तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति
तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति
कोव्हीड काळातील तीन अनुभव
१) आमचे एक कौटुंबिक परिवार( family friend) मित्र. नवरा आणि बायको उच्च शिक्षित आणि दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर. माझी पत्नी त्यांची फॅमिली डॉक्टर. आमची मैत्री बऱ्याच वर्षांपासून १३-१४ पेक्षा जास्त.
एक दिवस हि मैत्रीण माझ्या पत्नी कडे आली आणि सांगू लागली, आमच्या बाबांचे इच्छापत्र (will) केलेले आहे. त्यावर त्यांनी हे इच्छापत्र (will) मानसिक सुस्थितीत असताना केलेले आहे अशी डॉक्टर म्हणून तुझी सही पाहिजे.
हिचे सासरे किमान १२ वर्षांपासून अंथरुणावर खिळून आहेत आणि नैराश्याच्या(depression) आजारासाठी मनोविकार तज्ञाकडून गेली ५-६ वर्षे औषध घेत आहेत.
(हि गोष्ट त्यांनी पत्नीला सांगितली नव्हती पण मागे एकदा दोनदा पत्नी त्यांना घरी तपासण्यास गेली असता औषधे कोणती चालू आहेत हे विचारल्यावर ते समजून आले).
पत्नी ने विचारले कि सासऱ्यांची मानसिक स्थिती पूर्ण सुदृढ आहे हे कसे लिहून देणार? कारण ते गेली काही वर्षे मानसिक सुस्थितीत नाहीत.
मैत्रीण सांगू लागली कि आम्ही त्यांना सांगितले आहे कि इच्छापत्रात काय लिहिलंय ते आणि त्याला त्यांची संमती आहे.
पत्नी म्हणाली पण तुझ्या नणंदेने आक्षेप घेतला तर? मैत्रीण म्हणाली नाही ती आक्षेप घेणार नाही, मला माहिती आहे.
पत्नी म्हणाली, 'उद्या तुझ्या नणंदेने न्यायालयात सांगितले कि गेली ५-६ वर्षे आमचे बाबा नैराश्यावर उपचार घेत आहेत त्यामुळे त्यांनी केलेले इच्छापत्र कमकुवत मानसिक स्थितीत केलेलं आहे म्हणून अग्राह्य आहे तर मी तोंडघशी पडेन आणि खोटे प्रमाणपत्र दिल्याबद्दल उगाच कायद्याच्या कचाट्यात पडेन.
मैत्रीण नाही असं काहीहि होणार नाही. पत्नी म्हणाली कि त्या मनोविकार तज्ज्ञाकडून जो गेले ५-६ वर्षे इलाज करतो आहे त्याच्याकडून तू ही सही घेऊ शकतेस.
पत्नीने असे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.
यानंतर गेले ७-८ महिने हे कुटुंब आमच्या संपर्कात नाही. त्यांनी आमच्याशी बोलणे बंद केले आहे. अन्यथा आठवड्यात एखादे वेळेस फोन तरी होत असे
२) एक आमच्या वडिलांचे स्नेही अतिवरिष्ठ नागरिक (वय ८० च्यावर) .अतिशय अहंमन्य आणि अतिशहाणा माणूस असे वडिलांचे मत. माझी पत्नी त्यांची फॅमिली डॉक्टर. याना बऱ्याच वर्षांपासून मधुमेह आहे. नियंत्रणात नाही म्हणून पत्नीने त्यांना अनेक वेळेस तज्ञ माणसाकडे दाखवा असे सांगितले होते पण हे महाशय स्वतः संस्कृतचे अभ्यासक असल्याने स्वतःच आयुर्वेदाची पुस्तके वाचून स्वतः वर उपचार करत होते.
याना खोकला झाला. पत्नीने त्यांना कोव्हीडची चाचणी करायला सांगितली आणि त्यांना तुमचा मधुमेह पण नियंत्रणात आणा असे सांगितले. या महाशयांनी दर्पोक्ती केली कि मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात यांचा एक विद्यार्थी तज्ञ आहे त्याला नुसता एक फोन केला कि तो घरी येऊन माझा इलाज करेल. त्यांनी पत्नीसमोर त्याला फोन लावला त्याने तो उचलला नाही म्हणून यांनी त्याला संदेश पाठवला. त्याने तो (पुढचे सात दिवस तरी) वाचलाही नव्हता त्यांनी कोव्हीडची चाचणी केली नाही.
तीन दिवसांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेंव्हा यांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांच्या मुलाने पत्नीला सांगितले, त्यावर पत्नी म्हणाली त्यांची कोव्हीड चाचणी केलेली नसेल तर त्यांना रुग्णालयात घेणार नाहीत.
मग त्यांनी चाचणी केली तिचा अहवाल संध्याकाळी आला त्यात तो पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजनचे प्रमाण ९० च्या खाली आले होते.
त्यांना रुग्णालयात भरती करायला सांगितले. यांचा मुलगा म्हणाला आम्ही फोर्टिस मध्ये भरती करतो. पत्नी म्हणाली तुम्हाला हवे तेथे पण लवकरात लवकर भरती करा. पण फोर्टिस मध्ये जागा नव्हतीच. मग हा मुलगा परत फोन करून फोर्टिस मध्ये खाट मिळवून द्या सांगू लागला.
त्याला सांगितले कि सध्या तुम्हाला मिळेल तिथे भरती व्हा. याचि आणि याच्या वडिलांची तयारी नव्हती. पत्नीने कळकळीने सांगितले कि पहिल्याने भरती व्हा मग कुठे हलवता येईल का ते पाहू.
यांनी काहीच केले नाही.
मग रात्री १० वाजता श्वास घ्यायला अधिकच त्रास होऊ लागला.ऑक्सिजन ची पातळी ८५ च्या खाली आलेली म्हणून परत यांनी फोन केला.
पत्नीने माझ्या मित्राला सांगून दुसऱ्या रुग्णालयात त्यांच्या भरतीची सोय केली. तेथले तज्ञ म्हणाले नाही तरी त्यांना तुम्ही हलवता आहात तर त्यांचा सीटी स्कॅन करूनच या. त्यासाठी रात्री १२ वाजताची सीटी स्कॅनची अपॉइंटमेंट घेतली. सी टी स्कॅन झाल्यावर रात्री साडे बारा वाजता त्याचा कच्चा रिपोर्टहि घेऊन हे भरती झाले. तेथे त्यांना ऑक्सिजन लावला गेला. डेक्सामेथासोन, रेम डेसीव्हीर, क्लेक्झेन इ सर्व उपचार सुरु झाले.
रुग्णालयात केलेल्या चाचण्यांत यांच्या रक्तातील ग्लुकोज ३८० पर्यंत पोहोचलेली होती. एच बी १ सी १०.५ होते (म्हणजेच गेल्या तीन महिन्यातील सरासरी रक्तातील ग्लुकोज २५० च्या वर होती).
दुसऱ्या दिवशी त्यांना थोडा आराम वाटू लागला. तेंव्हा हे महाशय तेथे आरडा ओरडा करू लागले. सिस्टर माझ्याकडे लक्ष देत नाहीत. काल रात्रीची चादर अजून बदलली नाही. रुग्णालय स्वच्छ नाही. मला घरी पाठवा मी तेथे आपोआप ठीक होईन.
यावर यांच्या चिरंजीवांनी मला फोन केला आणि म्हणाले त्यांना तेथून फोर्टिस मध्ये हलवा. मी त्यांना स्वच्छपणे सांगितले कि फोर्टिस मध्ये अजिबात जागा नाही. पण तुम्हाला जायचे असेल तर "तुम्ही तेथे जागा मिळवा" आणि खुशाल जा. त्यावर ते मला दोष द्यायला लागले कि हे रुग्णालय चांगले नाही तुम्ही कशाला इथे पाठवले? यात तुमचा निष्काळजीपणा आहे. तुम्ही त्यांना ऑक्सिजन लावून घरी पाठवा.
मग मात्र माझा संयम सुटला.
मी त्या चिरंजीवांना स्पष्टपणे म्हणालो कि एकतर तुमच्या वडलांना रक्तातील साखर अफाट वाढलेली असताना तज्ञ माणसाला दाखवायला सांगून तुम्ही दाखवले नाही. त्यावर तो म्हणाला "एकच दिवस झाला. त्यांनी संदेश पाहिला नाही".
मी आवाज चढवून म्हटले कि तीन महिन्याची साखर २५० च्या वर आहे याचा अर्थ तुमच्या वडिलांनीच नव्हे तर तुम्ही पण निष्काळजीपणा दाखवला आहे आणि उगाच आमच्यावर दोष टाकू नका.
वडिलांना ऑक्सिजन वर घरी पाठवले तर त्यांची काळजी कोण घेणार आहे आणि तुम्हाला सर्वाना क्वारंटाईन केलेले आहे.तुमच्या आईचा पण rtpcr पॉसिटीव्ह आहे म्हणू तिचा घरी उपचार चालू आहे.
बाहेरचा कोण माणूस येउन त्यांची काळजी घेणार आहे? उगाच उंटावरून शेळ्या हाकू नका. आणि त्यातून तुम्हाला त्या रुग्णालयातून डिस्चार्ज घययचा असेल तर वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध( against medical advice) घ्या आणि जेथे उपचार करायचेत ते करा. मला काहीही घेणं देणं नाही.
मग यांचा आवाज खाली आला.
पुढचे चार दिवस अक्षरशः दिवस रात्री अपरात्री केंव्हाही फोन करून त्यांनी आम्हाला सळो कि पळो करून सोडले. आठवड्याभराने जेंव्हा वडील डिस्चार्ज घेऊन घरी आले. तेंव्हा या महाशयांचे चिरंजीव मोठ्या आढ्यतेने म्हणाले कि तुम्हाला फोनवर त्रास दिला त्याबद्दल मी तुम्हाला ३ हजार रुपये देणार आहे.
त्यावर माझ्या पत्नीने सांगितले कि तुमचे पाच दिवसात ३५ फोन कॉल झाले आहेत. इतर वेळेस मी ३०० रुपये घेते पण ते माझे जुने पेशंट आहेत म्हणून २०० रुपये प्रमाणे तुम्ही मला सात हजार रुपये द्यायचे.
यावर हे महाशय एवढे पैसे होतात कसे होतात म्हणून विचारत होते?
पत्नी म्हणाली रात्री बारा वाजता तुमची सीटी स्कॅन ची अपॉइंटमेंट घेऊन त्याचा अहवाल रात्री साडे बारा वाजता तुम्हाला माझे मिस्टर रेडिओलॉजिस्ट आहेत म्हणून मिळाला. रुगालयात अपरात्री एक वाजता त्यांनी माझ्या शब्दामुळे बेड रिकामा ठेवला होता. रुग्णालयात तुमचे बिल किती झाले हे तुम्हाला माहिती आहे. माझे वाजवी दर सुद्धा तुम्हाला जास्त वाटत आहेत?
दुसऱ्या दिवशी त्यांनी ७ हजाराचा चेक आणून दिला. वडिलांच्या प्रकृतीबद्दल किंवा तुमच्या मुळे गोष्टी सुसह्य झाल्या याबद्दल एक शब्द नाही.
याला आता ६ महिने होऊन गेले यांनतर हे महाशय पत्नीकडे परत आलेले नाहीत.
मी तर पत्नीला म्हणालो कि असला रुग्ण नाही आला म्हणून आपणच आनंद साजरा करायला पाहिजे.
३) आमच्या घराच्या समोरच्या घरात राहणारे कुटुंब सख्खे शेजारी. आम्हाला सर्वाना ऑगस्ट मध्ये करोना झाला म्हणून आम्ही सर्व १७ दिवस क्वारंटाईन होतो.
तेंव्हा यांनी एकदाही साधे विचारले नाही कि साधा एक फोनहि केला नाही कि तुम्हाला काही हवे आहे का?
यानंतर यांची पत्नी गरोदर राहिली. त्यांच्या स्त्रीरोग तज्ञाने सोनोग्राफी साठी माझ्याकडे पाठवले. तेंव्हा बाळाची वाढ नीट होत नाहीये असे सोनोग्राफीत मला दिसून आले. यावर त्यांच्या स्त्रीरोग तज्ञाने संपूर्णपणे विश्रांती( complete bed rest) घ्यायला सांगितले आहे.
सध्या १८ एप्रिलपासून मुंबईत लॉकडाऊन लावले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्व घरकामाला येणारी मुलगी कळव्या वरुन येत असे तिला लोकल ने प्रवासास बंदी केली आहे.
यासाठी हे महाराज आमच्या कडे येऊन विचारू लागले कि तुम्ही तिला सर्टिफिकेट द्याल का? पत्नीने विचारले कसले सर्टिफिकेट?
त्यावर हे महाराज म्हणाले कि "ती तुमच्या दवाखान्यात काम करते आहे" म्हणून सर्टिफिकेट दिले तर तिला लोकल ने प्रवास करता येईल.
पत्नी म्हणाली असे सर्टिफिकेट कसे देता येईल?
एक तर माझ्या दवाखान्याच्या लेटरहेड वर ते सर्टिफिकेट द्यावे लागते त्यावर तिचा फोटो आधार कार्ड नंबर ती माझ्या कडे केंव्हा पासून कामाला आहे असे सर्व लिहून द्यावे लागते.
त्यातून अशी खोटी सर्टिफिकेट घेऊन लोक प्रवास करतात यामुळे आठवड्यात दोन वेळेस रेल्वेत तपासणी होते तेथे हि मुलगी काय सांगणार? तिने खरे सांगितले कि पोलीस माझ्या दवाखान्यात येऊन खोटे सर्टिफिकेट दिल्याबद्दल मला जबाबदार धरुन कार्यवाही करणार आणि तुम्ही मात्र नामानिराळे राहणार.
हे सर्व कशाला तर तिला बसप्रवासाचे पैसे द्यायला नकोत म्हणून?
तो मान खाली घालून निघून गेला.
पत्नी मला म्हणाली कि एक तर त्याने आपल्याला गरज होती तेंव्हा साधा फोन करण्याचे सौजन्य दाखवले नाही आणि असे खोटे सर्टिफिकेट द्या म्हणून बिनधास्तपणे आपल्याला विचारायला याची जीभ कशी रेटली?
मी तिला म्हणालो चमडी जाये पर दमडी न जाये अशा मनोवृत्तीची हि माणसं आहेत. याना जनाचीच नाही तर मनाचीही लाज नसते.
तिन्ही उदाहरणे गेल्या आठ महिन्यातील आहेत.
लबाडी त्यांनी करायची आणि त्याची लाज किंवा टोचणी तुम्हालाच लावायची कि एवढी साधी गोष्ट तुम्हाला डॉक्टर म्हणून आमच्यासाठी करता येत नाही
तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति
आत्मानं पीडयेत यच्च तत्प्रयत्नेन वर्जयेत.
म्हणजेच
असेच काम करा ज्याने तुमच्या आत्म्याला संतोष पोचेल
आणि
ज्याने तुमच्या आत्म्याला क्लेश होईल असे काम प्रयत्नपूर्वक टाळावे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja