सद्यपरीस्थितीत परीक्षा घेणं योग्य की अयोग्य
सध्या परीक्षेवरून राजकारण चालू आहे. या परिस्थिती मध्ये परीक्षा घेणं ही अवघड गोष्ट आहे. मी एक संस्थेत काम करते. माझ्या संस्थेत किंवा इतर कोणत्याही संस्थेत सोशल डीसस्टिंग पाळुन परीक्षा घेणं केवळ अशक्यप्राय आहे.
तसेच एक पालक म्हणून ही मी माझ्या मुलांना अशा वातावरणात बाहेर सोडू शकत नाही. परिक्षे साठी पण नाही की शाळा चालू झाल्यावरही नाही. जर कोव्हीड 19 वर लस निघाली तरच ठीक अन्यथा नाही. भलेही त्यांचे एक वर्ष वाया गेलं तरीही मला चालेल.
तर मला वाटतं की एक वर्ष वाया गेलं तर भविष्यात त्यांचे काही नुकसान तर होणार नाही ना?
पालकांना आपली मुले प्रिय असतात त्यांना काहीही त्रास झाला तर सहन होत नाही.
तसेच सध्या ऑनलाईन शिक्षण नावाचा जो भयानक प्रकार चालू आहे त्या बद्दल तर भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती झाली आहे. कळत तर काहीच नाही आणि होमवर्क मात्र ढीगभर देतात.
मंत्री शिक्षकांवर ऑनलाईन शिकविण्यावर जोर देत आहेत, त्यांच्याकडून रोजच्या रोज अहवाल मागविला जातो. की काय प्रगती झाली या बद्दल.
कृपया मार्गदर्शन करावे
महाविद्यालयीन परिक्षासंदर्भातला माझा प्रतिसाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन परिक्षांबाबत युजीसीने एक तज्ञ समितीला याबाबत आपला अहवाल द्यायला सांगितला होता त्या अहवालानंतर युजीसीने सविस्तर असे एक पत्र सर्वच विद्यापीठांना पाठवलं होतं आणि परिक्षांबाबत विद्यापीठांनी परिक्षा कशा घ्यायच्या हे ठरवावे असे सांगितले होते. (पाहा युजीसीचं पत्र) आता विद्यापीठांनी पहिल्या आणि दुसर्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या एका सत्रासाठी मागील सत्राच्या गुणांच्या आधारे त्यांना प्रमोट केलेलं होतं. अंतिम परिक्षांच्या बाबतीत परिक्षा विद्यापीठ घेणार होतं म्हणजे त्यांनी दोन तासांची परिक्षा पन्नास गुण वगैरे याबाबतीत वेळापत्रक करायचं होतं की मा.मंत्रीमहोदयांनी युजीसीला पत्र लिहिलं की सध्याची परिस्थिती पाहता अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे कठीण आहे, त्याबाबतीतही आपण त्यांना प्रमोट करावे व त्याबाबत मार्गदर्शन करावे असे पत्र लिहिले. नंतर महाराष्ट्र शासनाने अशा विद्यार्थ्यांना मागील सर्व सत्रांच्या प्रॅक्टीकल आणि इतर सत्रांच्या आधारे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या आधारे पास करुन त्यांना पास करायचा निर्णय घेतला. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत असे वाटते त्यांच्यासाठी पुन्हा भविष्यात परिक्षा देता येईल असाही पर्याय होता. असा निर्णय झाल्यावर राज्यपालांनी असा निर्णय घेतला तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होईल म्हणून मा.मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं.
खरं तर, एकदा युजीसीने विद्यापीठांना पत्र लिहिलं की परिक्षा घ्या, तर त्याबाबतीत पुन्हा पत्रव्यवहारामुळे गोंधळ उडाला पण त्याला कारणही तसेच आहे की आत्ता परिक्षा घेण्यासारखी परिस्थिती नाही. माझ्या स्वतःच्या महाविद्यालयात नुसते शहरातीलच विद्यार्थी-विद्यार्थीनी नाही तर अगदी मुंबई पासून विद्यार्थी आहेत. केवळ अंतिम वर्ष शाखेच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घ्यायच्या तरी फिजीकल डिस्टेंन्स, परिक्षा, बेंचेस, सुविधा, काळजी, त्यांच्या चाचण्या घेणे. (थर्मल स्क्रीनींग) आणि मग विद्यार्थ्यांना परिक्षेला बसविणे हा सर्व प्रवास सध्याच्या काळात जिथे माझ्या जिल्ह्यात आज एकूण रुग्ण संख्या सतराशेच्या जवळपास आहे त्यातले तितकेच बरेही होत आहेत तरीही संसर्गाचा धोका तितकाच आहे, हे सत्य आहे. त्यामुळे सध्याच्या काळात परिक्षा घेणे शक्य नाही या मताचा मी आहे.
विद्यापीठांनी परिक्षा घेतांना ऑनलाइन परिक्षा घ्यावी असे वाटले होते. ऑब्जेक्टीव्ह वगैरे देऊन कमी तासाची आणि लगेच गुण विद्यार्थ्यांना कळावे अशी व्यवस्था करायला हवी असे वाटते परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे पुन्हा सुविधांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे वाटते. आता जेव्हा कॉलेजेस सुरु होतील तेव्हा त्यांनाटाचन, अभ्यासक्रम ऑनलाईन देता येईल काय याची चाचपणी सुरु आहे.
शाळेतल्या बाबतीतही ऑनलाईन शिकविणे वगैरेच्या चर्चा वाचत आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी तेही पर्याय चाळून पाहात आहे. आपल्याकडे दुरस्थ शिक्षण पूर्वी होतेच. काही दिवस कोरोनाचा कहर कमी होईपर्यंत तरी ऑनलाईन शिकविणे हाच पर्याय दिसतो. आता ऑनलाईन शिकणे, शिकविणे सुरु आहे. विद्यार्थ्यांना सध्या शाळांमधून पालकांच्या वाट्सॅपवर पाल्यांना अभ्यासक्रम पाठविला जात आहे. आणि शंकाही ऑनलाइन विचारणे सुरु आहे. एक पालक असल्यामुळे हेही माहिती आहे. परिक्षा न घेता आमचाही पाल्य पुढील वर्गात ढकलला गेला आहे. पाल्य सांगितलेला अभ्यास करीत आहे.
आम्हीही झुम अॅपद्वारे मिटींग्स अटेंड करीत आहोत. वर्गातले शिकविणे आणि ऑनलाईन शिकविणे हा पुन्हा नवा विषय. सध्या तरी वर्क फ्रॉम होम आहे, पुढे जे काही घडेल ते धाग्यात येऊन सांगूच.
-दिलीप बिरुटे