Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

जाज्वल्य राष्ट्राभिमान, थोरा मोठ्यांचे पुण्यस्मरण वगैरे...

स
सर टोबी
Mon, 06/22/2020 - 13:17
💬 1 प्रतिसाद
या देशात जरा चुकीच्याच काळात आपण जन्माला आलो हि भावना आजकाल फार बळावते. स्वातंत्र्यानंतरची बहुदा दुसरी पिढी असावी आमची. येता जाता म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अगोदरच्या पिढीने केलेला अभ्यास, स्वतंत्र भारतात जन्माला आल्याचे भाग्य, वगैरे गोष्टी कानावर आदळत असत. स्वातंत्र्य सैनिकांनी आंदोलनात घेतलेली उडी, आसुडाचे फटके, नखं उपसून काढणे, दगडी घाण्याला जुंपून घेणे, फाशी जाणे अशा शिक्षा भोगणे असे सहन केलेल्या लोकांनाच राष्ट्राभिमानी म्हणवून घेण्याचा अधिकार आहे असे कुठे तरी वाटायचे. हे कमी म्हणून कि काय, त्या वेळेस अभिनव असणारी गोष्ट म्हणजे परदेशी वास्तव्य. मग तिकडची स्वच्छता आणि शिस्त, भ्रष्टाचाराचा मागमूस नसणे, जीवनावश्यक गोष्टींनी ओसंडून वाहणारी दुकानं अशी परीकथाच वाटावी अशी वर्णनं. आणि इथे आपण रेशनच्या रांगेतून गॅसच्या रांगेत, घरी आल्यावर डोळे ताणून धान्य निवडणे अशी कामं करून कसाबसा अभ्यास करतो. सततची टंचाई, कपात, आणि रांगेत उभं राहणं हेच वैशिष्ठ्य जणू काही होऊन गेलेलं होतं. अशावेळेस कुठला असणार आपल्या देशाचा अभिमान? तरीपण जमिनीच्या ज्या तुकड्यावर आपण उभे आहोत त्याच्या विषयी प्रेम वाटले नाही तरी कृतघ्न व्हायचे नाही एवढे धोरण स्वतःशी बाळगले. पुढील काळात मिळवता झाल्यानंतर सहसा कधी कच्च्या पावतीचा व्यवहार केला नाही, 'पावती फाडायची कि कसं' असं पोलिसांनी विचारल्यावर पावती फाडा असे स्पष्ट सांगण्याचे धाडस आणि अशाच काही सोप्या गोष्टी यालाच देशाची सेवा समजून वागत राहिलो. होता होता या देशातील जगणेही हळू हळू सुसह्य व्हायला लागले. बऱ्याच गोष्टींसाठी परदेशाचे अप्रूप वाटावे अशी काही परिस्थिती राहिली नाही. कपडे, सुगंधी द्रव्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदी परदेशी ब्रॅन्डच्याच मिळू लागल्या. जीवनावश्यक गोष्टींची रेलचेल तर इतकी वाढली कि चीनच्या युध्दात एकवेळ जेवून राहणं किंवा तांदूळ आणि साखर अशा वस्तू टाळणं या गोष्टी नव्या पिढीसाठी अतर्क्य प्रकारातल्या झाल्या. आता अशा देशाबद्दल कुणाला प्रेम वाटणार नाही? मग त्या प्रेमाचे अविष्कार देखील जन्माला आले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लफ्फेदार फेटा बांधणं, मुलींनी कचकचीत नऊवारी नेसणं, कपाळावर चंद्रकोर आणि हनुवटीवर तीळ असा सरंजाम करून फोटो काढणं आणि हेटाळणी आणि धिक्कार करण्यासाठीच असलेल्या जमातीवर शेरेबाजी करणं असा साधा सोपा राष्ट्रवाद जन्माला आला. म्हणूनच वाटतं आपल्या जन्माची वेळच चुकली. आपला राष्ट्रवाद अजूनही आसुडाचे फटके, दगडी घाना आणि फाशीच्या दोराभोवती घुटमळतो आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1479 views

💬 प्रतिसाद (1)
स
सामान्यनागरिक Mon, 06/22/2020 - 14:50 नवीन
किती दिवस आपण " अमक्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवुन दिलं " म्हणुन त्यांच्या पुण्यतिथीला / जयंतीला गोडवे गात रहाणार आहोत. स्व्ततंत्र्यानंतरची तिसरी पिढी आहे. त्यांना २ ऑक्टोबरला उगीचच ड्राय डे असतो हे खुपतं. आपणही ढोंगी पणाने " नाही... नाही..... गांधी जयंतीला दारु ? छे छे ! " असे म्हणत त्यांना दाबत रहातो. आजच्या पिढीने लोकांनी आपल्या आजोबांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला या गोष्टीचे भांडवल करुन अनेक सवलती लाटल्याचे पाहिले आहे. आणि त्यांचे नांव घेऊन राजकारणात अनेक कोलांट्या उड्या मारल्याचे पाहिले आहे. त्यांना राष्ट्रवाद कसा शिकवणार ? निदान फ़ेसबुक / इन्स्टाग्राम साठी का होइना, ते भारत माता की जय म्हणतात हेच खुप झालं. बाकी जेंव्हा वखत बडा बांका येईल तेंव्हा काळच शिकवील त्यांना.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 21 hours ago
  • सुंदर !!
    6 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा