स्वच्छतेचं सोवळं की सोवळ्यातील स्वच्छता!?
सध्या सोशल मीडियावर कोरोना कोविड19 या रोगाच्या अनुषंगाने याप्रकारचं समर्थक लेखन आढळत आहे. यातले भेद ,हेतू दुसऱ्या उदाहरणांवरून दाखवून देणे हा सदर लेखनाचा हेतू आहे.
1)भस्मधारण विधी:- हा विधी धर्मशास्त्रात (शरीर)शुद्धीचा विधी म्हणून(अनेक ठिकाणी) सांगितला गेलेला आहे. सामान्यतः भस्म म्हणजे होमहवनातील आहुती दिलेल्या पदार्थांची राख. या राखेत लाकडं गोवऱ्या तूप तीळ भात दुर्वा असे बरेच घटक जळालेल्या अंश रूपांनी येतात. स्वाभाविकच याचे काही रासायनीक गुणधर्म त्यात असतात. जे शरीराच्या त्वचेला-अंगाला उपकारक/अपकारक असे दोन्ही असू शकतात.आता समजा, समाजात (एखाद्या) त्वचारोगाची साथ आली तर याचा उपयोग झालेलाही दिसून येईल किंवा तेच उलट आणखी त्रासदायकही झालेलं दिसून येईल. या दोन्ही गोष्टींबाबत धर्म व परंपरा ,रूढी इत्यादींचे समर्थन करणाऱ्या लोकांची विधानं अथवा लेखन दिसून येतं. म्हणजे-"आपल्याकडे अश्या गोष्टींची काळजी 'आधीच' घेतलेली आहे." हा त्यांच्या बोलण्यातला कळीचा/महत्वाचा मुद्दा असतो. जे कधीच माहीत नव्हतं त्याची काळजी आधीच कशी घेतली जाऊ शकते? ही सामान्य गोष्ट यात नजरेआड केली जाते. पूर्वेतिहास म्हणून प्लेगची साथ पाहिली तरी तेव्हा ह्या असल्या "आधीच" माहीत असलेल्या गोष्टींचा तेव्हा काहीही उपयोग झालेला नव्हता, अश्या गोष्टी(पुराव्यांसह) दाखवून दिल्या तरी या समर्थन करणाऱ्यांकडून धर्मप्रेमाच्या लालसेपोटी याकडे सम्पूर्ण दुर्लक्ष केलं जातं.
आता गम्मत अशी असते की त्वचारोगाची साथ असेल तर शरीराला जे लोक दररोज भस्म लावतात..त्यांना त्यातील काही घटकांमुळे फायदा झाला असं जरी दिसून आलं तरी भस्म हे त्या त्वचारोगाचं "औषध" ठरत आहि. तो असतो त्यातल्या काही घटकामुळे त्या व्यक्तीला मिळालेला (तिच्या आरोग्याला सापेक्ष असलेला) परिणाम. शिवाय त्वचेला भस्म हे विधीनुसार सगळ्या अंगाला फासल जात नाही.रोगाचा विचार भस्म धारण विधी वाल्या ऋषींनी/व्यक्तींनी केला असता तर तो विधी इलाजाच्या स्वरूपात तयार झाला असता,ही गोष्ट तर नाकबूल करता येत नाही ना? शिवाय काही जणांना याच भस्मानी तो त्वचारोग आणखी वाढलाही असता कारण त्यांच्या त्वचेचा व एकूण शरीराचा जो प्रकार आहे त्यानुसार हे भस्म त्यांना लागूही पडलं नसतं. यावरून तरी ते औषध नव्हतं केवळ त्या काळात वाटलेल्या(धार्मिक) गोष्टींच्या मनोधारणेचा भाग होता हे तर नक्की आहे(ना?)
मग आपल्या धर्मप्रेमापोटी आपल्याला वाटलेल्या अश्या गोष्टींमुळे व त्याचा आपण प्रसार केल्यामुळे आपल्या धर्म,रूढी,परंपरा यांचा अपमान होतो की गौरव!? याच भान का येत नाही? (सूर्यनमस्कारा सारख्या काही गोष्टी ह्या मात्र आरोग्यकारक म्हणूनच जन्माला आलेल्या आहेत.त्याबद्दलचा रास्त मान धर्माला रूढी परंपरेला मिळालेला आहेच. ह्या गोष्टी आमच्या सारखे लोक मुळीच नाकारत नाहीत.)
समजा इमारतीचे जिने चढल्यानी(तेव्हढाच?) व्यायाम(?) होतो असं आपलं म्हणणं असेल तर जिने तयार करण्याचा "हेतू" व्यायाम होणे हा होता की इमारतीत येजा करणे हा होता??? नक्की काय निष्कर्ष काढायचा? आणि स्वतःचा वेगळा व्यायाम न करण्यातला आळस दडवायला लिफ्टला जिन्याच्या हिशोबात पाखंड का ठरवायचं???आणि लिफ्ट पाखंडच ठरवायची असेल तर त्याच आपल्या लाडक्या व्यायामी आयामानुसार, हातानी दरवाजा लावायची लिफ्ट दरवाजे लावता उघडताना खांद्याना व हाताला व्यायाम होतो म्हणून आपोआप उघडझाप होणाऱ्या दरवाजेवाल्या लिफ्टपेक्षा कमी पाखंड समजायची काय??? आपण धर्मप्रेमात वहात वहात जाऊन अजून किती हास्यास्पद व्हायचं आहे?
तसेच जर जिने चढण्यानी-व्यायाम होतो या निष्कर्षाशी आपण प्रामाणिक असू तर मग जेवायला वापराच्या धर्मातल्या प्राणप्रिय पत्रावळीद्रोण,केळीची पाने जाऊन त्याजागी आलेल्या ताट वाटी भांड्यांमुळे जेवणानंतर ती खराब होऊन घासायला लागतात तर त्या भांडी घासण्याचा हात व खांद्याना व्यायाम होतो म्हणून धर्मातल्या पत्रावळी द्रोणा पेक्षा ताट वाटी भांडी(च) योग्य,या त्याच नियमाला धरून काढलेला निष्कर्ष खरा मानायला हवा ना? पण मग मात्र तो निष्कर्ष धर्मातल्या पत्रावळी द्रोणा विरुद्ध जातो म्हणून धर्मप्रेमी मंडळी तो अमान्य करतात.. ही धर्म परंपरांच्या आंधळ्या समर्थनाची रीत नाही,तर दुसरं काय आहे?
(पुन्हा आम्ही असें युक्तिवाद केले की "तुम्ही गुरुजी/पुरोहित असून(?) स्वतःच्याच धर्माविरुद्ध कसे बोलता?" हा मनभावी परंतु अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न येतोच! जणू काही पुरोहित जेव्हढा जास्तीत जास्त अंधश्रद्ध तेव्हढा तो धार्मिक जनतेला अधिक आदर्श,असा या लोकांचा {आत्मप्रतारक} समजच आहे... असो!)
जगातल्या सगळ्या धर्मविधी रूढी परंपरा या तयार होण्यामागची खरी कारणं काय आहेत? यांचा अभ्यास आपण कधी करणार?
जर धर्मातल्या सगळ्या सोवळ्या ओवळ्या कथित साधनशुचितेचा हेतू फक्त स्वच्छता हाच होता तर पूजेला बसताना मग स्वच्छ धुतलेले कपडे हे तेव्हढ्याच स्वच्छ (नेसायाच्या) सोवळ्यापेक्षा कमी दर्जाचे किंवा कट्टर सनातनी मतांनुसार अयोग्य कसे होतात?
मग दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे हेच त्यामागचं मूलभूत अंग आहे,असा आरोप धर्म,रूढी,परंपरा यांच्यावर होतो तो खोटा कसा मानायचा? जर 1+1 याचं धर्मातील,रूढी,परंपरेतील उत्तर 5 अस असेल,तर ते 2 आहे असं दाखवून देणाऱ्यावर आपण प्रतिवादी,शाब्दिक,शारीरिक हल्ला चढवताना आपली(नेहमीच्या कौतुकातली) सहिष्णुता जाते कुठे? (ती कुठेही जात नाही,कारण तीही धर्माच्याच बाजूनी वागणारी आहे. त्या त्यांच्या सहिष्णूतेला मानवता शहाणपण यांच्याशी काहीएक कर्तव्य नाही! हा आमचा गेल्या 22 वर्षातला असल्या धर्म अंध प्रेमी लोकांकडून वादविवादातआलेला अनुभव आहे.)
शेवटी काहीश्या खिन्न व दुःखी मनानी एकच सांगतो -"आपलं मूल चोरी करत असेल तर आईनी त्याला 'तू चोर आहेस.' असं खडसावण हेच खरं अपत्यधर्मप्रेमाचं लक्षण की त्याला पदराआड लपवणं, त्यांचं हेतू न अभ्यासता समर्थन करणं ,हे खरं प्रेम? याचा हिशोब धर्मप्रेमी माणसं करणार नसतील तर गुंडगिरी हाच धर्म होईल व धर्म ही (सगळी) गुंडगिरीच आहे हा आरोप आपोआपच सिद्ध होईल."
जय हिंद!जय भारत!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aithey Aa... :- Bharatहेच सर्व मी करतोतुम्ही काय करता याची कबुली तुम्हीच तुमच्या फेसबुकवरच्या पोस्टमध्ये दिलीत, जी पोस्ट तुम्ही डिलीट केलीत. सांगा बरे, ती तथाकथित सुधारणावादी पोस्ट का डिलीट केलीत?