Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

ह
हेमंतकुमार
Mon, 03/15/2021 - 05:12
🗣 124 प्रतिसाद
नुकताच एका परिचितांनी ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा. या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात : १. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो २. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा ३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात. म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा. माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी. … १. आठराविश्वे दारिद्र्य अर्थ : -पूर्ण दारिद्र्य आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो. त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली : अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = 18/20 (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF+) ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे) http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87 आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले : १८/२० आणि १८ गुणिले २० ! २. पुराणातली वांगी पुराणात अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर). आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा : “यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”. https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-mythology-1670536/ ३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला = हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु] https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8 इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा? ४. परोक्ष मूळ अर्थ : एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष. मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो ! हा पाहा संदर्भ : “अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”. (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7+) ५. मेत(थ)कूट याचा सर्वपरिचित अर्थ हा: तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें. यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे. पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे. मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र) दाते शब्दकोश https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%9F ...... वानगीदाखल मी काही वर दिले आहे. येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल. **************************************

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 56718 views

🗣 चर्चा (124)
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 03/15/2021 - 06:41 नवीन
आरत्यांमधे पण आजकाल नवनवीन ओळी ऐकू येतात:- उदा:- जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती, जयदेव जयदेव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, पंढरीचा महिमा, द्वारकेचा महिमा वर्णावा किती, जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी, हो दैत्यासुरमर्दिनी आपण आगदी मनापासून आरती म्हणत असताना मधेच असे मीठाचे खडे लागले की आरती म्हणण्यातला उत्साह संपून जातो. टिव्ही वर ज्या वेगवान मराठी बातम्या दिल्या जातात त्यात उधळली जाणारी "शब्दभेळ" हा तर वेगळ्या संशोधनाचा विषय होईल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 03/15/2021 - 08:13 नवीन
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे. >>> मला वाटते याचा अर्थ स्वतःचे अस्तित्व विसरून मिसळून जाणे असा होईल..
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 03/15/2021 - 13:04 नवीन
एखाद्याचा माल विशेषतः सकाळी सकाळी पहिल्यांदी खरेदी केला तर तो भवानी झाली म्हणुन ते पैसे डोक्याला लावुन दिवसाचा धंदा चालु करतो. ग्रामीण भागात जे राहिले आहेत त्यांना हे रोज अनुभवयास मिळते. भवानी होणे म्हणजे धंद्याची सुरवात होणे. पण मुंबईत मात्र हा शब्द अपभ्रंश होऊन बोवनी असा झाला आहे. आता कुणी भवानी म्हटले तर लोक काय गावंढळ आहे अश्या नजरेने पाहतात.
  • Log in or register to post comments
न
नगरी गुरुवार, 03/24/2022 - 08:53 नवीन
बोहनी
  • Log in or register to post comments
स
सुरिया गुरुवार, 03/24/2022 - 09:22 नवीन
पहिल्यांदी खरेदी केला तर तो भवानी झाली म्हणुन ते पैसे डोक्याला लावुन दिवसाचा धंदा चालु करतो.
मूळ शभ बोहनी हाच आहे. भवानी हा अपभ्रंश आहे. त्यातली अजुन एक गोष्ट म्हणजे बर्याच गोष्टी (उदा. आंबे, फळे ई.) मोजुन देताना विक्रेते एक, दोन असे न मोजता लाभ, दोन, तीन असे मोजतात.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/24/2022 - 09:30 नवीन
लाभ, दोन, तीन असे मोजतात.
>> याच धर्तीवर बरकत, दोन, तीन अशीही एक पद्धत. https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%A4
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 03/15/2021 - 13:24 नवीन
ज्ञा पै, अगदी बरोबर. बऱ्याच आरत्यांमध्ये अशी खिचडी झालेली ऐकायला येते. आनंदा, बरोबर. असाही अर्थ घेता येतो. का यो, होय. मूळ संस्कृत शब्द भवानी आहे. त्याचा मराठीत येताना बोहणी / नी अशी दोन्ही रूपे झाली. (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%80+).
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 03/15/2021 - 15:58 नवीन
बोहणी हा शब्द इतका जुना असेल असे मला वाटले नव्हते. आजपावेतो मी असेच समजत होतो कि बोबड्या साहेबाने व त्याच्या पिलावळीने बदलेला हा शब्द असावा. (जसे बिहाईंड द बाझार चे भेंडीबाजर वगैरे.)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 03/17/2021 - 13:49 नवीन
बिहाईंड द बाझार चे भेंडीबाजर
>>> यावरून आठवले : तेव्हा भारतात अधिकारपदावर असणारे इंग्रज अधिकारी आपल्या हाताखालच्या भारतीय शिपायांना दरवाजा बंद करणे व उघडणे अशी कामे सांगत. आता शिपायांना तर साहेबांचे इंग्रजी कळणे अवघडच आणि साहेबाला इंग्लिश सोडून दुसरी कुठली भाषा येणार ? मग आपल्यातल्या काही डोकेबाज लोकांनी साहेबांना ती दोन वाक्ये हिंदीतून कशी बोलायची ते शिकवले. जेव्हा “दरवाजा बंद कर”, असे सांगायचे असेल तेव्हा ‘There was a banker’ आणि “दरवाजा खोल दे” यासाठी ‘There was a cold day’ असे म्हणायचे. साहेबाने इंग्लिश वाक्ये भरकन म्हंटली त्याचा अपेक्षित ध्वनी हिंदीतून येतो ! करून पाहा !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/15/2021 - 15:41 नवीन
वाचत आहे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 03/15/2021 - 16:23 नवीन
अपभ्रंश पाहा : घोड्यानें पेंड (पेण) खाणें वास्तविक पेण =प्रवासांतील टप्पा प्रत्यक्षात , 'पेंड’ हा शब्‍द ‘पेण’ याबद्दल चुकीचा वापरतात व खाण्याची पेंड असा असा खुलासा करतात. घोड्याने पेंड खाल्‍ली म्‍हणजे तो सुस्‍त होतो व पुढे जात नाही. पण ही उपपत्ति चुकीची आहे. दूरच्या प्रवासात विश्रांतीचे निरनिराळे टप्पे (पेणे) ठेवलेले असतात. तेव्हां सरावाचे टप्पे आले की घोडे तेथे अडतात, म्‍हणजे घोडे तेथे पेण खातात. https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A3-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82/word
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 03/15/2021 - 17:42 नवीन
ही आरती म्हणताना म्हणणारी व्यक्ती स्वत:च्या लिंगानुसार "चारी श्रमलो/श्रमले परंतु..." तसेच "साही विवाद करिता पडलो/पडले प्रवाही" म्हणते. प्रत्यक्षात "चारी (वेद) श्रमले" व "साही (=सहाही) (दर्शने) विवाद करिता पडली प्रवाही" असे म्हणणे योग्य असते.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 03/16/2021 - 09:40 नवीन
या माहितीबद्दल आभारी ! ))
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 03/15/2021 - 18:00 नवीन
सुखकर्ता दुखहर्ता या गणपतीच्या आरतीत संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे ऐवजी संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे असे अनेक ठिकाणी म्हणतात. इतकेच नव्हे तर 'दास रामाचा वाट पाहे सदना' ऐवजी 'दास रामाचा वाट पाहे सजणा' असेही अनेक ठिकाणी ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 03/16/2021 - 08:46 नवीन
ह्या लोकांपुढे "घालीन लोटांगण" करावे असे वाटते!
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Mon, 03/15/2021 - 18:26 नवीन
रिकामा न्हावी भिंतीला तुंबडे लावी - येथे तुंबडे हे 'टुमणे'चे अपभ्रंशित रूप झाले आहे असे एके ठिकाणी वाचले होते. रिकामा न्हावी भिंतीशी बोलत बसतो असा त्याचा अर्थ. विद्वानांनी ह्यावर प्रकाश पाडला तर उत्तम. 'ऐना का बैना, घेतल्याशिवाय जाय ना' मला वाटते पूर्वी होळीत दारोदारी जाऊन मुले पैसे मागायची व हे गाणे म्हणायची. त्यातील 'ऐना का बैना' म्हणजे 'आई असो की बहीण असो' पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, असा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 03/16/2021 - 03:44 नवीन
तुंबडी = रक्तशोषक यंत्र. >>>> 1. तुंबडी लावणें-१ पिच्छा, पाठ पुरविणें. २ वित्त, शक्ति इ॰ चें शोषण करणे.म्ह॰ रिकामा न्हावी कुडाला तुंबड्या लावी. https://bruhadkosh.org/words?shodh=++%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80+ …. 2. पूर्वी न्हावी हे शस्‍त्रक्रियादि साधनांनी रोग्‍यास उपचार करीत असत. तुंबडी लावणें हेहि एक त्‍यांच्या कामापैकी एक असे. मनुष्‍य निरुद्योगी असला म्‍हणजे भलतेच उद्योग करण्याकडे त्‍याची प्रवृत्ति होते. https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80/word
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/16/2021 - 04:44 नवीन
तुंबडीचा मूळ अर्थ जरी रक्त शोषायचे नळीसारखे यंत्र असा असला तरी लौकिकार्थाने तुंबडीस जळू म्हणतात. पूर्वीच्या काळी न्हावी लोकांकडे जळवा असत. अशुद्ध रक्त ओढून काढण्यासाठी जखमांच्या ठिकाणी त्या लावल्या जात.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 03/16/2021 - 18:22 नवीन
खुप खुप आभार
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/15/2021 - 18:29 नवीन
"प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे" या पंक्तीचा अर्थ "खूप परिश्रमाअंती साध्य प्राप्त होते" असा लावला जातो. परंतु हा अर्थ चुकीचा आहे व संदर्भही चुकीचा आहे. मूळ पंक्ती अशा आहेत. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे तृषार्थाची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे सशाचे लाभे विपिनी फिरता शृंग ही जरी, परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ... प्रयत्ने वाळूचे कण-" या ओळीचा अर्थ प्रयत्नाने सारे काही साध्य होते, असा मुळीच नाही. माणूस जन्मभर जरी रगडत बसला तरी वाळूच्या कणांवर थेंबभर देखील तेल गळणार नाही. या ठिकाणी कवी पूर्णपणे अशक्य अशा गोष्टींची उदाहरणे देत आहे. मृगजळाने तहानलेल्या माणसाची (एखाद्या वेळी) तहान भागेल, रानात सशाचे शिंग सापडू शकेल, वाळूच्या कणांतून तेलाचा थेंब गळू शकेल, पण मूर्खाचे हृदय मात्र कधीही धरता येणार नाही. म्हणून ही ओळ प्रयत्नांची स्तुती करणारी मुळीच नाही. कुणी तरी असला खुळचट अर्थ डोक्यात घेतला व त्याची परंपरा होऊन बसली. एखाद्या पुजाऱ्याला पूजा करताना शिंक यावी व ते पाहून पूजेच्या सुरुवातीला शिंकलेच पाहिजे असा क्रम निर्माण व्हावा, तसे या ओळीबद्दल झाले आहे." ... संदर्भ - http://lahanpan.blogspot.com/2008/07/blog-post.html?m=1
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 03/16/2021 - 15:52 नवीन
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
बहुदा वाळवंटी प्रदेशात तेलाच्या खाणी सापडल्यामुळे ह्या म्हणीला नवीन अर्थ प्राप्त झाला असावा.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Mon, 03/15/2021 - 18:35 नवीन
म्हणी व वाक्प्रचार ह्यातील नक्की फरक कोणी सांगू शकेल काय ? माझ्या माहितीनुसार म्हणी ह्या प्रतीकात्मक किंवा रूपकात्मक असतात, म्हणजेच त्याचा सरळ संबध वस्तुस्थितीशी नसतो. उदा. बैल गेला झोपा केला (ह्यातील 'झोपा' म्हणजे काय ?) वाक्प्रचार वस्तुस्थिती दर्शक असतात. उदा. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाने तीनच. माझी ही माहिती बरोबर आहे का ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/15/2021 - 19:07 नवीन
म्हणी' म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य. म्हण ही कहाणी, उखाणा यांप्रमाणे मूलतः मौखिक अशा लोकसाहित्यात जमा होणारी, पण छोटेखानी गद्य वाङ्‍मयकृती असते. संक्षेपाबरोबरच यमक, अनुप्रास, अतिशयोक्ती, उपमा इ. अलंकारांमुळे ती चटकदार बनते. त्या त्या समाजाच्या संस्कृतीमधले विशिष्ट विषयाबद्दलचे शहाणपण तिच्यात साठवलेले आणि पुढच्या पिढीच्या हवाली केलेले असते. म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती 'म्हण'होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते. कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. यात उपमा, रूप, पर्यायोक्ती, विरोधाभास, यमक, अनुप्रास अशा विविध भाषा अलंकारां सोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग केलेला असतो. उदाहरणार्थ - कामापुरता मामा – गरजेपुरता गोड बोलणारा कुंपणानेच शेत खाल्ले – रक्षकानेच चोरी करणे वाक्प्रचार हा म्हणीप्रमाणे स्वयंपूर्ण नसतो (म्हणीला तर पंचांसमोरच्या न्यायदानात आधार म्हणून वापरण्याइतकी प्रतिष्ठा असते.) जगातल्या कोणत्याही भाषेत एकेरी शब्दांबरोबर ज्यांचा अर्थ सहजगत्या न लागता रूढीने लागतो असे शब्दसमूह आणि कधी वाक्ये असतात आणि ती लहान मुलाला असो किवा परक्याला असो स्वतंत्रपणे शिकून घ्यावी लागतात. सुटा वाक्प्रचार स्वयंपूर्ण नसतो, सुट्‍ट्या शब्दांप्रमाणे तो संदर्भातच जिवंत होतो. उदाहरणार्थ - अंधारात घाव घालणे, उखळ पांढरे होणे. संदर्भ - गुगल
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 03/16/2021 - 18:24 नवीन
गुरुजी, आभार.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 03/16/2021 - 05:58 नवीन
बैल गेला झोपा केला (ह्यातील 'झोपा' म्हणजे काय ?)
झोपा = कवाड एका मनुष्‍याजवळ एक बैल होता. तो ज्‍या ठिकाणी बांधीत असे त्‍या गोठ्‌याला दरवाजा अथवा कवाड नव्हते. अशा स्‍थितीत वाघाचा उपद्रव सुरू झाला तेव्हां त्‍यास गोठ्यास झोपा करावयास त्‍याच्या बायकोने सांगितले, त्‍यानेहि त्‍याप्रमाणें करण्याचा मनात विचार केला पण रोज काही काही निमित्ताने तो ते काम दिरंगाईवर टाकू लागला. अखेरीस त्‍याने एके दिवशी कवाड जवळजवळ तयार केले व दुसर्‍या दिवशी सकाळी गोठ्‌यास लावावयाचे तो त्‍या रात्री वाघाने बैलास उचलून नेले. याप्रमाणें दिरंगाईमुळे त्‍याचा बैल गेला व त्‍याचे श्रमहि फुकट गेले.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 03/16/2021 - 18:25 नवीन
आळसामुळे 'झोपा' चा अर्थ शोधण्याचा प्रयत्न आधी केला नाही. तुमच्यामुळे तो अर्थ कळला. खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/17/2021 - 15:28 नवीन
मी एक दुसरा अर्थ ऐकला होता बैल नसून बाईल म्हणजे बायको आणि झोपा म्हणजे घर (वर्हाडी कि अहिराणी भाषेत असावे) राहायला घर नसल्यामुळे बायको नवऱ्याशी भुणभुण करत असे. शेवटी नवऱ्याने घर बांधायचे मनावर घेतले परंतु त्या अगोदरच बायको (बाईल) निघून गेली होती
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/15/2021 - 19:25 नवीन
पुन्हा एकदा अप्रतिम धागा.. वाचत आहे.. प्रतिसाद हि वाचनीय..
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 03/15/2021 - 19:28 नवीन
लेक माहा टिकोबा चारी बैले इकोबा, बोली भाषा व त्यातुनच निर्माण झालेले अपभ्रंश, म्हणी इतक्या सटिक व सशक्त परीणाम कारक असतात. सुदंरभरम्हणींचचा संग्रह व त्यावर एक लेख लिहिला आहे लवकरच शेअर करेन धन्यवाद
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Mon, 03/15/2021 - 20:18 नवीन
रोचक माहिती.. !!!
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 03/16/2021 - 00:43 नवीन
छान धागा. सुंदर माहीती . . . नावाच्या बाबतीत पण असेच झालेले पाहिले आहे .. आसराबाई --> अप्सराबाई??? बिरोबा --> वीरभद्र ?? "अती शहाणा त्याचा बैल रिकामा" यात बैल रिकामा म्हणजे काय अभिप्रेत असावे?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 03/16/2021 - 05:52 नवीन
अती शहाणा त्याचा बैल रिकामा" यात बैल रिकामा म्हणजे काय अभिप्रेत असावे?
जो वाजवीपेक्षां जास्त हुषारी दाखविण्याचा प्रयत्न करतो त्याचें मुळींच काम होत नाहीं. फाजील शहाणपणा नुकसानच करतो. एक माणूस आपण बैलाकडून काम करुन घेतलें तर त्याला फार खावयाला घालावें लागेल व मग नुकसान येईल म्हणून त्याला रिकामा ठेवी. या मूर्खपणाबद्दल त्याचें दुप्पट नुकसान झालें. कारण त्याचें मुळींच काम न होतां बैल मात्र पोसावा लागला.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 03/17/2021 - 20:32 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 03/16/2021 - 08:50 नवीन
पूर्वी बैल म्हणजे काही तरी कामासाठी ठेवायचे, नांगरणे किंवा बैलगाडी ओढणे इत्यादी. आणि बैल रिकामा असणे म्हणजे पोसायला एक तोंड आहे पण फायदा काही नाही अशी स्थिती. (म्हणजे तुमच्या कडे टेक्सी आहे पण गॅरेजमध्ये पडून आहे असा प्रकार). ह्याला एक कथा सुद्धा असे पण आता आठवत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 03/17/2021 - 20:32 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 03/16/2021 - 03:32 नवीन
आपण सर्वांनीच धाग्यात मौलिक भर घातलेली आहे. आता विशिष्ट शंकाचे संदर्भ शोधतो व त्यानुसार भर घालेन धन्यवाद !
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 03/16/2021 - 05:59 नवीन
येथेही अनेक म्हणी अर्थासहित आहे. https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE/word
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 03/16/2021 - 06:03 नवीन
धन्यवाद. हेच लिहीत होतो : सूचना : ज्यांना अपभ्रंश इ. बद्दल ‘ऐकीव’ माहिती असेल त्यांनी खालील संस्थळावरून तिची खातरजमा करून घ्यावी. १. https://bruhadkosh.org/ २. https://www.transliteral.org/dictionary नंतर चुकीचे/ ऐकलेले व बरोबर अशी एकत्र माहिती लिहावी. धन्यवाद व स्वागत !
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Tue, 03/16/2021 - 06:25 नवीन
चांगला लेख.आवडला.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 03/16/2021 - 09:00 नवीन
हा लेख मला खूप आवडला. मैथिली ठाकूर हि एक सुप्रसिद्ध यौतुंबे वरील बालिका आहे. आपल्या सुंदर आवाजांत हि सुंदर गाणी, भजने म्हणते आणि तिचे बाऊ तिला तबला, पेटीवर साथ देतात. आता हि बालिका लाईव्ह शो सुद्धा करते. तिच्यासारखी कन्या प्राप्त होणे हे पालकांचे भाग्य आहे. पण विविध भजनाच्या सोबत ती एक खा गाणे सुद्धा म्हणते "छाप तिलक सब छिन लोहे मोसे नैना मिलायिके". मैथिलीच नाही तर अनेक लोक हे गाणे विविध ठिकाणी आणि अनेकदा धार्मिक उत्सवांत सुद्धा भजन म्हणून म्हणतात. प्रत्यक्षांत ह्या शब्दांचा अर्थ खूपच वाईट आहे. कदाचित छाप आणि तिलक हे शब्ध असल्याने लोकांना हे गीत काही तरी धार्मिक आहे असे वाटते, पण तसे अजिबात नाही. हे गीत अमीर खुसरो ने १२०० च्या काळांत लिहिले. त्या काली दिल्ली वगैरे भागांत इस्लाम आणि हिंदू धर्म ह्यांच्यात बरीच युद्धे होत होती आणि आपली हिंदू ओळख दाखविण्यासाठी वैष्णव लोक छाप (कानशिलावर लावलेले गंधाचे शिक्के) आणि तिलक लावत असत. अमीर खुसरो च्या गीताच्या बोलाचे अर्थ आहेत कि मुस्लिम माणूस निव्वळ आपल्या दृष्टीने हिंदू महिलेच्या मनात वासना निर्माण करतो आणि त्याच्यावर मोहित होऊन हि महिला आपली हिंदू ओळख पुसून इस्लाम कबुल करते. अशी इस्लाम ची जादू आणि इस्लामिक पुरुषाची जादू आहे. ह्या गीतातून हिंदू धर्म आणि त्यांचे सिम्बॉल ह्यावर मुद्दाम हुन अमीर खुसरो ह्यांनी टीका केली आहे. https://www.youtube.com/watch?v=pL9wLxsXKTE&t=99s
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 03/16/2021 - 18:33 नवीन
मी हे गाणे युट्यूबवर अनेक कलाकारांच्या तोंडून ऐकले आहे. मैथिली ठाकूर उत्तम गाते ह्यात शंकाच नाही, पण ह्या गाण्याचा अर्थ इतका वाईट असेल असं चुकूनही वाटलं नाही. हे गाणे ऐकल्यावर ते एखाद्या उत्तर भारतीय भाषेतील लोकसंगीत असावे असा समज झाला. आता प्रत्येक वेळी ते गाणे ऐकताना अर्थच मनात फिरत राहणार. अरेरे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 03/17/2021 - 01:08 नवीन
छाप तिलक सब छिन लोहे मोसे नैना मिलायिके" अमीर खुसरो यानी १४व्या शतकात लिहीलेला सुफीयांना कलाम त्या वेळचे सुफी संत हजरत निजामुद्दीन औलीया याच्या बद्दल अवधी भाषेत लिहीला. नुसरत फतेह अली खान, अबिदा परवीन, राहत फतेह अली खान, रिचा शर्मा आणि कितीतरी मान्यवर गायकांनी गायले आहे. रिचा शर्माजी खाली दिलेला शेर गाऊन याची सुरवात करतात. यू ट्यूबवर आहे. अत्यंत सुंदर रचना व प्रस्तुती. माझे आवडते आणी नेहमीच ऐकण्या मधला सुफी कलाम. बाकी माहिती आपण अतंरजाला वर बघु शकता. कृपया भ्रमीत ना हो आणी सुफीयाना गायकीचा आनंद घ्या. " कागा सब तन खाइयो चुनचून मोरा मांस पर दो नैना मत खाईयो इसमे साई मीलन की आंस" तन मज तन मन धन बाजी लागी रे धन धन मोरे भाग बाजी लागी रे लागी लागी सब कहें लागी लागी लागी लागी लागी सब कहें लागी लगी ना अंग लागी तो जब जानिए जब रहे गुरु के संग मौला ओ जी मौला ख़ुसरो रैन सुहाग की ख़ुसरो रैन सुहाग की जो मैं जोगी पी के संग ख़ुसरो बाजी प्रेम की ख़ुसरो बाजी प्रेम की जो मैं खेली पी के संग जीत गयी तो पिया मोरे जो मैं हारी पी के संग नमस्कार
  • Log in or register to post comments
र
राज२००९ गुरुवार, 03/18/2021 - 18:08 नवीन
>>कृपया भ्रमीत ना हो आणी सुफीयाना गायकीचा आनंद घ्या. +१ हे मकरंद जे कोण आहेत त्यांनी "छाप तिलक.."ची पार्श्वभूमी लक्षात न घेता विनाकारण या अजरामर गझल्/कव्वालीचा संदर्भ त्या डिबेटमधे जोडलेला आहे. यावर माझी एकच प्रतिक्रिया - कुछ भी...
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 06/13/2021 - 15:57 नवीन
छाप तीलक छिनणे = ओळख हिसकावणे खो जाना = हरवणे नाहीए छिनणे = हिसकावणे , 'मीटा देना' शी जवळीक आहे. अमीर खुस्रो कुणा सुल्तानांचा भाट नसता तर त्याने असेच लिहिले असते का ? हा प्रश्नच आहे. या वर फुर्सतीने लेख पाडावयास हवा. खुस्रोचा स्वतःचे प्रेम आणि विवाहसंबंध याबद्दल कुणाकडे संदर्भ असल्यास नक्की द्या. एरवी खुस्रोची आई किंवा देवल राणी या परिस्थितीवश मुस्लीम झालेल्या स्त्रीयांशी या काव्याचा संदर्भ असेल. भाटांना काही झाले तरी परिस्थितीचे कौतुक करणे भाग होते उपलब्ध मर्यादेत स्त्रीदास्यत्वातील भक्ती कितीही मोठी भक्ती असली तरी पराजीत दास्यत्व पराजीत दास्यत्व असते.
  • Log in or register to post comments
म
मका म्हणे Tue, 03/16/2021 - 14:43 नवीन
मराठी म्हणी व वाक्प्रचार हे वा.गो.भट यांनी लिहिलेल्या पुस्तकात खूप जुने मराठी वाक्प्रचार व म्हणी वाचायला मिळतील.
  • Log in or register to post comments
म
मका म्हणे Tue, 03/16/2021 - 14:43 नवीन
मराठी म्हणी व वाक्प्रचार हे वा.गो.भट यांनी लिहिलेल्या पुस्तकात खूप जुने मराठी वाक्प्रचार व म्हणी वाचायला मिळतील.
  • Log in or register to post comments
म
मका म्हणे Tue, 03/16/2021 - 14:53 नवीन
मराठी म्हणी व वाक्प्रचार हे वा.गो.भट यांनी लिहिलेल्या पुस्तकात खूप जुने मराठी वाक्प्रचार व म्हणी वाचायला मिळतील.
  • Log in or register to post comments
म
मका म्हणे Tue, 03/16/2021 - 14:54 नवीन
मराठी म्हणी व वाक्प्रचार हे वा.गो.भट यांनी लिहिलेल्या पुस्तकात खूप जुने मराठी वाक्प्रचार व म्हणी वाचायला मिळतील.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 03/16/2021 - 15:27 नवीन
लोकसंस्कृतीचे आणि भारतविद्येचे (इंडॉलॉजी) एक प्रतिभावंत अभ्यासक श्री विश्वनाथ खैरे यांच्या मतानुसार प्रमाणभाषांतील (तथाकथित) "शुद्ध"शब्दांचा अपभ्रंश होऊन बोलीभाषा घडत गेल्या नाहीत तर बोलीभाषांतील शब्दांचा उदभ्रंश होऊन म्हणजे त्यांच्यावर प्रमाणभाषामान्य संस्कार करून प्रमाणभाषांची जडणघडण झाली आहे. हे मत मला फारसे पटत नाही पण अशी उद्भ्रंशाची उदाहरणे कोणास ठाऊक असतील तर ते जाणून घेणे रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 03/16/2021 - 16:27 नवीन
उदभ्रंश होऊन
हा शब्दच किती गोड आहे ! आवडला. कोणी यावर जरूर लिहावे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा