Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गुढीपाडवा - शक्रोत्सवातील इंद्रध्वजपूजेचे प्राचीन साहित्यातील वर्णन

प
प्रचेतस
Tue, 04/13/2021 - 02:57
💬 51 प्रतिसाद
चैत्र शुद्ध प्रतिपदा-गुढीपाडवा, नववर्षाचा पहिला दिवस, शालीवाहन शक, या दिवशी आपण गुढ्या उभारुन नववर्षाचे स्वागत करतो. गौतमीपुत्र सातकर्णीने याच दिवशी शकांचा पराभव केला असे मानले जाते आणि त्याच विजयाप्रीत्यर्थ हा शक सुरु केला असे मानले जाते. अर्थात हा विवाद्य विषय कारण मुळात गौतमीपुत्राने नहपानाचा पराभव केला ते इसवी सन १२५ ते १३० च्या आसपास असे मानले जाते तर कुशाण वंशीय कनिष्काची राजवट सुरु झाली ते इस ७८ मध्ये, साहजिकच हा संवत्सर कनिष्काने सुरु केला असावा आणि नंतर त्यांचे क्षत्रप असलेल्या शकांनी हा प्रचलित केला असे मानता येते. अर्थात ह्या घटनांच्या बाबतीत येथे मी जास्त खोलात जाणार नाही, मला येथे लिहायचे आहे ते गुढीपाडव्याच्या म्हणजे गुढी उभारण्याच्या प्रथेचे प्राचीन साहित्यात आलेल्या वर्णनांबाबत. हा सण प्राचीन काळात इंद्रोत्सव किंवा शक्रोत्सव ह्या नावाने प्रचलित होता आणि ह्या उत्सवात इंद्राची पूजा केली जात असे. कळकाच्या काठ्या उभारल्या जात आणि त्याला इंद्रध्वज असे म्हणत असत. महाभारतातल्या आदिपर्वात इंद्रध्वजाचे वर्णन पुढीलप्रकारे आले आहे. उपरिचर नामक एका धर्मनिष्ठ राजा आपल्या तपोबलाने इन्द्रपदासही योग्य झाला असे वाटून देव त्याच्यापुढे प्रकट झाले व त्यास म्हणाले की तू पृथ्वीचे राज्य कर, इंद्राने त्याला चेदी देशाचे राज्य दिले व त्याला एक दिव्य विमान, ज्यातील कमळे कधीच कोमेजत नाहीत व जी परिधान केल्यावर कुठल्याही शस्त्रांपासून भीती नाही अशी एक दिव्य इंद्रमाला त्यास दिली आणि... यष्टिं च वैणवीं तस्मै ददौ वृत्रनिषूदनः | इष्टप्रदानमुद्दिश्य शिष्टानां परिपालिनीम् || तस्याः शक्रस्य पूजार्थं भूमौ भूमिपतिस्तदा | प्रवेशं कारयामास गते संवत्सरे तदा || ततः प्रभृति चाद्यापि यष्ट्याः क्षितिपसत्तमैः | प्रवेशः क्रियते राजन्यथा तेन प्रवर्तितः || अपरेद्युस्तथा चास्याः क्रियते उच्छ्रयो नृपैः | अलङ्कृतायाः पिटकैर्गन्धैर्माल्यैश्च भूषणैः || माल्यदामपरिक्षिप्ता विधिवत्क्रियतेऽपि च || भगवान्पूज्यते चात्र हास्यरूपेण शङ्करः | स्वयमेव गृहीतेन वसोः प्रीत्या महात्मनः || एतां पूजां महेन्द्रस्तु दृष्ट्वा देव कृतां शुभाम् | वसुना राजमुख्येन प्रीतिमानब्रवीद्विभुः || ये पूजयिष्यन्ति नरा राजानश्च महं मम | कारयिष्यन्ति च मुदा यथा चेदिपतिर्नृपः || तेषां श्रीर्विजयश्चैव सराष्ट्राणां भविष्यति | तथा स्फीतो जनपदो मुदितश्च भविष्यति || एवं महात्मना तेन महेन्द्रेण नराधिप | वसुः प्रीत्या मघवता महाराजोऽभिसत्कृतः || उत्सवं कारयिष्यन्ति सदा शक्रस्य ये नराः | भूमिदानादिभिर्दानैर्यथा पूता भवन्ति वै || वरदानमहायज्ञैस्तथा शक्रोत्सवेन ते || सम्पूजितो मघवता वसुश्चेदिपतिस्तदा | पालयामास धर्मेण चेदिस्थः पृथिवीमिमाम् || इन्द्रप्रीत्या भूमिपतिश्चकारेन्द्रमहं वसुः || (महाभारत भांडारकर संशोधित प्रत १.५७) ...आणि नंतर इंद्राने उपरिचर राजाला आपल्या प्रेमाचे प्रतिक म्हणून एक वेळूची (बांबू/कळक) काठी दिली. इंद्राने प्रदान केलेल्या वस्तूंना स्मरुन राजानेही तो संवत्सर संपण्याच्या दिवशी ती काठी जमिनीत पुरुन ठेवली. ही चाल अद्यापिही राजेलोकांत सुरु आहे. नंतर नवीन वर्षाच्या प्रथम दिवशी त्या काठीला वस्त्रभूषणे, गंधपुष्पे इत्यादिकांनी अलंकृत करुन उंच उभारितात आणि वसुराजाप्रीत्यर्थ धारण केलेल्या हंसरूपी ईश्वराची या यष्टीद्वारा विधीपूर्वक मोठ्या आदराने पूजा करतात. आपला हा उत्सव वसुराजाने प्रचलित केलेला पाहून त्या चक्रवर्ती राजावर इंद्राचा अनुग्रह होऊन त्याने असा वर दिला की "जे नृप व जे लोक चेदीराजाप्रमाणे माझा उत्सव व पूजा करतील त्यांचा सदैव विजय होत जाऊन त्यांचे राज्य अखंड संपन्न होईल व त्यांच्या प्रजाजनांचेही कल्याण होऊन ते नेहमी संतुष्ट राहतील" याप्रमाणे त्या उदार महेन्द्राने चेदीराजाचा उत्तम सत्कार केला. तर वराहमिहिराच्या बृहदसंहितेत इंद्रध्वजाचे वर्णन पुढीलप्रमाणे आले आहे. उपरिचरस्यामरपो वसोर्ददौ चेदिपस्य वेणुमर्याम | यष्टिं तां स नरेन्द्रो विधिवत् सम्पूजयामास || (इन्द्रध्वसम्पद् ४३) एकदा इंद्राने चेदी देशातील राजाला जो उपरिचर वसु या नावाने विख्यात होता त्याला एक कळकाची काठी दिली तो राजा त्या काठीची विधिवत पूजा करत असे. बृहद्संहितेतील काही श्लोकांचे वर्णन महाभारतातील वर्णनाप्रमाणेच आलेले आहेत. मात्र ह्या व्यतिरिक्त ही यष्टी कशी आणावी ह्याचे अधिकचे वर्णनही बृहद्संहितेत येते. उद्यान देवतालय पितृवन वल्मीकमार्ग चितिजाताः।कुब्जोर्ध्वशुष्क कण्टकिवल्लीवन्दाक युक्ताश्च ॥ बहुविहगालय कोटरपवनानल पीडिताश्च ये तरवः। ये च स्युः स्त्रीसंज्ञा न ते शुभाः शक्रकेत्वर्थे ॥ एक ज्योतिषी आणि एका सुताराने शुभदिवस, नक्षत्रे पाहून मंगल मुहूर्तावर जंगलात प्रस्थान करावे, जी झाडे उद्यानात, देवळांत, स्मशानांत, वारुळांत, रस्त्यांवर, यज्ञीय स्थळी लावली जातात, जी बुटकी आहेत, माथ्यावर खुडलेली आहेत, काटेरी आहेत, परजीवी वेलींनी ज्यांना वेढा घातलेला आहे, ज्यांच्यावर असंख्य पक्ष्यांचा निवास आहे, त्यांची घरटी आहेत, जी पोकळ आहेत, ज्यांचे वारा आणि आगीमुळे नुकसान झाले आहे आणि ज्यांची नावे स्त्रीसूचक आहेत अशी सर्व झाडे ह्या साठी वर्ज्य समजावीत. वराहमिहिर पुढे म्हणतो, अर्जुन, अजाकर्ण (चंद्रुस), प्रियक, धव (धामोरा/धावडा), उंबर ह्या झाडांचे लाकूड ध्वजासाठी उत्तम समजावे. त्या वृक्षाची स्तुती करावी- हे महान वृ़क्षा, तुझ्यात निवास करणार्‍या सर्व जीवांना नमन असो, राजाने तुला ह्या देवेन्द्राचा ध्वज म्हणून निवडले आहे, कृपया या पूजेचा स्वीकार करावा. यानंतर भल्या पहाटे सुताराने पूर्व किंवा उत्तर दिशेस सन्मुख होऊन हे झाड कापण्यास आरंभ करावा किरकिर आवाज करत न कापता हळूवार पण एकच वारात हे काम करावे. जर तो वृक्ष एकाच फटक्यात इतर वृक्षांना इजा न देता शिवाय स्वतःचेच नुकसान न होऊ देता पडला तत तो राजाला विजय देईल. याविपरीत वृक्ष पडला तर तो ध्वजासाठी त्याज्य समजावा. हा वृ़क्ष वरील बाजूस चार अंगुळे तर खालील बाजूस आठ अंगुळे इतका ठेवून साफ करावा व त्याचे खोड पाण्यात बुडवून ठेवावे व यांनतर तो मनुष्यांकरवी अथवा रथातून गावाच्या वेशीवर आणावा. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षात राजाने नगरजन, सचिव, पुरोहित यांसह नवे कपडे धारण करुन शंख आणि वाद्ये वाजवत ध्वजास सामोरे जावे. सर्व नगर स्वच्छ करुन ध्वज, पताका, तोरणे, पानाफुलांच्या माळा यांनी सजवावे. यष्टी आणताना ती जर हत्तीं किंवा इतर प्राण्यांद्वारे पडल्यास तो अपशकुन समजावा. मुलांनी टाळ्या वाजवल्यास किंवा प्राणी एकमेकांशी भांडू लागल्यास भविष्यात युद्ध होईल असा अपशकुन मानावा. नंतर राजसुताराने ती यष्टी एखाद्या चौथर्‍यावर आडवी ठेवावी व राजाने अकराव्या दिवशी रात्री तिचे निरिक्षण करावे. नंतर बाराव्या दिवशी ब्राह्मणांना गूळ, दूध दक्षिणा देऊन ध्वज उभारावा. ध्वजाला विविध रंगांतील अलंकारांनी अलंकृत करावे यातले काही अलंकार पुढीलप्रमाणे- अशोकाचे रक्तवर्णी फूल, विविध रंगांचे पट्ट, मसूरक, मोराची पिसे, कमलपुष्प इत्यादी. हा ध्वज ४ दिवस तसाच ठेवून विविध सूक्तांद्वारे त्याची पूजा करावी. पाचव्या दिवशी हा इंद्रध्वज राजाने त्याच्या अमात्यांसह येऊन उतरवावा. उपरिचर वसुने प्रचलित केलेल्या व इतर राजांद्वारे अनुसरण केल्या गेलेल्या ह्या प्रथेचे जो राजा यथाविधी पालन करेल त्याला शत्रूंकडून कुठलेही भय राहणार नाही. अर्थात बृहद्संहितेत शक्रोत्सवाच्या वर्णनात चैत्र महिन्याचा उल्लेख न येता भाद्रपद महिन्याचा उल्लेख आलेला आहे शिवाय सुरुवातीला कळकाचा (बांबूचा) उल्लेख असला तरी नंतर इतरही वृ़क्ष काठीसाठी योग्य समजले आहेत. जंगलात जाऊन लाकूड आणणार्‍या प्रथेचे आजही येथील बगाड यात्रेत पालन होताना दिसते. बगाडासाठीचे लाकूड आणायला लोक जंगलांत जातात. हिंजवडीतल्या बगाडाचे लाकूड मुळशी खोर्‍यातल्या बार्पे ह्या दुर्गम गावी जंगलात जाऊन वाजतगाजत आणले जाते. बगाडाच्या यात्रा चैत्र महिन्यात होतात हे उल्लेखनीय आहे. महाभारतातील खिलपर्वात -हरिवंशात (खिलपर्व मूळ महाभारताचा भाग समजले जात नाही) इंद्रोत्सव न करता गोवर्धन पर्वताची पूजा करावी असे गोकुळातल्या लोकांना सांगतांना कृष्ण म्हणतो की "सांप्रत शरद ऋतूचा काल प्राप्त झालेला आहे.हा ऋतू लागला म्हणजे मेघ कमी होऊन जलाशयातील पाणी कमी होऊ लागते. तुम्ही ह्या गोवर्धन गिरीचे पूजन करुन त्याला संतुष्ट करा." त्यानंतरची कथा सर्वांना माहिती आहेच. इंद्राचे गर्वहरण झाल्यावर तो श्रीकृष्णाला म्हणतो, "पावसाळ्याचे माझे चार महिने आहेत. ते त्यातील शेवटचे शरदऋतूचे दोन महिने मी तुला अर्पण करेन अर्धा पावसाळा झाल्यावर माझी कालमर्यादा व पूजा समाप्त करुन लोक तुझी पूजा करतील, आकाश निर्मल होऊन मेघ नाहीसे होतील, धान्य उत्पादन वाढेल, ध्वजाकार यष्ट्या उभ्या करुन अखिल लोक तुझे व माझे महेन्द्र आणि उपेन्द्र या नावांनी पूजन करतील" रामायणात मात्र मला इंद्रध्वजाचा उल्लेख मिळाला नाही, रावणाचा वध करुन राम अयोध्येस परत येतो तेव्हा देखील तिथीचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही, इतर कुठल्या प्रतींत आहे का ते बघायला हवे. वराहमिहिराची बृहद्संहिता व खिलपर्वातील ह्या उल्लेखांमुळे इंद्रध्वजाची पूजा भाद्रपद महिन्यात प्रचलित होती हे सहज लक्षात यावे मात्र महाभारतातील त्याचा उल्लेख मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीस काठीची/इंद्रध्वजाची पूजा करावी असा येतो. आदिपर्वात इंद्रध्वजपूजेचे संक्षिप्त वर्णन आलेले असून वराहमिहिराने मात्र ते अगदी तपशील्वार नोंदवले आहे. महाभारत काळात इंद्रोत्सव हाच नववर्षाचा दिन मानला जात असे की नाही ते कळत नाही. भाद्रपदातील हा शक्रोत्सव नंतर कधीतरी कुशाण कालखंडात कनिष्काच्या राज्यारोहणसमयी चैत्र महिन्यात परिवर्तीत झाला असावा व मूळ इंद्राच्या उत्सवाचे त्याचे रूप लयास जाऊन केवळ नवीन संवत्सराचे स्वागत करुन त्याच्या आगमनाप्रीत्यर्थ ध्वजरुपी काठ्या अर्थात गुढी उभारण्यात सुरु झाले असावे असा माझा तर्क. गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. (चैत्र शुद्ध प्रतिपदा, शालिवाहन शक १९४३, प्लव संवत्सर)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 38658 views

💬 प्रतिसाद (51)
अ
अहिरावण Wed, 04/10/2024 - 07:59 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा