लॉकडाऊनः पस्तिसावा दिवस
खरं बोलायचं झालं तर मी या लॉकडाऊनचे आभार मानतो. त्याचे कारण असे आहे कि बऱ्याच दिवसांनी, नेमकं सांगायचं तर साधारण अडीच तीन वर्षांनी काही तरी वाचायला किंवा इतर काही छंद वगैरे पुन्हा नव्यानं जोपासायला हाताशी मोकळा वेळ मिळालाय ह्या लॉकडाऊनमुळे.
साधारण फेब्रुवारीच्या मध्यापासूनच या कोरोनाच्या संकटाचे पडसाद व्यावसायिक आयुष्यात डोकवायला सुरुवात झालेली होती परंतु का कुणास ठाऊक 'आपल्याकडे काही होत नसतंय' हि एक बेफिकिरीची भावना मनात होती हे नाकारण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मार्च एंडला गाठायचा मनाशी ठरवलेला आकडा गाठण्याची धावपळ सुद्धा जोमाने सुरूच होती.
साधारण मार्चचा पंधरवडा उलटून गेल्यावर धोक्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली आणि त्यानुसार हालचाली सुरु केल्या परंतु तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली होती. ज्या काही ऑर्डर्स मार्चच्या शेवटच्या आठवड्यात डिस्पॅच करायच्या होत्या त्या बोंबलल्या होत्या. वेळ अशी होती कि कारखान्यात तयार असलेल्या उपकरणांपैकी जवळपास सत्तर टक्के उपकरणे हि मार्च मधेच पुरवायची होती आणि उरलेली एप्रिल मध्ये पुरवायची होती. आमच्या नेहमीच्या पद्धतीने डिस्पॅच आधी क्लायंट व्हिजिट होते, नंतर त्यांचे क्वालिटी इंजिनियर येऊन इन्स्पेक्शन वगैरे करून मग उपकरणाला हिरवा कंदील दाखवतात. परंतु तोपर्यंत बऱ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना प्रवासाला मनाई केलेली असल्याने कुणी येऊ सुद्धा शकत नव्हते आणि म्हणूनच मी हि सगळी उपकरणे अनिश्चित काळासाठी बोकांडी घेऊन बसणार होतो अशी चिन्हे निर्माण व्हायला लागली होती.
झाले असे होते कि स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यापासूनचे हे तिसरे आर्थिक वर्ष होते आणि गेल्या दोन वर्षात मिळून जितका धंदा झाला होता त्याहून जास्त या वर्षी जानेवारीपर्यंतच केलेला होता. त्यामुळे साहजिकच आत्मविश्वास दुणावलेला होता आणि काही नवीन प्रोजेक्ट्स अत्यंत कमी वेळात म्हणजेच मार्च एंडला पूर्ण करायचे वायदे करून नव्या ऑर्डर्स मिळवलेल्या होत्या, त्या अनुषंगाने बरीचशी अतिरिक्त रक्कम सुद्धा गुंतवली गेलेली असल्यामुळे जरा ताणच आला होता.
यथावकाश मुख्यमंत्र्यांनी लॉक डाऊन जाहीर केला आणि वीस मार्च रोजी आम्ही कारखान्याला टाळे लावून घरी आलो. त्यानंतर चार पाच दिवस तरी दिवसभर काही ना काही कामे फोनवरून अथवा मेलामेली हि चालू होतीच त्यामुळे वेळ घालवायचा कसा या प्रश्नाची तीव्रता कमी होती. चोवीस तारखेच्या रात्री पंतप्रधानांनी येऊन पूर्ण देश बंद केल्याची घोषणा केल्यावर मात्र खऱ्या अर्थाने सर्व कामे ठप्प होत पूर्ण बंद झाली. घरी बसून करण्यासारखी काही कामे उरलेली तर नव्हतीच. मायबाप सरकारने इन्कम टॅक्स, जीएसटी रिटर्न्स वगैरे धंदे उरकण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली असल्यामुळे त्या आघाडीवरही करण्यासारखे काही नव्हते. कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या पगाराची व्यवस्था लावून मग मी हापिसच्या कामाला क्वारंटाईन करून टाकले. कर्नाटक,आंध्र ,गुजरात, पश्चिम बंगाल वगैरे भागातील आमच्या कस्टमरचे लोकांचे हापिसं बंद होऊन त्यांचे फोन अथवा मेल यायचे बंद झाले आणि आता आपण खऱ्या अर्थाने रिकामटेकडे झाल्याची जाणीव झाली. हि जाणीव गडद करून द्यायला आजूबाजूचे वर्क फ्रॉम होम करणारे आयटीवाले होतेच.
शेवटी ठरवलं कि आपणच आता काही तरी टाइमपास शोधावा. धाकटा बंधू त्याच्या खोलीत कोंडून घेऊन वर्क फ्रॉम होम करतो ते नेमके कसे दिसते हे पाहायला दोन चार वेळा डोकावून झाले, काही ठोस हाताला लागेना मग तिथून काढता पाय घेतला. इकडून तिकडून रिव्ह्यूज गोळा करून नेटफ्लिक्स, प्राईम वर काही मालिका बघायला सुरुवात केली पण शेंडेफळ सतत आजूबाजूला बागडत असल्याने तेही धड बघणे होईना, अर्धे लक्ष टीव्हीकडे अन अर्धे खोलीत कुणी येतंय का याकडे. शेवटी पॉज , रिवर्स अन फॉर्वर्डचा करत बसायचा कंटाळा आला अन ते हि सोडून दिले. वाचायची अर्धवट राहून गेलेल्या पुस्तकांपैकी काही बाहेर काढली आणि वाचायला सुरुवात केली. नेमके त्यात नेमाडेंचे हिंदू हाताशी लागले, मग तासाभराने हे पुस्तक आपण परत कधीच हातात सुद्धा धरायचे नाही असा दृढनिश्चय करून गपगुमान दुसऱ्या पुस्तकांकडे वळलो. घरकामासाठी येणाऱ्या बायकांना सोसायटीने बंदी घातल्यावर मात्र घरातील कामांची विभागणी झाली आणि वेळ पटापट जायला लागला.स्वयंपाक घरात नवनवीन प्रयोग करणे चालू केले. वेळचं वेळ असल्यामुळे चकल्या,चिवडा आणि शंकरपाळे बनवायला शिकून घेतल्या.
चारेक दिवसांनी तारीख वार याचे भान सुटल्यावर काल हा भास आहे हे संक्षींचे म्हणणे आठवले आणि तो लेख उपसून वाचला. त्या दिवशी तारीख पाहिली तर निघाली नेमकी ३१ मार्च. मनाशीच म्हटलं कि च्यायला नेमका काय फरक पडतो राव तारखे फिरकेनी, ज्या तारखेसाठी गेले कित्येक महिने उरस्फोड करून धावत होतो ती येऊन गेलेली सुद्धा कळली नाही आणि आता तर त्याचे काही दुःख सुद्धा नाही. काल हि वस्तुस्थिती नसून कल्पनाच असली पाहिजे यांवर विचार करण्यात दोनेक दिवस गेले.शेवटी त्यातील काही गोष्टी पटायला सुद्धा लागल्या.
पण याचा अर्थ असा होत नाहीये कि विरक्ती वगैरे येतेय किंवा हे सर्व मिथ्या आहे असे वाटू लागलंय. जसजसा या लॉकडाऊनला सरावात चाललोय तसतसे आपण तर आता हा लॉकडाऊन सुद्धा उपभोगायला लागलोय. म्हणजे माणूस हा चंगळवादी, भौतिक सुखांच्या मागे धावणारा एक उपभोगी वृत्तीचा प्राणी आहे आणि तो त्याच्या मागे पळत राहणार हेचं अंतिम सत्य. कारण उद्या हे निर्बंध हटल्यावर माणसं यंत्रवत परत पळायला सुरुवात करणारच आहेत आणि हा बॅकलॉग भरून काढायला कदाचित पहिल्यापेक्षा जास्त वेगाने.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mere Dil Ka Tumse Hai Kehna ( Cover) | Armaan | Shankar Ehsaan Loy & Chitra