Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कोविड १९ घडामोडी : समज, गैरसमज

ह
हेमंतकुमार
Mon, 06/08/2020 - 15:51
🗣 164 प्रतिसाद
(शेवटचे संपादन : २० /०३/२०२१) गेले तीन महिने आपण सर्व कोविडमय झालेलो आहोत. हा आजार नवा असल्याने त्यावर अविरत संशोधन होत आहे. या दरम्यान अनेक प्रसारमाध्यमांतून या आजाराबद्दलची विविध माहिती दिली जात आहे. त्यापैकी काही विश्वासार्ह असते, पण त्याच बरोबर चुकीची माहिती, अर्धवट माहिती आणि अनेक अफवा यांचाही सुकाळ आहे. या संदर्भात मला व्यक्तिगत संपर्काद्वारा अनेक प्रश्न विचारले गेले. त्यातून असे जाणवले की काही बाबतीत समाजात बरेच गैरसमज पसरले आहेत. त्यांचे निराकरण करावे या उद्देशाने हा स्वतंत्र धागा काढत आहे. तो लेख स्वरूपात नसून लोकांकडून प्रत्यक्ष जे प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरे, या स्वरूपाचा आहे. अजून जसजसे लोकांचे प्रश्न वाढत जातील तशी या प्रश्नोत्तरांमध्ये भर घालता येईल.

कोविड१९ हा समाजात उद्भवलेला पूर्ण नवीन आजार आहे. संबंधित रुग्णांचा जागतिक पातळीवर सतत अभ्यास चालू आहे. त्यातून त्याचे स्वरूप हळूहळू उलगडत आहे. त्यानुसार तज्ञांची मते तयार होत आहेत. बऱ्याचदा त्यात एकवाक्यता दिसत नाही. आजाराचे स्वरूप देखील विविधांगी आहे. या धाग्यात केलेले लेखन हे लिहितेवेळीच्या अधिकृत वैद्यकीय माहितीनुसार केलेले आहे. त्यात वेळोवेळी बदल होऊ शकतात याची नोंद घ्यावी. असे काही महत्त्वाचे बदल झाल्यास त्याची दखल नव्या प्रतिसादातून घेईन.

प्रश्न : …………………………………………….. १. कोविडसाठी Antibodies चा उपाय पारंपारिक विषाणूनाशक औषधांपेक्षा भारी असतो का? ‘भारी’ असे नाही म्हणता येत; उपचारांच्या त्या दोन दिशा आहेत. सध्या सुमारे ५० प्रकारच्या करोनाविरोधी औषधांच्या चाचण्या चालू आहेत. ढोबळ मानाने त्यांचे असे वर्गीकरण करता येईल: १. पारंपरिक रासायनिक औषधे ( HCQ इ.) २. विषाणूविरोधी औषधे ३. अ‍ॅन्टिबॉडीज ४. मूळ पेशींचे उपचार. या सर्वांचे रुग्णप्रयोग शास्त्रीय पद्धतीने चालू आहेत. त्यांचे दखलपात्र निष्कर्ष बाहेर यायला काही महिने जावे लागतील. काही रुग्णांना अ‍ॅन्टिबॉडीजच्या जोडीने विषाणूविरोधी औषधे देखील द्यावी लागतात. पुरेसे निष्कर्ष हाती आल्याखेरीज अमुक एक उपचार ‘भारी’ आहे असे म्हणता येणार नाही. ………………………………………………………………………………………………………….. २. कोविडसाठी बीसीजी लसीचे उपचार उपयुक्त आहेत का ? बीसीजी लस आणि कोविड यांचा संबंध तपासण्यासाठी एप्रिलपासून अनेक रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष हाती यायला सुमारे ४ महिने तरी लागतील. यानिमित्ताने बीसीजीबद्दल काही उपयुक्त माहिती: १. ज्या देशांत ती बालपणी सर्वांना देतात, तिथे बालकांच्या श्वसनाच्या गंभीर आजारांचे प्रमाणात घट दिसली आहे. २. मुळात ही लस जरी जीवाणूविरोधी असली तरी तिच्यात काही विषाणूविरोधी गुणधर्म आहेत. ३. या लसीचे देखील काही उपप्रकार आहेत. त्यानुसार तिचे गुणधर्मही बदलतात. याचाही पुरेसा अभ्यास व्हायचा आहे. ४. सध्यातरी करोना- 2 आणि बीसीजीचे उपचार यासंदर्भात पुरेसा विदा मिळालेला नाही …………………………………………………………………………………………………………………………………………. ३. ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यांचा कितपत संबंध आहे ? यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत: १. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते. २. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते. ३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात. ४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते. ५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते. ६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे. ..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल. ……………………………………………………………………………………………………………………….. ४. गेल्या काही दिवसात “अमुक-तमुक रसायने खा आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा”, या आशयाचे अनेक सल्ले ढकलपत्रांतून फिरवले गेले. त्यात किती तथ्य ? या संदर्भात मला एका वैद्यकीय तज्ञांचे मत दखलपात्र वाटले. ते इथे लिहितो. शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी जर कशाची खरोखर कमतरता असेल, तरच तो घटक बाहेरून देण्याने उपयोग होतो. “ प्रतिकारशक्ती वाढवा (बूस्ट)” हे विधान मुळात अशास्त्रीय आहे. जर एखाद्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ती कमतरता बाहेरून घटक देऊन भरून काढली जाते. त्यामुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती पूर्ववत (नॉर्मल) होते. तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही. कोविड-प्रतिबंध आणि जीवनसत्वे १. क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत. २. ड जीवनसत्व : वयाच्या 50 ते 55 नंतर जर हाडांची दुखणे उद्भवली असतील तरच संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधरूपात घ्यावे. उगाचच स्वतःच्या मनाने नाही. ………………………………………………………………………………………………………………………………………………. ५. कोविड१९ साठी रक्तद्रव उपचार : गेल्या काही दिवसात यावर खूप चर्चा होत आहे. म्हणून या बद्दलची काही शास्त्रीय माहिती : १. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ? खालील निकष पूर्ण करणारा दाता सुयोग्य असतो: *वय १८ ते ५५ दरम्यान. *१०१.३ अंश F च्यावर ताप येऊन तो तीन दिवस वा अधिक टिकलेला असणे. *असा दाता स्वतः कोविडसाठी उपचार घेऊन नुकताच बरा झालेला असतो. त्यानंतर सुमारे १४ दिवस त्याला या आजाराची कुठलीही लक्षणे नसावी लागतात. त्याची प्रयोगशाळा चाचणी सलग दोनदा नकारात्मक यावी लागते. *पहिले लक्षण आलेल्या दिवसानंतर एक महिन्याने त्याच्या रक्तातील IgG बॉडीजचे प्रमाण चांगले असते. २. या उपचारात प्राप्तकर्त्या रुग्णास काही धोका असतो का ? वरवर पाहता तसा नसतो पण, एक शक्यता राहते. जेव्हा आपण सध्याच्या करोनाविषाणू विरोधी antibodies दिल्या, तर कालांतराने या विषाणूच्या अन्य प्रकारापासून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. ………………………………………………………………………………………………………………………………………………… ६. कोविड होण्याचे प्रमाण आणि लिंगभेद यात तथ्य किती ? या प्रश्नाचे उत्तर वंश आणि देशानुसार वेगवेगळे आहे. तरी काही निरीक्षणे लिहितो. या विषाणूचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा लिंगभेद नाही. पण, हा आजार झाल्यानंतर तो गंभीर होण्याचे आणि त्यातून पुढे मृत्यूंचे प्रमाण काही देशांत पुरुषांत अधिक दिसून आले आहे. याची कारणमीमांसा तशी रोचक आहे. अद्याप यावरील संशोधन चालू आहे. अंदाजे काही निष्कर्ष असे आहेत : १. साधारणपणे स्त्रियांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता अधिक असते. यामागे स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा वाटा असतो. तसेच स्त्रीमध्ये दोन X गुणसूत्रे (XX) असल्याचाही या शक्तीला काही फायदा होतो. त्यामुळे शरीरात घुसलेल्या रोगजंतूंचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होतो. २. बऱ्याच देशांत धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक आहे, हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो. ३. या विषयाची अजून एक बाजू. जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात. ……………………………………………………………………………………………………………………………………….. ७. कोविडसाठी (संसर्गातून) सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याबाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का? होय, असे काही अभ्यास चालू आहेत. १. अशा अभ्यासात बाधित लोकांपैकी किती मृत्यू पावतात याचे गुणोत्तर काढले जाते. ते देशानुसार भिन्न आहे. २. एकदा बाधित झाल्यानंतर पुन्हा तोच संसर्ग होतो का हे आजमावले जाते. त्यासाठी माकडांवर काही प्रयोग झाले आहेत. ३. बऱ्या झालेल्या रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्यात हेही मोजले जाते. ४. एकंदरीत करोना या विषाणू जमातीने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अल्पकालीन असावी, असा सध्याचा अंदाज आहे. ५. त्यामुळेच लस शोधणे महत्त्वाचे ठरेल. ……………………………………………………………………………………………………………………………………………………………. ८. घरगुती पातळीवर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सगळ्यांनी मोजावी का? प्रश्न चांगला आहे पण त्याचे उत्तर सरळ नाही ! बरेच उलट-सुलट मुद्दे विचारात घ्यावे लागतात. १. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अन्य श्वसनाच्या आजारात देखील कमी होऊ शकते. उदा. न्युमोनियाचे अन्य प्रकार, अन्य दीर्घकालीन श्वसनविकार . ३. घरगुती वापराच्या oximeter यंत्रांची अचूकता बरीच कमी असते. विशिष्ट ऑक्सिजन पातळीच्या खाली त्यांची उत्तरे विश्वासार्ह नसतात. ४.अशी मोजणी घरी करताना दक्षता घ्यावी लागते. हात पुरेसे गरम असावे लागतात तसेच संबंधित बोटाच्या नखाला नेलपॉलिश असलेले सुद्धा चालत नाही. ५. उठसूट घरगुती मोजणीमुळे विनाकारण भीतीचे प्रमाण वाढत जाते. हे सर्व बघता या उपकरणाचा उठसूट सर्वांसाठी वापर सुचविलेला नाही. ………………………………………………………………………………………………………………………………………………………… ९. कोविडमुळे मृत्यू होण्याची कारणे काय आहेत ? कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरात बरीच आहे. अशा काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातून मृत्यू होण्याची कारणे अभ्यासली जातात. आतापर्यंत विच्छेदनातून समजलेली तीन कारणे अशी आहेत: १. विषाणूच्या थेट हल्ल्यामुळे झालेला शरीरपेशींचा नाश २. अनेक रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या रक्तगुठळ्या ३. या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> अधिकाधिक पेशींचा नाश. ....................................................................... १०. करोना २ ची लस खरेच लवकर उपलब्ध होईल का? ती घाईने बाजारात आणल्यास काही तोटे? लसीचा मुद्दा उपस्थित केलाय हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो. कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू. ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात. हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते. ................................................................................................................................................. ११. करोनाचा संसर्ग डोळ्यांच्यावाटे होतो का? ज्याप्रमाणे फ्ल्यूचे अन्य विषाणू डोळ्यांच्यावाटे शिरू शकतात तसेच हाही विषाणू शिरू शकतो. पण, अशा प्रकारे संसर्ग झालेल्या व्यक्ती अत्यल्प आहेत. किंबहुना त्याचा पुरेसा विदा उपलब्ध नाही. आरोग्यसेवकांनी काम करताना आपला चेहरा पूर्ण झाकावा हे योग्यच. पण सामन्यांसाठी तशी शिफारस नाही. नाक व तोंड झाकणे पुरेसे आहे. हात नेहमी स्वच्छ ठेऊन ते डोळ्यांना लागणार नाहीत, ही काळजी घेतली की पुरे. ................................................................................................... १२. सध्या जे रोगी कोविड१९ होऊन बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का? याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात : 1. मारक (Neutralizing) 2. अ-मारक यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही). पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत. ........................................................................................................................ १३. “ आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ? या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला. या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही. १३ ब. ओ (positive,निगेटिव्ह) रक्तगट आणि covid 19 च्या आजाराची तीव्रता ह्याचा काही संबंध आहे का ? २००८ मधील करोना-१ या विषाणू संदर्भात असे काही जुजबी संशोधन प्रयोगशाळेत झाले होते. तूर्त सध्याच्या करोना-२ बाबत मात्र असे संशोधन बाल्यावस्थेत आहे. ‘ओ’ गटाच्या लोकांमध्ये काही विशिष्ट antibodies तयार होत असतात. त्यांच्यामुळे या विषाणूला पेशीत शिरण्यास प्रतिबंध होतो, असे एक गृहीतक आहे. पण सध्या कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही. ........................................................................................................................................................ १४. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ? होय त्यात काही तथ्य आहे. या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो. रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते. सध्या हे गृहितक चर्चेत आहे. अधिक संशोधन होत आहे. दम्याचे रुग्णांना अजून एक फायदा होतो. हे रुग्ण तोंडावाटे steroids चा फवारा घेत असतात. या औषधामुळे श्वसनमार्गात विशिष्ट प्रथिनांचे ( ACE२) प्रमाण कमी होते. त्यामुळे अशा लोकांना कोविड झाल्यास तो बऱ्यापैकी नियंत्रणात राहतो. ................................................................................................................................................................................. १५. रुग्णाचा कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, हे कसे ठरवायचे ? मृत्यूचे निदान ही अचूक गोष्ट असते. पण, मृत्यूचे खरे कारण ही मात्र काही वेळेस (विशेषतः साथींच्या काळात ) वादग्रस्त गोष्ट ठरते. बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण हे संबंधित डॉक्टरांचा अनुभव आणि परिस्थितीजन्य पुरावा यावरून दिले जाते. मृत्यूनंतर काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होते. अर्थात ही प्रक्रिया सर्वांचे बाबतीत केली जात नाही; तसे शक्यही नसते. ............................................................................................................. १६. “कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता. आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर: १. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत. २. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत. ३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल. ................................................................................................................................... १७. कोविडविरोधी लसीचा संरक्षक कालावधी कमी असणार आहे का ? लस तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार तिचा संरक्षक कालावधी (सं का) ठरतो. १. काही लसी ( देवी, पिवळा ताप) या सौम्य केलेल्या जिवंत जंतूंपासून बनविल्या होत्या. देवीलसीचा ‘सं का’ पन्नास वर्षांहून अधिक काळ होता. २. करोना २ च्या बाबतीत त्या विषाणूच्या एका प्रथिनाचा वापर लस तयार करण्यासाठी होतो. ते प्रथिन पूर्णपणे की अंशतः वापरायचे यावर मतभेद आहेत. त्यानुसार संबंधित लसीच्या संकात फरक पडेल. ३. वरील प्रकार २ च्या लसींचा सं का १ पेक्षा खूप कमी असतो. म्हणून त्यांना बूस्टर द्यावे लागतात. ४. सारांश : लस तयार करताना संशोधकांना तराजूच्या एका पारड्यात प्रभावीपणा तर दुसऱ्यात सुरक्षितता ठेवावी लागते. तो समतोल साधणे जिकिरीचे असते. ........................................................................................................................................................... १८. “करोना- २ विरोधी औषध शोधायला एवढा वेळ का लागतोय?” या संदर्भात काही मूलभूत माहिती: विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत. करोना- २ RNA या प्रकाराचा आहे. अशा प्रकारच्या विषाणूंची काही वैशिष्ट्ये: १. त्यांचा जनुकीय संच खूप लहान असतो. २. त्यामुळे त्यांचे जनक जनुकीय बदल वेगाने आणि वारंवार होतात. ३. त्यांची रचना बरीच भिन्न स्वरूपाची असते. ४. त्यांची उत्क्रांती वेगाने होत राहिल्याने औषधांना त्यांचा पाठलाग करणे तुलनेने अवघड जाते. ५. म्हणून त्यांच्याविरोधी नवनवी औषधे लवकर निष्प्रभ होऊ शकतात. ( याउलट वैशिष्ट्ये DNA गटातील विषाणूंची असतात). ........................................................................................................................ १९. वाफ घेणे व रोगप्रतिबंध वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती: कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे. तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही. त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे. ......................................................................................................... २०. रेमडेसीविर आणि इटोलीझुमॅब यात काय फरक असतो ? १. रेमडेसीविर हे थेट विषाणूविरोधक आहे. ते आपल्या पेशींतील या विषाणूची तुफान वाढ थांबवते. ( अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘विर” असते. Antiviral या अर्थी) २. इटोलीझुमॅब ही मुळात विशिष्ट प्रकारची antibody आहे. (अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘मॅब’ असते). जेव्हा विषाणू पेशीत हल्ला चढवतो, तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून तिथे प्रचंड दाहप्रक्रिया होते. काही वेळेस ही अनियंत्रित होते >> गंभीर आजार >> मृत्यू. हे औषध दाहप्रक्रिया नियंत्रित करते. ........................................................................ २१. कोविड आणि हृदयाचा त्रास यासंबंधी दोन प्रकारची निरीक्षणे आहेत: १. जे रुग्ण या आजारातून बरे झाले त्यांना पुढे काही दिवसांनी हृदयस्नायू कमकुवत होण्याचा त्रास दिसून आला. यांच्यातील काहींना पूर्वी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, तर काहींना नव्हता. २. काही मृतांच्या शवविच्छेदनात या विषाणूने हृदयस्नायूला इजा केल्याचे आढळून आले आहे. ............................................................... २२. इंटरफेरोन्सचे उपचार : इंटर्फेरोन्स (IF) ही सजीवांच्या पेशींनी विषाणू विरोधात तयार केलेली प्रथिने असतात. ती औषधरूपात प्रयोगशाळेत देखील तयार केली जातात. मुळात ती विषाणूंची वाढ रोखतात (interfere with). कोविड संदर्भात त्यांचे विविध रुग्णप्रयोग अजून चालू आहेत. एका अभ्यासात हा मध्यम आजार झालेल्या रुग्णांना IF अधिक अन्य दोन विषाणू विरोधी औषधे एकत्र दिली गेली. तिथे परिणाम चांगले दिसले आहेत. अर्थात यावर अजून पुरेशी तज्ञ चिकित्सा व्हावयाची आहे. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. .......................................................................... २३. किरणोत्सर्गाचे उपचार : न्यूमोनियातील दाह कमी करण्यासाठी किरणोत्सर्गाचे उपचार शंभर वर्षांपूर्वीही दिले जात. आता हा उपचार पुन्हा चर्चेत आला आहे. यामध्ये किरणोत्सर्गाचा सौम्य डोस शरीरावर दिला जातो. हा १ डोस साधारण सिटीस्कॅनच्या डोसपेक्षा थोडा अधिक असतो. तो थेट विषाणू विरोधक म्हणून काम करत नाही, पण फुफ्फुसातील दाहप्रक्रिया कमी करतो. सध्या भारतासह सहा देशात त्याचे प्रयोग चालू आहेत. हा उपचार गंभीर आजार असलेल्या आणि ऑक्सिजन द्याव्या लागणाऱ्या रूग्णांसाठी केला जात आहे. काही निष्कर्ष चांगले आहेत मात्र किरणोत्सर्गाचे संभाव्य दीर्घकालीन दुष्परिणाम ध्यानात घ्यावे लागतील. त्यामुळे हा उपचार मर्यादित रुग्णांपुरताच विचाराधीन आहे. ..................................................................................... २४. मृतदेहाद्वारा या रोगाचा प्रसार होतो का ? या विषयावर बरेच संदर्भ पाहिल्यावर एक स्पष्ट होते. ते म्हणजे याबाबत समाधानकारक शास्त्रीय पुरावा किंवा विदा उपलब्ध नाही. काही उल्लेखनीय मुद्दे : १. इतिहासात अन्य महासाथींच्या दरम्यान मृतदेह हाताळण्याची काही ठाम तत्त्वे पाळली गेली आहेत. त्याला अनुसरून सध्याही तशात अंतरिम सूचना जाहीर झाल्या. २. व्यक्ती मृत्यू झाल्यावर शरीरात कुजण्याची प्रक्रिया सुरू व्हायला थोडा वेळ लागतो. एकदा ती सुरू झाली, की शरीरातील विषाणू वगैरे सर्व नष्ट होतात. ३. त्या ‘मधल्या’ वेळात विषाणू बाहेर पोहोचू शकतील असे गृहीतक मांडले गेले. प्रत्यक्ष सार्स-२ बाबत तसा काही ठोस अभ्यास झालेला नाही. ४. रेडक्रॉसच्या अंतरराष्ट्रीय फॉरेन्सिक समितीचे प्रमुख डॉ. Oran Finegan आहेत. त्यांचे उद्गार असे आहेत, “रोगप्रसाराचा सर्वात मोठा धोका जिवंत बाधिताकडून आहे, मृताकडून नाही”. ५. व्यक्तिगत पातळीवर मृतदेह काळजीपूर्वक हाताळले जाणार नाहीत, या गृहितकामुळे ते ताब्यात न देण्याचा शासकीय निर्णय झालेला दिसतो. एक संदर्भ: https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7290165/ ........................................................... २५. कोविड आणि अस्पिरीनचा उपयोग अस्पिरीनला दाहप्रतिबंधक आणि रक्तगुठळीप्रतिबंधक असे दोन्ही गुणधर्म आहेत. सध्याच्या आजारात अनेक लोकांमध्ये रक्त गोठण्याच्या प्रक्रिया बऱ्यापैकी झालेल्या दिसून आल्या आहेत. रुग्णाचे एकंदरीत रिपोर्ट पाहून संबंधित डॉक्टर अस्पिरीनचा निर्णय घेतात. बऱ्याच प्रयोगांमध्ये असे दिसले आहे, की ज्या रुग्णांना ऍस्पिरिन चालू होती त्यांचा हा आजार नियंत्रणात राहिला व गंभीर झाला नाही. तसेच अशा एकूण रुग्णांचा मृत्यूदरही कमी राहिलेला आहे. यावर अधिक संशोधन अभ्यास चालू आहेत. .......................................... २६. भविष्यात कोविडचा समूळ नाश होइल का ? मानवी संसर्गजन्य आजारांच्या इतिहासात समूळ नाश झालेला एकमेव आजार म्हणजे देवी. तो नष्ट होण्यामागे दोन कारणे होती: १. माणूस सोडून अन्य प्राण्यांत देवीच्या जंतूंचा साठा (reservoir) नसणे. २. प्रभावी लसीकरण कोविडच्या बाबतीत वटवाघळात साठा असणे ही कटकटीची बाब आहे. लसीकरण सध्या प्रायोगिक अवस्थेत आहे. म्हणून…. समूळ नाश होणे कठीणच. आजार सौम्य करणे व साथ नियंत्रणात आणणे हे ध्येय. ..................................

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 118077 views

🗣 चर्चा (164)
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/30/2020 - 21:55 नवीन
लोकहो, अँथनी फौची हा अमेरिकेतला पराकोटीचा भ्रष्ट डॉक्टर आता नवीन शहाणपण शिकवतोय की करोना डोळ्यांतूनही पसरू शकतो म्हणे. बातमी : https://www.marketwatch.com/story/dr-fauci-recommends-wearing-goggles-to-prevent-catching-the-coronavirus-2020-07-29 या माणसावर फुटक्या कवडीइतकाही विश्वास ठेवायचा नाही ! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 07/31/2020 - 05:06 नवीन
गा.पै. बर्‍याच दिवसात डोळ्याच्या डॉक्टरांशी संवाद झाला नसेल तर लौकरात लौकर करून घ्याच एकदा. गॉगल/ चष्मे स्मार्ट सुंदर दिसण्यासाठी घाला हवेतर पण साथ चालू असे पर्यंत घाला जरूर असे तुमच्या डोळ्याच्या डॉक्टरांनी कळवले तर तेही इथे आठवणीने नमुद करा. तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटताना त्यांच्या डोळे डॉक्टर गुरुजींचा फोन नंबर मागून घेऊन ते बरोबर सांगताहेतना याची सुद्धा खात्री करून घ्या. तसेही डोळ्यांना अस्वच्छ वातावरणापासून जपलेले बरे असते म्हणून चष्मे गॉगल घाला म्हणाले तर तेही इथे कळवा.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 07/31/2020 - 05:35 नवीन
https://m.timesofindia.com/life-style/health-fitness/health-news/coronavirus-80-patients-report-heart-issues-post-recovery-finds-jama-study/amp_etphotostory/77238865.cms कोरोना होऊन गेलेल्यांपैकी ८०% लोकांना हृदयविकाराशी संबंधित त्रास होऊ लागल्याचं निरीक्षण आलंय. हे राम. चला, पृथ्वीवर मनुष्यजातीचा काळ छान गेला. विरंगुळा लाभला चार घटका. :-(
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/31/2020 - 06:33 नवीन
कोविड आणि हृदयाचा त्रास यासंबंधी दोन प्रकारची निरीक्षणे आहेत: १. जे रुग्ण या आजारातून बरे झाले त्यांना पुढे काही दिवसांनी हृदयस्नायू कमकुवत होण्याचा त्रास दिसून आला. यांच्यातील काहींना पूर्वी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, तर काहींना नव्हता. २. काही मृतांच्या शवविच्छेदनात या विषाणूने हृदयस्नायूला इजा केल्याचे आढळून आले आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 07/31/2020 - 06:40 नवीन
आता एकदम दिलासा मिळाला :-(
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 07/31/2020 - 06:06 नवीन
होत असेल पण सर्रास होत नसेल,एक दुर्मिळ घटना असू शकते किंवा अपवाद म्हणून एकादी घटना झाली असेल डोक्यातून संक्रमणा ची.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 07/31/2020 - 06:52 नवीन
चेहर्‍याला (त्यातच डोळ्याला हात लावणेही येते) लावण्याची सरासरी प्रतिव्यक्ती, प्रतिघंटा किती असते ? बातम्या ताशी १५ ते २५ असल्याचे सुचवतात म्हणजे सरासरी दर २ ते ४ मिनीटातून एकदा येतो. हा एक कोविडपूर्व रिपोर्ट २०१५ चा आहे म्हणजे केवळ कोविडच नव्हे तर इतरही काही संक्रमणशील आजार टाळण्यासाठी डोळ्यांना स्पर्षकरण्या पुर्वी आणि नंतर हात धुण्यास सुचवले जात असे. अर्थात चष्मा किंवा पारदर्शक चेहरा पट्टी डोळ्यांना संक्रमणशील आजारांपासून जपण्यास अधिक मदत करत असणार.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 07/31/2020 - 06:54 नवीन
संदर्भ दुवा देण्याचा राहीला जरासे गुगलले तर पुरेसे संदर्भ दिसतात
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/31/2020 - 06:55 नवीन
डोळा : धाग्यात प्र क्र ११ मध्ये आधीच उत्तर दिलेले आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/31/2020 - 08:47 नवीन
यापुढील चर्चा या नव्या धाग्यावर होईल. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 08/05/2020 - 07:25 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/three-thousand-st-buses-for-konkan-abn-97-2237073/ विलगीकरणाचा कालावधी १० दिवस केला आहे. एस्टी ने प्रवास करणार्‍यांसाठी इपास ची गरज नाही. हजारो लोकांना ह्या सवलतीचा फायदा होणार आहे. मग १४ दिवसांची खरेच गरज नाही का ? हे लोक उत्सव संपुन परत मुंबईला आल्यावर त्यांना परत विलगीकरण करावे लागेल का ? तसेच जे लोक पुणे-मुंबई , नाशीक-मुंबई रोज येजा करतात ते इपास काढतात का ? त्यांच्या विलगीकरणाचे काय ?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 08/07/2020 - 15:19 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/14-day-home-quarantine-compulsory-to-all-domestic-passengers-bmc-new-order-bmh-90-2239838/ आता , गणेश उत्सव आटोपुन येणार्‍यांना १४ दिवस विलगीकरण करावे लागेल असे दिसतेय. गावी गेल्यावर विलगीकरण, परतल्यावर विलगीकरण , इतके दिवस कामापासुन लांब रहाता येइल का (घरुन काम करणारे सोडुन)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/07/2020 - 15:26 नवीन
म मा ही चर्चा नव्या धाग्यावर घेतोय. https://www.misalpav.com/node/47257
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 09/12/2020 - 09:03 नवीन
या आजाराच्या प्रयोगशाळा चाचण्यांसंबंधी सामान्यांमध्ये अजूनही काही गैरसमज आढळतात. त्यासाठी हा उपयुक्त तक्ता : Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा