Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

छंदिष्ट, हरहुन्नरी, उद्योगी मिपाकर सध्या काय करत आहेत ? (एप्रिल २०२१)

च
चित्रगुप्त
Wed, 04/14/2021 - 23:42
🗣 109 प्रतिसाद
मित्रहो, काही काळापासून मिपावर येत असलेल्या 'चालू घडामोडी', 'सध्या मी काय पाहतोय' वगैरे धाग्यांवर अनेक मिपाकर उत्साहाने सहभाग घेत आहेत. या धाग्यांमधून 'बाहेर'च्या जगातील लोक काय करत आहेत याची माहिती मिळत असली तरी खुद्द मिपाकर काय करत आहेत, हे कळत नाही. कसलातरी छंद जोपासणार्‍या, काहीतरी वेगळेच करण्याची आवड असलेल्या, आपण स्वतः काहीतरी झपाटून केले पाहिजे असे वाटत असलेल्या हरहुन्नरी, हौशी, छंदिष्ट मिपाकरांसाठी हा धागा आहे. आपण अगदी छोटेसे का होईना, पण हौशीने स्वतः काही करत असाल, नवीन काही शिकत असाल, कश्यात तरी सहभागी होत असाल तर ते इथे अवश्य लिहावे अशी सर्वांना विनंती आहे. तर आता सुरूवात स्वतःपासून करतो. मी रंगवत असलेली चित्रे घरात सर्वत्र लावत असलो, तरी त्यांना चौकटी करवून घेणे कधी जमले नाही. मला एक चित्र करायला जेवढा खर्च येतो, त्याच्या अनेक पटींनी एकेका चवकटीवर करावा लागेल, हे त्याचे मुख्य कारण. जुन्या बाजारात कधी कधी चांगल्या चवकटी असलेले जुने आरसे वा चित्रे मिळतात, पण आपले चित्र अगदी नेमक्या त्याच आकाराचे असेल, तरच त्या वापरता येतात. मध्यंतरी तूनळीवर अचानकच ' हौ टु मेक वुडन फ्रेम' असे काही बघायला मिळाले. असे बरेच विडियो बघितल्यावर आपण हे करून बघायला हवे असे वाटू लागले. मग बाजारातून काही लाकडे, सेट स्क्वेयर, चिमटे, कॉर्नर स्ट्रॅप, मायटर बॉक्स, करवत वगैरे आणून प्रयत्नाला लागलो. . . लाकूड कापताना ते अजिबात हलू नये म्हणून क्लँप वगैरे लावणे, करवत चालवताना हात स्थिर ठेवणे, मोजमाप अगदी अचूक करणे, हे अगदी आवश्यक असल्याचे थोड्या चुका झाल्यावर लक्षात आले. तसेच अनेक बारीकसारीक गोष्टी या विचार, प्रयत्न आणि जुगाडबाजी यातूनच साध्य होतात आणि असे करताना मोठेच समाधान लाभते, याची वारंवार अनुभूति येत गेली. योग्य त्या मापाचे तुकडे मायटर बॉक्सच्या सहाय्याने कापल्यावर ते बरोबर काटकोनात जुळवून आधी चिकटवताना कॉर्नर स्ट्रॅपचा चांगला उपयोग होतो. ... सुरूवातीला अगदी साधी फ्रेम बनवून बघितली. नंतर जरा रुंद आणि कारागिरी केलेल्या लाकडाची. त्याबरोबरच फ्रेमला वेगवेगळ्या प्रकारे रंगवणे आणि रंगातला भगभगीतपणा घालवण्यासाठी घासणे, खरवडणे, रंगावर रंग चढवणे वगैरे उद्योग करून बघितले. ... . याप्रकारे केलेल्या प्रयत्नातून थोड्या चित्रांना आता चवकटी लाभल्या आहेत आणि काही नवीनच रोचक काम करण्यातून मिळणारा आनंद आणि समाधान यांचा लाभ होत आहे. आता आणखी कठीण, उत्तम दर्जाच्या चवकटी करण्याचा बेत आहे. . अन्य मिपाकर पण आपापल्या उद्योगांबद्दल लिहून या धाग्यात भर घालत राहतील अशी आशा आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 43666 views

🗣 चर्चा (109)
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/15/2021 - 00:47 नवीन
चित्रे भारी आहेत, मुख्य म्हणजे "समजतात" ;) (ते खालच्या बाजूला उजव्या कोपर्यातले सोडून)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/15/2021 - 04:24 नवीन
@टवाळ कार्टा: कोपर्‍यातले चित्र कालांतराने 'समजण्यासारखे' होईल. या फोटोतील बरीचशी चित्रे अद्याप अर्धवट स्थितीत आहेत. समोर लावलेली असली की कशात काय काम करायला हवे ते सुचत जाते. कधीकधी चित्र अमूलाग्र बदलते सुद्धा. ते उजव्या कोपर्‍यातले दोन - तीन वर्षापूर्वी सुरु केले होते, तेंव्हा टेबलावर कॅनव्हास नुस्ते पसरवून ते रंगवले होते. यंदा पुन्हा अमेरिकेत आल्यावर हे फ्रेमिंगचे नवीनच सुरू झाले, मग त्या चित्रासाठी योग्य आकाराचा लाकडी स्ट्रेचर देखील बनवता आला, आणि त्यावर ते चढवले. आता जसे सुचेल त्याप्रमाणे पुढे काम करायचे आहे. अजून काही सुचलेले नाही. (या प्रकारे मी कसे काम करतो ते दोन भागातील 'एका तैलचित्राची जन्मकथा' या २०१२ सालच्या लेखात सविस्तर दाखवले होते, त्यावर बरीच चर्चादेखील झाली होती. वाचलेला नसेल तर तो अवश्य वाचावा. चित्रे आवडल्याचे वाचून आनंद वाटला. अनेक आभार.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 04/15/2021 - 04:38 नवीन
:)) तसल्या 'अनाकलनीय' चित्रांनाच लिलावात कोट्यावधी रुपये मिळतात म्हणे! ;)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/15/2021 - 05:04 नवीन
@ उपयोजकः अनाकलनीय चित्रे आणि त्यांच्या कोट्यावधीच्या किंमती हा सुद्धा एक अनाकलनीय प्रकार आहे. कलेपेक्षा तो अर्थशास्त्राचा विषय असून त्यात कंपूबाजी, सांस्कृतिक भ्रष्टाचार, पैसा काळ्याचा पांढरा करणे , बँकांना गंडवणे वगैरे अनेक भानगडींचा गुंता असतो. वासुदेव गायतोंडे यांचे एक अमूर्त चित्र काही वर्षांपूर्वी एका लिलावात चोवीस कोटींमधे विकले गेले होते, त्यावर मी 'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल' हा एक मजेशीर लेख लिहीला होता. प्रतिसादाबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/22/2021 - 07:09 नवीन
चित्रगुप्त साहेब तुमचे गाय २४ कोटी लेख वाचून गम्मत वाटली आणि माझ्य मनात आलेले प्रश्न अगदी मस्त उपहासात्मक पद्धतीने दुसरे कोणी तरी पण लिहिते हे वाचून बरे वाटले जर तुमच्या सारख्या कलाकाराला सुद्धा २४ कोटी बद्दल उपहासात्मक गम्मत वाटत असेल तर माझ्यसारखाय रुक्ष तांत्रिक माणसाला काय वाटत असेल... ? हे मान्य कि अप्रतिम कलाकृतीला चांगली किंमत दयावी लागते .... कधी ती योग्य वाटत्ते कधी अगदीच " हवेतील " वाटते , त्यामुळे कलाकृतीला चांगले पैसे मिळण्याबद्दल दुमत नाहीच ... जिथे नुसते नाव होऊन हवा होते तिथे मात्र हसू येते अर्थात उद्य्या मोना लिसा जर विकत कोणी घेणार असले तर सौदी कीव ब्रुनेई चा राजा, किंवा बिल गेट यांच्यातील ती अहंकाराची स्पर्धा राहील मोना लिसा ला ट्रेडिग साठी विकत घेणे म्हणजे अगदी ILLIQUID मार्केट मध्ये खेळयनसारखे आहे असे वाटते ... थोड्या तांत्रिक आणि व्यव्हारी भाषेत सांगायचे तर उत्तम दर्जाचा रंगयाचा चष्म घ्यायचा तर रेबॅन ला चांगले पैसे मोजन्य्यात काही वाटत नाही कारण वर्षनुवर्षे त्यांनी त्यात काम केलं आहे पण तेच उद्या " सेलिब्रिटी चषमा ब्रँड म्हणजे रितिक रोशन गॉगल " निघाला तर ती नुसती हवा ... असो मला मुद्दा नीट मांडता आलं कि नाही कळत नाहीये ...
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 04/15/2021 - 01:29 नवीन
कार्पेट म्हणजे आपण विदेशांत आहात
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/15/2021 - 04:38 नवीन
@साहना: तुमचा प्रतिसाद म्हणजे पूर्वीच्या पुस्तकांमधून हमखास आढळणारा वाक्प्रचार - "हे चाणाक्ष वाचकांनी केंव्हाच ताडले असेल" याचे उदाहरण. खूप काळानंतर हे वाक्य या प्रतिसादाच्या मिषाने आठवल्याने खूप छान वाटले. तुम्ही बरोबर ओळखले. आम्ही जुलाई २०२० पासून Charlotte NC मधे आहोत. इकडे आल्या आल्या कोविडची लागण होऊन बेजार झालो होतो, त्या अनुभवावर 'कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)' हा लेख लिहिला होता, कदाचित वाचनात आला असेल. अमेरिकेत उत्तम दर्जाचे लाकूड आणि अवजारे मिळत असल्याने असे काही उद्योग हाती घेणे इथे सोपे जाते. भारतात कदाचित हे जमले नसते. नाहीतर गेल्या पन्नासेक वर्षात मी ते केलेच असते. तुमचे जे लिखाण माझ्या वाचनात आलेले आहे, त्यावरून तुम्ही अतिशय साक्षेपी, उद्यमी आणि वेगळा विचार करणारांपैकी असून वेगवेगळे छंद जोपासत असाल असे वाटते. तरी या धाग्यावर त्याविषयी जरूर लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 04/15/2021 - 05:15 नवीन
मागच्या धाग्याच्या विषयावरून मी भारतात आलाय का.. असा प्रश्न विचारला.. :)) असो, हा धागा आवडला. जमेल तसे उपद्व्याप करत असतो. जर्मनीतील मार्केट मधून एक कार्व्हींग टूल सेट आणला होता पण तशी मऊ लाकडे इथे मिळाली नाहीत.. किंवा मी शोधली नाहीत म्हणू. तुमच्या फ्रेमला किंचित बदल म्हणून असे कुरतडून डिझाईन करता येईल. शिवाय तापलेल्या धातूने (अर्धवट जाळून) नक्षी करता येईल!
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 04/15/2021 - 08:28 नवीन
अमेरिके मधील DIY संस्कृती जबरदस्त आहे. माझे प्राध्यापक सौमेन ह्यांचा हा खूप जुना ब्लॉग पोस्ट नेहमी आठवत आले आहे : https://www.cse.iitb.ac.in/~soumen/APKGKAH/flaky-products/maintain.html लाकूडकाम अजून तरी मी केले नाही आणि तशी आवड नाही पण एपॉक्सी वापरण्याची इच्छा आहे. तुम्हाला आवड असेल तर जवळच्या कम्युनिटी कॉलेज मध्ये अनेक आणि माफक दारांत खूप मजेदार कोर्सेस असतात. मी पॉटरी चा एक कोर्स केला होता आणि डझन पेक्षा जास्त जबरदस्त पॉट्स, सुशी प्लेट्स बनवले होते. २५ तासांच्या कोर्स साठी मी २०० डॉलर दिले. त्यांनतर मी शिकार हा कोर्स करून हंटिंग लायसेन्स मिळवले आणि शिकार करू लागले. धनुष्य बाण वापरून सुद्धा शिकार केली आहे. पण हे सर्व काही खूपच शारीरिक ताणाचे काम असल्याने मागील एक वर्षांत शिकार केली नाही पण रेंज मध्ये भरपूर प्रॅक्टिस करत आले आहे. पण कोविड मध्ये मी जर काही शिकले असेल ते म्हणजे खूप उच्च दर्जाचा ब्रेड बनवणे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 04/15/2021 - 09:43 नवीन
शिकारीचे तिकडे काय नियम आहेत काय शिकायला मिळाले यावर कधीतरी लिहावे. दिवाळी अंकासाठीही देऊ शकता.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 04/16/2021 - 07:01 नवीन
नक्की
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/21/2021 - 20:22 नवीन
तुम्ही शिकलात तसा उच्च दर्जाचा ब्रेड कसा बनवतात हे यूट्यूबवर वगैरे आहे का ? असल्यास कृपया दुवा द्यावा. मिपावर पाककृतीत देता आले तर उत्तमच.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/22/2021 - 07:12 नवीन
पण कोविड मध्ये मी जर काही शिकले असेल ते म्हणजे खूप उच्च दर्जाचा ब्रेड बनवणे. वाह .. आधुनिक यांत वापरून कि नुसता अव्हन वापरून फोटू द्या , काय काय करता चिबा ता व्हिएन्ना सावर डो ? कि भारतीय मसाले , जिरे वैगरे मध्ये काळे ऑलिव्ह घालून केला होता .. मस्त झाला होता
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 04/15/2021 - 03:03 नवीन
सर्व चित्रे आवडली आहेत. ________________ या कामाविषयी - बरेच प्रश्न पडले आहेत १) कोपऱ्याचा कसा केला - चिकटवले का सांधा करून लाकडाचीच खिट्टी मारली? २)मागच्या आधारासाठी वाटरप्रुफ प्लाइ वापरले का? ३)चित्र घेऊन जायची वेळ आली तर packing चे झाकण बनवून ते मागच्या बाजूस लावले तर तेच पुढे लावून बंद करता येईल. ४) चित्रावर काच असते का? एक वेगळा प्रश्न की चित्रांना काही standard size ठेवली तर ती साठवणे सोपे जाईल. तुम्ही म्हणता तसे जुन्या बाजारातले आरसे वगैरे घेऊन फ्रेम केल्यास ती सीजन्ड असते तशा नव्या फ्रेम पट्ट्या आणल्यास तीन वर्षे सीजन करावी लागेल. आमच्या घराजवळ एका गराजमध्ये लाकडाच्या पट्ट्यांच्या फ्रेम करायचा कारखाना होता तो मी पाहात असे. ____________________________ माझ्या छोट्याशा बाल्कनीत जी झाडे आहेत त्यावरच प्रयोग करतो. कुंड्यांवर प्रयोग करतो. कुंड्या टांगणे, वेलांना आधार, कमी जागेत अधिक कुंड्या बसवणे इत्यादी. ते घराबाहेर न पडताही चालू ठेवता येते. _____________________ अगदी शाळेत असतांना पहिला उद्योग पुस्तकास हार्ड बाउंड करणे. पुठ्ठा आणि कापड लावून मुखपृष्ठाचे चित्र वर आणणे. पण त्या वेळेस गोंद असायचा तो फार घट्ट चिकटायचा नाही. एका वर्गमित्राच्या वडलांचा प्रेस होता त्याने सांगितले की 'शिरस' वापरावे लागते पण ते तुला जमणार नाही. तर ते त्यावेळचे सुपर ग्लू होते आणि खटपटींना D I Y म्हणतात हे आता कळले. आता हार्ड कवर कलेक्शन मागे पडली किंवा महाग झाली आणि किंडल आले. तरी टेबल बुक्स अशीच असतात. ________________ फोटोंसह लेख झकास झाला आहे. स्फुर्तिदायक.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 04/15/2021 - 15:46 नवीन
चित्र काढायच्या पेक्षा खर्च आणि सुतारकामाची उसाभर जास्त... कोरोना ने तेही करायची वेळ आणली आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 04/16/2021 - 08:48 नवीन
खर्चिक छंद ताबडतोब सोडावेत. कमावलेला बराचसा पैसा हा छंदावर खर्च होणार असेल तर मनाचा आनंद वगैरे गोष्टी बाजूला ठेवून बचत करणे श्रेयस्कर. छंदातून भरपूर आर्थिक कमाई होणार असेल तर छंदावर वेळ आणि थोडे पैसे अवश्य खर्च करावेत.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/21/2021 - 19:26 नवीन
माझ्या जीवनात तरी मी छंदाला नेहमी प्राथमिकता देत आलो आहे. उत्तम दर्जाचे रंगसाहित्य ब्रश नाईफ कागद कॅनव्हास याचा साठा नेहमीच असतो. अर्थात बरेचसे काम स्वतः काही जुगाड भिडवून करण्यातून स्वस्तात बरेच काही करता येते. कधी कधी अतिशय स्वस्तातले ब्रश सुद्धा विशिष्ट प्रकारे वापरून चांगले काम करता येते आणि घरातल्याच फेकण्याच्या वस्तू सुद्धा कल्पकतेने वापरता येतात. गेली दहा वर्षे तरी मला चित्रकलेतू काहीच कमाई झालेली नाही पण म्हणून मी काही ते सोडलेले नाही. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात चित्रकला चालूच आहे. नुक्तीच मी सुमारे १०० - १५० डॉलरला मिळणारे कॅनव्हास दहा - पंधर डॉलर मधे (तेही उत्तम दर्जाचे) घरी बनवण्याची क्लुप्ती शोधून काढली आहे. ते करून बघितल्यावर इथे लिहीणार आहे. "करले जुगाड करले करले कोई जुगाड" यात आनंद - समाधान आणि पैसे वाचवणे हे सर्वच साध्य होते.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/21/2021 - 19:12 नवीन
लेख आवडला आणि स्फूर्तीदायक वाटला हे वाचून खूप आनंद झाला. १. चारी कोपरे वुड ग्लू लावून कॉर्नर स्ट्रॅप मधे आवळून रात्रभर ठेवले. सकाळी मागल्या बाजूने २-३ इंचाचे त्रिकोणी तुकडे (जाडे प्लास्टिक किंवा टणक जाडा कागद - हे दोन्ही दुधाचे रिकामे कॅन किंवा डबे कापून मिळवतो) स्टेपल गन वापरून ठोकले. तसा वुड ग्लू इतका मजबूत असतो की काढायला गेले तर लाकूड तुटते पण सांधा निघत नाही. २. मागून फक्त त्रिकोणी तुकडे लावले आहेत. चित्र कॅनव्हासवर असल्याने आणखी कसली गरज नाही. ३. मोठे चित्र बाहेरगावी कोरियरने पाठवायचे असेल वा बरोबर न्यायचे असेल तर उघडून रोल करून नेतो मात्र बाहेरची फ्रेम नेता येत नाही. आत्तापर्यंत मी फ्रेम करतच नसे हा उद्योग आत्ताच सुरू केला आहे. पूर्वी प्रदर्शने करायचो तेंव्हा भारतात सर्व काम सुताराकडून करवून घेत असे. ४. कॅनव्हासच्या चित्राला पुढून काच लावयची गरज नाही. ५. मी एकाच आकाराची निदान दोन तरी चित्रे करतो म्हणजे एकमेकांवर ठेऊन पॅक करणे वा साठवणे सोपे जाते. ६. अमेरिकेत तरी उत्तम दर्जाचे अनेक प्रकारचे सीझन्ड लाकूड मिळत असल्याने काही करावे लागत नाही. .... पुण्यात 'बोपोडी' भागात वर्मा टिंबर आणि २-३ दुकानात हल्ली उत्तम दर्जाचे परदेशी लाकूड ३०-४० रुपये किलो या भावाने मिळत असल्याचे समजले आहे. कुणी जाऊन बघितले तर अवश्य कळवावे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 04/22/2021 - 09:43 नवीन
चित्र टिकवायचे फ्रेम केलेले म्हणजे सांधा आणि मटिअरिअलचे काय केले ही शंका होती. वुडग्लू, सीजन लाकूड आणि दोन एकाच आकाराची चित्रे ही कल्पना आवडली.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 04/15/2021 - 04:24 नवीन
प्रेरणादायी धागा आहे. मायटर बॉक्स म्हणजे तो करवत ठेवण्यासाठी वापरलेली लाल वस्तू का? एकदम साधी पण प्रचंड उपयोगी कल्पक वस्तू आहे. ' बाईंच्या' चित्राची चौकट सुरुवातीला केल्यापैकी आहे का? तुलनेने साधी वाटली. तिसऱ्या चित्राची चौकट मात्र अतिशय साजेशी आहे. या धाग्यातील प्रतिसादांतून प्रेरणा घेऊन काहीतरी नक्की करायची ईच्छा आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/15/2021 - 04:41 नवीन
@ कंजूस आणि तुषार काळभोरः आणखी फोटोंसह सविस्तर प्रतिसाद उद्या देतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 04/15/2021 - 04:42 नवीन
चित्रगुप्त साहेब - डिआयवाय (डू इट युअरसेल्फ) उपक्रम आवडला. मी घरात एका ठिकाणी सामान ठेवण्यासाठी भिंतीला रॅक लावायचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्टड फाइंडर, हॅन्ड ड्रिल वगैरे खरेदी झाली. शेल्फच्या असेंब्ली मॅन्युअलमधल्या सूचनांनुसार योग्य ती बीट वापरून छिद्रे केली. परंतु शेल्फबरोबर मिळालेले स्क्रू व भोवतीचे प्लॅस्टिकचे फिलर (योग्य शब्द आठवत नाही) त्या छिद्रांपेक्षा जाडे आहेत. पुढे काय करायचे हे जालावर शोधणार आहे. रॅक खरेदी करुन दीड वर्षे झाली ;-).
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 04/15/2021 - 05:09 नवीन
@रंगा, प्रॉब्लेम सोपा दिसतोय. Rawlplug, ज्याला मराठीत रावेल प्लग म्हणतात तो बहुधा वेगळ्या व्यासाचा आलाय. त्याचा बाह्य व्यास किती मिमी आहे तो पाहून एक साईझ लहान मागवा. ज्या छिद्रात बसवायचा त्याचाही व्यास किंचित लहान किंवा तितकाच चालेल. अमेझॉन वर असोर्तेड प्लग चे पाउच मिळतात, किंवा मोठ्या मार्केट मध्ये टूल विभागात असतात. ते योग्य मापाचे टाकून काम होऊन जाईल.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/15/2021 - 05:22 नवीन
@ श्रीरंग जोशी: तुम्ही लिहिलेल्या 'स्क्रू भोवतीचे प्लॅस्टिकचे फिलर ' ला देसी भाषेत 'गिट्टी' म्हणतात. विटांच्या वा काँक्रीटच्या भिंतीत स्क्रू किंवा खिळा टिकून रहावा, म्हणून भिंतीत आधी ड्रिलने भोक पाडून त्यात गिट्टी ठोकून बसवून मग त्यात स्क्रू पिळतात. एका अर्थी या गिट्टीचे काम स्क्रूभोवतालची भिंत लाकडासारखी वा रबरासारखी करणे हे असते. मात्र तुम्ही अमेरिकेतील लाकडी घरात हे काम करत असल्याने गिट्टीची गरज पडणार नाही, किंबहुना ती वापरायलाच नको. तुम्ही स्टडच्या बरोबर मध्यात स्क्रू पेक्षा कमी व्यासाच्या बिटने थोडेसेच भोक करून त्यात सरळ (सुमारे तीन इंच लांबीचा) स्टीलचा स्क्रू ड्रिलच्या सहाय्याने लावून टाकू शकता. हे स्टड सुद्धा ओक, मोहोगनी वगैरे टणक लाकडाचे नसून पाईनचेच मऊसर असतात. तुम्ही अमेरिकेच्या घरात असे अनेक उद्योग नेहमीच करत असाल, त्याबद्दल वाचायला आणि चर्चा करायला खूप आवडेल.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 04/16/2021 - 07:58 नवीन
मी या कामासाठी रावळ प्लग मिळाले नहीत तर सरळ काड्यापेटीच्या काड्या वापरतो. तेही लाकुड मउ असते आणि भोक बुजवायला चालते (खिळा धरुन राहते). अर्थात इथे भिंत विटा किवा सिपोरेक्स ब्लॉकची असते यु एस मध्ये प्लाय सारखी पार्टीशन/तयार भिंती असतात त्यामुळे मेहनत कमी लागते. मात्र भाड्याच्या घरात राहात असाल तर सोडताना सर्व साफ करुन द्यावे लागेल.
  • Log in or register to post comments
भ
भुजंग पाटील गुरुवार, 04/15/2021 - 06:13 नवीन
तुम्ही शिटरॉक वॉल मध्ये ड्रील करत असाल तरच त्या केसींगची ची गरज आहे. स्टड फाइंडर आहे म्हटल्यावर फक्त जाड स्क्रु ने तुमचे काम सोपे व्ह्यायला हवे.
  • Log in or register to post comments
म
मनो Fri, 04/16/2021 - 07:11 नवीन
+१ अमेरिकेत घराची भिंत वेगळी असते. जर लाकडी स्टडमध्ये ड्रिल केले असेल तर सरळ तिथेच फक्त स्क्रू लावा. ते प्लास्टिक चे ड्रायवॉल अँकर आहेत. जर तुम्ही स्टड न ड्रिल करता नुसत्या कागदी भिंतीत (शीट रॉक) लावणार असला तरच अँकर लागतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 04/18/2021 - 13:39 नवीन
हेच मला म्हयायचे होते .. लाकडी भिंत म्हणजे नक्कीकाय ? लाकडाची चौकाट आणि त्यावर कागदी भिंतीत (जीप रॉक ) असेल तर स्टड फाइंडर ने आतील लाकडी पट्टी शोधावी लागेल मग रावळ प्लग वैगरे कशाला? सरळ त्या लाकडात यौग्य तो सेल्फ टॅपिंग वूड स्क्रू चालेल पट्टी यौग्य ठिकाणी नसले तर मग टोगल स्क्रू
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 04/16/2021 - 07:39 नवीन
प्लास्टिक च्या फिलर ना अँकर असे म्हणतात. तुम्ही जो रॅक दाखवला आहे तो स्टड वर लावण्याचा आहे तिथे हे अँकर्स वापरण्याची गरज नाही. स्टड कदाचित ८० किलो वजन घेऊ शकतील पण ड्रायवॉल बहुतेक वेळा फारतर ४० किलो वजन घेऊ शकते आणि ते सुद्धा काही वर्षांनी पडू शकते. तो रॅक स्टड नसला तर लावूच नका.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 04/16/2021 - 17:47 नवीन
मंडळी, मी मांडलेल्या समस्येवर तुम्हा सर्वांचे तपशीलवार उपाय पटले. यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. या विकांताला हे काम पूर्ण करतो. स्टडमधेच छिद्रे केली आहेत. त्यामुळे स्क्रू थेट ड्रिलने लावतो. Rawl plug चा उपयोग टाळतो. या रॅकचा फार अवजड सामान ठेवायचे नाहीये. नेहमी न लागणार्‍या. पण उगाच जागा व्यापणार्‍या वस्तू ठेवायच्या आहेत.
  • Log in or register to post comments
भ
भुजंग पाटील Fri, 04/16/2021 - 21:35 नवीन
@ श्रीरंग आपली रॅक ची अ‍ॅमॅझॉन लिंक smile.amazon.com आहे असे दिसले, त्या बद्दल तुमचे कौतुक. :)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 04/17/2021 - 05:15 नवीन
गेल्या सहा वर्षांपासून मी माझ्या अ‍ॅमेझॉन स्माइल प्रोफाइलमधे Save Indian Farmers या संस्थेची निवड करुन ठेवली आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 04/17/2021 - 05:55 नवीन
श्रीरंग साहेब भिंत कशाची बनलेली आहे त्यावर सगळे अवलंबून आहे - पूर्ण विटांची किंवा काँक्रेट ब्लॉक असले तर यौग्य असा खिळा+ केमसेट डायना बोल्ट आणि भोक पाडण्यासाठी मेसनरी ड्रिल लागेल - भिंत पोकळ असेल आणि मॅगी लाकडाची पट्टी नसले तर टॉगल स्क्रू लागतील https://www.youtube.com/watch?v=dMaWRaJ2GXQ
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 04/17/2021 - 06:08 नवीन
चौकस साहेब, माहितीसाठी धन्यवाद. भिंत लाकडी आहे. स्टडच्यव पोझिशन शोधून छिद्रे केली आहेत. तुम्ही दिलेला व्हिडिओ बघतो.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/15/2021 - 05:28 नवीन
@ श्रीरंग जोशी: आताच तुमच्या रॅकचे फोटो बघितले. अगदी सोपे आहे, स्क्रूसाठी धातुचे वॉशर वापरून चांगले लांब कोणतेही मजबूत स्क्रू लावून मोकळे व्हा. चिंताकी कोई बात नै सरजी. मात्र स्क्रू ड्रिल मशीननेच लावा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 04/15/2021 - 05:47 नवीन
म्हणजे स्क्रूला सुतळी गुंडाळून त्याला फेवीकोल ( सिंथेटिक ग्लू फॉर क्राफ्ट) लावून लावणे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/15/2021 - 06:16 नवीन
गिट्टी किंवा रावळ प्लग नसेल तेंव्हा मी फुकट गेलेल्या झाडूच्या मागच्या जाड काड्या किंवा काडेपेटीच्या काड्या गुल काढून टाकून वापरतो. भोक लहान मोठे पडले असले तरी चिंता नसते. भारतात सर्व विटा सिमेंटच्या भिंती असतात तेथे या वर्षानुवर्षे उत्तम चालतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/15/2021 - 06:56 नवीन
सध्या तरी दिवाळी अंक वाचत आहे...
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 04/15/2021 - 08:59 नवीन
मला काही दिवस आधी एका मोठ्या दरवाज्याला पडदे लावायचे होते. ड्रिल वगैरे होतेच पण पडद्याचा बार अगदी आडवा कसा लावावा ह्याचा विचार करत होते. दरवाज्याची रुंदी साधारण ६ फूट होती आणि त्याशिवाय बाजूला दोन छोट्या खिडक्या त्यामुळे साधारण १० फुटांचा पडदा हवा होता आणि एका सरळ रेषेंत तीन ड्रिल होल करायचे होते. आता हि रेषा जमिनीला १००% कशी समांतर ठेवावी ह्याचा मी खूप विचार केला. youtube वर अनेक व्हिडीओ असले तरी एकटीने आणि ते सुद्धा १० फुटांवर कसे लेवल ठेवायचे समजत नव्हते. लेव्हलर टूल असले तरी १० फुटांच्या अंतरावर काही डिग्रीचा जरी फरक पडला तरी पडद्याचा बार दुरून वाकडा दिसला असता. नंतर भारतांत गवंडी लोक एक यंत्र वापरतात ते आठवले. एक साधी दोरी आणि तिला खाली निमुळते वजन. ह्याला इंग्रजीत काय म्हणतात हे ठाऊक नसल्याने होम डेपो मध्ये ते मिळेल कि नाही ठाऊक नव्हते. बराच विचार केल्यानंतर ह्याला मराठीत ओळंबा म्हणतात हे आठवले आणि शब्दकोशावरून ह्याला मेसन्स प्लम्ब बॉब म्हणतात हे समजले मग हा होम डीपो मध्ये सापडला. मग एका बाजूला ड्रिल केले, जमिनीपासून त्याची उंची ह्या बॉब ने निर्धारित केली आणि मग तोच बॉब दुसऱ्या बाजूला वापरून त्याच उंचीवर दुसरा होल केला आणि पडद्याचा बार लावला. मग एका अमेरिकन कन्स्ट्रक्शन वर्करला विचारले नि त्याने मला सेल्फ लेव्हलिंग लेसर मशीन असते ती दाखवली. अर्थांत इतकी महागडी मशीन मला कामाची नव्हती त्यामुळे घेतली नाही. किमान ५ तरी पडदे मी ह्या ओळंब्याचा साहाय्याने लावले.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/15/2021 - 09:10 नवीन
मी हेच काम दारूच्या बाटलीच्या सहाय्याने केले आहे....
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 04/15/2021 - 11:03 नवीन
पाण्याने भरलेली रबरी नळी वापरतात ना?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/15/2021 - 13:51 नवीन
पण पारदर्शक नळी नसेल तर, ओळंबा किंवा दोरी आणि जड वजन पण चालते.. प्रात्यक्षिक दाखवीन...
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 04/16/2021 - 09:16 नवीन
ओळंबा गवंडी लोक कशासाठी वापरतात मला ठाऊक नाही पण मी ओळंबा खालील प्रकारे वापरला. जमीन हि सपाट असेल तर आधी भिंतीवर एक टिम्ब काढायचे आणि ओळंबा वापरून टिम्ब आणि खालील जमीन ह्यांतील अंतर मोजायचे. मग दूर जाऊन जमिनीपासून तितक्याच वर दुसरे टिम्ब काढायचे. आता तुम्ही दोन्ही टिम्ब मधून रेषा काढली तर ती खालील जमिनीला पॅरलल राहील. उदाहरण म्हणजे समाज एका खोलींत तुम्हाला ५ ठिकाणी विजेची स्विच लावायची असतील तर हि सर्व एकाच उंचीवर असणे आवश्यक आहे. मला वाटते तिथे पाण्याची नळी विशेष उपयोगी नाही.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 04/16/2021 - 20:03 नवीन
भिंत बांधताना ती जमीनिशी काटकोनात आहे की नाही ते चेक करण्यासाठी गवंडी ओळंबा वापरतात. तो नाही वापरला तर भिंत वेडी वाकडी उभी राहील. बाकी ओळंबाचा हा नवीन उपाय भारी आहे. मी या कामासाठी, छताचा किंवा जमीनिचा रेफरंस वापरतो. म्हणजे छत त्रिकोणी नसेल तर मेजरिंग टेप वर छतापासुनचे अंतर मोजुन घेतो तेच सगळीकडे वापरतो. छत त्रिकोणी असेल तर तेच अंतर जमीनिपासुन मोजतो. बाकी आम्रविकेत डीआयवाय केले नाही तर भरपुर पैसे खर्च करावे लागतात. कारागिर कधी कधी मनाला येइल ते भाव लावतात.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 04/15/2021 - 09:26 नवीन
डी आय वाय व मी या सदराखाली एप्रिल २०२१ ची मर्यादा घालायची मी म्हटले तर उडदाचे पापड , साबुदाण्याच्या पापड्या , रव्याच्या कुरडया सध्या करीत आहे ! मात्र ही मर्यादा ओलांडायची झाली तर एक स्वतंत्र धागाच काढावा लागेल इतक्या लटपटी मी केल्या आहेत. माझे निरीक्षण असे आहे की .. मराठी माणूस डी आय वाय बाबतीत जगाच्या फार मागे आहे. खरे तर तो आंतरजालावर ज्ञान या बाबतीत मागेच आहे ! त्याचे मन मला आरक्षणात नोकरी कशी मिळेल यातच जास्त गुंतले आहे ! याउलट हिंदी भाषिक पुरुष व स्त्रिया या चौफेर डी आय वाय विषयावर उदारपणे यू ट्यूब मध्ये माहिती देत आहेत. अमेरिकन लोकांबद्दल तर बोलायलाच नको . तिथे लेबर महाग असल्यामुळे कदाचित ( एक ब्लॉगर ने एल ई डी दिवा बदलण्यासाठी रु १०००० अमेरिकेत घेतले कारण तासावरच्या मजुरीत हा मोबदला द्यावा लागला म्हणे असे सांगितले आहे ! ( यांचा हात पोहोचत नव्हता )) तिथे डी आय वाय ला पर्याय नाही ! मला अनेक इलेक्ट्रॉनिक रिपेर वाल्यानी सांगितले की माझ्या जवळचा वायरलेस मायक्रोफोन " वायर्ड " मध्ये रूपांतर होणार नाही .यू ट्यूब वर शोध घेतला व एका कृष्ण वर्णीय ब्लॉगर याचा मार्गदर्शना खाली मी ते काम स्वतः: घरी केले. आपल्या आजुबाजूच्या नातेवाईकावरून ,मित्रांवरून , आपल्या देशवासीयांवरून आपले जगाबाबत प्रतिकूल मत बनवू नये असा मी यातून धडा घेतला आहे !!
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 04/15/2021 - 09:50 नवीन
खरं आहे. आपण मागेच आहोत. कारण पैसे आहेत, वस्तू विकत मिळते तर भंगार खटपट का करायची हे विचार.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/15/2021 - 13:27 नवीन
मराठी माणूस डी आय वाय बाबतीत जगाच्या फार मागे आहे. हे बऱयापैकी खरे आहे ... पण वेळ पडली कि आणि थोडे स्वतःची हौस म्हणून काही गोष्टी केल्याआहेत घरात त्या - भिंती आणि फर्निचर ला रंग देणे - नळाचे वॉशर बदलणे - मध्यम आकारची झाडे कापणे - दाराची कुलुपे ( त्यांचे सिलिंडर ) बदलणे - टाइल मधील भेगा बुजवणे - कपाटे / भिंतीवर फळ्या ( शेल्फ ) लावणे - फ्रिज आणि डिश वॉशर ला लागणारी छोटी पाण्याच्या नळांची जोडणी करणे - आयकिया च्या फर्निचर ची जोडणी करणे
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र गुरुवार, 04/15/2021 - 15:19 नवीन
आयकिया च्या फर्निचर ची जोडणी करणे याची खूप धडकी घेतली आहे मी :) आजकाल पहिल्यांदा वास्तूच्या manual मधील जोडणीची माहिती घेऊन , जमत असेल असे वाटत तरच मग वस्तू घेतो.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 04/16/2021 - 20:06 नवीन
आतापर्यंतच्या अनुभवावरुन माझी एक फळी शिल्लक राहते ... कितीही काटेकोर जोडणी केली तरी :-)
  • Log in or register to post comments
K
king_of_net गुरुवार, 04/15/2021 - 09:43 नवीन
चित्रगुप्त, मायटर बॉक्स, एफ क्लॅप आणि करवत कुठुन घेतली ते सांगाल का?? मी ह्या प्रकारची करवत (Tenon saw) शोधत होतो..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा