Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

बालम केतकर : अ-भंग

ड
डॉ. सुधीर राजाराम देवरे
Sat, 01/02/2021 - 06:56
💬 5 प्रतिसाद
- डॉ. सुधीर रा. देवरे बालम केतकर गेले. 26 डिसेंबर 2020 ला बातमी येऊन धडकली. ही बातमी आत प्रचंड कासावीस करणारी आहे. विश्वास बसत नव्हता. म्हणून त्यांच्याच नंबरवर तात्काळ फोन केला. त्यांच्या पुतण्याने उचलला. बातमी खरी होती. ह्‍दय विकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं होतं. 23 डिसेंबरला त्यांनी मला लिहिलेलं सविस्तर पत्र 26 डिसेंबरला मिळालं, जे मी त्यांच्या निधनानंतर वाचत होतो. (प्रत्येक चार दिवसांनी वा आठवड्याने त्यांचा फोन येत होता. आणि सोबत पत्रंही.) 24 डिसेंबरला सकाळी आठ वाजता त्यांचा शेवटचा फोन आलेला. म्हणजे फक्त तीन दिवस आधी. म्हणाले, ‘कूपर हॉस्पिटलमधून काल फोन आला. लॉकडाऊनमुळे माझ्या पायाचं ऑपरेशन पुढं ढकललं होतं ते पुढच्या आठवड्यात करु असं डॉक्टर म्हणाले. ऑपरेशन झाल्यानंतर घर शिप्ट करायचं आहे. म्हणून ‘चंद्रकंस’ आता जानेवारीच्या (2021) शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होईल...’ बालम केतकरांनी कविता लिहायला सुरुवात केली तेव्हापासून म्हणजे 1996 पासून त्यांच्या सर्वार्थाने ‘वेगळ्या’ कविता विविध नियतकालिकांत वाचत होतो. पण त्यांच्याशी व्यक्तीगत परिचय नव्हता. परिचय अगदी अलीकडचा म्हणजे आठ महिण्यांचाच. तोही फक्त फोनवर आणि पत्राने. (पत्रं तेच लिहीत. माझ्याकडून पत्र लिखाणाची त्यांनी खूप अपेक्षा केली, पण त्यांच्या पत्राचं उत्तर फोनवरच देत होतो. ते ही तिकडून त्यांचा फोन आल्यावर.) ‘तुम्ही मला पत्रं लिहिली नाहीत तर मी नाराज होईल.’ असंही त्यांनी नोव्हेंबरातल्या एका पत्रातून मला धमकावलं होतं. मार्च 2020 ला स्पीड पोष्टानं त्यांचं एक पार्सल आलं. त्यात त्यांचे दोन कविता संग्रह, ‘विरक्‍त फुलपाखरे’ आणि ‘चंद्र गंजलेला’. सोबत त्यांचं सविस्तर पत्र. पोच देऊ असं ठरवत असतानाच त्यांचा फोन. ‘देवरे सर, मी बालम केतकर बोलतो. दोन कवितासंग्रह पाठवले आपल्याकडे. पहिल्या संग्रहाच्या प्रती आता शिल्लक नाहीत. ‘चंद्र गंजलेला’वर आपण समीक्षा लिहावी, अशी माझी विनंती आहे.’ अशी ही आमची पहिली भेट. माझा संदर्भ त्यांना नक्की कोणी दिला हे शेवटपर्यंत त्यांनी सांगितलं नाही. आठ दिवस होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या सविस्तर पत्रासह ‘तळघरातले हंसध्वनी’ची झेरॉक्स प्रत आणि त्यांच्या कवितासंग्रहांवरील काही लेख पोचलेत. सोबत त्यांचा फोन. त्यानंतर पुन्हा आठच दिवसांनी त्यांच्या नुकत्याच लिहून झालेल्या (20-8-2019 ते 28-2-2020) सव्वीस कवितांच्या हस्तलिखितासह सविस्तर पत्र. त्या नंतरच्या फोनवर त्यांनी थोडक्यात त्यांचं आत्मकथन केलं. नवीन येऊ घातलेल्या कवितासंग्रहाला मी प्रस्तावना लिहावी असा आग्रह धरला. फोनवरचे त्यांचे काही शब्द आठवतात, ‘तुमच्या सारखाच मी ही प्रसिध्दीपासून, सभा, भाषणं, संमेलनांपासून आणि पारितोषिकांपासूनही लांब आहे. म्हणून मला तुमची प्रस्तावना हवीय...’ मी स्पष्ट होकार न देता बालमांच्या कवितांचा अभ्यास सुरु ठेवला. त्यांची कविता आकलनाला आव्हानात्मक असल्यानं खूप वेळ देत होतो. मध्यंतरी लॉकडाऊन सुरु झाल्यानं त्यांची पत्रं येणं बंद झालं. पण फोन येत होते. ऑगष्ट 2020 च्या शेवटी अजून चौतीस कविता त्यांनी पाठवल्या. आधीच्या तिन्ही कवितासंग्रहांचा विचार मी प्रस्तावनेत करत होतो म्हणून एप्रिलपासून 30 नोव्हेंबरपर्यंत साडेआठहजार शब्दांच्या दीर्घ प्रस्तावना लिखाणाला मी आठ महिने घेतले. या चौथ्या कवितासंग्रहाला काय शीर्षक द्यावं यावर ते फोनवर विचार विनिमय करीत. माझ्यासह अजून दोन मित्रांशी चर्चा करुन ‘चंद्रकंस’ नाव नक्की करण्यात आलं. बालम केतकर हे अतिशय नम्र होते. कवितेच्या प्रांतात ते ज्येष्ठ ‘आहेतच’. पण वयानेही माझ्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठे होते. तरीही ते मला ‘सर’ म्हणायचे. पत्रात ‘मा.’, ‘ति.’ असे मायने वापरायचे. त्यासाठी मी वेळोवेळी विरोध केल्यामुळं आता ते ‘प्रिय मित्र’ वर स्थिरावले होते. प्रस्तावनेत त्यांना मी ‘अहो जाहो’ वापरु नये. केवळ बालम म्हणावं असा त्यांचा आग्रह होता. (फोनवरही ‘बालम बोलतो’ अशी सुरुवात करायचे.) 30 नोव्हेंबर 2020 ला प्रस्तावना ईमेलनं पाठवताना बालमना मी लिहिलेलं पत्र: ‘आपली एकांतवासातली कविता मला मनापासून भावली व समीक्षेसाठी आव्हानात्मक वाटली म्हणून मी प्रस्तावना लिहायला होकार दिला. केवळ प्रकृतीमुळंच असं नाही पण एक तत्व म्हणूनही मी संमेलनं, भाषणं, सेमिनार्सपासून कायम अलिप्त असतो. (म्हणून माझंही साहित्य दुर्लक्षित आहे.) घरात बसून कलेची आराधना करतो- अहिराणीसह- सर्वच भाषांसहीत इतर अभ्यास करतो. या अर्थानं मी स्वत:ला गुहामानव म्हणतो. हेच गुहामानवपण मला आपल्यात दिसलं म्हणून मी प्रस्तावना लिहिली. प्रस्तावना पूर्ण ताकदीनं लिहिण्यासाठी या दरम्यान अनेकांना लिखाण द्यायला मी नकार दिला. आपल्या कवितेविषयी मला जे काही म्हणायचं आहे ते प्रस्तावनेत आलं आहेच. प्रस्तावना जशीच्यातशी छापावी. काही बदल अपरिहार्य असलाच तर ते संपादन मी करुन देईन. परस्पर एका शब्दाचाही बदल करु नये. प्रस्तावना पुस्तकातूनच वाचकांना व समीक्षकांना वाचायला मिळावी. पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी ही प्रस्तावना कोणालाही वाचायला देऊ नये ही विनंती.’ डोळ्यांच्या समस्येमुळं प्रस्तावना वाचायला त्यांना दोन दिवस लागले. वाचून त्यांनी तात्काळ फोन केला. (आणि पत्रही लिहिलं.) माझी प्रस्तावना त्यांना आवडली होती. तात्काळ त्यांनी ती ‘ग्रंथाली’कडे दिली. आणि कवितासंग्रहासोबतच ती चांगल्या नियतकालिकातही छापून यावी (म्हणजे त्यांची कविता सर्वदूर पोचेल) असं त्यांना वाटत होतं. सामान्य माणूस असो, श्रीमंत असो की कलावंत, आपल्या मृत्यूरेषेच्या पलीकडच्या काळातलेही तो डोळे उघडे ठेऊन स्वप्न पहात असतो. ज्यांची स्वप्ने पूर्ण झाली आणि केवळ मृत्यूची वाट पहात बसले, असं आयुष्यात खूप कमी लोकांना भाग्य लाभतं. अनेक इच्छा मनात ठेऊन लोक अनंताच्या प्रवासाला कायमचं निघून जातात. ‘चंद्रकंस’ हा चौथा कवितासंग्रह प्रकाशित झाल्यावर बालमांना तो ‘आपल्या अजून एका अपत्यासारखा’ हाताळायचा होता. आयुष्यात अजून किमान एक तरी - पाचवा कवितासंग्रह निघावा असं वाटत होतं. आपल्या कवितेची दखल सर्वदूर घेतली जावी, आपल्या पुस्तकाला एखादा पुरस्कार मिळावा, आपल्या कवितांवर एखादं स्वतंत्र पुस्तक कोणीतरी लिहावं असं वाटत होतं. आणि मुख्य म्हणजे पायाचं ऑपरेशन करुन चालता येईल असंही त्यांना वाटत होतं. घर शिप्ट करायचं होतं. या सगळ्या त्यांच्या इच्‍छा निसर्गाने हिरावून घेतल्या. दीर्घ प्रस्तावना नुकतीच लिहून झाली आणि महिना पूर्ण होण्याच्या आतच असा मृत्यूलेख त्यांच्यावर लिहावा लागतोय. बालम केतकर यांचा कवितेतला आवडता छंद म्हणजे अभंग. त्यांची कविता यापुढंही कायम ‘अभंग’ राहील याची शाश्वती त्यांच्या कवितेचा अभ्यास असलेला कोणीही देऊ शकेल. त्यांच्या इच्छा पूर्ण न होताच ते लौकीकार्थाने भंग पावले तरी या शापीत कलावंताने त्यांचे ‘अभंग’ अक्षरांत ओवून मागे ठेवले आहेत. 2020 हे वर्ष संपूर्ण जगात एक भयानक आव्हान ठरलं. करोनाने अनेक मित्रांना गिळंकृत केलं. ‘आता होता कसा गेला’, हे अनुभव रोज येऊ लागले. हे जग सोडून गेलेल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहत, बाकी सगळ्यांनाच उदंड आयुष्य मिळो, अशी प्रार्थना करण्याशिवाय आपल्या हाती काहीच नाही. (31 डिसेंबर 2020 च्या ‘अक्षरनामा’ पोर्टलवर प्रकाशित झालेला लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) © डॉ. सुधीर रा. देवरे ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3284 views

💬 प्रतिसाद (5)
ड
डॉ. सुधीर राजा… Sun, 01/03/2021 - 05:26 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 01/03/2021 - 06:17 नवीन
बालम केतकरांना एक चित्रकार म्हणून ओळखत होतो. त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनानिमित्त एक लेख ही लिहीला होता. त्यांची नाईफ पेंटिंग्स ही खासियत होती. गोरेगावातल्या त्यांच्या घरी पहिल्यांदा गेलो होतो तेंव्या त्यांनी त्यांची चित्रे दाखवली होती. नाईफ पेंटिंग्स ही काय चीज असते हे त्या दिवशी समजले. अनेक व्याधी असूनही केतकरांनी चित्रकलेचा छंद वेगळ्या उंचीवर नेला होता. मनस्वी चित्रकार होता माणूस
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Mon, 01/04/2021 - 05:40 नवीन
बालम केतकर हे आधी चित्रकार नंतर कवी. चित्रकारीतेचे अनेक प्रतिके त्यांच्या कवितेत आली आहेत. ते जसे अमूर्त चित्र चितारायचे तशाच त्यांच्या कविता अमूर्त आहेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 01/04/2021 - 13:40 नवीन
त्यांच्या कविता मला हिडीस वाटल्या. काहिंची शिसारीच आली होती. असो. कदाचित माझी समज अल्प असेल. चित्रे मात्र एक नंबर. त्यांनी त्याची सिडी देखील दिली होती मला
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Tue, 01/05/2021 - 05:47 नवीन
हो त्यांच्या काही कविता बिभत्स वाटतील अशा आहेत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 21 hours ago
  • सुंदर !!
    5 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा