आणीबाणीची चाहूल- भाग ०
नमस्कार मंडळी,
बोका-ए-आझम हे मिपावरील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. त्याला मी अगदी दोन-तीन वेळेला भेटलो असेन आणि फोनवर फार तर सात-आठ वेळा बोलणे झाले असेल. तरीही आमच्या दोघांच्याही आवडीनिवडीचे विषय बर्यापैकी सारखे असल्याने त्याच्याशी माझी चांगली मैत्री झाली होती. २०१७ च्या सुमारास एकदा मिपावर कोणत्यातरी प्रतिसादात मी लिहिले होते की एकदा मला मिपावर स्वातंत्र्योत्तर भारताचा राजकीय इतिहास ही प्रदीर्घ लेखमाला लिहायची आहे. त्यानंतर त्याचा मला फोन आला होता आणि त्या लेखमालेसाठी त्यालाही लिहायला आवडेल असे त्याने मला सांगितले. त्याबद्दल आणखी दोन-तीनदा फोनवर बोलणे झाले तरी मी मुलखाचा आळशी असल्याने मीच चालढकल करत राहिलो. त्यातून पुढे या लेखमालेचे काहीच झाले नाही. नोव्हेंबर २०१८ मध्ये काळाने बोक्याला आपल्यापासून हिरावून नेले. मी पण मिपापासून २०१८ ते २०२१ या काळात दूर होतो.
फेब्रुवारी २०२१ मध्ये मी मिपावर परत आल्यापासून बोक्याशी या विषयावर बोलणे झाले होते त्याविषयी आपण काहीच केले नाही याची टोचणी लागली होती. स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय इतिहासावर लेखमाला लिहिणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. तेव्हा सगळ्या इतिहासावर नाही तरी स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक महत्वाचे पर्व- आणीबाणी याविषयी तरी काहीतरी लिहावे असे मी ठरविले. त्यातही १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची लोकसभेवर झालेली निवड रद्द ठरविणारा ऐतिहासिक निकाल दिला त्याविषयी काहीतरी लिहावे असे ठरविले. त्यातून या लेखमालेची कल्पना सुचली. गेल्या काही दिवसात मी पुढील दोन पुस्तके वाचली. ही लेखमाला त्या दोन पुस्तकांवर आणि थोडेफार इंटरनेटवर केलेल्या इतर शोधावर आधारीत असेलः
१. प्रशांत भूषण यांचे The Case That Shook India: The Verdict That Led To The Emergency
२. कुलदीप नय्यर यांचे Judgment: Inside Story of the Emergency in India .
खरं सांगायचं तर प्रशांत भूषण आणि कुलदीप नय्यर हे दोघेही मला आवडत नाहीत- म्हणजे त्यांचे राजकीय विचार मला आवडत नाहीत/ पटत नाहीत. तरीही या दोन पुस्तकांमध्ये 'फॅक्ट्स' म्हणजे घटना जशा घडल्या त्याचाच परामर्श आहे. त्यामुळे या दोन पुस्तकांना आधार घेण्यात मला तरी काही गैर वाटत नाही. तसेच १९७० ते १९७६-७७ पर्यंत इंदिरा गांधींच्या काँग्रेसकडून Socialist India नावाचे एक साप्ताहिक प्रसिध्द केले जायचे. इंदरकुमार गुजराल, नंदिनी सत्पथी वगैरे काँग्रेसचे नेते या साप्ताहिकाशी निगडीत होते. त्याचे अंक गुगल बुक्सवर बघायला मिळाले. त्याचाही संदर्भ घेतला आहे.
आताचा बेत असा आहे की १ जूनपासून लेखमालेचे भाग इथे टाकायला सुरवात करेन. १२ जूनला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला ४६ वर्षे पूर्ण होतील. त्या दिवशी तो निकाल आला हा भाग येईल. तो लेखमालेतील नववा भाग असेल. हे सगळे भाग लिहून तयार आहेत. १२ ते २५ जून १९७५ पर्यंत म्हणजे आणीबाणीची घोषणा होईपर्यंत नक्की काय घडामोडी घडल्या याविषयीही वेळ मिळाल्यास लिहिणार आहे. मात्र आणीबाणी लादली हा भाग बरोबर २५ जूनला येईलच याची खात्री आता देऊ शकत नाही कारण पुढचे भाग लिहून व्हायचे आहेत. कुलदीप नय्यर यांनी आणीबाणीवर इतरही काही पुस्तके लिहिली आहेत. ती वाचून त्या पुस्तकांचाही संदर्भ जमल्यास घेईन. पहिले १० भाग त्या खटल्याशी आणि निकालाशी संबंधित असल्याने त्यात कायदेशीर गोष्टी येतील. कायदा या विषयात मी कोणतेही शिक्षण घेतले नसले तरी त्या विषयात भरपूर रस मला आहे. हे भाग रटाळ आणि कंटाळवाणे होणार नाहीत याची शक्य तितकी काळजी घेऊन पहिले ९ भाग लिहून तयार आहेत. तसेच तेव्हाच्या घटनांमधील पात्रांचा आताच्या काळातील कोणाशी संबंध आढळला तर त्याविषयीही लिहिणार आहे.
तेव्हा बोका-ए-आझमच्या स्मृतीस अभिवादन करून या लेखमालेची सुरवात करत आहे. पहिल्या भागात भेटू १ जूनला.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennonकायदा या विषयात मी कोणतेही शिक्षण घेतले नसले तरी त्या विषयात भरपूर रस मला आहे.माझेही असेच आहे. मालिका विषय माझ्या जन्मापूर्वीचा असला तरी वाचायला आवडेल. पुढच्या भागाची वाट बघतोय.आणीबाणीवरील लेख हा आपल्या मनाच्या सच्चेपणाचा कस पाहणारे आव्हान असेल.म्हणजे आणिबाणी हा खूप चांगला निर्णय होता, ते अनुशासन पर्व होते, त्या काळात देशाची प्रचंड प्रगती झाली, आणिबाणीचे सर्व जनतेने उस्फूर्त स्वागत केले होते, त्या काळात जनता अत्यंत आनंदी होती, पोलिस अत्यंत सौजन्यशील होते, त्या काळात समाजहिताचे असंख्य निर्णय घेतले होते . . . असे लिहिले नाही तर ते लेखन खोटारडेपणा समजला जाईल.