लॉकडाऊन : छत्तीसावा दिवस..
लॉकडाऊन धागे मालिका एकवीस दिवस पूर्ण झाले की संपेल असं सुरुवातीला वाटलं होतं. लॉकडाऊन वाढल्याने आणि उत्स्फूर्तपणे लेख येत गेल्याने ती चालू राहिली आणि तशी राहण्यात एक महत्वाचा फायदा म्हणजे.. आता यात "फायदा" कसला हेही खरंच, पण तरी.. जसेजसे दिवस वाढताहेत तसा तसा एक ताण म्हणा किंवा परिणामांची तीव्रता म्हणा, बदलत चालली आहे. अगोदर करोना आणि लॉकडाऊनबद्दल हलकं फुलकं लिहिता येत होतं. ते दिवसेंदिवस अवघड होत चाललंय.. आणि ही छटाही कदाचित मालिका वाढेल तशी तशी नोंदवली जात जाईल हा फायदा.
"करोना हा विषय अजिबात न काढता आजचा दिवस बोलूया" किंवा "अति झालं सगळीकडे करोना करोना.. दुसरं काहीतरी बोला आता' असे विचार लोकांच्या मनात आणि संदेश सर्व गप्पांत येऊनसुद्धा प्रत्यक्षात "तो" विषय पूर्ण सोडून काही बोलणं जवळपास अशक्य झालं आहे इतका तो सर्वस्पर्शी बनला आहे.
वेगवेगळे पदार्थ, त्यांच्या रेसिपी देऊन घेऊन झाल्या, की गाडी पुन्हा करोनाकडे वळते. त्या पदार्थासाठी लागणारा एखादा घटक उपलब्ध नसल्याने पुन्हा लॉकडाऊनच्या वळचणीला पाणी जातं. किंवा हा पदार्थ सहज उपलब्ध असलेल्या घटकांपासून बनवता येतो अशी पार्श्वभूमी असते, कारण पुन्हा एकदा लॉकडाऊन..
व्यायाम प्रकार.. कारण आता तुम्ही घरी आहात.. लॉकडाऊन
रामरक्षा, शुभंकरोती यांची आठवण आणि रेग्युलर उजळणी अनेकांनी सुरू केली आहे. हाही करोना इफेक्ट.
जे एरवी करत नाही किंवा विसरून गेलेले असतो ते आवर्जून करायला लागणं म्हणजेच लॉकडाऊन.
मधल्या काळात आकडे झपाट्याने वाढताहेत. काही अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी दिसतात. जनता हळूहळू तापायला लागली आहे. रिकामपणा, कंटाळा ही समस्या सुखवस्तू लोक उपरोक्त प्रकारांनी सोडवू पाहात असले तरी ज्या बहुसंख्य लोकांना "कंटाळा" याहून खूप मोठ्या वेगळ्याच समस्या पडल्या आहेत ते आता हळूहळू आक्रमक होत चाललेत, नसतील ते होण्याची शक्यता आहे.
अजून संपूर्ण वस्तीला किंवा मोठ्या प्रमाणावर संशयित रुग्णांना उचलून गावाबाहेर किंवा अन्यत्र तात्पुरत्या कॅम्पमध्ये सक्तीने घेऊन जाणं इथपर्यंत वेळ आलेली नाही. त्याचीही झलक तुरळकपणे आलीच आहे म्हणा.
आणखी काय काय होतंय?
एक.. पगार कपात सुरू झाली आहे. खुद्द स्वतः धरून अनेक क्षेत्रातले मित्र एकेक करून ही वस्तुस्थिती पचवते होत आहोत. जे जे दूर होतं, असं भासत होतं ते अगदी स्वतःच्या गळ्याशी आल्याची ही जाणीव आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आता दुसऱ्या देशाऐवजी किंवा दुसऱ्या शहराऐवजी स्वतःच्या शहरात, इतकंच नव्हे तर अगदी गल्लीत, शेजारच्या सोसायटीत, नातेवाईक किंवा पलीकडच्या मित्राच्या कंपनीत आढळताहेत. पुन्हा एकदा.. इनव्हलनरेबिलिटी हा स्वभावदोष ("संकटे येतात ती इतरांवर, माझ्यावर? कब्बी नय") ढासळून पडला आहे, फॉर गुड..
दोन.. वर्क फ्रॉम होम आणि स्कूल फ्रॉम होम या गोष्टी, ज्या भारतीय पद्धतीत कधीच बसत नव्हत्या त्या सुरू झाल्या आहेतच पण त्याउपर जाऊन आता अनेक कंपन्यांमध्ये तो कायमचा प्रकार होतो आहे. अगदी करोना संकट टळलं तरी पुढे घरूनच काम होईल हे पुष्कळ कंपन्यांनी जाहीर केलं आहे. आपल्या देशात यापूर्वी असे प्रयोग करायला कोणी धजतच नव्हते. वर्क फ्रॉम होम म्हणजे कामचोरीच, वर्क फ्रॉम होम म्हणजे सुट्टीच अशी घट्ट समजूत होती. ढुंगणावर सदैव हंटर असल्याशिवाय आपले लोक कामच करणार नाहीत या समजुतीतून हे कामगार - मुकादम कल्चर शेकडो वर्षं बहरलं होतं. आता बळेच लोकांना घरून काम करू द्यावं लागलं आणि नव्याने साक्षात्कार झाला.. आता कंपन्या मोठी मोठी फ्लोअर स्पेस असणारी ऑफिसेस "सरेंडर" करून भक्कम भाडं वाचवून मोठं "ओपेक्स" सेव्हिंग करु जाताहेत.
तीन.. लॉकडाऊन हा आपली मेडिकल सिस्टीम सज्ज करण्यासाठी वेळ मिळवण्याचा (बाईंग टाईम) उपाय आहे. त्यामुळे करोना फैलाव तेवढा काळ मंदावेल पण त्यामुळे पुढे करोना टळेल आणि आपल्याला होणारच नाही अशी एक समजूत अनेकांची आहे. श्रीमंत वस्त्यांतले सुखवस्तू लोक "अरे रहा ना घरात, कशाला मरायला बाहेर पडताय, यांना गोळ्या घालायला हव्यात" वगैरे म्हणत छंद जोपासत, ऑनलाइन पोस्ट टाकत, व्हाट्सएप गप्पा मारत दिवस काढताहेत. पण ज्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे ते लोक कधी ना कधी रस्त्यावर येणार हे त्यांना समजत नाहीये. लॉकडाऊन अधिकाधिक वाढत गेला तर अधिकाधिक बेरोजगारी आणि अधिकाधिक नॉन-करोना मृत्यू होणार हे कटु सत्य आहे.
चार.. प्रत्येक नवीन केसची ब्रेकिंग न्यूज. इन्फेक्शन होणे या अतिशय शक्य आणि अपेक्षित घटनेशी वेदनादायक स्टिग्मा जोडला जाणं.. लस निघून सर्वांना मिळेपर्यंत कधी ना कधी आपल्याला, म्हणजे बहुतांश लोकांना करोना होण्याची शक्यता न होण्यापेक्षा खूपच जास्त आहे. केवळ रुटीन सुरू होण्यानेही हे होणारच आहे. दीर्घकालीन लॉकडाऊन नक्कीच जास्त जीवघेणा आहे. तेव्हा रोग झालेले आणि न झालेले असे दोन मोठ्ठे सामाजिक वर्ण तयार होताहेत हे भयंकर आहे.
वृत्तनिवेदक किंवा निवेदिका फसफसत्या उत्साहाने चीत्कारत असतात: "बुलढाण्यातून (किंवा यवतमाळमधून किंवा औरंगाबादहून) आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज येतेय.. आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. आपल्यासोबत आमचे वार्ताहर... काय परिस्थिती आहे तिथे?"
गावोगावची रुग्णसंख्या सांगताना "तब्बल","कहर","थैमान" असे शब्द सर्रास येत आहेत. काल आठशे नवीन सापडले होते, आज चारशे सापडले तर नवीन रुग्णसंख्या कालच्यापेक्षा चारशेने कमी आहे असं न म्हणता "तब्बल चारशे" असा उत्तेजित उल्लेखच होतोय. सगळे चॅनेल्स लालभडक पार्श्वभूमीवर ब्रेकिंग ब्रेकिंग करत आहेत. एखाद्या नवीन गावात, शहरात, वस्तीत, सोसायटीत या बातम्या पाहणारे जे रहिवासी असतील त्यांना धडकी भरतेय की मला ताप खोकला झाला तरी मी घरात मरणं परवडेल पण आपल्या गावात आपण ही "ब्रेकिंग न्यूज" बनायला नको. सगळ्या वस्तीचा रोष नको. सर्व निरोगी वातावरणाला आपण नासवलं ही अपराधी भावना मरणाहून वाईट.
लोक नक्कीच लक्षणे लपवत असू शकतील. अंगावर दुखणं काढून अधिकच फैलाव करत असू शकतील. हे मत अनेक तज्ञ लोकांनीही व्यक्त केलंय. मीडियातून होणारं प्रेझेंटेशन पूर्ण बदलून उलट लोकांना तपासणी करून घ्यायला धीर येईल अशी मांडणी यायला हवी आहे. तुम्हाला हा रोग झाला तर याचा अर्थ तुम्ही आसपासची सोसायटी किंवा समाजाचा घात केलात, किंवा तुम्ही अढीतला नासका आंबा निघालात अशी भावना होऊ देऊ नका. हा आजार नवीन आहे म्हणून अधिक खबरदारी आवश्यक आहे, पण ते इन्फेक्शन आपल्या सर्वांपासून वाटतं तेवढं दूर नाही आणि मोअर प्रॉबेबल दॅन नॉट, आपल्याला ते होणार आहे.. आणि इट्स ऑलराईट.. अपराधी होऊ नका.. हे मनावर ठसवणारं वार्तांकन गरजेचं आहे.
सर्वांची मतं आणि तुम्ही निरीक्षण करत असलेल्या घडामोडी इथे नक्की नोंदवा. पुढे या जिवंत, त्या त्या क्षणी केलेल्या नोंदी कोणालातरी खूप मौल्यवान वाटू शकतील.
काळजी घेऊया, धीर धरूया, समजून घेऊया, शांत होऊया.. जमेल तितकं, जमेल तसं.. फॉर धिस टू शाल पास.
गविशेठ, उत्तम विचार उत्तम लेखन. आता आपणही लॉकडाऊनच्या व्यवस्थेत मॅच्युअर होत गेलो आहोत. आपण म्हणालात तसे अनेकविध प्रश्न आता समोर आले आहेत. वर्कफ्रॉम होममुळे ऑफिसेसचा खर्च करायचा कशाला असा एक फंडा भविष्यात येऊ शकतो. दूर राहूनही मूकरदम तुम्हाला उत्तम प्रेशर मधे ठेवतो आणि काम करवून घेतो तर भविष्यात असेच असेल. वेतन तर नक्की कमी करणार यात काही वाद नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि उत्पादन क्षमता आणि व्यापार कमी झाल्यामुळे आता यापुढे आपणास इतके वेतन देणे पुरणार नाही असे मेसेज यायला सुरुवात होईल. आपण सर्वांनी याचीही मानसिकता पूर्ण केली पाहिजेच. कायम काहीच नाही.
सालं ब्रेकींग न्युजही भयंकर डोकेदुखी झाली आहे. महत्वाची बातमी, एक मोठी बातमी येत आहे. अशा वेळी त्यावृत्तनिवेद्कांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आपल्याला टीव्हीवर बसवून ठेवण्यासाठी पूर्ण कसब वापरतत असतात. अत्यंत महत्वाची बातमी म्हणून सकाळची कोणती तरी एक बातमी आपल्याला रिपीट मारत असतात. आपणही आता हे सर्वबेफिकिरपणे बघायलाच हवे, नाही केलं तर आपण आपले आजार वाढवून घेऊ असे वाटते.
बाकी, अखेर लॉकडाऊन किती दिवस ? एकदिवस ही जगरहाटी आपल्याला सुरुच करावी लागणार आहे. अचानक आज रात आठबजहसे लॉकडाऊन अब नही रहेगा असे म्हणून चालणार नाही. एक नियोजन आवश्यक आहे, जगरहाटी तुम्हाला हळूहळू पूर्ववत करावी लागणारच आहे .एकदम सुरु झालं तर असंख्य रुग्ण वाढणारच आहेत आणि जनजीवन सुरळीत होईल तेव्हाही रुग्णसंख्या वाढणारच आहेत. एक नियोजन जिथे रुग्णसंख्या कमी आहे, तिथे दक्षता घेऊन तुम्हाला नियमित कामकाजाला सुरुवात करावीच लागणार आहे, तसे न केल्यास भविष्यात अनागोंदी होणार आहे. नोक-या वेतन यावर गदा आली की नियमित आयुष्याची नौका डगमगायला लागते. आणि अशी काही चित्रं दिसायला लागली आहेत.
बाकी, आपण म्हणता तसे कोणी संशयीत रुग्ण असेल, सोसायटीत कोणी आढळलं की त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा सकारात्मक हवा. आपण त्याच्याकडे कोणी दहशतवादी आपल्याकडे आलाय असे पाहात आहोत, हे बदलायलाच हवं. आज एक डॉक्टर की परिचारिकेचा व्हीडीयो पाहण्यात आला. बर्याच दिवसानंतर ती दवाखान्यात सेवा करुन आल्यानंतर घराच्या दरवाजात पोहचली तेव्हा सोसायटीचे लोक स्वागतासाठी गेटवर जमले. सोसायटीच्या लोकांनी कुटुंबानी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला, टाळ्या वाजवून स्वागत केलं ते दृष्य पाहून डोळ्यात पाणी आलं.
आज मिपावर यायचाही मूड नव्हता. गलपटलेली फिलिंग यायला लागली आहे. उगाचाच 'आज उदास उदास गं पांगल्या सावल्या' असे वाटायला लागते. च्यायला, आयुष्यातली कंपलसरी विश्रांती इतकी भयानक असे वाटले नव्हते. पण यह भी दिन बदल जायेंगे यावर विश्वास आहे, दिवस बदलत असतात. गविंच्या धाग्यामुळे पुन्हा लिहावेच वाटले. धन्स.
-दिलीप बिरुटे