कविता आणि गजल दोन वेगवेगळे प्रकार आहेत.
मिपावर काव्यलेखन स्पर्धा २०२० आयोजीत केली आहे. हे वाचून मनापासून आनंद आला.
सांप्रत काळात कवी आणि कवितांना इतर साहित्यप्रकारापेक्षा कमीपणाचे लेखले जाणे हे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. "मला कवीता समजत नाही तरीपण वाचून मी प्रतिसाद दिला" - असे लिहीणे एकप्रकारे उपकार केल्यासारखे वाटते.
या पार्श्वभुमीवर मिपाने कवितांची स्पर्धा आयोजीत करणे अभिमानास्पद आहे.
सदर स्पर्धेतल्या कविता वाचल्या. त्यात कवितांचे सर्व प्रकार आहेतच पण गजल देखील समाविष्ट आहे.
माझ्या मते गजल हा काव्यप्रकार इतर काव्यप्रकारांपासून निराळा आहे. गजल ही तिच्या प्रकृतीनुसार अधीक अचूक आणि व्याकरणातील सक्षम असावी लागते. ( असे गजल अभ्यासकांचे मत आहे.) त्यामुळेच गजल लिहीणे आणि समजणे, चर्चा करणे जास्त प्रतिष्ठेचे समजले जाते. कला शाखा आणि विज्ञान शाखेत जी चढाओढ असते तेच येथे अपेक्षीत आहे.
अनेक काव्यवाचन स्पर्धांत गजला या गावून सादर केल्या जातात. त्यातील शेर मनाला भिडणारे असतात. त्यामुळे इतर काव्यप्रकारांतून गजल या काव्यप्रकाराला तेथे अधिक मान्यता मिळते. अशा मिश्र काव्यप्रकाराच्या सादरीकरणात गजल ला जास्त बक्षिसे आणि वहावा मिळाल्याचे मी स्वत: अनुभवले आहे.
प्रश्न गजल आणि इतर काव्य यांच्या द्वंदाचा नाहीये. हे दोन भिन्न काव्यप्रकार आहे. गजलेची प्रकृती निराळी आहे. दोन्ही काव्यप्रकार त्या त्या जागी श्रेष्ठ आहेत. यात कोणा एका काव्य रचनाकाराची बुद्धी श्रेष्ठ आणि दुसर्याची कनिष्ठ असे समजायला नको. परंतु ते तसेच होते. मिश्र काव्यप्रकार असतील तेथे गजल करणारे बाजी मारतात. त्यांचे सादरीकरण चांगले असते. त्यामुळे परिक्षकांवर त्यांची छाप पडते. गजलेला प्राप्त झालेले प्रतिष्ठेचे वलय इत्यादी गुण यावेळी उपयोगी पडतात. वास्तविक पाहता इतर काव्यप्रकारही तितक्याच ताकदीचे असतात.
काव्यमंचावर केवळ गजलेचे सादरीकरण असणारे कार्यक्रम नेहमी होत असतात. तेथे इतर काव्यप्रकार सादर होत नाहीत किंवा होवू दिले जात नाहीत. परंतु नेहमीच्या काव्यस्पर्धांत किंवा कविसंमेलनात इतर काव्यप्रकारांसोबत गजल देखील विनासायास समाविष्ट केली जाते नव्हे ती बक्षिसासदेखील पात्र ठरते. मिपावरील सध्याची काव्यस्पर्धा २०२० मध्येदेखील गजल आणि इतर काव्यप्रकार येत आहेत ही याचीच साक्ष आहे.
इतर काव्यप्रकार आणि गजल यामध्ये वाद घालून श्रेष्ठ कनिष्ठ असा प्रकार नसावा. दोन्ही साहित्य भगीनी आहेत. काव्याचे अलंकार आहेत.
मिपावर कविता आणि गजल असे दोन स्वतंत्र प्रकार (विभाग) असावेत असे मला वाटते. दोन्ही आपआपल्या जागी श्रेष्ठ आहेत. इतर संस्थळावर असल्या दोन्ही प्रकारांसाठी निरनिराळे विभाग आहेत.
या काव्यस्पर्धेत परिक्षक गजल आणि इतर काव्यप्रकार असा भेद परिक्षक करतील ही अपेक्षा.
(हे सारे लिहून एका वादाला सुरुवात केल्यासारखे वाटते आहे.)
छंदबद्ध नसल्यास शब्दरचना ही कविता नाहीह म्हणजे लग्न न झालेली माणसे, नपुसंक असतात असे म्हणण्यासारखे आहे.. गझल आवडते मला.. खुप आवडते.. पण वृत्त नसलेल्या कविता हि तितक्याच जवळच्या वाटतात.. भावनेच्या त्या जसेच्या तसे रूप वाटते.. पण वृत्तात लिहिले पाहिजे, वृत्त पाहिजेच हि अवाजवी मागणी करणारे.. शब्दा वर हि हक्क गाजवू लागतात तेंव्हा? मग ती गझल असु वा निव्वळ कविता.. त्याचे काय..ज्यावर अहंकार चिकटतो.. तो संपतो असे आपले मत.. शब्द हे शब्द असतात...ते प्रेमिका च्या गळ्यात हि हार बनतात.. कोठ्यावर हि फुलेच बरसवतात.. घरात असता ते तिथे हि फुलांचा वर्षाव करतात.. पण म्हणून कोणी फुलांचा बाजार मांडून, तीच खरी फुले असे म्हणत असेल तर अवघड आहे...