मुंबई सागा: काल, कथा आणि कलेचे मातृभगिनी एकत्रीकरण
डॉन लोकांना मुंबईचे प्रेम अफाट. कींबहुना डॉन फक्त मुंबईवरच राज करतात, ऐकलात का कधी चैन्नैचा डॉनाण्णा कींवा कोलकात्याच्या डोनबाबू? भाई किंवा डॉन शोभतो मुंबईतच. मग अशा ह्या मुंबैतल्या बॉलीवुडाला मुंबैच्या गँगस्टरांचे प्रेम जरा जास्तच. कसा का असेना, काही का करेना आणि कसा का मरेना, पिक्चरमध्ये त्याला हिरो बनवणे म्हणजे गल्ल्याची फुल्ल वसूली. स्टार्टींगला गरीबीत झालेला अन्याय, तेंव्हाही साथ देणारे यार दोस्त, अन्याय करणार्याचे हात पाय तोडून किंवा जीवे मारुन केलेला प्रतिकार, ह्या प्रतिकाराच्या गेटपासवर अंडरवर्ल्डात झालेली एन्ट्री, दुशमनोका दुशमन दोस्त ह्या न्यायाने वाढलेले नेटवर्क, कमाई, व्यसने, जीव लावणारी आयटम अथवा हिरवीन कींवा टू इन वन, "फॅमिलीको बीचमे नई लानेका, जबान, उसूल, फर्ज, वादा अशा जिर्यामोहर्या सोबत थोडी सर्व धर्म सम्भावाची फोडणी, त्यात शिंदे पाटील कुलकर्णी अशा तत्सम मराठी आडनावाचे भ्र्ष्ट पोलीस आणि राजकारणी मंडळी, त्यांच्या आपासातल्या टिपा किंवा एखाद्या दगाबाजीने चार पाच डॉयलॉग हाणत द एन्ड ची पाटी ओढायची. ह्याच रेसिपीवर मस्तान झाला, वरदा झाला, डॅडी झाला, माया झाला, मन्या झाला, कासकराचा पोरगा तर वेगवेगळ्या रुपात, वेगवेगळ्या कारवायात दाखवून झाला. आता आला अमर नाईक.
मुंबई सागा ह्या सव्वादोन तासाच्या छळवादात ८० ते ९० च्या दशकातली मुंबईतला गँगस्टर अमर नाईकाची कथा ह्याच मसाल्यात घोळलेली आहे. बॉलीवुडकरांचे आर्ट डायरेक्टर आणि इतर वेषभुषा वगैरे बघणारे पब्लिक पिरियड पिक्चर करताना टाईमलाईन ह्या गोष्टींना फारसे महत्त्व देत नाहीत हे आधीही सिध्द झालेले पुन्हा सिध्द झाले आहे. रस्त्यावर चार पाच अॅम्बेसेडर आणि सायकली दिसल्या आणि फ्रेम जर सेपीया केली की काळ ४० वर्षे मागे जातो इतकेच त्यांना माहीत. भले मग त्यातली अॅम्बेसेडर इसुझु हे १९९२ ला आलेले मॉडेल १९८० चे म्हणून खपून जाते.
बरं वाहनांचं सोडलं तरी जुन्या इमारती मुंबईत काही तशाच अवतारात शिल्लक राहिल्यात म्हणून खालच्या मजल्यावरचे डिजिटल बोर्ड दिसावेत तेही ८० च्या दशकात? कपडे आणि हेअरस्टाईलचे तसेच. भाषा आणि शिव्याही आधुनिक असताना नुसते मोठे कल्ले ठेवले की ८० साल दिसावे म्हणजे फारच. परवाच आलेला बिग बुल काय किंवा इथे काय. डिटेलिंग आणि अभ्यास फक्त हिरोच्या स्टाइलमध्ये.
अर्थात चित्रपट संजय गुप्ता सारख्या दिग्दर्शकाचा म्हणजे काय बोलायचे. ज्याची जंदगी संजूबाबा, सुनीलआण्णा, जॉनभाई सारख्या अभिनयमाठांना नुसते स्लोमोशनमध्ये चालवून आणि फायटिंगच्या नावाखाली पालापाचोळा उडवण्यात गेली तेथे काळ, कथा आणि कॅरेक्टरचा अभ्यास म्हणजे ह्यॅ ह्यॅ ह्यॅ. आठवा तो अंगावर काटे आणणारा कांटे. पात्रांच्या केवळ इंट्रोवर घातलेला एक तास आणि उरलेल्या दीड तासात त्याच पात्रांनी केलेली हॉलीवुडी प्लॉटची केलेली बॉलीवुडी माती. आठवा तो संजूबाबाची स्टायलिश व्यसने ग्लोरीफाय करण्यासाठीच काढलेला मुसाफिर आणि जिंदा. ह्या मुंबई सागातही पात्रे तशीच येतात, स्टाइल मारतात आणि स्टाइलीत मारतात मरतात. सत्य कहाणीवर आधारीत म्हणले तरी गुप्तासायबांना मूळ कथेशी देणेघेणे नसते.
कथा मुंबईची म्हणल्यावर बॉलीवुडकरांनी मराठीची एक केलेली तर ओघाने आलेच. पकिया, गोटीया, मानिया हे तर आम्ही फार आधीच स्वीकारले आहे. मांजरेकर अन अमोल गुप्तेसारखी काही मंडळी बोलतात मराठी पण बाकीच्यांचे काय? सुरुवातच अमर नाईकाचे नाव चक्क अमर्त्य राव. अहो इथे काय भाईगिरीतले नोबेल मिळवायचेय काय? का कोथरुडात भाईगीरी करायचीय? नाव काय तर अमर्त्य म्हणे. मांजरेकर एकटे त्याला अमर म्हणतात. बाकीचे अमरत्या. सुरुवातीला वाटते तसे हे राव पण आडनाव नाही बरं का. आडनाव नाईक. ते ही त्याचा भाऊ अर्जुन नाईक म्हणून आपणाला कळते. तर अशा ह्या कथेत जॉन आण्णा असतात अमर्त्या नाईक, ते मन्या सुर्वेचा सिक्वल आणि वेलकम बॅकमधला अज्जूभाई चा प्रिक्वल, टोटली सत्यमेव जयतेचा इक्वल असा अमर्त्या नाईक साकारतात. बापाचा जड आणि घोगर्या आवाजाचा रेकॉर्ड मोडणारा प्रतिक बब्बर अर्जुन नाईकाच्या भुमिकेत. बाळासाहेबाची टोटल कॉपी भाऊं ह्या नावाने खपवणारे महेश मांजरेकर, चाळीस पन्नास करोडांमुळे आणि सेक्रेड गेमामुळे माहीत झालेले गायतोंडे नाव धारण केलंय अमोल गुप्त्यांनी. सगळ्यात टॉप म्हणजे इम्रान हाश्मीसाहेब आहेत सावरकर. दचकू नका मंडळी. विनायक सावरकर नाही तर विजय सावरकर. हे विजय साळसकरांशी साधर्म्य असलेले एकमेव आडनाव दिग्दर्शकाला सापडल्याबद्दल त्याला मार्सेलिसला पाठवावे की अंदमानात हाच प्रश्न प्रत्येक मराठी माणूस विचारेल.
बाकी ओळखीच्या मंडळीत गुलशन ग्रोव्हर नारी खान, रोहीत राय, आकाश खुराना, समीर सोनी आणि एका फ्रेमपुरता सुनीएल शेट्टी. चार पाच फ्रेमापुरती आपली काव्या...सॉरी काजल अगरवाल. ती हि सिंघमच्या चौथ्या पाचव्या सिक्वेलात काम करावे इतक्या सहजतेने कुंकू टिकली काही न लावता मिसेस नाईक बनते. एक दोन फ्रेमपुरती अंजना सुखानी मिलमालकाच्या सुनेच्या भुमिकेत. खेतान मिलचे नाव तेच ठेवले आहे आणि त्या मिलच्या जागेच्या पैशाबाबतीत सगळा गोंधळ आहे हे आपण समजोन घ्यायचे. ह्या गोंधळाला दिलेले संगीताचे बाप अमर मोहिले आणि योयो हनीसिंग म्हणल्यावर म्युट करुन पाहायचे का ते तुम्ही ठरवा.
सुरुवातीला भाजी विक्रेत्याकडून पक्षी नाईक कुंटुंबाकडून हप्ता घेताना तक्रार, गुंडांना हाणणारे जॉन नाईक, मग जेल, तेथे गायतोंडे, व्हाया गुल्लु शेट्टी टू भाऊ. धाकट्या भावाला लंडनला पाठवणे, तो परत येणे, त्यामध्येच येणारे पोलीस इन्पेक्टर सावरकर. बरेच इकडे तिकडे करुन भावाची परत लंडन्ला रवानगी करताना सावरकरांनी केलेला अमर नाईकांचा एन्कांटर इतकीच कथा असताना काही प्रसंग मात्र डोळ्यात पाणी आणण्याइतपत हसवतात. उदाहरणार्थ पिक्चरातल्या सेनाप्रमुखाच्या म्हणजे भाऊंच्या युवाशाखेत युवा सावरकर चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्ण गणवेशात ध्वजप्रणाम करताना(फोटोत) दिसतो. आता ह्या प्रसंगात काही क्रिप्टिक कॉन्ट्रोव्हर्शिअल असल्यास चित्रपटावर बंदी आली असती पण बंदी घालायची मागणी केली ती अमर नाईकाच्या वहीनीने हे जास्त क्रिप्टीक. ती मान्य झाली असती तर जास्त कॉन्ट्रोव्हर्सी झाली असती आणि कोरोनाच्या सागात डुबलेला हा सागा कदाचित तरुनही गेला असता.
असा छळवाद सोसायची हौसच असेल, सगळ्याच्या घरी नेट आहेच आता बहुधा आणि वर्क फ्रॉम होम आहेच तर प्राईमवर आहे. थेटरात काही जायची सोय नाही तेंव्हा ह्या सीझनचा एखादा आयपीएल एपिसोड बळी देऊन बघण्यास हरकत नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naa Romba Busy... :- Vasuvum Saravananum Onna Padichavanga