Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

जोडीदार

ब
बिपीन सुरेश सांगळे
Tue, 05/11/2021 - 05:40
💬 16 प्रतिसाद
एक सूचना - सध्याच्या काळात , नकारात्मक , कोरोनाची पार्श्वभूमी असलेलं लेखन वाचू नये असं वाटू शकतं . त्यांनी कृपया ही कथा वाचू नये . ---------- जोडीदार --------- रूमवर लोळत पडलो होतो. बाकीची पोरं लॉकडाऊनला कंटाळून घरी गेलेली . उन्हाळ्याची दुपार . गरमीने नुसता जीव चाललेला . वर पंखा नावालाच फिरत होता . वारंच लागत नव्हतं . एकटं पडल्यासारखं वाटत होतं . पश्याचा फोन आला . लय जुना रूममेट . त्याचं नाव स्क्रीनवर बघून जीवाला बरं वाटलं . आणि मग डोकं फिरलं !... त्याने एक निरोप दिलेला. त्याचा एक मावसभाऊ याच शहरात राहायचा. त्याची आई गेलेली . मदतीला कोणी नाही अन अशावेळी कोणी येतही नाही . म्हणून मला जायला सांगितलं होतं . आता आली का पंचाईत ! तसा मी स्मशानभूमीत बऱ्याचदा गेलेलो आहे . पण मुळात तिथे जायलाच नको वाटतं - ते काय कॉलेज कॅन्टीन असतं का तरुण पोरा-पोरींनी भरलेलं ? आणि आत्ता या परिस्थितीत तर नकोच वाटतं . त्यात कोरोनाची भीती ! नाईलाजाने उठलो . मनात म्हणालो - पश्याचा भाऊ म्हणजे आपली आवडती मैत्रीण आहे असं समजू . खरं तर मी पश्याच्या भावाला कधी भेटलो नव्हतो की त्याचा नंबर माझ्याकडे नव्हता . पश्याने माझा नंबर त्याला दिला होता . परत पश्याचा फोन आला , ' डायरेक्ट स्मशान भूमीतच पोच . ते अजून अर्ध्या-एक तासाने तिथे येतील . ‘ आता थेट तिथेच जायचं तर मग मी कशाला पाहिजे ? तिथे माझी काय मदत होणार ? ... पण म्हणलं जाऊ दे . सध्या लोक मयतालाही येत नाहीत . जवळचेसुद्धा लोक टाळतात , घाबरतात जिवाला . काय करणार ? जो गेला तो सुटतो बाकीचेच अडकतात . मी निघालॊ . रस्ते सामसूम . माणसंच नाहीत . रस्त्यांवर स्मशानशांतता . स्मशानभूमी लांबूनच लक्षात येत होती .साऱ्या परिसरात धूरच धूर ! साला ! किती बॉड्या जळत असतील ? ... ते आत गेल्यावर कळलं . त्या वर वेटाळत पसरणाऱ्या धुराकडे पाहून डोक्यात काहीबाही वाटायला लागलं . स्पर्धा परीक्षांमुळे डोक्यात इतिहास घोळत असतो . आपल्या देशात कधी काळी सोन्याचा धूर निघायचा अन आता ? ... आत गेलो तर हे गर्दी ! एकदम माणसात आल्यासारखं वाटलं . माणसात ? ... की ? नकोसा वाटणारा घाण आवाज करत , सतत येणाऱ्या अँब्युलन्स , त्यांचे फटाकफट दार उघडण्याचे , स्ट्रेचर खाली ठेवण्याचे आवाज . कुठे नातेवाईकांचे आक्रोश तर कुठे सुकलेले अश्रू . नातेवाईक कमी असले तरी बॉड्याच एवढ्या की स्मशानभूमी भरून गेलेली . लसीकरणाला वेटिंग तसं इथं जाळून घ्यायलाही वेटिंग ! ... जे जिवंतपणी तेच मेल्यानंतरही ! ... संध्याकाळ वाढत चाललेली . वर झाडांवर वटवाघळं . घराकडे परतणारी पाखरं . कावळ्यांची कावकाव . पण ती पाखरं स्थिर नव्हती . धुरामुळे त्यांना नको होत असावं . पण आपलं घरटं सोडून ती जाणार तरी कुठे ? कोरोनामुळे माणसं घरात दडली होती . अन त्याच कोरोनामुळे ह्या पाखरांना घर सोडावं लागणार होतं . मी एका जागी बसून कंटाळलो . हा पश्याचा भाऊ कुठं मेला होता कोणास ठाऊक ? आपल्या तोंडात हे असे शब्द बसलेले असतात , कुठे मेलाय ? - पण त्या जागेत माझे ते शब्द मलाच आवडले नाहीत . पुढे गेलो . एक तरुण मुलगी . एकटीच . रडणारी .तिला विचारलं, तर म्हणाली ," आई गेलीये . वडील दवाखान्यात आहेत . मदतीला कोणीच येत नाही . पण इथली व्यवस्था स्वयंसेवक बघताहेत . " मी सुन्न होऊन पुढे गेलो . भिंतीवर रंगवलेले तुकाराम महाराज अन त्यांचे अभंग दोन्ही काळवंडलेले होते . पण माणुसकी अजून पूर्ण काळवंडलेली नव्हती . बऱ्याच संस्था कामासाठी पुढे सरसावलेल्या . कट्ट्याला टेकून एक आजोबा एकटेच बसलेले. पांढरी गांधी टोपी. पांढरंच धोतर . नजर शून्यात , कसंतरीच झालं म्हाताऱ्याकडे बघून . आज्याचीच आठवण झाली . मी जवळ गेलो , म्हणालो , " बाबा " . त्याने नजर वर उचलली . " काही मदत पाहिजे का ? " " नगं , काय नगं ". " कोण गेलंय तुमचं ? " " आमची मंडळी गेली दादा, " त्यांनी लांबवर बोट दाखवलं, " संस्थेचे लोक करत्यात सगळं ” . त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं ," शेवटच्या टायमालाबी कोणच नाय ! " मी म्हणालो , " बाबा, रडू नका , तुम्ही तरी आहात ना ! " " मला तर यायलाच लागणार . माझी मंडळी म्हंजे जन्माची जोडीदार . शेवटपर्यंत साथ द्यायलाच हवी ना . " मला पुढे काय बोलावं ते सुचेना . तेच पुढे म्हणाले , "आत्ता दोन आठवड्यांपूर्वी मी गेलो ,त्या टायमाला ती आली होती . आता ती गेली तर , मला तर यायलाच हवं ना ! " ... =\=\=\=

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6955 views

💬 प्रतिसाद (16)
आ
आनन्दा Tue, 05/11/2021 - 06:44 नवीन
धक्का भारी होता.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 05/11/2021 - 06:57 नवीन
हो ना..किती आत्मे असेच अतृप्त फिरत असतील.
  • Log in or register to post comments
व
वकील साहेब Tue, 05/11/2021 - 11:46 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 05/11/2021 - 17:13 नवीन
आनंदा भक्ती वकील साहेब आणि इतर वाचक धन्यवाद
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Tue, 05/11/2021 - 17:45 नवीन
रुम वरचा पोऱ्या पण भुत आहे, ती पोरगी पण भुतं आहे, पशा पण मेलाय. संस्थेची माणसं तेवढी जिवंत आहेत.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 05/11/2021 - 18:05 नवीन
आपल्याला दिसत नाही, या अज्ञानात सुख मानायचं.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Wed, 05/12/2021 - 18:18 नवीन
मंडळी लेखनाचा आनंद आहे पण विषयाचा नाही . काही विचित्र संवेदना ...
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Wed, 05/12/2021 - 18:18 नवीन
तुषार आभारी आहे
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Wed, 05/12/2021 - 18:19 नवीन
भीमराव आभारी आहे फक्त एक - आपली प्रतिक्रिया नीटशी कळली नाही .
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 05/13/2021 - 06:39 नवीन
खतरनाक ..... !

😨

  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 05/13/2021 - 15:14 नवीन
लिखाण अत्यंत वास्तवदर्शी धूर, पाखरं, काळवंडलेले अभंग वगैरे वर्णन वाचून अगदी परीस्थिती डोळ्यासमोर उभी राहीली. पण खरं सांगु शेवटचा धक्का आवडला नाही. लेख इतका प्रत्ययकारी आहे की या कलाटणीची माझ्या मते तरी गरज नव्हती.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 05/15/2021 - 06:39 नवीन
मलाही असेच वाटते....
  • Log in or register to post comments
स
सुरिया गुरुवार, 05/13/2021 - 19:38 नवीन
अप्रतिम लेखन
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Fri, 05/14/2021 - 07:02 नवीन
मानलं!
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Fri, 05/14/2021 - 18:02 नवीन
चौथा कोनाडा सुरिया शानबा आणि सौंदाळा आभारी आहे .
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Fri, 05/14/2021 - 18:05 नवीन
सौंदाळा आभारी आहे . अन थोडा सहमत ही तुम्ही म्हणता त्या पद्धतीनेही कथा उभी राहू शकली असती .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 11 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 25 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 27 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा