविले. पंडित कन्हैय्यालाल मिश्रा हे उत्तर प्रदेशातील एक आघाडीचे वकील काँग्रेस पक्षाला जवळचे होते. पूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे अॅडव्होकेट जनरल (केंद्रातील अॅटर्नी जनरलला समकक्ष) म्हणूनही काम बघितले होते. त्यांनी इंदिरांना तुम्ही साक्ष द्यायला न्यायालयात जाऊ नका, ती एक घोडचूक ठरेल असा स्पष्ट इशारा पत्र लिहून दिला. पण तो इंदिरांनी मानला नाही आणि त्याचे परिणाम त्यांना आणि एका अर्थी देशालाही भोगावे लागले.
इंदिरांची साक्ष त्यांच्या दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात घ्यावी अशी विनंती बचावपक्षाकडून करण्यात आली. पण ती न्या.सिन्हांनी अमान्य केली. त्यांनी स्पष्ट केले की इंदिरा पंतप्रधान असल्या तरी इतर कोणत्याही साक्षीदाराप्रमाणेच त्यांनाही न्यायालयात स्वतःच हजर राहावे लागेल. इंदिरा गांधींची साक्ष १८ मार्चला सुरू होणार होती. न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हांनी स्पष्ट आदेश दिले होते की इंदिरा गांधी न्यायालयात येतील तेव्हा उपस्थित असलेल्यांपैकी कोणीही उभे राहू नये आणि कोणीही टाळ्या वाजवू नयेत किंवा कोणत्याही घोषणा देऊ नयेत. इतर कोणत्याही साक्षीदाराप्रमाणेच इंदिरा गांधींनाही वागवण्यात यावे. मात्र त्यांना साक्षीदाराच्या पिंजर्यात बसायला विशेष आसनाची सोय करायला न्या.सिन्हांनी परवानगी दिली. हे विशेष आसन वकीलांच्या आसनापेक्षा जास्त उंचीवर असले तरी न्यायाधीशांच्या आसनापेक्षा कमी उंचीवर होते. अशी विशेष व्यवस्था पंतप्रधान इंदिरा गांधींसाठी करण्यात आपला काहीही आक्षेप नाही असे शांतीभूषण यांनी स्पष्ट केले.
या खटल्याच्या संदर्भात इंदिरा गांधींची साक्ष किती महत्वाची होती हे वेगळे सांगायलाच नको. त्यातून प्रथमच विद्यमान पंतप्रधान कोणत्या न्यायालयात साक्षीसाठी येणार असल्याने सगळ्या जगाचे लक्ष तिथे लागले होते. दोन्ही बाजूंकडून खलबते सुरू झाली. राजनारायण आणि शांतीभूषण यांच्या भेटींचा सपाटा लागला. अशा आणि इतरही खटल्यांमध्ये साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणे ही नेहमी केली जाणारी खेळी आहे. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी अविभाजित काँग्रेसचे मुख्यालय दिल्लीत जंतरमंतर येथे होते. पक्षात फूट पडल्यावर ते मुख्यालय इंदिरांविरोधी काँग्रेस(संघटना) ला दिले गेले होते. राजनारायण यांच्याकरवी काँग्रेस (संघटना) च्या नेत्यांना निरोप धाडला गेला आणि जंतरमंतर येथील कार्यालयातून इंदिरा गांधींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल असे काही मिळते का हे शोध घ्यायला सांगितले गेले. त्यातून इंदिरा गांधींना लिहिलेले एक पत्र शांतीभूषण यांच्या हाती पडले. गोष्ट होती १९५९ मधील. त्यावेळेस हिमाचल प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश होता आणि आताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील सिमला, कांगरा वगैरे भाग तेव्हा पंजाब राज्यात होते. त्या लहान हिमाचल प्रदेशाचे उपराज्यपाल होते उत्तर प्रदेशातील भदरी या ठिकाणचे माजी संस्थानिक बजरंग बहादूर सिंग. १९५९ मध्ये हिमाचल प्रदेशातील महासू लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली आणि त्यात काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. त्यावेळी इंदिरा गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा होत्या. या विजयानंतर उपराज्यपाल बजरंग बहादूर सिंग यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिले होते आणि त्यात म्हटले की 'या निवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे आणि मी माझी पहिली परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालो आहे'. वास्तविक उपराज्यपाल हे अराजकीय पद असते. अशा पदावरील व्यक्तीने पोटनिवडणुकीत कोणाचाही विजय झाला तरी त्यात विशेष रस घ्यायचे कारण नाही. त्यातही इंदिरा गांधींनी उपराज्यपालांना नक्की कोणते काम सांगितले होते की 'मी परीक्षा उत्तीर्ण झालो' असे उपराज्यपालांनी लिहावे हा प्रश्न उभा राहिलाच. हे पत्र शांतीभूषण वापरू शकत होते.
हळूहळू १८ मार्चचा दिवस उजाडला. पंतप्रधान इंदिरा गांधी न्यायालयात येणार म्हणून न्यायालयाच्या आवारात सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली. या खटल्यात निर्माण झालेल्या उत्सुकतेमुळे न्यायालयाच्या आवारात गर्दी होणे अपरिहार्य होते. त्यातून घोषणाबाजी वगैरे झाल्यास न्यायालयाच्या इतर कामकाजावर परिणाम व्हायला नको म्हणून न्या.सिन्हांनी इंदिरा गांधींची साक्ष टोकाच्या म्हणजे २४ क्रमांकाच्या खोलीत घ्यायचे ठरविले. इंदिरा गांधींच्या साक्षीच्या वेळी प्रत्यक्ष न्यायालयाच्या २४ क्रमांकाच्या खोलीत निवडक लोकांना प्रवेश दिला गेला. राजनारायण यांच्याबाजूने विरोधी पक्षांचे नेते मधू लिमये, श्यामनंदन मिश्रा, पिलू मोदी, ज्योतिर्मय बसू आणि रबी रे हे पण कामकाज बघायला प्रेक्षकांमध्ये होते. तर इंदिरा गांधींच्या बाजूने त्यांचे पुत्र राजीव गांधी आणि सून सोनिया गांधी न्यायालयात हजर होते.
इंदिरा गांधींनी आपल्या साक्षीत नक्की काय सांगितले? हे समजून घेण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल पुढच्या भागाची.
इंदिरांची साक्ष त्यांच्या दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात घ्यावी अशी विनंती बचावपक्षाकडून करण्यात आली. पण ती न्या.सिन्हांनी अमान्य केली.ही साक्ष न्यायालयात न घेता एखाद्या आयोगासमोर घेतली जावी अशी विनंती इंदिरा गांधींचे वकील खरे यांनी न्यायाधीश सिन्हांना केली होती. परंतु साक्षीदाराला फिर्यादी पक्षाने कोणते प्रश्न विचारायचे नाही हे ठरविण्याचे स्वातंत्र्य आयोगाला नसल्याने सिन्हांना ती विनंती अमान्य केली.इंदिरा गांधींच्या साक्षीच्या वेळी प्रत्यक्ष न्यायालयाच्या २४ क्रमांकाच्या खोलीत निवडक लोकांना प्रवेश दिला गेला. राजनारायण यांच्याबाजूने विरोधी पक्षांचे नेते मधू लिमये, श्यामनंदन मिश्रा, पिलू मोदी, ज्योतिर्मय बसू आणि रबी रे हे पण कामकाज बघायला प्रेक्षकांमध्ये होते. तर इंदिरा गांधींच्या बाजूने त्यांचे पुत्र राजीव गांधी आणि सून सोनिया गांधी न्यायालयात हजर होते.प्रत्यक्ष साक्षीच्या दिवशी पोलिस किंवा सुरक्षारक्षकांनी न्यायालयात येऊ नये असा सिन्हांनी आदेश काढला होता. इंदिरा गांधी न्यायालयात येताना त्यांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाच्या वकीलांनी त्यांच्याभोवती साखळी केली होती व त्यांच्या गराड्यात त्या न्यायालयात पोहोचल्या. साक्ष सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी एका फालतू प्रकाशनाचा वार्ताहर गोविंद मिश्रा याला एका गावठी पिस्तुलासह न्यायालयाच्या आवारात पकडण्यात आले.या विजयानंतर उपराज्यपाल बजरंग बहादूर सिंग यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिले होतेया पदाबद्दल कधी वाचले नाही. हे पद कशासाठी व कधीपर्यंत होते?