Soap Opera
जमेल तसे जास्तीत जास्त स्वत:ला विकायला शीक
दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक
सगळ्या मालिका सारख्या
त्यात दळली फक्त कणी
पाझरती सा-या वाहिन्या
जसे गटारातील पाणी
निर्बुद्धपणा कळसाला
सारे कैकयीचे वंशज
कमरेचे अजून कमरेला
तेही सुटेल लवकरच
रोज त्याच घाणीमध्ये डुकरासारखं लोळायला शीक
दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक
पेराल तेच उगवते
पहाल तेच निपजते
तणासारखे वाढते
TRP वर फोफावते
पडद्यावर जे दिसेल ते
सुख देवो मनाला
अभिरुची सोडून दे
डोकं बांध गुडघ्याला
भरलं ताट टाकून कच-यावर पोट भरायला शीक
दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक
पुरुषांना साड्या नेसवून
पाचकळ विनोद करूया
पडद्यामागून जोरदार
'चला हशा येऊ द्या'
आपल्याच मालिकांना
आपणच बक्षीस देऊया
अतीसुमार कलेवराला
खांद्यावर वाहून नेऊया
रोज रोज जगण्यासाठी रोज रोज मरायला शीक
दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक
... संदीप लेले
भरलं ताट टाकून कच-यावर पोट भरायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीकह्या काय आपल्याला जमायचा नाय! नाय म्हंजे नायच! :)