Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शरीर..

प
पाटिल
Tue, 06/16/2020 - 08:11
💬 6 प्रतिसाद
ह्याचं शरीर ह्याला पुरेपूर ओळखून आहे. फार जुनी सोबत आहे..! ह्याचं शरीर चालतं, बसतं, लोळतं, लाडावतं, कधी बासरीसारखं झंकारतं.. शरीर ह्याच्या इच्छा विनातक्रार झेलत, ह्याच्यापाठोपाठ पळतं...तेव्हा हा कृतज्ञ नसतो शरीराबद्दल.. पण तेच आजारलं की मलूल होऊन पडून राहतं, तेव्हा मात्र ह्याला दगाफटका झाल्यासारखं वाटतं. ह्याचं शरीर थरथरतं. पिकल्या पानांबरोबर हल्लकफूल गिरक्या घेतं. पाचोळा तुडवतानाचा आवाज ऐकत ऊर्जावान होतं. कधी वेल्हाळ गाण्याबरोबर आपोआप डुलायला लागतं.. शरीर घारींसोबत आकाश तोलतं. कधी सुनसान हायवेवर, सुसाट बाईकवर, वारा कापत भिंगरी होतं. पावसात भिजून लगदा होतं. रखरखत्या ऊन्हात पाणी धरून ठेवतं.. 'खालच्यांपुढं' फणा काढतं.. लाकडासारखं ताठ, रूक्ष होतं..! 'वरच्यांपुढं' आज्ञाधारक, मऊ मऊ, लवचिक होतं..! कधी सभ्य, हसरे मुखवटे घालून सामाजिक होतं.. कधी असामाजिक होतं आणि स्वत:ला कोसत कोसत कोषात जातं.. फार दाबून ठेवलं की शरीर इशारे देतं, कधीमधी स्प्रिंगसारखं उसळी मारून विद्रोह करतं.. जेवतं, जुगतं, अनोळखी भीतीनं पिटपिटतं, खूप खूप थकून झोपी जातं.. पण कधी कधी ह्या सगळ्यापलीकडं दैवी, मुक्त झेप घेतं..! कधी हाच विषारी झालेला असतो, स्वत:लाच सहन होण्यापलीकडे जातो आणि म्हणतो की तुझ्यामुळंच सगळं होतंय, तुझ्यापासून सुटका झाल्याशिवाय हे थांबणार नाही.. थांब, आता तुलाच भिरकावून देतो एखाद्या कड्यावरून.. मग शरीर मुळापासून हादरतं.. पण मग शहाणं होत सांगतं, सोडायचं तर आहेच कधी ना कधी एकमेकांना.. पण पूर्ण ओतप्रोत भरल्यावर आपोआप, 'सहज सोडणं' घडेल तर बरं... मग कदाचित थांबेलही सगळं 'कायमचं' तुला हवंय तसं.. पण अशी ओढाताण करून सोडवशील तर कदाचित पुन्हा सगळं पहिल्यापासून सुरू होईल... तेव्हा आत्ता तुझ्यात उतरलेली ही अवसादी राळ थोडी निवळू दे.. मग आहोतच आपण..! आणि मी तुझ्यावर काय काय उधळून दिलंय हे मीच सांगायला हवं, असं नाही..! मग पुन्हा ह्याला शरीराबद्दल, अगदी गाभ्यातून, जिव्हाळ्याचे झरे फुटायला लागतात..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2747 views

💬 प्रतिसाद (6)
स
संजय क्षीरसागर Tue, 06/16/2020 - 09:20 नवीन
आणि सुशांत सिंहच्या आत्महत्येमुळे एकदम सुसंगत ! लगे रहो !
  • Log in or register to post comments
प
पाटिल Tue, 06/16/2020 - 13:50 नवीन
@संजय क्षीरसागर... _/\_
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Tue, 06/16/2020 - 17:10 नवीन
सुंदर! - (शारिरीक) सोकाजी
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 06/18/2020 - 00:53 नवीन
मग पुन्हा ह्याला शरीराबद्दल, अगदी गाभ्यातून, जिव्हाळ्याचे झरे फुटायला लागतात..
खरय राजा
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/07/2020 - 02:27 नवीन
खूप छान हो पाटिल साहेब.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 09/11/2020 - 18:52 नवीन
वाह, क्या बात ! कधी हाच विषारी झालेला असतो, स्वत:लाच सहन होण्यापलीकडे जातो आणि म्हणतो की तुझ्यामुळंच सगळं होतंय, तुझ्यापासून सुटका झाल्याशिवाय हे थांबणार नाही.. थांब, आता तुलाच भिरकावून देतो एखाद्या कड्यावरून. व्वा, भारीच !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 22 hours ago
  • सुंदर !!
    6 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा