Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अपवाद

च
चंद्रकांत
Sun, 05/09/2021 - 17:40
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. आनंदाची अभिधाने आणि समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर. रंग येथून तेथून सगळीकडे सारखे असले, तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या असतात. जगण्यावर चढलेला स्वभिमानाचा रंग अन् आयुष्याला लागलेला मिंधेपणाचा रंग सारखा कसा असेल? खरं हेही आहे की, लाचारीचा रंग जगण्यावर चढला की, सगळेच रंग विस्मरणात जातात अन् माखून घेतलेला रंग अधिक गहिरा होत जातो. मुखवटे देखणे वाटायला लागले की, चेहरे विस्मरणात जातात. मन गढूळलं की, जगण्यातलं नितळपण निरोप घेतं. विलोभनीय विभ्रमांनी संमोहित करणाऱ्या निसर्गातील रंगांचं कोणतंही अप्रूप नाही उरत. मिंधेपणाचा रंग एकदाका आयुष्यावर चढला की, विचारांचं नानाविध रंगात न्हाऊन निघणं थांबतं अन् मिंधेपणाच्या माखल्या रंगांना देखणे करण्याच्या कवायतीत मूळचं सौंदर्य करपतं. जगणं समृद्ध करू पाहणारी विचारविलसिते परिघ हरवतात अन् विकारांची वर्तुळे भक्कम होत राहतात. विचारांनी विस्मरणाचा रंग धारण केला की, मेंदू बधिर होतो अन् मन सैरभैर. अशावेळी मनगट खड्गाचं धारदार पातं पेलण्याऐवजी पुढ्यात पसरवण्यात धन्यता मानतं. याचक बनून पसरवलेल्या हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेले हात अधिक देखणे असतात, भलेही ते मळले असतील. विचारांनी लाचारीची वसने परिधान केली की, विवेक आपलं विश्व हरवतो आणि माणसं आपल्या अस्मिता. अविवेकाच्या वाती उजळू लागल्या की, अस्मितेचे रंग विटू लागतात. अहंपणाच्या इमल्यांना सांभाळणाऱ्यांच्या महाली आत्मसन्मान गहाण पडला की, आयुष्याचे अर्थपूर्ण असण्याचे संदर्भ साखळीतून सुटतात. सन्मानाचा कणा अन् जगण्याचा बाणा उसवतो. आशाळभूतपणे कुणाच्या पुढ्यात उभं असलेलं अधोमुख वदन आपल्याला कणा असल्याचे आठवू देत नाही. व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे आसपास असायला लागतात, भलेही ती संख्येने नगण्य असतील. काळाच्या कोणत्याही तुकड्यात शोधून पाहिलं तरी त्यांची वानवा असलेलंच दिसेल. गढूळलेला प्रवाह पुढे सरकत नाही तोपर्यंत नितळपणाच्या परिभाषा त्याच्या ललाटी कोरता नाही येत. त्याकरिता त्याला वाहते राहावे लागते. वाहता वाहता आरस्पानी होता येतं, फक्त मार्ग तेवढा गवसत राहावा. कणा असलेली माणसे संख्येने अधिक होत नाहीत, तोपर्यंत प्रयासांच्या परिभाषांना पूर्णविराम नाही देता येत. अविचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतच राहतात. हे भ्रमण अज्ञानाने असेल किंवा अगतिकतेमुळे. कारणे काही असोत, त्याभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांची वानवा कधीच नसते अन् संख्याही दुर्लक्षिण्यासारखी. हे अप्रिय पण सत्य आहे. विश्वाच्या वर्तुळात वसलेल्या कोणत्याही परगण्यात वर्तनव्यवहारांबाबत प्रवाद शोधलेच तर अगणित गवसतील, वादही विपुल असतात. हे असं काही असलं तरी अपवादही असतातच. वाद, विसंवाद, वितंडवाद असणं जेवढं स्वाभाविक, तसं अपवाद असणंही सहज आहे. अपवाद संवाद सकारात्मक दिशेने सरकण्याचं सम्यक कारण असू शकतात. ते आहेत म्हणून प्रयासांच्या परिभाषा परत परत पेरता येतात. आशेचे अंकुर अगत्याने जोपासता येतात. पेरलेलं उगवतं, पण सोबत तणकटही दणकून येतं. अविचारांचं तण वेळीच वेगळं करावं लागतं अन्यथा पिकाच्या आयुष्याचे अर्थ हरवतात अन् उरतात निरर्थक अवशेष, जे उमेदीचे कुठलेच अन्वयार्थ शेष राहू देत नाहीत. विकल्पांचं तण वेगळं करण्यासाठी विचार जागे असायला लागतात. विचारविश्व समृद्ध करण्यासाठी संवेदनांचे किनारे धरून वाहता यायला हवं. प्रवाहासोबत वाहणारे अगणित असतात. प्रवाहाच्या विरोधात पोहणारेही असतात; पण प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करणारे किती असतात? असं करणं सगळ्यांनाच अवगत असतं असं नाही. जगण्यात सत्त्व असलं की, स्वत्वाचे अन्वयार्थ आकळतात. स्वत्व सोबत असणारी संवेदनशील मने तत्त्वांची प्रयोजने अधोरेखित करतात, भले ते अपवाद असतील. अपवाद प्रवादांना पर्याय देण्यास पर्याप्त असतात, नाही का? - चंद्रकांत चव्हाण ••

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1137 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा