Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सातवा) ३१.१०.२०१९ सिरा ते बंगलोर

स
सतीश विष्णू जाधव
Sun, 05/24/2020 - 12:07
💬 4
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सातवा) ३१.१०.२०१९ सिरा ते बंगलोर सायकलिंग सिराच्या सरकारी गेस्ट हाऊस मधून सकाळी साडेपाचला राईड सुरु झाली. सकाळची सायकलिंग अतिशय आल्हाददायक होती. पूर्व दिशा हळूहळू तांबूस रंगप्रभेने आरक्त होऊ लागली. आकाशांत ढगांचे बागडणे सुरू होते. आज अभिजित आणि दीपक सर्वात पुढे होते. ब्लुटूथ स्पीकरवर सकाळची आवडती गाणी लावून त्यांची रपेट सुरू होती. मागोमाग मी आणि लक्ष्मण मोबाईलवर पहाटेची भक्तीगीते लावून, भक्तिरसात न्हात राईड करत होतो. आमच्या मागे विकास, नामदेव आणि सोपान मार्गक्रमण करत होते. आता सुरू झाला प्रकाश कवडश्यांचा खेळ. काळ्या पांढऱ्या ढगाबरोबर प्रकाशाचे इंद्रधनुष्यी रंग लपंडाव खेळू लागले. . धरणीवर येणारे कवडसे सप्तरंगाची उधळण करीत होते. पावसाळी वातावरणात पहाटे सायकल चालविणे म्हणजे प्रकाश किरणांच्या निसर्ग मार्गावरून स्वर्गारोहण करण्यासारखे होते. सर्व सवंगड्यांची साथ साथ सफर सुरू होती.१५ किमी वरच्या सिरा टोल प्लाझाला तासाभरात पोहोचलो. टपरीवर नानखटाई, केक आणि मसाला चहा घेतला. सर्वजण एकत्रच होतो. पुढची राईड सुरू झाली. आज लक्ष्मण जोरात होता. सर्वांच्या पुढे सायकलिंग करत होता. सोपान आणि विकास सर्वांना घेऊन येत होते. नामदेव माझ्याबरोबर सायकलिंग करत होता. नामदेवची पेडलिंग करताना एक विशिष्ट लकब होती. त्याचे दोन्ही खांदे पेडलसह वरखाली व्हायचे. 'चढावर कोणते गियर लावायचे', नामदेवने मला विचारले. 'पुढचा दोन आणि मागचा पाच हे आयडल गियर असतात. पण तुमच्या पायावर किती प्रेशर येते, त्या प्रमाणे गियर बदलणे गरजेचे असते. तुमचे मोशन कायम राहण्यासाठी, एकाच गतीने पेडलचे स्पिनींग आवश्यक असते, त्यामुळे दमछाक होत नाही. चढावर न थांबता, न थकता सायकलिंग करणे यासाठी हे स्पिनींग टेक्निक वापरतात. मनाली-लेह सायकलिंग मध्ये युथ हॉस्टेलच्या शैलेशने हे टेक्निक मला शिकवले होते', मी नामदेवाला म्हणालो. वाटेत बंगलोर १०० किमी माईल स्टोन लागला. . लक्ष्मण थोडा पुढे राईड करत होता. "बंगलोर", एक महत्वाचा टप्पा शंभर किमी अंतरावर म्हणजे मुंबई वरून जवळपास ९०० किमी अंतर आम्ही पार केले होते. आनंदाला पारावर नव्हता. सायकलने अप्रतिम साथ दिली होती. आज तिला माईल स्टोनची गळाभेट घ्यायची होती. . सायकलचा आनंद माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. पाणी पिऊन माईलस्टोनला नमस्कार करून पुढची राईड सुरू झाली. आज माझ्यासाठी हा माईल स्टोन निसर्ग होता. पुन्हा ढगांनी आभाळ भरून आले. हळूहळू त्यांनी सूर्यावर आक्रमण केले. . पांढऱ्या ढगांपाठोपाठ काळेजर्द मेघ हत्तीच्या कळपासारखे आकाशावर चालून गेले. पावसाचे निशाण फडकू लागले. आम्ही आक्रमणाची वाट पाहत होतो. पण वाऱ्याचा पलटवार; त्या मस्तवाल मेघांना भारी पडला. ते उन्मत्त हत्तीसारखे मेघ; सैरावैरा पळू लागले. . निसर्गाचा हा लपंडाव मी स्तिमित होऊन पहात होतो, भान हरपून. साठ किमी वरच्या दुसऱ्या टोल नाक्यावर दहा वाजता पोहोचलो. मस्त लुसलुशीत डोसा, मिरचीची भजी, सोबत बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा घातलेले सांबर आणि केसरी रंगाची खोबरे चटणी ह्या नास्त्यावर आडवा हात मारला. आज आमचा अकाऊंटंट नामदेव रंगात आला होता. सर्वांबरोबर सेल्फी काढत होता. . सायकल सोबत सुद्धा त्याने सेल्फी काढला. त्याच्या चेहऱ्यावरील निर्मळ हास्य बरेच काही सांगत होते. सकाळीच बायकोबरोबर गप्पा मारल्या होत्या त्याने, तीला सर्व सेल्फी पाठवायचे होते. . आणखी पंधरा किमी सायकलिंग केली. जवळपास ८० किमी राईड झाली होती. वाटेतील छोट्या टपरीवर उत्तप्पा इडली सांबर आणि चटणीचा आस्वाद घेतला. लक्ष्मणने आज मसाला डोसा खाल्ला. या डोस्याच्या तव्यावर अंडी तळतात, म्हणून लक्ष्मण कुठेही डोसा खात नव्हता. खाता खाता नामदेवने सर्व सेल्फी बायकोला पोष्ट केल्या होत्या. वातावरण अजूनही पावसाळी आणि ढगाळ होते. परंतु पाऊस पडत नव्हता. कदाचित आमची प्रदूषण मुक्तीची राईड सुखरूप आणि प्रशस्त व्हावी, यासाठीच वरुण राजाने न बरसण्याचे फर्मान काढले असावे. . बंगलोरचा नाईस हायवे अजून ४० किमी होता. तेथून पुढे ३५ किमी सायकलिंग करायचे होते. माझ्यासह लक्ष्मण, दिपक आणि अभिजित यांनी जोरदार मुसंडी मारली आणि नाईस हायवे जवळ पोहोचलो. हा हायवे प्रायव्हेट आहे. BOT (Built, Own & Transfer) तत्वावर, हा हायवे ३४ वर्षाच्या करारावर नाईस संस्थेने बांधला आहे. ३४ वर्ष, टोल वसुली नाईस संस्था करणार आहे. यामुळे बंगलोर मुख्य हायवेची रहदारी बऱ्याच अंशी कमी झाली आहे. परंतु हा रस्ता सायकलसाठी निषिद्ध आहे. नाईस टोलनाक्यावर पोहोचताच, तेथील सिक्युरिटी गार्ड अक्षरशः आम्हाला हाकलून लावत होते. दिपकची फोनाफोनी चालू झाली. काय आश्चर्य ! ! थोड्या वेळातच मुख्य सुरक्षा अधिकारी रंगनाथ धावत आला. तुम्ही एकून कीती जण आहात. मागची मंडळी किती वाजता येतील, याची चौकशी केली. दिपकची चक्रे फिरली होती. मगाशी हाकलवून लावणारे गार्ड आम्हाला पाणी देऊ लागले. आम्हाला बाजूच्या रेस्टरूममध्ये थांबायला सांगितले. थोड्याच वेळात सोपान, विकास आणि नामदेव नाईस हायवेला आले. मग काय, पोलीस एस्कॉर्ट मध्ये, त्या 42 किमीच्या नाईस रोडवरून आमच्या सायकली धावू लागल्या. . दिपक पोलीस व्हॅन मध्ये बसून थांबलेल्या आणि बाजूने जाणाऱ्या गाड्यांना सूचना देत होता. सायकलींची शाही सवारी निघाली होती. अफलातून दिपकमुळे सायकलींना नाईस रोड पाहता आला. दिपकने बंगलोरच्या होम मिनिस्ट्री मध्ये फोन लावला होता. त्यामुळेच त्या हायवेवरून राईड सुरू झाली. क्या बात है, दिपक!!! आम्ही नाईस रोड वरून मध्येच बांनारकट्टा एक्झीटला बाहेर पडलो. तेथून तडक कनकपुरा पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तेथील वरिष्ठ पोलीस अधिकारी रवी सरांनी नाईस रोड बाबत आम्हाला मदत केली होती. सायंकाळी सहा वाजता कनकपुरा भागातील तीन स्टार 'सिंदूर गार्डन हॉटेल' मध्ये पोहोचलो. . आज १५५ किमी राईड झाली होती. आमची रहायची आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा पोलीस अधिकारी रवी सरांनी केली होती. या हॉटेलच्या रेस्टॉरंट मधील मासे आणि टायगर कोळंबीने जेवणात बहार आणली. रात्री आम्हाला आवर्जून भेटायला आले, पोलीस अधिकारी रवी सर. बंगळूरमध्ये आमचे जंगी स्वागत झाले होते. या हॉटेलवर, दिपकचा आणखी एक घनिष्ठ सायकलिस्ट मित्र 'सलीम' आमच्या भेटीला आला होता. या सलीमने १९९७ मध्ये बंगलोर ते हज सायकलिंग केले होते. मुंबईत व्हिसासाठी दिपकने सलीमला मदत केली होती. ती ओळख अजूनही सलीमने ठेवली होती. त्याने खास आमच्यासाठी 'चिकन 65' ही मुघलाई डिश आणली होती. आणखी एक खासियत पाहायला मिळाली, दिपकची. कोणत्याही मोठया हॉटेलमध्ये बाहेरील पदार्थ निषिद्ध असतात. दिपकने रेस्टॉरंटच्या मुख्य कप्तानाला सांगितले, 'सलीमने आमच्या प्रेमाखातर चिकन 65 आणले आहे. पण तुमचा नियम आम्हाला मोडायचा नाही, तुम्हीच सांगा काय करू'. दिपकची हे मिठास बोलणे ऐकून आम्हाला सलीमची डिश खायची परवानगी मिळाली. रात्रीचे बंगळूर जबरदस्त भावले. सलीम सारखा झकास मित्र मिळाला. मस्त वाटला सलीम. त्याच्या सोबत युरोप सायकलिंग करायची इच्छा आहे. नाईस रोड, पोलीस अधिकारी रवी सर, सलीम ही मंडळी आणि आजच्या सफरीतील निसर्ग; 'बंगळूर' बरोबर कायम स्मरणात राहील. ध्यानीमनी नसताना आजची सायकल सफर, अतिशय आल्हाददायक, पाऊस विरहित आणि बंगलोरच्या प्राईम रस्त्यावरून झाली होती. दुपारी उन्हाचा दाह सुद्धा जाणवला नव्हता. आज निसर्गाचा वरदहस्त आमच्यावर झाला होता. सातव्या दिवशीच हजार किमी अंतर पादाक्रांत केले होते. आयुष्यातील पहिली मोठी राईड दोस्तांच्या साथीने भन्नाट अनुभवली होती. पुण्यात प्रथमच भेटलेले दोस्त आता माझ्या जिवाभावाचे मित्र झाले होते. एखाद्या व्यक्तीला मित्र म्हणून स्वीकारायचे असेल तर त्याला सोबत, सायकलिंगसाठी न्या. दिवस रात्र एकत्र राहिल्यावर त्याचे मूळ स्वभाव आपल्याला समजतात. यातून झालेली मैत्री कायमची असते. त्यांची ओळख खूप जुनी आहे, असेच मग प्रतीत होते. आजचा दिवस दिपकचा होता. हॅट्स ऑफ दिपक !!! सतीश विष्णू जाधव

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3926 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Sun, 05/24/2020 - 14:54 नवीन
वा भारी...
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 05/25/2020 - 12:32 नवीन
धाडसी प्रवास .. सुरेख वर्णन .
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 05/25/2020 - 22:08 नवीन
सर्व भाग वाचले. प्रवास भन्नाट झाला असणार. सायकल प्रवासात भाग घेतल्या सर्वच सहकार्यांची ओळख करुन नाही दिली आहे. का माझ्याकडुन वाचायचे राहिले?
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 05/26/2020 - 11:38 नवीन
अतिशय सुरेख वर्णन. प्रकाशचित्रे प्रोसेस न करता टाकलीत तर अधिक आकर्षक वाटतील. वैम. तसेच त्यांच्या वरील कॅप्शंस प्रकाशचित्रांवर न देता खाली दिल्यास अधिक परिणामकारक वाटतील. पुनश्च वैम. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा