Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा) ०४.११.२०१९ कोविलपट्टी ते कन्याकुमारी सायकलिंग

स
सतीश विष्णू जाधव
Fri, 07/03/2020 - 20:28
💬 6
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा) ०४.११.२०१९ *कोविलपट्टी ते कन्याकुमारी* कोविलपट्टीच्या जयलक्ष्मी हॉटेल कडून सकाळी सहा वाजता राईड सुरू केली, येथून कन्याकुमारी फक्त १३० किमी होते. मुंबई कन्याकुमारी राईडचा आजचा शेवटचा दिवस होता. सर्वजण रिलॅक्स होते. हॉटेलजवळ सायकल बरोबर फोटो काढले. सायकलिंनी या सफरीत अतिशय प्रेमळ आणि अप्रतिम साथ दिली होती. आज सांगता सुद्धा झकास होणार होती. . "प्रदुषणमुक्त भारत" ही संकल्पना व उद्देश घेऊन निघालेली मुंबई - पुणे - कन्याकुमारी" ही दिर्घ पल्ल्याची सायकलवारी आता अखेरच्या टप्प्यात आली होती. सूर्य दर्शन झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आणि झाडे डोलत होती. आजचे सूर्यदर्शन एक वेगळी ऊर्जा घेऊन आले होते. . जीवनप्रवासात रेल्वेने, बसने, गाडीने पळती झाडे पहिली होती. आज पळणारी झाडे सायकल पाहणार होती. शेतात दिसणारे दोन उंच पाम झाडे रग्बीच्या गोल पोष्ट सारखी भासली. त्यांच्या मधोमध दिसणारा सकाळचा सूर्य आम्हाला खेळायला बोलावत होता. . पहिला टप्पा तिरुनेलवेली ४५ किमी वर होता. उजव्या बाजूला छोटे छोटे डोंगर दिसत होते. त्या माईल स्टोन जवळ सायकलने थोडा वेळ विश्रांती घेतली. . आता सायकल, चाकाजवळ पसरलेल्या हिरवळीशी हितगुज करू लागली. "बघ, तुझ्या भेटीला मुंबईवरून आले. आता येतेस का, स्वामी विवेकानंदांना भेटायला". हिरवळ हसत म्हणाली, अग बाई, मी आहेच तुझ्या बरोबर कन्याकुमारी पर्यंत. हिरवळीला हाताने हळूच कुरवाळत, हसतच सायकलवर स्वार झालो. खूप गम्मत वाटली दोघांच्या संभाषणाची.... नऊ वाजे पर्यंत ३५ किमी राईड झाली होती. वाटेतील थमिला रेस्टॉरंट मध्ये नाश्त्याला थांबलो. इडली, डोसा, मेंदूवडा, केळीच्या पानावर आला. सोबत चहा घेऊन पुढची राईड सुरू झाली. आज कोणाला घाई नव्हती. पण संध्याकाळच्या आत जर कन्याकुमारीला पोहोचलो तर सनसेट पॉईंट आणि कन्याकुमारी "झिरो किमी माइल स्टोन" वर फोटो काढता येतील, ही गोष्ट सोपनने सर्वांच्या कानावर घातली. वाटेत स्पॉटेड डिअर सॅनच्युअरी लागली. आता कन्याकुमारी गाठायचे वेध लागले होते. त्यामुळे फक्त सॅनच्युअरीबाहेर फोटो काढून निघण्याच्या तयारीत होतो. तेव्हढ्यात मोटारसायकल वरून चहा विकणारा तामिळी आमच्या जवळ आला. त्याच्याशी हावभावाने संवाद केला. "तुई मुई इंडिया" त्याला कळले. सन्मान म्हणून त्याने आम्हा सर्वांना प्रेमाने चहा पाजला. . . मनातील भाव आणि संकल्प समोरच्याला भावाले की माणसे खूप जवळ येतात आणि गोड आठवणी देऊन जातात. सकाळी दहा वाजता, आमच्या पासून ९८ किमी वर कन्याकुमारी होते, तर तिरुनेलवेली १५ किमी होते. येथे अभिजीतने माईल स्टोनवर चक्क झोपून फोटो काढला. . उन्हे चढण्याअगोदर जास्तीत जास्त अंतर कापायचे होते. आता जंगलातील, छोट्या छोट्या घाटींचा रस्ता सुरू झाला. वाहनांची वर्दळ तुरळक होती. मी आणि लक्ष्मण पुढे होतो. काही ठिकाणी डोंगर पोखरून सपाट रस्ते बनविले होते. लांबवर मदुराई वरून कन्याकुमारीला जाणारी रेलगाडी दिसत होती, त्यात तिची कु...क, कु...क शिट्टी ऐकू येत होती. . जसे काही आम्हाला खुणावत होती. "या, लवकर या, स्वामी विवेकानंदांच्या भेटीला कन्याकुमारीला" एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावे, असे चित्र होते. स्वामीजींच्या "विश्व बंधुत्व" या संकल्पनेला आमची "प्रदूषण मुक्त भारत" ही संकल्पना भेटायला निघाली होती. आज सर्वजण वेगळ्याच मूड मध्ये होते. लक्ष्मणच्या तुटलेल्या तिरंग्याचीची काठी नामदेव जोडून देत होता. . दिपकचे नवीन बूट माईल स्टोनच्या पांढऱ्या रंगापेक्षा चमकत होते, तर विकासाच्या एका पायाची निकॅप गायब होती. सतत राईड करून त्याचा उजवा पाय बरा झाला होता. . . नामदेव आणि विकास या दोघांच्या खांद्यावर, त्यांचे गुरू सोपान यांनी हात ठेऊन माईल स्टोनवर फोटो काढला. . पण सोपानरावांनी आपले हात दोघांच्या डोक्यावर ठेवल्याचा भास मला झाला. सोपानरावांसोबतच विकास आणि नामदेव यांनी सायकलिंग केले होते. सोपानरावांचा सायकलिंगचा वसा दोघांनी मनापासून पळाला होता. मैरेथॉन आणि सायकलिंग मुळे सोपानरावनी एका वर्षात १६ किमी वजन कमी केले होते. आता आणखी ते, काही चांगले संकल्प करणार आहेत आणि विकासच्या गळीसुद्धा उतरवणार आहेत. अडीच वाजता पोदिगय हॉटेल आले. हॉटेलमध्ये स्वच्छता आणि नीटनेटकेपणा जपला होता. हॉटेल मध्ये सर्व महिला काम करत होत्या. पानावर शाकाहारी जेवण आले. दोन भाज्या, रस्सम भात, पापड आणि ज्याला हवे त्यांना तळलेली मासळी आली. . मालकाला बऱ्यापैकी हिंदी येत होते. वाढायला सुद्धा सर्व महिलाच होत्या. हॉटेलमध्ये महिलांची साथ असली की, जेवणाला एक वेगळीच गोडी येते. त्यामुळे विकास मासे खाऊन दमत नव्हता. या हॉटेलचे छप्पर नारळाच्या झावळ्यांचे असल्यामुळे आता मस्त थंडावा होता. जेवणानंतर खोबरा चिक्की खायला मिळाली. . येथून ५० किमी कन्याकुमारी होते. दिवसा उजेडी साडेपाचच्या आत कन्याकुमारीला पोहोचण्यासाठी आता जोर मारावा लागणार होता. शेवटच्या दिवशी एक महत्वाची गोष्ट घडली. तामिळनाडू शासनाच्या पर्यावरण मंत्रालय व वन मंत्रालया मार्फत 'लझाऊर' गावाच्या वनक्षेत्रांत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होता. आम्ही "प्रदूषण मुक्त भारत" हा संदेश घेऊन वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात आम्ही सामील झालो. . आमच्या मुंबई-पुणे-कन्याकुमारी सायकल वारीतून देण्यात येणा-या संदेशाची या दोन्ही मंत्रालयांनी अतिशय सकारात्मक दखल घेतली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाशीदेखील त्यांनी आमच्या उपक्रमाबाबत संपर्क साधलेला होता. या दोन्ही मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आमच्या स्वागताला कन्याकुमारीला उपस्थित होते. साडेचार पर्यंत कन्याकुमारी पासून १७ किमी अंतरावर होतो. तासाभरात हे अंतर कापणे शक्य होते, परंतु मधल्या गावांजवळच्या छोट्या छोट्या चढाच्या पुलावरून जाण्याने दमछाक होत होती. पण आता आम्ही " मंझील के पास" आल्यामुळे पायात बळ संचारले होते. सूर्य अस्ताला जाण्याची तयारी करत होता. पण तो डुंबण्या अगोदर कन्याकुमारीला जायचे होते. सर्वजण जोशात दौडू लागले, बरोबर साडेपाचला कन्याकुमारीच्या शेवटच्या माईल स्टोन वर पोहोचलो आणि सर्वानी जल्लोष केला. त्या माईल स्टोन जवळ भरपूर फोटोग्राफी केली. तेथून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर समुद्रांच्या त्रिवेणी संगमावर आलो. . मावळत्या सूर्याला नमस्कार केला. भारताचा रस्ता तेथे संपला होता, आमचे ध्येय साध्य झाले होते. खडतर परिश्रमाला फळ मिळाले होते. आनंदाच्या भरात सर्वांनी सायकल हातात घेऊन फोटो काढले. मी दोन्ही हात पसरून सागरांच्या त्या त्रिवेणी संगमाला कवेत घेतले. . डोळ्यात अश्रू तरळले, पण ते आनंदाचे, ध्येयपूर्तीचे आणि संकल्प सिद्धीचे होते. ११ दिवसात १७६० किमी सायकलिंग; एक खडतर पण आनंददायी सफर पूर्णत्वास गेली होती. सोपानराव नलावडे, विकास भोर, नामदेव नलावडे, दिपक निचित, अभिजित गुंजाळ आणि लक्ष्मण नवले याची साथ होती म्हणूनच सतत ऊर्जा मिळत होती. एकजुटीमुळेच संकल्प सिद्धीस गेला होता. या घवघवीत यशामध्ये सर्वात मोठा वाटा मित्रांचा होता. सतीश विष्णू जाधव

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3986 views

💬 प्रतिसाद
स
सिरुसेरि Sat, 07/04/2020 - 10:59 नवीन
धाडसी प्रवासाची यशस्वी सांगता केल्याबद्दल अभिनंदन . छान माहिती आणी फोटो . सागर संगमाचा फोटो दिसत नाही .
  • Log in or register to post comments
स
सतीश विष्णू जाधव Sun, 07/05/2020 - 17:12 नवीन
धन्यवाद !!! सागर संगमाचा फोटो पुढील पोष्ट मध्ये आहे.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Sun, 07/05/2020 - 07:18 नवीन
मस्त झाली सफर.
  • Log in or register to post comments
स
सतीश विष्णू जाधव Sun, 07/05/2020 - 17:12 नवीन
खूप खूप धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
स
सतीश विष्णू जाधव Sun, 07/05/2020 - 17:13 नवीन
धन्यावाद राघवेंद्र..
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 07/05/2020 - 10:16 नवीन
व्वा, भन्नाट सफर !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा